पंकज भोसले

निक हॉर्नबी हा जगाला गेल्या वीस-बावीस वर्षांत माहीत आहे, तो त्याच्या खूपविक्या पुस्तकांचा लेखक म्हणून. त्याच्या कादंबऱ्यांवर येणारे चित्रपटही गाजले. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ‘बीलिव्हर’ या अकथनात्मक मासिकात २००३ साली त्याचे ‘स्टफ आय हॅव बीन रीडिंग’ हे सदर सुरू झाले. आडव्या-तिडव्या ग्रंथखरेदीसोबत वाचनअजीर्णाच्या अवस्थेतील त्यातील वाचननोंदींचा प्रवास १७ वर्षांनंतरही सुरळीत सुरू आहे. ग्रंथ दिनाच्या सरत्या आठवडय़ात, या लोकप्रिय कादंबरीकाराच्या अकथनात्मक कामगिरीविषयी..

लेखकाचा वाचनव्यवहार हा बहुतेक वेळा अज्ञात असतो. समाजमाध्यमाच्या अतिउपलब्ध साधनांमुळे काही लेखक आपल्या समकालीन वाचकांच्या आवाक्यापलीकडे सुरू असलेल्या वाचनाचे अतिअवडंबर माजवताना सहज दिसतात. तर अनेक बाबींमधील अनाकलनामुळे काहींचे ग्रंथावरील कृतक प्रेमाचे दाखले जागोजागी सांडलेले पाहायला मिळू शकतात. नोकरी, आहार, निद्रा आणि इतर जीवनावश्यक बाबींतून मिळणाऱ्या फावल्या वेळेत पुस्तकाचा नूर आणि ते वाचताना लागणारा सूर यांच्या अपरिहार्य लढाईतून साधारण प्रत्येक ग्रंथोपासकाची वाचनयात्रा घडत असते. ‘बीलिव्हर’ या अमेरिकी अकथनात्मक मासिकाच्या सहाव्या अंकात म्हणजेच सप्टेंबर २००३ मध्ये (अंकाच्या संकेतस्थळावर हा अंक उपलब्ध आहे.) निक हॉर्नबी याचे ‘स्टफ आय हॅव बीन रीडिंग’ नावाचे आगंतुक सदर सुरू झाले. तेव्हा हॉर्नबी जगासाठी कादंबरीकार म्हणून अतिज्ञात होता. पण वाचक म्हणून त्याच्याबाबत मत व्यक्त करण्यास कुणीही धजावू शकणार नाही, इतका त्याचा वावर अल्पकेंद्री होता. जगातील कोणत्याही भल्या-बुऱ्या गोष्टींची यादी करणाऱ्या त्याच्या ‘हाय फिडीलिटी’ या कादंबरीतील नायकासारखी महिन्यातील ग्रंथखरेदी आणि ग्रंथवाचन याचा हिशेब ठेवणारी वाचननोंद त्याच्या पहिल्या सदरामध्ये सादर झाली. बरीचशी उद्धट, बरीचशी स्वत:सोबत भवतालाची आणि जागा दिली त्या मासिकाच्या संपादकीय मंडळाची (या एकसारख्या औपचारिक वागणाऱ्या वर्गाला त्याने ‘पॉलीसिलॅबिक स्प्री’ असे संबोधनही दिले आहे!) फिरकी घेत लिहिल्या गेलेल्या या मजकुरात अधिकाराचा फायदा म्हणून आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या पुस्तकाची शिफारस करण्याची गंमतही त्याने केली. या प्रमादावर पुढल्या महिन्यात संपादकीय मंडळ सदर बंद करेल अशी भीती त्याला होतीच. पण त्याहीपेक्षा सदर लिहिण्यासाठी झालेल्या ‘‘आदल्या महिन्यातील वाचन अतिरेकामुळे या महिन्यात फार तर ‘ग्राफिक नॉव्हेल’मधील तीन पाने आणि ‘डेली मिरर’ वृत्तपत्रातील क्रीडा विभागातील बातम्या वाचण्यापलीकडे कदाचित माझ्याकडून काहीही वाचून होणार नाही,’’ अशी शंका त्याने व्यक्त केली होती अन् एवढय़ाच वाचनावर पुढल्या महिन्यातील सदराचा ऐवज असू शकेल, याची जाणीव त्याने करून दिली होती.

पहिल्या महिन्यात त्याने दहा पुस्तके खरेदी केली होती. ही पुस्तके कोणती, तर दशकांपूर्वी हजारो लोकांनी वाचलेली आणि बऱ्यापैकी चर्वितचर्वण झालेली; पण तोपावेतो त्याच्यासाठी वाचायची राहिलेली. कवी रॉबर्ट लोवेल यांचे इयन हॅमिल्टन यांनी लिहिलेले चरित्र, जे. डी. सॅलिंजर यांचा ‘नाइन स्टोरीज्’ हा कथासंग्रह आणि इयन हॅमिल्टन यांचाच ‘इन सर्च ऑफ जे. डी. सॅलिंजर’ हा वादग्रस्त ग्रंथ. सोबत कवितांची काही पुस्तके, खरेदी केलेली दोन पुस्तके आणि स्वत:च्या साडूने भेट म्हणून दिलेल्या ग्रंथांचे त्याने आदल्या महिन्यात वाचन केले होते. त्या ग्रंथांचा आरपारदर्शक वाचनव्यवहार या पहिल्या सदरामध्ये मांडला गेला. पार्क, हॉटेल, मुलाच्या शौचवेळेत दारावर पहारेकरी म्हणून आसनस्थ असताना झालेले ग्रंथवाचन आणि पूर्णपणे अपंडिती, असमीक्षकी थाटातील त्या ग्रंथांवर मांडलेली चपखल मते यांनी निक हॉर्नबीची वाचक म्हणून या मासिकाच्या सभासदांना ओळख झाली. पुढल्या महिन्यात ग्राफिक नॉव्हेल, क्रीडा बातम्या यांसह पुस्तकांचेही त्याने प्रामाणिक वाचन केले. नंतर कधी त्या महिन्यात घेतलेल्या पुस्तकांपैकी एकही पुस्तक तो वाचत नव्हता. तर कधी ५५ ते ७० टक्के (म्हणजे दहापैकी साडेपाच किंवा सात) संपवून त्यावर खुमासदार शैलीत प्रगट होत होता. लहरीनुसार चार महिन्यांपूर्वी खरेदी केलेला गठ्ठा उकसून त्याचे एखाद्या लेखकाचे अवलोकन सुरू होई, तर एखाद्याने शिफारशीसाठी प्रकाशनपूर्व पाठविलेल्या ग्रंथावर तो भरभरून व्यक्त होई.

आधी या लेखनाची मासिकाच्या सभासद वर्तुळापुरतीच पोहोच होती; पण सदराला एक वर्ष पूर्ण होताच ‘द पॉलीसिलॅबिक स्प्री’ नावाचा या लेखांचा संग्रह आला. दुसऱ्या वर्षी ‘बीलिव्हर’ मासिकाची इतर सदरे बदलली, लेखमांडणीतील संकल्पना बदलल्या; पण निक हॉर्नबीचे ‘स्टफ आय हॅव बीन रीडिंग’ मात्र त्याच्या अनपेक्षित विलक्षण शैलीचा शिरस्ता कायम राखत सुरू राहिले. पुढे या सदरांचीच ‘हाऊसकीपिंग व्हर्सेस द डर्ट’ (२००६), ‘शेक्सपीअर रोट फॉर मनी’ (२००८) आणि ‘मोअर बाथ्स लेस टॉकिंग’ (२०१२) अशी पुस्तके निघाली. आपल्याकडच्या अधिकृत आणि अनधिकृत पुस्तकांच्या बाजारांत निक हॉर्नबीच्या कादंबऱ्या ढिगांनी मिळत असल्या, तरी त्याची ग्रंथांवर मते मांडणाऱ्या लेखनाची ही पुस्तके या दोन्ही बाजारांत जवळजवळ अदृश्य स्वरूपात असतात. म्हणजेच आधीच ती खरेदीसाठी फार संख्येने उपलब्ध नसतात अन् जे ती खरेदी करतात, ते पुन्हा विकत नसल्याने जुन्या पुस्तकांच्या बाजाराला कधी लाभत नाहीत. पण त्याच्या दहा वर्षांतील लेखनाचा अन् आधीच्या पुस्तकातील सर्व लेखांना सामावणारा ‘द टेन इयर्स इन टब : ए डीकेड सोकिंग इन ग्रेट बुक्स’ हा ग्रंथ काही वर्षांपूर्वी उपलब्ध झाल्यामुळे आपल्याकडे ग्रंथप्रेमींना या वाचनव्यापाचा धांडोळा घेता येऊ शकतो. (या मासिकाच्या साऱ्या अंकांमधील लेखांचे हे कुलूपबंद सदर काही महिन्यांपूर्वी वाचकांना मोफत वाचण्यासाठी खुले करण्यात आले आहे!)

लेखक म्हणून आपली वाचकांसमोर असलेली प्रतिमा बिघडेल किंवा वधारेल, याची तमा न बाळगता हॉर्नबीची ग्रंथखरेदी आणि वाचनसोसाची प्रकृती या लेखनात उतरते. चार्ल्स डिकन्स आयुष्यात फारच उशिराने वाचायला घेतल्याचे दु:ख त्याला वाटत नाही. शेक्सपीअरच्या नगरीत राहून तो त्याच्या नाटकांच्या पुस्तकांवरचे आणि त्याच्या लेखनाचे धाडसी वर्णन करण्यास धजावतो. पुस्तकांवर जराही धोपट भाषेत व्यक्त होणे त्याला आवडत नाही. कवितांची पुस्तके आपण विकत घेतो, हे सांगताना तो त्याबाबत एका जागतिक सर्वेक्षणाचा निष्कर्ष देतो. जगात ७२ लोकांपैकी एखादाच कवितेचे पुस्तक खरेदी करतो आणि आपण त्यातले एक असल्याचा त्याला अभिमान वाटतो. पर्यटनस्थळी सुट्टीवर आलेले असताना हॉटेलच्या स्विमिंग पुलाजवळ आपली कादंबरी वाचताना झोपत असलेल्या तरुणीची दखलही त्याच्या एका वाचननोंदीत येते. सिनेमा, ‘न्यू यॉर्कर’ किंवा इतर कोणत्याही नियतकालिकात वाचलेल्या चांगल्या परिच्छेदामुळे तयार होणारी एखाद्या ग्रंथवाचनाची खुमखुमी, फार ओढीने खरेदी केलेल्या ग्रंथाऐवजी निरस मुखपृष्ठामुळे पूर्वग्रह झालेल्या पुस्तकातील मजकुराशी अचानक झालेली मैत्री, असे अनेक नमुने या लेखनातून सापडतात. हॉर्नबीने अगदीच त्रोटक संख्येने कथा लिहिल्या आहेत. त्याचा एकही कथासंग्रह उपलब्ध नाही. पण या लेखसंग्रहातील प्रत्येक लेख हा एखाद्या कथेसारखा रंजक वर्णनांनी भरला आहे. वाचलेल्या पुस्तकाबद्दल सांगताना आडवी वळणे घेत हॉर्नबी वैयक्तिक तपशिलांची सजावट करतो. पुस्तकाबद्दलचे वाचन आणखी नवनव्या संदर्भाचे दालन उघडून देते. या लेखनाला समीक्षा म्हणता येणार नाही आणि त्यावर आलेल्या ग्रंथांना पूर्णपणे ‘बुक्स ऑन बुक्स’ या गटातही बसविता येणार नाही, पण वेगळ्या पातळीवर त्याचा वाचनानंद भरपूर मिळू शकतो.

गेल्या पन्नास-शंभर वर्षांतील गाजलेल्या-दुर्लक्षित राहिलेल्या, सापडलेल्या संदर्भामुळे नाव कळालेल्या आणि तातडीने केलेल्या ग्रंथखरेदीची कित्येक उदाहरणे येथे सापडतील. एका महिन्याच्या मर्यादित काळात झेपतील त्यांचे वाचन करून त्यांतली मौज वाचकापर्यंत पोहोचविण्याची हॉर्नबीची पद्धत तिरपागडी असली, तरी वाचकाला कोणत्याही परिस्थितीत या ग्रंथांच्या नादाला लावणारी आहे. २००८ च्या मार्च-एप्रिलच्या अंकासाठी त्याला पुस्तकावर लिहायचा कंटाळा आला. तेव्हा चक्क त्याने त्या महिन्यात पाहिलेल्या सहा सिनेमांवर लिहून दिले. महिन्यात पाहिलेले सिनेमे आणि स्थानिक डीव्हीडी लायब्ररीतून भाडय़ाने आणलेल्या- पण पाहू न शकलेल्या सिनेमांची यादी संपादकीय मंडळाला पाठवून दिली. ‘स्टफ आय हॅव बीन वॉचिंग’ स्वरूपाचे झालेले हे लेखन पाहून संपादकीय मंडळ पुढच्या महिन्यात आपले सदर नक्की बंद करणार, ही शंका व्यक्त करीत लिहिला गेलेला लेखही फार सुंदर वठला आहे. क्रीडा, संगीत, चित्रपट, टीव्ही मालिका, गेल्या वीस-पंचवीस वर्षांत गाजलेल्या लेखकांच्या गोतावळ्यातील स्वत:चे अनुभव, प्रवासात विमानतळावरच्या वाचन आठवणी, अ‍ॅन टेलर या अमेरिकी लेखिकेच्या हॉर्नबीवर असलेल्या प्रभावाची माहिती आणि जगाच्या अतिअर्वाचीन सांस्कृतिक इतिहासाचा आलेख या लेखनातून सापडू शकतो. आर्थिक मंदीच्या दरम्यान छोटय़ा प्रकाशन उद्योगांना मदत होईल, यासाठी अतिरिक्त ग्रंथखरेदी करणारा आणि वाचलेल्या पुस्तकातील उत्तमाची कारणमीमांसा निराळ्या पठडीत मांडण्याचे मार्ग शोधणारा इथला हॉर्नबी हा कादंबरीकार म्हणून नाव कमावलेल्या हॉर्नबीपेक्षा अधिक भावणारा आहे. पुस्तकावर नेमके कसे लिहायचे, याचे आपल्याला आजवर माहीत असलेले ठोकताळे पूर्णपणे बदलून टाकणारे असे हॉर्नबीचे हे लेखन आहे. ते वाचल्यानंतर आपल्या ग्रंथखरेदी-वाचनाच्या सवयी आधीसारख्या राहतील, याची बिलकूल खात्री नाही!

pankaj.bhosale@expressindia.com

 

Story img Loader