पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वोत्तम इंग्रजी कथात्म साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या बुकर पारितोषिकाची लघुयादी नुकतीच जाहीर झाली. सहा पुस्तकांच्या या यादीत ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी आणि कॅनडामधील लेखिका मार्गारेट अ‍ॅटवूड या दिग्गजांबरोबरच ब्रिटिश आफ्रिकी लेखिका बर्नार्डिन एव्हारिस्टो, नायजेरियन लेखक चिगोझी ओबिओमा, तुर्की कादंबरीकार एलिफ शफाक  आणि अँग्लो-अमेरिकी लेखिका ल्यूसी एलमन यांच्या कादंबऱ्यांचा समावेश आहे. त्यातील- सलमान रश्दी यांच्या ‘किशॉट’ या कादंबरीच्या परिचयापासून ‘बुकमार्क’ पानावरलं हे नैमित्तिक सदर..

कोणताही लेखक त्याच्या भवतालातून जगलेल्या घटकांची उस्तवारी करीत आपल्या लिखाणाचा डोलारा उभारत असतो. दर वेळी कल्पनेचा मुलामा त्याच्या कलाकृतींना वेगवेगळ्या छटा प्राप्त करून देत असला, तरी लेखक एकच गोष्ट पुन:पुन्हा वेगळ्या रूपात सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. सलमान रश्दी हे भारतीय वाचकांसाठी त्यांच्या साहित्यापेक्षा वादग्रस्त वलयामुळे सर्वाधिक परिचित आहेत. या लेखकाच्या सर्वच कादंबऱ्यांमध्ये त्यांचे भारतीयत्व, मुंबई शहर ‘बॉम्बे’ म्हणून ओळखले जात होते, तेव्हाच्या वास्तव्यातील अनुभव आणि इथल्या जगण्याचे संदर्भ येत राहतात. पण त्याऐवजी चर्चा होते, ती त्यांच्या कादंबऱ्यांमधील वादग्रस्त तपशिलांची, त्यातील धाडसी विधानांमुळे खवळलेल्या समाजमनाच्या प्रतिक्रियेची. ‘सॅटनिक व्हर्सेस’ ही महंमद पैगंबराच्या आयुष्यावर प्रेरित वाचण्यास जड आणि पट्टीच्या वाचकांनाही न पेलणारी कादंबरी रश्दी यांना जिवे मारण्याच्या काढलेल्या फतव्यानंतर अतिलोकप्रिय झाली. त्यात बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्यापासून नेतेपदाचा प्रवास करणारे तेलुगु सिनेमावीर एन. टी. रामाराव यांच्यावर आधारलेलीही एक व्यक्तिरेखा होती. मात्र, कट्टर इस्लामी पंथाच्या रोषामुळे रश्दी यांच्या नावाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रसिद्धी मिळाली आणि भारतीय वंशाचा हा ब्रिटिश लेखक ‘जागतिक’ झाला.

रश्दी यांची पहिली कादंबरी ‘ग्रिमस’ १९७५ साली प्रसिद्ध झाली. बाराव्या शतकातील एका सुफी काव्यावरून स्फुरलेल्या या कादंबरीमध्ये एका अमर्त्य भारतीय गरुडाची सातशे सत्त्याहत्तर वर्षे सात महिने आणि सात दिवसांची पृथ्वीप्रदक्षिणा मांडण्यात आली आहे. जोनाथन स्विफ्टच्या ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ ही भटक-साहसांची वर्णने असलेल्या कादंबरीशी तिची तुलना केली गेली. या कादंबरीनंतरच्या एक तपाच्या काळात रश्दी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीच्या दोन बाजू मांडणाऱ्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’ व ‘शेम’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या. पैकी पाकिस्तानात घडणाऱ्या ‘शेम’ या कादंबरीच्या वाटय़ाला मिळावी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’ने मात्र दोन बुकर मिळविले. परंतु ‘सॅटनिक व्हर्सेस’च्या वादभोवऱ्याने आज त्यांची पहिली कादंबरी कोणती, हे जसे फार जणांना माहिती नाही, तसेच त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या पुढच्या दहा कादंबऱ्यांची नावेदेखील भारतीय वाचकांच्या खिजगणतीत नाहीत. भारतीय नेत्यांपासून अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींपर्यंत थेट जहरी विधाने केल्यामुळे त्यांच्या पुढल्या कादंबऱ्यांनी काही काळ इथल्या ग्रंथवर्तुळात चहाच्या पेल्यात मावणारी वादळे घडवली. मात्र, प्रसारमाध्यमांतील प्रसिद्धीपलीकडे या लेखकाच्या साहित्यातील मोठेपणा शोधण्यात कुणाला महत्त्व वाटले नाही. ‘ईस्ट-वेस्ट’ हा कथासंग्रह, दोन लहान मुलांसाठीची पुस्तके, आत्मचरित्र आणि आठेक निबंधसंग्रह इतक्या त्यांच्या भल्या मोठय़ा लेखनजत्रेविषयी भारतातून तरी फार कुतूहल प्रसवले नाही.

पौराणिक, ऐतिहासिक कथानकांतील बीज घेऊन त्याआधारे आजच्या जगावर व्यंगात्मक टिप्पणी करणाऱ्या सलमान रश्दी यांचे ताजे पुस्तक ‘किशॉट’ हे त्यांच्या नेहमीच्या लक्षवेधी वैशिष्टय़ांना सामावून घेते. त्याचबरोबर आजच्या समाजाच्या श्वासोच्छवासाला पकडण्याचा प्रयत्न करते. स्पॅनिश कादंबरीकार म्युगुअेल दी सव्‍‌र्हातिस यांच्या सोळाव्या शतकात प्रसिद्ध झालेल्या ‘डॉन किहोटे’ कादंबरीचे आजच्या जगाला आधार करून केलेले हे पुनर्लेखन आहे. अन् त्यात भारताशी विखंडित झालेल्या पिढीच्या तुटलेल्या मुळांची दखल घेतली आहे. ‘रश्दी यांची कादंबरी झेपत नाही’ म्हणणाऱ्यांनाही आवडून जावी इतक्या सहजशैलीत तिची मांडणी झाली आहे.

सव्‍‌र्हातिसचा पन्नास वर्षीय नायक क्विझाडा हा ला मांचा या गावात पुस्तके वाचून डोके फिरवून घेतलेला श्रीमंत असामी दाखविला आहे. शिलेदारांच्या धाडस आणि शौर्याच्या लढाईंवरील पुस्तक वाचनातून तो झपाटला जातो. शिलेदारांची प्राचीन परंपरा पुनरुज्जीवित करणे आपले कर्तव्य असल्याच्या भ्रमात तो आणि त्याचा सम-तिरसट, पण व्यवहारी सहकारी सॅन्चो पान्झा साहसप्रवासावर निघतात. हा प्रवास तब्बल ८०० पानांच्या कादंबरीमध्ये सव्‍‌र्हातिसने सजविला होता. स्वप्नाळू माणसाच्या या कथानकाला आजच्या काळामध्ये आणताना रश्दी यांनी मुंबई, लंडन आणि अमेरिकेतील अटलांटा, न्यू यॉर्क शहरांचा आधार घेतला आहे.

इथला नायक जरी ‘किशॉट’ असला, तरी कथानकातला कादंबरी-पुरुष सॅम डुशॉ हा सुमार दर्जाचा अपयशी हेरकथा लेखक आहे. मुंबईत जन्मलेला आणि अमेरिकेत राहून टोपणनाव धारण करणाऱ्या या लेखकाने लिहिलेल्या हेर-रहस्यकथा किंचितही गाजलेल्या नाहीत. तो आर्थिकदृष्टय़ा जवळजवळ कफल्लक अवस्थेत गेला आहे. असे असतानाही तो ‘किशॉट’ नावाची एक व्यक्तिरेखा नव्या कादंबरीद्वारे घडवीत आहे. अन् ती हेर-रहस्यकथा नसल्याचा त्याला विश्वास आहे.

इस्माईल स्माइल हा भारतीय वंशाचा फिरता औषध विक्रेता टीव्हीवरील मालिकांनी इतका प्रचंड झपाटून गेला आहे, की त्यांतील सारे त्याला खरे वाटू लागलेले आहे. फिरस्तेगिरीतही त्याच्या टीव्हीसोसाने त्याचे डोके फिरविले आहे. अन् ठरविले तर काहीही घडू शकते, यावर त्याचा विश्वास बसलेला आहे. भारतीय सिनेसृष्टी गाजवल्यानंतर अमेरिकेतील टॉक शोमुळे जगभरासाठी सेलिब्रेटी ठरलेली सलमा आर या ललनेवर त्याचे या उतारवयात प्रेम बसते. तिच्यावर ‘किशॉट’ या नावाने तो प्रेमपत्रांचा वर्षांव करीत असतो. पुढे या स्माइल ऊर्फ किशॉटची नोकरी जाते आणि त्याला आपल्या आयुष्याचे ध्येय सापडते. आपल्या कल्पनेच्या बळावर तो सॅन्चो या मुलाला पाचारण करतो. सलमा आर या सेलिब्रेटीला पटविण्यासाठी शेवरलेट क्रूझमधून अमेरिकेचा प्रवास सुरू करतो.

सॅम डुशॉ हा कादंबरीतला लेखक स्वत: कादंबरी लिहून क्विशोटची कहाणी रंगवताना दिसतो, तसेच रश्दी सॅम डुशॉ या नायकाची कहाणी मांडताना दिसतात. हा सॅम डुशॉही जन्माने भारतीय आणि कर्माने अमेरिकी आहे. १९५०-६० च्या दशकात भारतीय कुटुंबांत मुलाच्या भरभराटीला सर्वाधिक प्राधान्य देण्याच्या नियमानुसार सॅम डुशॉला परदेशी शिक्षणासाठी पाठविण्यात येते. याच सुखवस्तू कुटुंबातील मुलीला मात्र भारतीय शिक्षण संस्थांमध्येच अडकविले जाते. आयुष्यभर त्यामुळे सॅम डुशॉला पाण्यात पाहणारी त्याची बहीण संधी मिळताच एका थोराडवयीन चित्रकाराबरोबर पळून जाऊन लंडन गाठते. तिथे निष्णात वकील बनते आणि भारतीय मुळांना उखडून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.

रश्दी यांचा कादंबरीत आणखी एक कादंबरी घडविण्याचा विचित्र प्रयोग आकलनास वाटतो तितका अवघड अजिबात नाही. उलट दोन दशकांमधील त्यांच्या इतर कादंबऱ्यांपेक्षा ही सर्वात सोपी आणि सहज संपणारी कादंबरी आहे. समाजमाध्यमे, टीव्ही मालिका आणि मनोरंजनाच्या अजस्र जगात गुंतलेल्या समाजाचा वैचारिक वकूब किती खोलात चालला आहे, यावर व्यंगात्मक हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर अमेरिका, ब्रिटन आणि भारतातील सामाजिक घटनांबद्दल पुरत्या टपल्या मारण्यात आल्या आहेत. ‘ब्रेग्झिट’मध्ये अडकलेले ब्रिटन, वंशद्वेशामुळे गोऱ्यांकडून कृष्णवंशीयांच्या नाहक हत्या वारंवार घडणारी प्रगत अमेरिका आणि मोदींचे भाजप सरकार आल्यानंतर बदललेला भारत हे मुद्दे कथानकामध्ये बेमालूमपणे मिसळण्यात आले आहेत. भारतात भाजपचे सरकार आल्यानंतर स्वयंघोषित गोरक्षकांनी घातलेला हैदोस, आठ वर्षांच्या मुलीवर मंदिरात झालेला अत्याचार, बॉलीवूड गाजवून पुढे हॉलीवूडमध्ये दाखल झालेल्या प्रियंका चोप्राचेही संदर्भ या कादंबरीमध्ये येतात.

अमेरिकेत झालेल्या भारतीय स्थलांतराचा दीडेकशे वर्षांचा इतिहास रश्दी यांनी मांडला आहे. अन् त्याबरोबर बॉलीवूडचा ५० वर्षांपूर्वीचा एक धागा या स्थलांतराला जोडला आहे. अटलांटामध्ये अफूच्या गोळ्या बनवून लोकप्रिय बनलेल्या किशॉटच्या नातेवाईकाची हरहुन्नरी व्यक्तिरेखा रश्दींनी फार टोकदार मांडली आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वाढत जाणारे प्रेम त्याला अजिबातच पसंत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशीही तो अजिबात सहमत नाही. अटलांटामध्ये आडमार्गाने त्याने आपले प्रस्थ सगळ्याच क्षेत्रांत विस्तारले आहे.

असे मानले जाते की, स्वप्नांच्या प्रदेशात नेणाऱ्या डॉन किहोटे आणि त्या जगातही व्यवहारी बनण्याचा धडा देणाऱ्या सॅन्चो पान्झा या व्यक्तिरेखांनी जगभरच्या आधुनिक साहित्यात प्रेरणेची महाद्वारे उघडून दिली. रश्दी यांनी या कादंबरीच्या पुनर्लेखनातून एकटय़ा ‘डॉन किहोटे’च नाही तर कित्येक अभिजात कलाकृतींना मानवंदना दिली आहे. त्यांचा हा जगसमांतर शिलेदार वाचकांना खास आवडेल अशा आवेशात तयार झाला आहे.

‘ब्रेकिंग बॅड’, ‘लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर’ आणि डझनांवरी नेटफ्लिक्स युगातील टीव्ही मालिकांसोबत पॉप्युलर कल्चरमधील शेकडो संदर्भाना इथे महत्त्वाचे स्थान आहे. प्रकाशनाच्या तिसऱ्या आठवडय़ातच बुकरच्या अंतिम यादीमध्ये ‘किशॉट’ची निवड झाली आहे. अद्याप तरी त्यातील भडक शेऱ्यांमुळे कुठे ओरखडा बसल्याचे दिसलेले नाही. इतर पाच स्पर्धकांवर मात करून ही कादंबरी विजेती ठरली, तर ती राजकीय कारणांनी वादग्रस्त झाल्यास नवल वाटणार नाही.

 किशॉट

लेखक : सलमान रश्दी

प्रकाशक : पेंग्विन

पृष्ठे: ४१६, किंमत : १,७१९ रुपये