‘दिल्ली राजधानी क्षेत्र’ म्हणवणाऱ्या प्रदेशाच्या ईशान्येकडचे अनेक भाग २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२० या चार दिवसांत जळत, धुमसत होते. एकंदर ५४ जणांनी या चार दिवसांमध्ये प्राण गमावले. जाळपोळीत अनेक घरांचं, व्यावसायिक गाळय़ांचं नुकसान  झालं. ‘आमच्या कारकीर्दीत दंगली झाल्या नाहीत’ असा दावा सर्वच राज्यकर्त्यांना करायचा असतो, पण दिल्लीच्या दंगलीनं ती संधी नाकारली. ज्या सहा भागांमध्ये ही दंगल अधिक पेटली, ते सारेच गरीब वा निम्न मध्यमवर्गीयांचे होते. तिथल्या रहिवाशांचं सरासरी नुकसान असेल प्रत्येकी दोन-तीन लाख रुपयांचं. हा आकडा कदाचित मोठा वाटणार नाही, पण त्या गरीब कुटुंबांमध्ये सर्वस्व गमावल्याची हताशा अवघ्या दोन वर्षांपूर्वी, फेब्रुवारीच्या अखेरीस होती.

या दंगलीवर दोन पुस्तकं आली. यापैकी विचारानं एक उजवं. एक विचारानं डावं. त्यापैकी उजवं पुस्तक प्रकाशनाआधीच खूप गाजलं. ‘दिल्ली रायट्स २०२०- अ‍ॅन अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाच्या लेखिका मोनिका अरोडा यांनी ‘ब्लूम्सबरी’ या प्रकाशनगृहानं आपलं पुस्तक प्रकाशित करायला ऐनवेळी नकार दिल्याचा आरोप केला आणि लगोलग हे पुस्तक ‘गरुडा बुक्स’ या संस्थेनं प्रकाशित केलं. ईशान्य दिल्लीच्या मुस्लिम वस्त्यांतून हिंसाचार मुद्दाम भडकावण्याची तयारी झालेली होती, तो जागरुक कार्यकर्त्यांनी कसा थोपवला, याच्या कथा  त्या पुस्तकात वाचायला मिळतात. अर्थातच या पुस्तकाला रिपोर्ताजचा ढंग आहे. दुसरं पुस्तक ‘लेफ्टवर्ड बुक्स’नं प्रकाशित केलं गेल्या फेब्रुवारीत. त्यात नसीरुद्दीन शाह, तीस्ता सेटलवाड, टी. एम. कृष्णा इत्यादींनी या दंगलीनंतर विविध वृत्तपत्रांत लिहिलेले लेख आहेत. या अशा लेखांचं संकलन हा पुस्तकाचा जवळपास निम्मा भाग (१८१ पानांपैकी पहिली ८७ पानं). पण ८९ व्या पानापासून, प्रामुख्यानं मार्क्‍सवादी संघटनांनी मिळून केलेल्या पाहणीवर आधारित ‘सत्यशोधन अहवाल’ सुरू होतो. या अहवालात आकडेवारीवर आणि एकेका कुटुंबाच्या मुलाखतींवर भर आहे. याच संघटनांनी दंगलीनंतर तातडीनं काही मदतकार्य केलं होतं, त्याचीही माहिती अखेरीस आहे. दोन्ही पुस्तकं प्रसारमाध्यमांपेक्षा निराळी तथ्यं सांगतात.

Story img Loader