ब्रूस ली हा पहिला ‘कराटे-स्टार’ होता, हे बहुतेकांना माहीत आहेच. हॉलीवूडपटांमध्ये नायकाची भूमिका करणारा तो पहिला आशियाई होता, हेही माहीत असेल. शिवाय तो १९४० साली अमेरिकेत जन्मला आणि वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला, ही माहिती तर विकिपीडियासुद्धा देतो. पण ज्यांना ब्रूस ली माहीत असतो, ज्यांनी त्याचे चित्रपट पाहिलेले असतात, त्यांनाच लीबद्दल एक गूढ आकर्षण असतं. त्याच्याबद्दलची उपलब्ध माहिती फार त्रोटक असते किंवा ‘त्याला कोणी मारलं?’ याची माहितीच मिळत नाही. इतका चांगला कराटेपटू दुसरा कोणी झाला असेल का, अशा चाहतेसुलभ शंका येत राहतात त्या निराळ्याच!

‘तो काही अत्युच्च दर्जाचा कराटेपटू वगैरे नव्हता. या क्रीडाप्रकारात त्यानं काही स्पर्धा जिंकल्या होत्या, पण बऱ्याच स्पर्धातून तो हरलाही होता. हॉलीवूडमध्ये चमकण्याची इच्छा मात्र त्याला जबर होती. वडील चिनी संगीत-नाटय़ कलावंत होते. हॉलीवूडमध्ये त्यांचीही जानपछान होती. त्यामुळे लहानपणापासून छोटय़ामोठय़ा भूमिका त्यानं केल्या. मात्र, नायकपद काही त्याला मिळू शकलं नाही. मग जिथं बालपणीचा काही काळ घालवला, जिथं मार्शल आर्ट्सचे पहिले धडे घेतले, त्या हाँगकाँगमध्ये ब्रूस ली आला. तिथं मात्र त्याला कराटेपटांमध्ये मुख्य भूमिका मिळाली. १९७१ मध्ये ‘बिग बॉस’, तर त्या पुढल्या वर्षी ‘फिस्ट ऑफ फ्यूरी’ आणि ‘वे ऑफ द ड्रॅगन’ हे चित्रपट गाजल्यावर मात्र ‘वॉर्नर ब्रदर्स’ या बडय़ा स्टुडिओनं त्याला घेऊन ‘एण्टर द ड्रॅगन’ (१९७३) केला. त्याच वर्षी तो मरण पावला. त्याचं कारण ‘अ‍ॅस्पिरिनची अ‍ॅलर्जी’ असं सांगण्यात येत असलं, तरी त्याहून विश्वसनीय कारण हे काखेतले केस काढण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर झालेला ऊष्मादाह, हे आहे. बाकी त्याच्या मृत्यूबद्दल सर्व भाकडकथाच आहेत..’ असं सांगणारं पुस्तक आता बाजारात आलंय!

मॅथ्यू पॉली लिखित ‘ब्रूस ली : अ लाइफ’ हे ते पुस्तक. सध्या हे पुस्तक इंटरनेटवरून उपलब्ध आहे. पण पुढल्या आठवडय़ातच ४९९ रुपये किमतीची त्याची भारतीय आवृत्ती सर्वत्र मिळू लागेल, असं ‘सायमन अ‍ॅण्ड शूस्टर इंडिया’च्या प्रतिनिधीकडून समजलं.

Story img Loader