|| राजेश घासकडवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत लिहिलेल्या पुस्तकाची ही ओळख..

‘ब्रीफ आन्सर्स टु द बिग क्वेश्चन्स’ या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक स्टीफन हॉकिंग म्हणतो- ‘मी एक वैज्ञानिक आहे.. सैद्धांतिक भौतिकशास्त्र वापरून माणसाला पूर्वापार पडत आलेल्या अनेक गहन प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी कायमच प्रयत्न केलेला आहे.’

हे गहन प्रश्न सर्वच विद्वानांना, विचारवंतांना पडलेले होते. देव आहे का? या विश्वाची सुरुवात कशी झाली? आपलं भविष्य ठरलेलं आहे का आणि असल्यास ते जाणून घेता येईल का? हे आणि इतर प्रश्न. त्या-त्या काळाच्या मर्यादेत, त्यांच्या वैयक्तिक आणि सामुदायिक अनुभवांतून, आपापल्या परीने केलेल्या चिंतनांतून अनेकांनी या प्रश्नांची उत्तरं मांडली. सामान्य वाचकांना समजेल अशा भाषेत स्टीफन हॉकिंग त्याला गवसलेली उत्तरं या पुस्तकात देतो. तसेच भविष्यात मानवजातीसाठी काय मांडून ठेवलेलं आहे, याबद्दलही काही कल्पना मांडतो.

स्टीफन हॉकिंग कोण, हा प्रश्न फार लोकांना पडणार नाही. अलीकडेच, म्हणजे यंदाच्या मार्चमध्ये त्याचा मृत्यू झाला. जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा हा माणूस. त्यात अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळिसेक वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे, चालत्याबोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू – अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला. अशा स्थित्यंतरातही त्याने विश्वरचनाशास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालनं उघडली. या पार्श्वभूमी वर, ज्या गहन प्रश्नांवर त्याने लहानपणापासून विचार केला त्यांवर जीवनाच्या शेवटच्या दिवसांत लिहिलेलं हे पुस्तक वाचण्याजोगं ठरतं.

हॉकिंगचं आधीचं प्रचंड गाजलेलं पुस्तक म्हणजे ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’! त्यातही त्याने अनेक कठीण वैज्ञानिक संकल्पना काहीशा सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. हे पुस्तक विकत घेणं, स्वत:कडे बाळगणं आणि ‘हो, मी ते वाचलं आहे!’ म्हणणं काहीसं फॅशनेबल झालेलं होतं. मात्र, ते समजायला कठीण असल्यामुळे त्यापलीकडे त्यावर कोणीच काही बोलताना ऐकलेलं नाही. ‘ब्रीफ आन्सर्स टु द बिग क्वेश्चन्स’ या नवीन पुस्तकातही हॉकिंगने ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’मधलेच विषय हाताळलेले आहेत. मात्र, त्याचं नवीन पुस्तक हे जास्त वाचनीय झालेलं आहे. त्याने केलेली मांडणी आणि त्याची उत्तरं तपासून पाहण्याआधी आपल्याला किंचित वैज्ञानिक पार्श्वभूमी  समजावून घ्यायला हवी.

हॉकिंग हा स्वत: एक विश्वरचनाशास्त्रज्ञ (कॉस्मोलॉजिस्ट) होता. म्हणजे- विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याची रचना काय आहे, या प्रश्नांचा अभ्यास करणारा. या अभ्यासासाठी प्रथम जुन्या ताऱ्यांचा आणि तारकासमूहांचा अभ्यास करावा लागतो. अवकाशात जितकं खोलवर, दूरवर पाहावं तितके जुने तारे दिसतात. असं का होतं? याचं कारण म्हणजे प्रकाशाला प्रवास करायला वेळ लागतो. आपल्या पृथ्वीत आणि सूर्यात जे अंतर आहे, ते कापायला सुमारे आठ मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला सूर्य दिसतो तो आठ मिनिटांपूर्वीचा. सगळ्यात जवळचा तारा सुमारे साडेचार प्रकाशवर्ष दूर आहे. म्हणजे त्याचा आपल्यापर्यंत पोहोचलेला प्रकाशकिरण हा तिथून साडेचार वर्षांपूर्वी निघालेला असतो. अवकाशाची व्याप्ती प्रचंड असल्यामुळे अब्जावधी प्रकाशवर्ष दूरचे तारे दिसतात. त्यामुळे दूरचे म्हणजे जुने. १९२९ मध्ये या अभ्यासातून हबल नावाच्या शास्त्रज्ञाला हे लक्षात आलं, की सर्वच तारकासमूह एकमेकांपासून दूर जात आहेत. एखाद्या फुग्यावर ठिपके काढले आणि तो फुगवला तर सगळेच ठिपके आपल्या शेजारच्या ठिपक्यापासून दूर जाताना दिसतात, तसे. जर तारकासमूह सतत दूर जात असतील, तर याचा अर्थ काही काळापूर्वी ते जवळजवळ होते आणि अजून पुरेसं मागे गेले, तर ते सगळेच एका बिंदूत एकवटलेले होते. याचा अर्थ आपलं विश्व अनादी अनंत नसून एका क्षणी सुरू झालं! एका बिंदूपासून उगम होऊन गेल्या १३.८ अब्ज वर्षांत इतकं महाकाय, प्रचंड झालं. याला ‘महास्फोटाचा सिद्धांत’ (बिग बँग थिअरी) म्हणतात. हे चित्र सामान्य माणसाचं डोकं चक्रावून टाकतं. कारण आपल्या डोळ्यांसमोर विश्वाची अनादी आणि अनंत अशी प्रतिमा ठसलेली असते.

विश्व निर्माण होण्याचा एक क्षण, एक बिंदू असेल तर साहजिकच प्रश्न पडतात- हे कोणी केलं? याआधी तिथे काय होतं? आपण इथे कसे आलो? यापुढे काय? हे विश्व असंच फुगत जाणार, की काही काळाने आकुंचन पावायला सुरुवात होत पुन्हा एका बिंदूत कोलमडणार? या प्रश्नांची, जवळपास याच क्रमाने हॉकिंगने उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या आधीच्या पुस्तकातही हेच विषय हाताळलेले होते. मात्र, त्या पुस्तकात एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे आधी शास्त्रीय माहिती देऊन त्यातून निष्कर्ष काढल्याप्रमाणे उत्तरं देण्याचा प्रयत्न होता. दुर्दैवाने त्या वैज्ञानिक संकल्पना क्लिष्ट असल्यामुळे उत्तरांपर्यंत पोहोचण्याआधीच वाचकांच्या मनात गोंधळ निर्माण होत असे. या बाबतीत त्याचं नवीन पुस्तक ‘ब्रीफ आन्सर्स..’ हे ‘ब्रीफ हिस्टरी..’पेक्षा अधिक उजवं वाटतं. एक तर, हॉकिंगने वैज्ञानिक संकल्पना अतिरेकी खोलात जाऊन सांगितलेल्या नाहीत. दुसरं म्हणजे, अनेक ठिकाणी वाचकाला समजेल अशा भाषेत, सोपी उदाहरणं देऊन समजावलेलं आहे.

सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे, या पुस्तकात सुरुवात उत्तरांनी केलेली आहे. त्या उत्तरांतून जे काही इतर प्रश्न निर्माण होतील, त्यांसाठी आवश्यक त्या वैज्ञानिक संकल्पना समजावून दिल्या आहेत. जसजशी नवीन प्रकरणं येतात तसतशी नवीन माहिती, अधिकाधिक खोलवर जाऊन सांगितलेली आहे. काही गुप्तहेर कथांमध्ये आधी खून घडताना दाखवला जातो; किंबहुना तो खून कोणी केला, हेही दाखवलं जातं. मग पुढची सगळी कथा गुप्तहेर त्या खुन्याला नक्की कसा पकडतो, याची असते. म्हणजे रहस्यकथा न राहता, ती उत्कंठकथा होते. कठीण वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारे गहन प्रश्नांची उत्तरं द्यायची, तर आधी उत्तरं देऊन मग ‘त्यामागचं विज्ञान काय आहे बरं?’ अशी उत्कंठा लागून राहणं जास्त परिणामकारक ठरतं. ते या पुस्तकात साधलेलं आहे.

सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे- देव आहे का? या प्रश्नाला इतरही उपप्रश्न चिकटलेले असतात. म्हणजे देवाची व्याख्या काय, देवाने हे विश्व निर्माण केलं का, देव मनुष्याच्या दैनंदिन जीवनात दखल घेतो का.. वगैरे वगैरे. या प्रश्नाचं उत्तर देताना हॉकिंग म्हणतो : ‘देव आहे की नाही, यावर मला काही भाष्य करायचं नाही. देव असलाच तर त्याने नक्की काय घडवलं, याबद्दल एक संदर्भचौकट मांडायची आहे.’ यापुढे देवाबाबत हॉकिंगचं म्हणणं आहे की, ‘हे विश्व विशिष्ट नियमांनुसार चालतं. हे नियम अचल आहेत. ते कुठच्याही यंत्रणेमुळे बदलत नाहीत. कारण जे बदलू शकतात ते विज्ञानाचे मूलभूत नियम नाहीत. त्यामुळे या अचल, सर्वासाठी सारख्या असलेल्या भौतिकीच्या नियमांनाच देव म्हणता येईल.’ वर दिलेला ‘बिग बँग’चा संदर्भ देऊन हॉकिंग म्हणतो, ‘जेव्हा आपलं विश्व सुरू झालं तेव्हा अवकाश आणि काळही सुरू झाला. त्याआधी काही नव्हतंच. त्यामुळे शून्य काळाच्या आधी कोणीतरी निर्माता असणंही शक्य नाही.’ हे स्पष्ट करण्यासाठी हॉकिंग उदाहरण देतो ते दक्षिण ध्रुवाचं. ‘तुम्ही दक्षिण ध्रुवावर पोहोचलात तर तिथून अजून दक्षिणेला काय असतं? ध्रुवाच्या व्याख्येपोटीच तिथून दिशा सुरू होतात. तिथून दक्षिणेला काही नसतं. तसंच ‘बिग बँगच्या क्षणाआधीचा क्षण’ असं काही नसतंच.’

यापुढचा प्रश्न येतो तो म्हणजे- शून्यातून विश्व कसं निर्माण झालं? या प्रश्नाचं सर्वात सोपं उत्तर या पुस्तकात सापडलं. हॉकिंग म्हणतो की, विश्व बनवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात. एक म्हणजे वस्तुमान- तारे आणि ग्रह बनवण्यासाठी; दुसरं म्हणजे ऊर्जा- सूर्यामध्ये ही भरपूर भरलेली हवी आणि तिसरं म्हणजे अवकाश- हे सगळे नांदण्यासाठी. आइन्स्टाइनने आपल्या सुप्रसिद्ध  E = mc 2 समीकरणानुसार ऊर्जा आणि वस्तुमान एकच आहेत हे दाखवून दिलेलं आहे. याचा अर्थ, भरपूर ऊर्जा आणि अवकाश असेल तर आपल्याला नवीन सृष्टी बनवता येते. हे शून्यातून कसं निर्माण होतं? उत्तर सोपं आहे- नवीन अवकाश निर्माण करताना ऊर्जा मुक्त होते! अवकाशात ऋण ऊर्जा असते. त्यामुळे अवकाश आणि ऊर्जा दोन्ही मोठय़ा प्रमाणावर तयार झाले तरी त्यांची गोळाबेरीज शून्यच होते. एखादा मातीचा ढीग तयार करायचा असेल, तर नुसता ढीग तयार करण्यासाठी माती कुठून आणायची, हा प्रश्न उद्भवतो. मात्र, एक ढीग आणि एक तेवढाच खड्डा यासाठी मातीची गरज पडत नाही.

वाचकाला हे समजावून दिल्यावर लेखकावर या संकल्पना अधिक खोलवर समजावून सांगण्याची जबाबदारी येते आणि या पुस्तकात हॉकिंग ती समर्थपणे पार पाडतो. ‘काळाचीच सुरुवात’ ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्याला काही पुंजभौतिकीच्या संकल्पना वाचकापर्यंत पोहचवाव्या लागतात. कारण ‘बिग बँग’च्या वेळी विश्व जितकं लहान होतं तितक्या लहान पातळीवर अभ्यास करायचा झाला, तर आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षतावादाची सांगड पुंजभौतिकीशी घालावी लागते. शून्यमय अवकाशात एकवटणाऱ्या वस्तुमानाचा आणि तिथे घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना ‘सिंग्युलॅरिटी’ नावाची संकल्पना विचारात घ्यावी लागते. याचं कारण तिथली घनता अमर्याद वाढत जाते. अशा अनंताशी खेळत तिथली गणितं सोडवावी लागतात. हॉकिंगने कृष्णविवरांचा सखोल अभ्यास केला होता. कृष्णविवरांच्या केंद्रातही महाप्रचंड वस्तुमान एकवटलेलं असल्यामुळे तिथेही सिंग्युलॅरिटी तयार होते. विश्वाची उत्पत्ती- काळ, वस्तुमान, ऊर्जा आणि अवकाश या सगळ्यांचीच सुरुवात ‘बिग बँग’ने झाली. त्या सुरुवातीला अशीच सिंग्युलॅरिटी होती, हे लेखक समजावून सांगतो.

इथपर्यंत पुस्तकात एकसंधता आहे; प्रश्न, उत्तरं, त्यांतून निर्माण होणारे प्रश्न, त्यांची उत्तरं, त्यांसाठीच्या संकल्पना- या स्वरूपाची. यापुढच्या भागांमध्ये प्रश्न थोडे वैविध्यपूर्ण आणि स्वतंत्र होतात. काळप्रवास शक्य आहे का? पृथ्वी तगून राहील का? आपण अवकाशात इतर ग्रहांवर वसाहती निर्माण कराव्या का? असे प्रश्न हॉकिंगने हाताळले आहेत. तसेच सध्या अगदी अंकुराच्या स्वरूपात असलेली ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) अफाट वाढून तिचा राक्षसी वृक्ष होईल का? आणि या सर्व पार्श्वभूमी वर मानवजातीचं एकंदरीत काय होईल? पहिल्या पाच प्रकरणांत आपलं विश्व निर्माण कसं झालं आणि आपण इथपर्यंत कसे आलो, याचा आढावा आहे. तर पुढच्या पाच प्रकरणांत ‘इथून पुढे काय?’ या स्वरूपाचं चिंतन आहे. पहिल्या भागावर अर्थातच हॉकिंगचा सखोल अभ्यास आणि त्यातून येणारं प्रभुत्व आहे. पुढच्या भागातल्या घटना घडलेल्या नाहीत, किंबहुना त्या घडतील का, घडल्या तर कशा प्रकारे घडतील, याबद्दल चर्चा असल्याने त्याकडे सत्य म्हणून पाहण्यापेक्षा शक्यता म्हणून पाहावं लागतं. जसजशा या शक्यता गहन होत जातात तसतसं त्यामागची तांत्रिक कारणपरंपरा जटिल बनते. या पुस्तकातही हे काही प्रमाणात जाणवतं. अनेक बाबतीत हॉकिंगची भाकितं निराशाजनक आहेत. उदाहरणार्थ, लोकसंख्यावाढ, अणुयुद्ध, जागतिक तापमानवाढ यापायी मानवजातीला मोठा फटका बसेल व कदाचित अवकाशात वसाहती कराव्या लागतील, असं तो म्हणतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे प्रचंड आहेत हे मान्य करूनही, त्यात महाप्रचंड धोके आहेत, असं तो सांगतो; परंतु सगळी मतं पुरेशी पटली नाहीत तरी काही उत्तरं ही हॉकिंगसारख्या प्रखर बुद्धिमान आणि अभ्यासकाचे विचार म्हणून हाती लागतात. तसेच त्याने दिलेली कारणं विशिष्ट मर्यादेपर्यंत समजली तरी त्यातून त्या मर्यादा ओलांडण्याचं कुतूहल निर्माण होतं. या कारणासाठी हे पुस्तक नुसतं एकदा वाचण्याजोगंच नाही तर स्वत:कडे बाळगून वेळोवेळी ते वाचून पाहण्याजोगं आहे.

या मूळ प्रश्नोत्तरांच्या अलीकडे आणि पलीकडे येणारे लेखही वाचण्याजोगे आहेत. त्याच्या सहकारी वैज्ञानिकाने हॉकिंगच्या आयुष्याबद्दल आणि कामाबद्दल लिहिलेलं आहे. तसेच हॉकिंगने स्वत:ही आपल्या जीवनप्रवासाबद्दल- पुस्तकाच्या नावाला साजेलंसं- थोडक्यात लिहिलेलं आहे. त्यातून त्याचा नर्मविनोदी स्वभावही दिसतो. उदाहरणार्थ, तो त्याच्या शालेय अनुभवावर लिहितो- ‘मी वर्गात कायमच मध्यावर असायचो. आमचा वर्ग बहुधा अतिबुद्धिमान लोकांनी भरलेला असावा!’ हॉकिंगला आपण स्वत: प्रज्ञावंत आहोत याची जाणीव आहे आणि तरीही आपण शाळेत काही पुढचा नंबर काढू शकलो नाही, यात शाळेच्या शिकवण्याच्या आणि गुण देण्याच्या पद्धतीतच काही तरी घोटाळा होता, हे तो अतिशय सहजपणे सांगतो! त्याच्या मुलीने वाहिलेली श्रद्धांजलीही त्याच्या जीवनावर प्रकाश टाकून जाते.

थोडक्यात, पुस्तक वाचनीय आहे आणि वाचकाला भरपूर काही देणारं आहे. सर्वच संकल्पना पहिल्या वाचनात समजतील अशा नाहीत; परंतु जी काही उत्तरं मिळतात, त्यांमधून त्या संकल्पना समजावून घेण्याची उत्सुकता निर्माण करणारं हे पुस्तक आहे. तेव्हा ‘पुस्तक वाचावं की नाही?’ या गहन प्रश्नाला थोडक्यात उत्तर – ‘हो, जरूर’!

  • ‘ब्रीफ आन्सर्स टु द बिग क्वेश्चन्स’
  • लेखक : स्टीफन हॉकिंग
  • प्रकाशक : बॅण्टम
  • पृष्ठे : २५६, किंमत : ६५१ रुपये

ghaski@gmail.com