अणुबॉम्बने संहार होतो तो कसा, हे जगाला दिसले त्याला ६ ऑगस्ट रोजी ७१ वर्षे होतील.. हिरोशिमाचा संहार आणि अण्वस्त्र स्पर्धा या विषयांवर गेल्या वर्षभरात आलेल्या लक्षणीय पुस्तकांची ओळख करून देणारा हा विशेष विभाग..

सहा ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा आणि नऊ ऑगस्ट १९४५ या दिवशी नागासाकी इथं जे झालं, ते जगाचा इतिहास बदलणारं होतं. जपानच्या या दोन शहरांवर अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकल्यानंतर दुसरं महायुद्ध संपुष्टात येऊन ‘जागतिक महासत्ता’ म्हणून अमेरिकेची प्रतिष्ठापना झाली आणि लागोपाठ हे संहारक अण्वस्त्र तंत्रज्ञान रशियानेही मिळवल्यामुळे जगात अण्वस्त्रस्पर्धा जी सुरू झाली, ती आजतागायत.  ती अणुबॉम्बफेक आणि त्यानंतरची स्पर्धा यांविषयी आजवर भरपूर पुस्तकं आली आहेत. हिरोशिमा-नागासाकीच्या उद्ध्वस्तीकरणानंतर तिथल्या माणसांवर झालेला परिणाम टिपणं हा या पुस्तकांचा एक प्रवाह; तर जगातल्या वाढत्या अण्वस्त्रस्पर्धेचं गांभीर्य वाचकांपर्यंत पोहोचवणं, हा दुसरा. हे दोन्ही प्रवाह साधारणपणे आजही कायम राहिले आहेत.. पण तरीही नवी पुस्तकं येत आहेत आणि त्यांच्यात ‘नवेपणा’सुद्धा नक्कीच आहे. म्हणजेच, आधी या विषयावर आलेल्या पुस्तकांपेक्षा गेल्या वर्षभरातली पुस्तकं निराळी आहेत. कशी, ते पुढे पाहूच..

Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Astrological predictions 2025 for Uddhav Thackeray in Marathi
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जपानला- त्यातही हिरोशिमाला या वर्षीच्या मे महिन्यात भेट दिली. त्यांच्या या दौऱ्याचा कार्यक्रम आठ-नऊ महिन्यांपूर्वीच जाहीर होऊ लागला होता. त्यामुळे, तसंच अणुबॉम्बच्या घटनेला गेल्या वर्षी ७० र्वष झाल्यामुळे, अमेरिकेत आणि एकंदर जगात या विषयाच्या चर्चेनंही पुन्हा उभारी धरली होती. प्रसारमाध्यमांतली चर्चा ‘ओबामा माफी मागणार की नाही’ यावरच केंद्रित झाली होती हे खरं, पण या काळात आलेली किमान दोन पुस्तकं ही ओबामांनी माफी का मागितली पाहिजे, अमेरिका का दोषी ठरते, यामागची कारणं स्पष्ट करणारी होती. अर्थातच, ओबामांचा दौरा, माफीबद्दलची चर्चा यांचा या दोन्ही पुस्तकांत कुठेही उल्लेख नाही. आणखी एक पुस्तक, अणुबॉम्बविरोधी कार्यकर्त्यांबद्दल अमेरिकनांचा दृष्टिकोन अधिक स्वागतशील करण्यासाठी- या कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि त्यांची धमक जगालाही समजावी यासाठी- उपयुक्त आहे. पण सर्वात नवं, अगदी याच आठवडय़ात प्रकाशित झालेलं एक पुस्तक अगदी निराळं आहे!

मुलांसाठी कादंबरी!

‘द लास्ट चेरी ब्लॉसम’ ही कॅथलीन बर्किनशॉ यांनी लिहिलेली कादंबरी गेल्या आठवडय़ात प्रकाशित झाली, ती लेखिकेच्या मूळ हिरोशिमावासी आईच्या बालपणाबद्दल आहे. लेखिका कॅथलीन या आईकडून जपानी, वडील युरो-अमेरिकन. आईनं तरुणपणीच अमेरिकेत स्थलांतर केलं. त्याआधीच्या अनुभवांवर आणि दुसऱ्या महायुद्धातल्या सत्य घटनाक्रमावर आधारलेली ही कादंबरी किशोर-किशोरींनी वाचावी, यासाठी लेखिकेनं प्रयत्न केले आणि त्यांना यशही आलं. अमेरिकेतल्या अनेक शाळांत इतिहास विषयाचं पूरक वाचन म्हणून ही कादंबरी लावली जाणार आहे! ही कादंबरी आहे युरिको या १२ वर्षांच्या मुलीबद्दल. तिला फक्त वडीलच आहेत. युद्ध सुरू आहे. जपान आघाडी घेतो आहे, अशा बातम्या येत असतात आणि युरिकोचं शिक्षणही सुरू असतं. पण हळुहळू युद्धाची छाया जाणवू लागते. युरिकोच्या घरी एक काकी आणि तिचा मुलगा राहायला येतात. काकी एकटीच कशी? काका कुठे असतात? हे काहीच युरिकोला सांगितलं जात नाही. पण आपले बाबा काकीशी बहुधा लग्न करणार, अशी कुणकूण तिला लागते. घरात आता जेवण वाटून घ्यावं लागत असतं. ती याही परिस्थितीशी जुळवून घेते. वडिलांनी सांगितलेल्या त्यांच्या बालपणीच्या- त्यावेळच्या जपानबद्दलच्या- आठवणी ऐकण्यात रंगून जाते. टंचाई, युद्धाच्या झळा यातलं काहीच युरिकोला माहीत नसताना अणुबॉम्ब पडतो.. ती वाचते. वडीलही वाचतात, पण फार काळ जगू शक त नाहीत.. आणि अणुबॉम्ब पडला त्याच दिवशी युरिको मोठी झालेली असते.. तिला समज आलेली असते आणि बाबा आणि काकी यांचं नातं आपल्यापासून लपवून ठेवलं गेलं यापेक्षाही, पराभव समोर दिसत असताना आपल्या देशानं नागरिकांना अंधारात ठेवून आडमुठेपणा सुरू ठेवला आणि संहाराला निमंत्रण दिलं याचा राग तिला आता आला आहे.

या कादंबरीच्या कथेइतकीच, ती कशी लिहिली गेली याचीही कथा रोचक आहे. लहानपणापासून आईच्या अनेक आठवणी ऐकलेल्या लेखिकेनं, पुढे शिक्षणक्षेत्रात काम करू लागल्यावर विद्यार्थ्यांपर्यंत या आठवणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण एखाद्या शाळेनं निमंत्रण दिल्यास तिथं एखादं व्याख्यान, एवढय़ापुरतेच हे प्रयत्न होते. शिवाय, आईनं आपल्याला सगळंच सांगितलेलं नाही.. ‘मोठी झाले गं मी.. मोठी झाले एकाच दिवसात’ याचा अर्थ काय? तो खुलासेवार सांगितलेलाच नाही, याची रुखरुख लेखिकेला होती. अखेर लेखिकेची मुलगी बारा वर्षांची झाल्यावर तिनं आजीकडे हट्टच धरला- ‘त्या दिवशी आणि त्यानंतर, काय झालं ते सगळं सांग.. नुसतं ‘मोठी झाले’ नको म्हणू’ .. आपल्या आईकडून लेखिकाही पहिल्यांदाच तिची पूर्ण कथा ऐकत होती. मग मात्र याचं पुस्तकच झालं पाहिजे, हे लेखिकेनं ठरवलं! पण अणुबॉम्ब-पीडितांच्या आठवणी तर अनेकदा लिहिल्या गेल्या आहेत.. मग आपलं वेगळेपण काय? कुणाला सांगणार आहोत आपण आपल्या आईची गोष्ट? याचं उत्तर म्हणजे ही कादंबरी.

जगायचंय.. सावरायचंय..

‘मी आठ वर्षांची होते. हिरोशिमाच्या ताकासु या उपनगरात आमची ‘फुरिता नॅशनल स्कूल’ होती. तिथं वर्गात आम्ही सारी मुलं असताना, मोठ्ठा आवाज झाला. लोळ दिसला.. मग अंधार घेऊन आलेला एक ढग पसरला.. आम्ही मुलं रडू लागलो. पण टीचरनं सांगितलं, रडू नका. बाकांखाली लपा. आम्ही सगळे गप्प होऊन बाकांखाली लपलो. माझे आई-बाबा बचावले होते, पण बाबांनी दहा दिवसांत प्राण सोडला. आम्हाला दुख वगैरे करायला वेळच नव्हता. चैनच ती! आम्हाला स्वतला तर सावरावंच लागणार होतं, पण देशालाही सावरायचं काम आम्हां सर्वापुढे होतं.. आम्ही काम केलं, तरच कुटुंब सावरणार होतं, देशही यातूनच सावरू लागणार होता’.. अशा सहज शब्दांत आणि अगदी तपशीलवार लिहिलेल्या आठवणींचं ‘हिरोशिमा : मेमॉयर्स ऑफ अ सव्‍‌र्हायव्हर’ हे साची कोमुरा-रुमेल यांनी लिहिलेलं पुस्तक तीन महिन्यांपूर्वी प्रकाशित झालं. त्याची जपानी आवृत्तीही आहे. साचीदेखील कॅथलीन बर्किनशॉ  यांच्या आईप्रमाणे, बिगरजपानी पुरुषाशी लग्न करून अमेरिका खंडात (कॅनडात) स्थलांतरित झाल्या. गेली ५० र्वष त्या तिथंच राहातात. त्याहीनंतर लिहिलेलं- आणि अणुसंहार प्रत्यक्ष पाहिलेल्यांनीच लिहिलेल्या आठवणीवजा पुस्तकांपैकी कदाचित शेवट-शेवटचं, म्हणून त्याचं वेगळेपण आहे.

एका निषेधाचं होणं..

‘अलमायटी’ या नावाचं एक पुस्तक पेंग्विन-रँडम हाउसनं जुलै महिन्यात प्रकाशित केलं, ते पत्रकार डॅन झाक यांनी लिहिलं आहे. अमेरिकी अणुबॉम्बखोरीच्या पराकोटीच्या निषेधाचं प्रतीक ठरलेल्या, पण अवघ्या सहा मिनिटांत आटोपलेल्या एका घटनेचा मागोवा या ४१६ पानी पुस्तकानं घेतला आहे. सिस्टर मेगन राइस, मायकल वॅली आणि ग्रेग बोएजरेबेड या तिघांचाच सहभाग या अल्पजीवी निषेधात होता. पण निषेधासाठी त्यांनी केलेली कृती अमेरिकेला हादरवणारीच होती. हिरोशिमा-नागासाकीवर टाकलेला अणुबॉम्ब जिथं बनला आणि पुढल्या अनेक वर्षांतही जिथं अण्वस्त्रांसाठी ‘युरेनियम समृद्धीकरण’ बिनबोभाट सुरू राहिलं, त्या ‘ओक रिज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘वाय-१२’ प्रकल्पाच्या कुंपणतारा कापून २८ जुलै २०१२ रोजी (पहाटे) या तिघांनी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला. अगदी मुख्यालयापर्यंत मजल मारली आणि पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे झटपट हालचाली केल्या. रंग स्प्रे करणारे कॅन वापरून युद्धखोरी आणि मानवी संहाराच्या निषेधाच्या घोषणा लिहिल्या, रक्तदानाच्या थैल्यांमधून आणलेलं मानवी रक्त या इमारतीवर फेकलं, इतकंच नव्हे तर छिन्नीहातोडय़ानं इमारतीच्या काँक्रीटच्या छोटय़ा ढलप्या काढून पायऱ्यांवर पसरल्या. यापैकी इमारत फोडण्याची कृती ही ‘बायबलमध्ये हिंसकांचा निषेध जसा सांगितला आहे’ तशी – कॅथोलिक शांततावादय़ांच्या प्लाउशेअर चळवळीला शोभणारी- प्रतीकात्मक कृती होती. सहाव्या मिनिटाला सुरक्षा रक्षकांची व्हॅन आली. तरीही या तिघांनी आपापल्या पाठीवरल्या बॅगांमधले अण्वस्त्रविरोधी बॅनर काढून फडकावलेच! कुठे कोणी फोटोग्राफर नाही की टीव्हीवाले नाहीत. अतिशय ‘श्रद्धे’नं हा काहीसा एककल्ली निषेध सुरू होता. सिस्टर मेगन राइस या जोगीण आणि वयानं ८२ वर्षांच्या; पण त्यांच्यासह त्यांच्या दोघा पुरुष सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. पुढे सिस्टर मेगन यांना प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी वगैरे गुन्ह्यांसाठी अडीच वर्षांची कैदही झाली.  या घटनेबद्दलचं हे पुस्तक, शांततेची आवश्यकता या तिघांना का पटली याचा मागोवा घेण्यापासून ते अमेरिकेची ‘अधिकृत’ प्रतिक्रिया काय होती इथपर्यंतचा मागोवा घेतंच, पण ‘अण्वस्त्रसज्जतेच्या स्पर्धेमुळे पराकोटीचा मनस्ताप होतो तो का?’ या व्यापक प्रश्नाचाही वेध घेतं. या तिघांची ‘अ‍ॅक्शन’, राज्यव्यवस्थेची ‘रिअ‍ॅक्शन’ आणि ‘रिलेटिव्हिटी/अनसर्टनटी’ या तीन भागांत या पुस्तकाची दहा प्रकरणं विभागलेली आहेत. पुस्तकाची सुरुवात महासत्ता होण्याच्या आणि त्यासाठी अणुबॉम्ब बनवण्याच्या ‘मॅनहॅटन प्रकल्पा’पासून होते. शेवटचं ‘गुड फेथ’ हे प्रकरण श्रद्धा आणि त्यावर आधारित निषेध हा अस्तित्वाच्या प्रश्नांना भिडण्यासाठी पुरेसा आहे का, हा प्रश्न उपस्थित करतं. लेखक शांततावादी आहे, हे लिखाणातून कळतं.

निषेधाच्या एका कृतीचं ‘होणं’ आणि त्यामागच्या सात्त्विक संतापाचं असणं, याचा सविस्तर उलगडा करणारं हे पुस्तक आहे. या अनुषंगानं निषेध जिथं प्रत्यक्षात करण्यात आला, त्या ‘ओक रिज’चंही वर्णन येतं. अगदी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांवरही टीका येते. ‘नोबेल पारितोषिक मिळवण्याआधी चेक प्रजासत्ताकाच्या भेटीस गेलेले ओबामा ‘अण्वस्त्रमुक्तीसाठी प्रामाणिक प्रयत्नां’ची ग्वाही जगाला देत होते. ती अखेर थापच ठरली, अशी भाषा पुस्तकात आहे. मात्र एकंदर पुस्तक काहीशा तात्विक सुराचंही असल्यामुळे, ‘‘अलमायटी’ कोण? निषेध करणाऱ्या श्रद्धावंतांचा ‘सर्वावर प्रीती’ करणारा ईश्वर ; की (१९८१ सालच्या ‘न्यूक्लिअर बॅरन्स’ या पुस्तकाचे लेखक पीटर प्रिंगल व जेम्स जेकब हे ‘थोडे लोक जग चालवतात’ असं ज्यांच्याबद्दल म्हणतात, ते) अण्वस्त्रांबद्दलची निर्णयसत्ता-धोरणसत्ता असलेले थोडे लोक?’ असा प्रश्न या पुस्तकात मांडल्याचंही लक्षात येतं.

ओक रिजचं कारस्थान!

‘अलमायटी’ या पुस्तकात ‘ओक रिज’ चा आणि तिथल्या ‘वाय- १२’ प्रकल्पाचा उल्लेख आला आहे.. ते ठिकाण टेनेसी राज्यात, दुसऱ्या महायुद्धकाळात उभारलं गेलं. नवराबायको दोघेही प्रकल्पाला उपयोगी पडू शकतील अशी कुटुंबच्या कुटुंबं- तब्बल पाऊण लाख माणसं – इथं आणून वसवली गेली. यापैकी अनेक महिलांना तर आपण कशासाठी काम करत आहोत हेही माहीत नव्हतं. ‘माझ्या आजीला वाटायचं की ती आईस्क्रीम फॅक्टरीत काम करते आहे’ असं सांगणारी एक नात ‘अलमायटी’चे लेखक डॅन झाक यांना ओक रिजमध्ये भेटली होतीच.. या अशाच कामं करणाऱ्या महिलांबद्दल याहीआधी ( मार्च २०१३ मध्ये) ‘गर्ल्स ऑफ अ‍ॅटॉमिक सिटी’ हे डेनीस किअर्नान लिखित पुस्तक प्रकाशित झालेलं आहेच.. पण ‘गर्ल्स ऑफ अ‍ॅटॉमिक सिटी’चा सूर हा प्रत्यक्ष अणुबॉम्ब बनत असतेवेळी काम केलेल्या महिलांचा पुनशरेध घेणं असा होता. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात रिचर्ड कुक यांनी याच ‘ओक रिज’बद्दल लिहिलेलं ‘इग्नोअर्ड हीरोज ऑफ वर्ल्ड वॉर टू’ हे पुस्तक मात्र हे ठिकाण १९४२ सालापासूनच कसं वसत गेलं, इथले कामगार- कर्मचारी आणि काही प्रमाणात अधिकारीसुद्धा कोणत्या परिस्थितीत काम करत होते, आपण नेमकं काय – कशासाठी काम करतो आहोत याची माहिती बऱ्याच जणांना कशी होती.. याचा धांडोळा मौखिक-इतिहास अभ्यासपद्धतीच्या आधारे घेऊन अनेक तपशील नव्यानं पुढे आणले आहेत. आजदेखील ओक रिज भागातले रहिवासी हे उजवे, कडवे राष्ट्रवादी मानले जातात.. ६ ऑगस्ट १९४५ रोजी जेव्हा ४.४ टनी अणुबॉम्बमुळे हिरोशिमातले ४५ हजार रहिवासी पहिल्या काही तासांतच जिवाला मुकले, तेव्हा ओक रिजमधल्या अनेकांना ‘विजयाचा अत्यानंद’ झाला होता, असं रिचर्ड कुक सांगतात.

अशी पुस्तकं कोणतेही आरोप करत नाहीत. केवळ तपशील देतात. पण अणुबॉम्ब ही अपरिहार्यता होती की कारस्थान होतं अशा प्रश्नाचं उत्तर अशा (साळसूद?) पुस्तकांमुळे ‘कारस्थान’ असं देता येऊ शकतं! जगापेक्षा आपण वरचढ आहोत, हे दाखवून देण्याची आकांक्षा ही हिटलर-काळातली महत्त्वाची प्रेरणाच होती काय आणि ती प्रेरणा अटलांटिकपल्याडच्या अमेरिकेतही त्या वेळीच होती की नाही, असा प्रश्न या अशा पुस्तकांमुळे निश्चितपणे पडतो. ‘ओक रिज’बद्दल लिहिण्यातला मोकळेपणा एकविसाव्या शतकात, त्यातही ओबामाकाळात वाढू लागला आहे, हेही लक्षात येतं.

आता असंच जगायचं?

विल्यम जे पेरी हे अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री. बिल क्लिंटन यांच्या कारकीर्दीत पेरी हे १९९४ ते ९७ अशी तीन र्वष पदावर होते. त्याआधी त्यांनी ‘सीआयए’मध्येही काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दाला वजन आहे. या पेरी यांचंच ‘माय जर्नी अ‍ॅट द न्यूक्लिअर ब्रिंक’ हे पुस्तक नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रकाशित झालं. गेल्या ७० वर्षांच्या अण्वस्त्र-स्पर्धेचा प्रवास मांडणाऱ्या या पुस्तकात पेरी यांनी विविध अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीत अण्वस्त्रस्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत गेला, याचाही मागोवा घेतला आहे. पण पुस्तकाचा विषय ‘अण्वस्त्रस्पर्धा कशी वाढली’ हाच आहे. रशियावर दोषारोप करत सुटण्याऐवजी पेरी अमेरिकेच्या धोरणांकडे जरा आत्मपरीक्षणाच्या नजरेतून पाहातात (‘द लास्ट चेरी ब्लॉसम’ या कादंबरीतली युरिको जसं जपाननं ओढवून घेतलेल्या संहाराकडे ‘आतून’ पाहाते, तसंच). त्यामुळे मग ‘बॅलिस्टिक मिसाइल कराराला रिचर्ड निक्सन यांनी दिलेली मान्यता रोनाल्ड रेगन यांनी काढून घेतली’ यामागची कारणमीमांसा या पुस्तकात येते.

‘‘जगातली अण्वस्त्रस्पर्धा आता शीतयुद्धाच्या काळापेक्षा अधिक भयावह झालेली असूनही बहुतेक लोकांना हा धोका माहीतच नाही, ते त्यांच्या अज्ञानामुळेच सुखी म्हणावे लागतील’’ आणि ‘‘ हा धोका वर्षांगणिक वाढतो आहे’’  असं प्रतिपादन या पुस्तकात विल्यम पेरी यांनी केलेलं आहे.

ते कुणा ‘प्रलयघंटावादी’ किंवा ‘राष्ट्रविरोधी’ माणसाचं विधान नाही.. अमेरिकेचं संरक्षणमंत्रीपद दोन दशकांपूर्वी सांभाळलेल्या एका जबाबदार आणि वयोवृद्ध, अनुभवी धुरिणाचं प्रतिपादन आहे.

इथं या संकलनवजा लिखाणातून तो धोका लक्षात येण्याची शक्यता कमीच. ही सगळी पुस्तकं  मुळातून वाचली  की लगेच तो लक्षात येईल, असंही नाही.. तो धोका लक्षात येण्यासाठी मुळात विचारशक्तीला मानवी जीवनाबद्दलच्या आस्थेची जोड हवी. तीच नाहीशी होत चालली असल्यामुळे, गेल्या साधारण वर्षभरात आलेली ही पुस्तकं तरी कुठवर पोहोचणार, असा प्रश्न पडतो.

ही सगळी पुस्तकं आपल्याकडे ‘किंडल’वर उपलब्ध आहेत. आयफोनच्या ‘आयबुक्स’वरही यापैकी काही पुस्तकं आहेत. पण ती वाचण्याइतकंच, सत्तास्पर्धा आणि त्यातले धोके यांचा काळा ढग आज  कसा दिसतो, हे ‘पाहणं’ही महत्त्वाचं आहे.

 

(संकलन : अभिजीत ताम्हणे)