भगतसिंग यांचा यंदाचा ‘शहीद दिन’ (२३ मार्च) पंजाब सरकारच्या ‘फक्त डॉ. आंबेडकर आणि भगतसिंग यांची छायाचित्रे’ या निर्णयामुळे गाजला पण ‘पिवळय़ा फेटय़ापुरतं भगतसिंग-प्रेम की भगतसिंग यांचे विचारसुद्धा?’ असा वादही त्यातून निर्माण झाला. हा वाद शमल्यानंतर का होईना, भगतसिंगचे विचार आणि त्याचं पंजाबच्या मातीत रुजलेलं बालपण व तारुण्य या दोहोंना न्याय देणारं एक ताजं पुस्तक आलं आहे.. ही चित्रकादंबरी आहे- ग्राफिक नॉव्हेल! इकरूप संधू या तरुण चित्रकर्तीनं ते लिहिलंय आणि चित्रंही तिनंच काढली आहेत. भगतसिंगच्या रोजनिशीचं संपादन आता पुस्तकरूपानं उपलब्ध आहेच, एस. इरफान हबीब यांनी ‘इन्किलाब’ नावाचं चरित्र लिहिताना या रोजनिशीचा नव्यानं आधार घेतला आणि तेही पुस्तक मिळतंच, पण इकरूप संधूनं आजवर उपलब्ध असलेल्या या संदर्भाचा आधार घेऊन, चित्रांमुळे रंजक ठरणारं पण वैचारिक तडजोड न करणारं पुस्तक सिद्ध केलं आहे. जलियाँवाला बागेच्या विहिरीत उडय़ा मारून अनेकांनी मृत्यू कवटाळला, तेव्हा भगतसिंग १३ वर्षांचा होता. ही घटना  ‘बरणीत फेकून दिली जाणारी माणसं’ अशा दृश्यातून इकरूप संधूनं मांडली आहे. याच दृश्याचा वापर मुखपृष्ठावरही आहे. गेल्याच आठवडय़ात प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रेक्षणीय-वाचनीयतेला आतापासून दाद मिळू लागली आहे, कारण इथे चित्रांसोबत विचारही पोहोचत आहेत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा