शैलजा तिवले
बालकांमधील वाढता स्थूलपणा रोखण्यासाठी समाजभान देणं, हा या पुस्तकाचा हेतू. त्याच्या परीक्षणाऐवजी, लेखक डॉ. संजय बोरुडे यांची ही मुलाखत..
स्थूलपणा हा सर्वसामान्यपणे प्रौढांमध्ये आढळणारा आजार. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बालकांमध्येही हा आजार मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. जनुकीय समस्येसह बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंब पद्धती, स्थूलपणा वाढण्यासाठीचे पोषक वातावरण अशी यामागे अनेक कारणे आहेत. परंतु याबाबत समाजातच काय पालकांमध्येही जागृतीचा अभाव मोठय़ा प्रमाणात आहे. बालकांमधील स्थूलपणा ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून याकडे लक्ष वेधणारे स्थूलपणाविषयक शल्यचिकित्सक (बॅरिअॅट्रिक सर्जन) डॉ. संजय बोरुडे यांचे ‘जनरेशन एक्सएल : टॅकिलग अॅण्ड प्रिव्हेिन्टग चाइल्डहूड ओबेसिटी इन इंडिया’ हे पुस्तक गेल्याच महिन्यात प्रकाशित झाले. मुंबईकर असलेले डॉ. बोरुडे यांच्याशी साधलेल्या या संवादातून, पुस्तकाचे अंतरंग आणि मर्मही उलगडत गेले..
पुस्तकाची संकल्पना काय आहे?
माझ्याकडे १४ वर्षांचा मुलगा आला होता. त्याचे वजन १८० किलोग्रॅम होते. मुंबईत राहणाऱ्या या मुलाचे आईवडील दोघेही नोकरी करत होते. याला जेवण वाढून घरामध्ये बंद करून ते कामावर जात. सहा वर्षांचा असताना या मुलाचे वजन १०० किलो होते. त्या पालकांना आपले मूल छान गुटगुटीत आहे असेच वाटायचे. त्यामुळे त्यांनी कधीही डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. १४ वर्षांचा असताना त्याला छातीत दुखू लागले.. हदयाला त्रास झाल्यामुळे ते माझ्याकडे घेऊन आले होते. त्याला अन्य आजारही जडले असल्याचे या वेळी समजले. त्यामुळे त्याची बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करावी लागली. या घटनेला आता १७ वर्षे झाली. त्या मुलाचे वजन आता वयाच्या ३१व्या वर्षी १०० किलो आहे.
झोया या ११ महिन्यांच्या मुलीवर वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया २०११ साली केल्यानंतर काही प्रमाणात पालकांमध्ये जनजागृती झाली. अनेक पालक स्थूल मुलांच्या तक्रारी घेऊन येऊ लागले. गेल्या काही वर्षांत बालकांमधील स्थूलपणाचे प्रमाण वेगाने वाढत असून जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, भारतातील पाच बालकांपैकी एका बालकाला स्थूलपणा आहे. बालकांमधील स्थूलपणा हा फक्त जनुकीय समस्यांमुळे नव्हे तर वर्तणुकीमध्ये झालेले बदल, जीवनशैलीतील बदल यामुळेही वाढत आहे. पौगंडावस्थेत वजन कमी होईल असा समज असल्यामुळे स्थूलपणाचे निदान वेळेत होत नाही.
बालकांमधील स्थूलपणा मोठय़ा प्रमाणात वाढण्यामध्ये आजूबाजूचे वातावरणही पोषक (!) आहे. हे विशेषत: शहरांमध्ये अधिक आहे. शहरातील कुटुंबामध्ये हे वातावरण वाढत असून जी जीवनशैली पालक जगत आहेत, ती आपसूकच मुलांमध्ये येत आहे. पालक, कुटुंब व्यवस्था, शाळा, समाज अशा सर्व घटकांचा यामध्ये सहभाग असून या घटकांना वेळीच भानावर आणण्यासाठी या पुस्तकाची रचना केली आहे.
पुस्तकामध्ये काय वाचायला मिळते?
स्थूलपणाशी निगडित वैद्यकीय, मानसिक, वर्तणूक, सामाजिक भान आणि अगदी शेवटचा आणि तुलनेने कमी महत्त्वाचा ‘शस्त्रक्रिया’ या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. बालकांमधील स्थूलता ही प्रतिबंधात्मक आजार आहे. बालकांमधील स्थूलता म्हणजे काय, मूल स्थूल आहे हे कसे ओळखावे, याचे निदान त्या मागील कारणे कशी ओळखावी यासाठीही मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. स्थूलपणा झाल्यास अनेकदा आहारामध्ये अचानक बदल करतात किंवा अचानक व्यायाम करायला सुरुवात करतात. परंतु बालकांमध्ये असे अचानक बदल त्यांचे हृदय, सांधे, हार्मोन्स, चयापचय (मेटाबॉलिक सिस्टीम) व्यवस्था इत्यादीवर परिणाम करते. त्यामुळे या उपाययोजना करणे चुकीचे आहे. वैद्यकीय मार्गदर्शनाखाली या उपाययोजना केल्यास कसे फायदेशीर ठरेल, याचीही सविस्तर माहिती पुस्तकात दिलेली आहे.
दहा वर्षांच्या खालील बालकांमध्ये जनुकीय समस्यांमुळे स्थूलता आलेली असते. दहा वर्षांवरील बालकांमध्ये जनुकीय आणि जीवनशैली या दोन्हींमुळे स्थूलपणा वाढलेला असतो. या बालकांमध्ये जनुकीय समस्यांमुळे हार्मोन्सच्या समस्याही असतात. यांच्यामध्ये इन्सुलिन प्रतिरोध जास्त प्रमाणात असल्यामुळे यांच्यामध्ये मधुमेहाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. चयापचयाशी संबंधित अनेक आजार जडतात. हे टाळण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत, कोणत्या प्रकारचे व्यायाम करावेत यावर स्वतंत्र भाग लिहिलेला आहे.
शस्त्रक्रियेबाबत पुस्तक काय सांगते?
शस्त्रक्रिया म्हणजे वजन कमी करण्याचा उपाय नाही – हा सगळे उपाय करूनही काही परिणाम होत नसल्यास आणि वाढत्या वजनामुळे जीवाला धोका निर्माण झाल्यास करायचा शेवटचा उपाय आहे. पुस्तकातील १० भागांपैकी नऊ भाग हे स्थूलपणा प्रतिबंधाविषयी आणि झाल्यास वेळेत निदान, आहार, व्यायाम यांसारख्या उपाययोजनांवर भर देण्याविषयी आहेत. काही परिस्थितींमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते, विशेषत: काही जनुकीय समस्यांमुळे आलेला स्थूलपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेचे काही फायदे आहेत. हे शेवटच्या भागामध्ये सांगितले आहे.
स्थूलतेसाठी पोषक वातावरण म्हणजे काय?
स्थूलपणा वाढण्यासाठीचे पोषक वातावरण म्हणजे स्थूलपणा वाढण्यासाठी घातक अशा आहारावर भर देणाऱ्या गोष्टी. काही कुटुंबामध्ये आई-वडिलांमध्येही अनेकदा आहाराविषयी पुरेशी जागरूकता नसते. सकस आहारयुक्त जेवणाऐवजी रेडिमेड फूडकडे कल वाढत आहे. पालकांमध्ये जागृती असल्यास घरी त्या मुलाला आहाराबाबत, व्यायामाबाबत चांगल्या सवयी आपसूकच लागतात. परंतु मूल जेव्हा शाळेत जाते, तिथे जंकफूड किंवा रेडिमेड फूडला प्रोत्साहन देणाऱ्या बाबी जसे की शाळेचे उपाहारगृह, वर्गातील इतर मुलांच्या डब्यातील पदार्थाकडे मूल आकर्षित होते.
समजा घरी आणि शाळेत हे वातावरण नाही. परंतु समाजात वावरताना अनेजण चॉकलेट, बिस्किटे असे जंकफूड देत असतात. त्यामुळे एकूण समाजातच वाढता स्थूलपणा आणि आहार याबाबतचे भान येणे का आणि कसे गरजेचे आहे, हे यात मांडले आहे. शहरांत स्थुलतेची समस्या गंभीर आहे. ग्रामीण भागांतील काही बालकांमध्ये स्थूलता असते. परंतु यामागे जनुकीय समस्या हे कारण असते.
स्थूलपणा आणि मानसिक आरोग्य याचा काही संबंध असतो?
स्थूलपणा आणि मुलाचे मानसिक आरोग्य याचा खूप जवळचा संबंध आहे. माझ्याकडे ११ वर्षांची मुलगी उपचारासाठी आली होती. जाडेपणामुळे तिचे वर्गमित्र तिला खूप चिडवायचे. त्या मुलीने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला स्थूलपणामुळे नैराश्य (डिप्रेशन) आले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेक मुलांमध्ये यामुळे न्यूनगंड निर्माण होतो. नैराश्य वाढल्यामुळेही मुले जास्त खाऊ लागतात. मग हे न संपणारे चक्र सुरू होते.
मानसिक अवलंबित्व हे एक स्थूलपणा वाढण्यासाठीचे महत्त्वाचे कारण आहे. पालक नोकरी करत असल्यामुळे त्यांना मुलांना पुरेसा वेळ देत येत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी मग मुलाला जे काही खायला आवडते ते भरभरून देण्याकडे पालकांचा कल वाढतो. मुले आणि पालकांमधील नाते आरोग्यदायी कसे असावे हेही पुस्तकातून सांगितले आहे. बऱ्याचदा पालकांचा गैरसमज असतो की माझे मूल गुटगुटीत आहे आणि किशोरावस्थेत गेल्यावर काही खेळाचे क्लासेस लावले की त्याचे वजन कमी होईल. पण ते खूप अवघड असते. मुलांची मानसिकता समजून त्यांना आहारासह व्यायामाच्या चांगल्या सवयीकडे कसे कलेकलेने वळविता येईल याबाबतही यात मार्गदर्शन केले आहे.
पालकांचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे का?
काही पालकांमध्ये अगदी टोकाची भूमिका असते की, मूल जाड नाहीच.. मग हळूहळू ते समजून घेतात आणि लहान वयातल्या स्थूलपणाकडे सकारात्मकपणे लक्ष द्यायला लागतात. तर दुसरीकडे ‘माझा मुलगा जाड आहे त्याची शस्त्रक्रिया करायची आहे. त्याला बारीक करा,’ अशी थेट भूमिकाही काही पालकांची असते. जाड किंवा स्थूल नसणे म्हणजेच मूल निरोगी आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे माझ्या मुलाचे वजन कमी करणे पुरेसे नाही तर आरोग्यदृष्टय़ा सक्षम कसे असेल याकडे पालकांचा दृष्टिकोन वळविणे आवश्यक आहे.
या पुस्तकाचा वाचक कोण असेल?
हे पुस्तक मुलगा किंवा मुलगी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक आणि त्यांचे आजीआजोबा अशा सर्वासाठी आहे. त्यामुळे हे पुस्तक वैद्यकीय भाषेत नाही तर सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिले आहे. हे पुस्तक मी गेली सात वर्षे लिहीतच होतो. विविध बालकांवर उपचार करताना आलेल्या दहा ते बारा वर्षांच्या अनुभवांमधून हे पुस्तक साकारले आहे.