|| सिद्धार्थ खांडेकर

हे पुस्तक आत्मपर खरे, पण क्रिकेटभोवतीचे भावविश्व कसे बदलत गेले याचे चित्र ते रेखाटते.. 

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

भारतातील क्रिकेटप्रेमाला धर्माची उपमा देण्याची खोड विश्लेषक आणि माध्यमांना केव्हा जडली ते कळायला मार्ग नाही. ब्रिटिशांनी शोधून काढलेला भारतीय खेळ, असेही याचे वर्णन केले जाते. स्वातंत्र्यानंतर देश सुरुवातीस संथगतीने स्वबळावर उभा राहात होता, जवळपास त्याच संथगतीने देशातील क्रिकेटही विकसत आणि विस्तारत होते. त्या विस्ताराची भुरळ रामचंद्र गुहांसारख्या इतिहासकारांनाही पडली. क्रिकेट व क्रिकेटपटूंच्या या प्रवासात यशापयश, हेवेदावे, रुसवेफुगवे असंख्यच. पण या प्रवासात जवळपास प्रत्येक क्रिकेटपटूच्या दृष्टीने सर्वात कडवे आव्हान ठरले, ते निबर क्रिकेट प्रशासनाचे! ‘फोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटिशांची नीती असल्याचे आपल्याला इतिहासात शिकवले जाते. हे धोरण वा ही नीती दशकानुदशकांच्या क्रिकेट प्रशासकांमध्ये मुरलेली होती.. अजूनही आहे. ‘दि इंडियन एक्सप्रेस’सह अनेक आघाडीच्या इंग्रजी नियतकालिकांमध्ये क्रिकेट बातमीदार, क्रिकेट संपादकाची भूमिका गेले तीन दशके निभावणारे पत्रकार-लेखक प्रदीप मॅगॅझिन यांच्या ताज्या पुस्तकातून हेच ठायीठायी जाणवत राहते.

‘नॉट जस्ट क्रिकेट’ हे त्यांचे नवीन पुस्तक. त्याआधी, सामनेनिश्चिती किंवा मॅच फिक्सिंगच्या प्रकारांवरील त्यांचे ‘नॉट क्वाइट क्रिकेट’ हे पुस्तक नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात अवतरले होते. त्या समस्येवरील पहिलेच पुस्तक म्हणून ते गाजलेही होते. ‘नॉट जस्ट क्रिकेट’ हे रूढार्थाने त्या पुस्तकाचा पुढील भाग वा सीक्वल नाही. सामनेनिश्चिती व सट्टेबाजीविषयी स्वतंत्र प्रकरण याही पुस्तकात आहेच. पण तो या पुस्तकाचा गाभा नाही. हे पुस्तक अधिक व्यापक (आणि पसरट) कालखंडाला स्पर्श करते. त्याचबरोबर ते बरेचसे आत्मचरित्रात्मकही आहे.

मॅगॅझिन हे काश्मिरी पंडित. ऐंशीच्या दशकात या समाजातील असंख्य कुटुंबांप्रमाणे त्यांचे कुटुंबही विस्थापित झाले. त्याची खंत ‘पास्ट इन द प्रेझेंट’ या पहिल्या प्रकरणातून प्रकटते. श्रीनगरमधून पंजाबात स्थलांतरित होताना बसलेले संस्कृतीबदलाचे अनेक धक्के (मांसाहार करू नका म्हणून घरमालकाने दिलेला इशारा धुडकावून खास सामिष भोजनाचा आस्वाद घेताना ब्राह्मण्याऐवजी कश्मिरियतशी अधिक जिव्हाळा दाखवणे वगैरे), नव्याने पायावर उभे राहण्याची गरज /अगतिकता यांचा उल्लेख आहे. पंजाबातच महाविद्यालयीन शिक्षण, क्रिकेट कौशल्य आणि क्रिकेटप्रेम अशी वळणे घेत पुढील प्रकरणांपासून मॅगॅझिन एक पत्रकार या नात्याने सुरुवातीला दिसलेल्या भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंचे किस्से कथन करू लागतात. त्यात सर्वाधिक उठून दिसतो वेस्ट इंडिजमध्ये १९७१मधील विजयाचा क्षण. भारतीय वेळेनुसार पहाटे ३ वाजता त्रिनिदादमध्ये भारतीय संघाने कॅरेबियनमधील पहिला कसोटी विजय आणि मालिका विजय नोंदवला. त्या काळात क्रिकेट आणि क्रिकेटप्रेमींना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा होता रेडिओ. त्या पहाटे साडेतीन वाजता विख्यात समालोचक रवी चतुर्वेदींना भारतीय विजयाची नांदी देताना रडू कोसळले. ‘यह गांधी का देश, यह नेहरू का देश..’ असे ते बोलून गेले. ते ऐकून प्रदीप मॅगॅझिनही भारावले. हे भाबडे, हळवे क्रिकेटप्रेम त्या काळाशी सुसंगत होते. कालांतराने भारतीय क्रिकेटप्रेमींची ही समज अधिक परिपक्व झाली. म्हणजे प्रेम घटले नाही, तरी अपेक्षा डोंगराएवढय़ा झाल्या. अपेक्षाभंगाच्या दु:खाने संतापाची जागा घेतली. हा बदल दाखवण्याच्या दृष्टीने मॅगॅझिन त्या प्रसंगाचा आधार घेतात.  हा प्रयत्न यशस्वीच म्हणावा असा.

हे पुस्तक जसे मॅगॅझिन यांनी दुरून-जवळून पाहिलेल्या क्रिकेटच्या सफरीचे आहे, तितकेच ते क्रिकेटपटूंविषयीदेखील आहे. मन्सूर अली खान ‘टायगर’ पतौडी, बिशनसिंग बेदी, सुनील गावस्कर, कपिलदेव निखंज, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे अशा अनेक खेळाडूंविषयी – त्यांना प्रत्यक्ष भेटून भारतीय क्रिकेटमधील गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न मॅगॅझिन करतात. पतौडींना टायगर संबोधले जाई कारण कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करताना चेंडूवर वाघासारखे झेपावताना त्यांना असंख्यांनी पाहिले. पण वयाच्या ११व्या वर्षी त्यांनी वाघ मारला, म्हणूनही हे नामकरण झाले असावे अशी अद्भुत माहिती या पुस्तकातून मिळते. पतौडींचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न मॅगॅझिन यांनी केला होता आणि ते राहिलेच. पण यानिमित्ताने पतौडींना जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली.

त्यांचे काही पूर्वग्रह निश्चित आहेत, हे खेळाडूंविषयीच्या लिखाणात ठसठशीतपणे दिसून येते. याचे एक कारण म्हणजे मॅगॅझिन लहानाचे मोठे झाले त्या काळात क्रिकेटमध्ये उत्तर भारत विरुद्ध पश्चिम भारत (म्हणजे खरे तर मुंबई) असे दोन प्रवाह जोरदार होते. मुंबई हे क्रिकेटचे केंद्र निर्विवाद होते, पण पतौडी, बेदीसारख्यांमुळे उत्तरेकडील मंडळींचा आत्मविश्वास व आवाज वाढू लागला होता. त्यात मॅगॅझिन उत्तरेतले. भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चिली गेलेली खेळाडूंतर्गत स्पर्धा होती कपिल वि. सुनील! या अलिखित द्वंद्वाविषयी स्वतंत्र उपप्रकरण आहे. कातळासारखा भक्कम,अविचल सुनील; तर फसफसणाऱ्या लाव्हारसासारखा कपिल. या दोघांतील स्पर्धा म्हणजे खरे तर दोन भिन्न संस्कृतींची टक्कर. पण त्यावेळच्या क्रिकेट मंडळाने या दोघांच्या गुणवत्तेची बेरीज करायचे सोडून त्यांच्या कर्णधारपदांची संगीत खुर्ची केली. कपिलच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३मध्ये विश्वचषक जिंकला, तर सुनीलच्या नेतृत्वाखाली १९८५मध्ये चँपियन्स ऑफ चँपियन्स ट्रॉफी. दोघेही आपापल्या काळातले विक्रमवीर. परंतु दोघांत अनेकदा काही मुद्दय़ांवर मतभेदही. त्यांच्याविषयी मॅगॅझिन कपिलची बाजू जितक्या समर्थपणे मांडतात, तितक्या समर्थपणे सुनीलची बाजू पुस्तकात येत नाही. सुनील काय म्हणतात, याविषयी त्यांच्याच आत्मचरित्रातील उतारे उद्धृत करणे पुरेसे वस्तुनिष्ठ ठरत नाही.

अझरुद्दीन आणि सामनेनिश्चिती काळातील त्याचे वर्तन याविषयी मात्र सविस्तर माहिती आहे. पण सौरव गांगुलीविषयी लिहिताना मॅगॅझिन किंचित वाहावत गेल्यासारखे वाटतात. सौरव उत्तम कर्णधार होता हे नि:संशय खरेच. पण त्याला सचिन, राहुल, लक्ष्मण, कुंबळे या अत्यंत व सचोटीच्या खेळाडूंची साथ लाभली याविषयीचे उल्लेख त्रोटक आढळतात. महत्त्वाच्या सामन्यांआधी दुखापतग्रस्त होण्याची त्याची सवय तंदुरुस्तीच्या सध्या निकषांत कुठेही बसणारे नाहीत. त्याच्यानंतरचे दोन्ही कर्णधार – महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांनी या निकषावर गांगुली किती कालबाह्य होता हेच दाखवून दिले. पण असे पुरेसे वस्तुनिष्ठ विश्लेषण पुस्तकात आढळत नाही. 

सचिनविषयी स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात असू नये हे खटकते. नव्वदच्या दशकातील सचिनपेक्षा नवीन शतकातील सचिनचा प्रभाव भारतीय क्रिकेटवर अधिक दिसून आला. कदाचित मुंबईकर क्रिकेटपटू फार मोकळेपणाने माध्यमांशी बोलत नाहीत आणि सामने जिंकण्यापेक्षा स्वत:च्या कामगिरीलाच अधिक जपतात/महत्त्व देतात या उत्तर हिंदूुस्थानी धारणेतून हे घडले असावे काय? सामनेनिश्चिती, सौरवच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगिरीचा बदललेला आलेख, ग्रेग चॅपेल प्रकरण, व्यावसायिकता आणि पैशाचा बदललेला पोत या सगळय़ा बदलांचा साक्षीदार आणि भागीदार या नात्याचे सचिनचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कदाचित ही अपेक्षा अवाजवी असू शकते. पण मेम्वॉ (स्मरण आख्यान) आणि क्रॉनिकल (इतिवृत्त) यांत समतोल साधण्याच्या आग्रहातून हे घडले असावे.

प्रदीप मॅगॅझिन हे हाडाचे पत्रकार. त्यामुळे पुस्तकातील भाषा अत्यंत प्रवाही आणि सोपी आहे. सामनेनिश्चितीची एक बातमी आपल्या हातून कशी निसटली हे प्रांजळपणे सांगताना, तमाम बातमीदारांच्या दुखण्यावर त्यांनी नेमके बोट ठेवले आहे. त्याचबरोबर, पंजाब जळत असताना जीव धोक्यात घालून केलेल्या क्रिकेट बातमीदारीचे किस्से या व्यवसायातील जोखमींची नेमकी जाणीव करून देणारे ठरतात. यात राजकीय संदर्भ असले, तरी राजकीय भूमिका घेण्याचा कोणताही सोस नाही. अपवाद शेवटच्या प्रकरणाचा. ‘क्रिकेट अ‍ॅज अ युनिफायर?’ या शेवटच्या प्रकरणात काश्मीर खोऱ्यात क्रिकेटमुळे तेथील स्थानिक मुस्लिमांच्या मानसिकतेत – भारताविषयीच्या धारणेत काही फरक पडला का, याविषयी त्यांनी केलेल्या चाचपणीचा उल्लेख आहे. परवेझ रसूल नामक काश्मिरी क्रिकेटपटूची गतदशकात भारतीय संघात निवड झाली (पण अंतिम ११ जणांमध्ये तो खेळू शकला नाही), तेव्हा काश्मिरी तरुण मुख्य प्रवाहात येत असल्याची ती नांदी समजावी का, असे प्रश्न त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन कित्येकांना विचारले. या सर्वाचे एकमुखी उत्तर होते – अजिबात नाही! स्वत: काश्मिरी पंडित असूनही अनुच्छेद ३७०मध्ये बदल झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात गेल्यास, पंडित-मुस्लीम दरी अधिक रुंदावेल हे ते नि:संदिग्धपणे मांडतात. एका क्रिकेट पत्रकाराच्या क्रिकेटविषयीच्या धारणांना बसलेला तो धक्का मॅगॅझिन प्रांजळपणे नमूद करतात, हे मात्र या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्टय़ मानावेच लागेल.

siddharth. khandekar@expressindia.

Story img Loader