‘बुकर पारितोषिका’च्या अंतिम यादीत असलेल्या या कादंबरीत सांस्कृतिक क्रांतीच्या काळातील मानसिक कुतरओढ आली, तरी त्यात कुणावर आकस नाही की कुणाला लक्ष्य करण्याचा प्रकार नाही. त्यातील तपशील हे लेखिकेचे आत्मचरित्र नाही. जगाला माहीत असलेल्या घटनेच्या ढीगभर संशोधनांतून उभारलेले हे कथात्म मिश्रण आहे..
आपल्या हयातीचा आणि कर्तृत्वाचा साराच लेखनकाळ देशाबाहेर घालवून मुळांचा वगैरे शोध घेणारा साहित्यप्रपंच हा कायमच त्या त्या लेखकाकडून तयार झालेला परदृष्टीचं इतिहासकथन ठरतो. फक्त भारतासंबंधात विचार करायचा झाला तर जन्माने ब्रिटिश आणि कारकीर्दीने अमेरिकी असलेल्या झुंपा लाहिरी यांचे भारतीय नक्षलवादी चळवळीच्या टप्प्याचे चिंतन, मुंबईत जन्मलेल्या सलमान रश्दी यांचा ब्रिटन-अमेरिकेतून फाळणीउत्तर भारताचा शोध किंवा जन्म-कर्माने संपूर्ण ब्रिटिश असलेल्या संजीव सहोटा यांचा (‘द इयर ऑफ रनअवे’ या गेल्या वर्षी बुकर लघुयादीत असलेल्या पुस्तकाचे लेखक) भारतीय मनातील जातिव्यवस्थेचा पगडा मांडण्याचा अट्टहास, रोिहटन मिस्त्री यांचा कॅनडा स्थलांतरानंतर पुस्तकबद्ध झालेला पारशी समुदायकेंद्रित भारत हे सगळे भूमीबाहेरून भूमीतील माणसांच्या जगण्याचे विच्छेदन आहे. हे शिलेदार आपल्या कलाकृतींनी जगभरात पोहोचले. पण त्यांनी पोहोचविलेल्या भारताच्या कथातिहासाला कायमच परदृष्टीची मर्यादा राहिलेली दिसते. मिस्त्री, रश्दींच्या नावामागे ‘वादग्रस्त’ हे विशेषण आणि लाहिरींच्या भारत-भारतीय दर्शनाबाबत दबक्या टीकेचा सूर कार्यरत असतोच असतो.
यंदा बुकरसाठी लघुयादीत सरकलेल्या मॅडलिन टियान या बऱ्याचशा मिस्त्री, रश्दी, लाहिरी पंथातल्या लेखक आहेत. चिनी आणि मलेशियाई दाम्पत्याच्या पोटी कॅनडामध्ये जन्मलेल्या टियान यांनी कथालेखनात जम बसवायला पुरेसा वेळ घेतला. त्यानंतर दीर्घ पल्ल्याच्या कादंबऱ्यांचा धडाका लावला. अन् त्यात आपले आशियाई अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. गेल्या दशकभरामध्ये त्यांच्या कादंबऱ्यांतून दक्षिण आशियाई देशांतील ऐतिहासिक घटनांच्या परिघात अडकलेल्या माणसांच्या कुटुंबकथा साकारल्या जात आहेत. सर्टनिटी (जपानव्याप्त मलेशियाई युद्धकाळ), डॉग्ज अॅट द पेरिमीटर (कंबोडियातील नरसंहाराची पाश्र्वभूमी) या कादंबऱ्यांनी टियान पुरेशा आंतरराष्ट्रीय झाल्या. त्यांच्या ‘डू नॉट से वी हॅव नथिंग’ या चीनच्या सांस्कृतिक क्रांतीचा महापट उभा करणाऱ्या नव्या कादंबरीने मात्र बुकरच्या संभाव्य विजेत्यांपर्यंत मजल मारली आहे.
माओने चीनमध्ये लादलेल्या ‘सांस्कृतिक क्रांती’ला यंदा पन्नास वर्षे पूर्ण झालेली असताना ‘डू नॉट से वी हॅव नथिंग’ आली आहे. यात क्रांतिपर्वातील दोन सांगीतिक कुटुंबांची राजकीय बंधनामुळे झालेली चरफड तिआनानमेन चौकातील प्रसिद्ध विद्यार्थ्यांच्या संहाराच्या घटनेपर्यंत जोडण्यात आलेली आहे. गंमत म्हणजे इतिहासातील भरगच्च घटनांच्या दस्तऐवजाचे दडपण न घेता ही दोन कुटुंबांतील तीन पिढय़ांची गाथा टियान यांनी उभी केली आहे.
कादंबरीला सुरुवात होते, व्हँकूव्हर शहरामध्ये. येथील दहा वर्षीय निवेदिका जिआंग-ली-लिंग किंवा मॅरी जिआँग ही वाचकांना सांगत असलेल्या, तिच्या वडिलांच्या आठवणींतून. तिआनानमेन चौकातील घटना घडून गेल्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये आपल्या वडिलांनी चीनमध्ये आत्महत्या केल्याच्या घटनेने शोकाकुल झालेली ही नायिका सांगत असलेल्या घटना संगीतातील लहानशा संदर्भानी कादंबरी सुरू होते. बाखच्या व्हायोलिन-पियानोच्या सोनाटा-४च्या सुरावटींचा उल्लेख येथे दुसऱ्याच पानात येतो.. हा संदर्भ मात्र, सुरुवातीला वाटतो तितका सूक्ष्म नाही. पुढे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताने भारलेल्या आणि ते अंगात भिनलेल्या चिनी व्यक्तींची होरपळ शब्दबद्ध करताना सातत्याने अभिजात सुरावटींचे दाखले पानोपानी भेटीला येत राहतात.
हाँगकाँगमध्ये वडिलांच्या इच्छेनुसार अंत्यविधी करून परतलेली आई आणि निवेदिका जिआंग-ली- लिंग यांच्या जगण्यातल्या सर्वच घटकांवर मृत्युछाया पसरलेली असते. वडिलांच्या अज्ञात ठिकाणी असलेल्या आप्तांपर्यंत त्यांच्या मृत्यूची वार्ता पोहोचविण्याची तिच्या आईची धडपड सुरू असते. त्यातच तिआनानमेन चौकातील घटनेनंतर चीनमधून भूमिगत झालेली अै-मिंग ही तरुण पाहुणी त्यांच्या घरात दाखल होते. जिआंग-ली-लिंगच्या वडिलांना संगीत शिकविणाऱ्या स्पॅरो नामक व्यक्तीची ही मुलगी. तिच्या तेथल्या तीन महिन्यांच्या वास्तव्यामध्ये जिआंग-ली-लिंगच्या वडिलांच्या खोलीत सापडलेल्या ‘बुक ऑफ रेकॉर्ड्स’ नामक हस्तलिखितांच्या आधारे आणि अै-मिंगकडून त्याच्या वाचनाच्या आधारे तीन पिढय़ांच्या सांगीतिक होरपळीचा इतिहास चीनमधील खेडय़ापासून सुरू होतो.
जिआंग-ली-लिंगचे पियानोवादक वडील जिआंग कै, त्यांना संगीताची दीक्षा देणारे स्पॅरो, या स्पॅरोचे आई-वडील, बहिणीचे कुटुंब आणि त्यांची मुलगी शू ली अशी लांबलचक पात्ररचना आणि प्रचंड मोठा काळ या कादंबरीमधील निवेदनात आहे.
अगदी १९४९ सालातील मुक्त-संगीताच्या काळामध्ये पुस्तकांपासून संगीतापर्यंत अभिजात जागतिक कलांचे संगोपन होणाऱ्या या मध्यमवर्गीय घरांमध्ये सांस्कृतिक क्रांतीनंतर बदलत जाणाऱ्या कित्येक घटनांची जंत्री आली आहे. सांस्कृतिक क्रांतीनंतर ‘परदेशी’ पुस्तकांची ग्रंथालयांपासून, दुकानांतून केली जाणारी हद्दपारी आणि ग्राहक-वाचकांनी त्यावर काढलेला हस्तलिखितांचा पर्याय येथे काहीसा रे ब्रॅडबरीच्या ‘फॅरनहैट ४५१’प्रमाणे आलेला आहे. अभिजात संगीताच्या रेकॉर्ड्स ऐकण्यासाठी शोधावी लागणारी पळवाट आणि स्वतजवळ असलेल्या संगीताची जपणूक करताना होणारी कुचंबणा या सगळ्यांचे आरस्पानी चित्रण येथे आलेले आहे.
इथे रात्री सर्व झोपल्यावर गुपचूप रेकॉर्ड्स काढून, बंदी घातलेले परकीय संगीत ऐकणारी पात्रे आहेत, तशीच दूरचे कोठलेसे रेडिओ स्टेशन ऐकण्यासाठी रेडिओला कान लावून जग हरवलेले संगीतभक्त आहेत. व्हायोलिन, पिआनो या वाद्यांसाठीच्या सुरावटी, आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या अभिजात संगीतकारांच्या कलाकृतींची कादंबरीतील व्यक्तींच्या आयुष्याशी घातलेली सांगड आहे. इथे चिनी नावांमध्ये दडलेल्या अर्थाची माहिती वारंवार येते, जिआंग-लीपासून प्रत्येक पात्राचा अर्थ पाहिला, तर आपल्याला काहीशा विचित्र वाटणाऱ्या चिनी नामकरणाच्या पद्धतींमागील विचारधारा लक्षात येऊ शकेल. ही पात्रे एकमेकांना भेटण्यापासून त्यांच्या संसाराला संगीताने दिलेला आधार, त्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या दडपशाहीच्या काळात संगीत पुसून टाकायसाठी केला जाणारा प्रयत्न आणि त्यावर त्यांनी केलेली मात हाच मुख्य विषय कादंबरीच्या प्रकरणांमधून वारंवार येत राहतो.
पुस्तकाला दोन विभाग आहेत. ज्याच्या पहिल्या विभागात एक ते आठ या क्रमाने प्रकरणे आहेत. तर दुसऱ्या ‘शून्य’ विभागात सात ते एक अशा उलट गतीने प्रकरणे आहेत. या साऱ्या प्रकरणांमध्ये चीनमधील ऐतिहासिक राजकीय दबावतंत्र आणि तिआनानमेन चौकातील घटनेनंतरचा धागाही तुटत नाही.
मॅडलिन टियान यांची शैली खूपच संयतपणे अधिकाधिक तपशील सांगण्याची आहे. चित्रपटांमध्ये तुलना करताना नेहमी संथपणे चालणारे कलात्मक चित्रपट आणि वेगवानरीत्या चालणारे मारधाडीचे घटनात्मक चित्रपट अशी विभागणी केली जाते. टियान यांची कादंबरी कलात्मक चित्रपटासारखी खूप संथपणे सुरू राहते. तिच्या सुरुवातीच्या, वाचकाचे चित्त पकडण्यास अवघड अशा नावांच्या पात्र-जंत्रीला आणि घटनाशून्य घटकांना डोक्यात पकडून पुढे जाण्यासाठी साहजिकच थोडे कष्ट घ्यावे लागतील. मात्र ते जुळल्यानंतर कादंबरीतला संगीत वेदना-प्रवास सहज आकलन व्हायला लागतो. कादंबरीत काही चित्रे, तत्कालीन घटनांची छायाचित्रे आणि चिनी चित्रलिपी यांचा त्रोटक प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. ही कादंबरी चीनमध्ये विशिष्ट काळात नक्की काय घडले, याचा माहितीपटासारखा दस्तऐवज देण्यासाठी लिहिली गेलेली नाही. जरी त्यात सांस्कृतिक क्रांतीच्या काळातील मानसिक कुतरओढ आली, तरी त्यात कुणावर करायची म्हणून करण्यात आलेली टीका नाही, आकस नाही किंवा वाद घडवून आणण्यासाठी कुणाला लक्ष्य करण्याचा प्रकार नाही. त्यात येणाऱ्या खूप तपशिलातील नोंदी लेखिकेच्या आत्मचरित्रात्मक नाहीत. जगाला माहिती असलेल्या घटनेविषयी ढीगभर संशोधनातून उभारलेले हे कथात्म मिश्रण आहे. चीन आपल्या इतिहासाविषयी आणि त्यावरच्या भाष्याविषयीही प्रचंड दक्ष राष्ट्र म्हणून ओळखले जाणारे राष्ट्र आहे. तेथील सांस्कृतिक क्रांतीच्या पन्नास वर्षांनंतर त्यातील संदर्भाना बृहद् कादंबरीचा विषय म्हणून आखताना या कॅनेडियन लेखिकेने आपली परदृष्टी किती सजग ठेवली आहे, याचे दर्शन कादंबरी वाचताना होते.
आपल्या वादातून, विधानांतून जाणीवपूर्वक लोकप्रिय होण्यासाठी वाटेल तो मार्ग अंगीकारून आजची भारतीय बाजारपेठ आणि वाचकपेठ काबीज करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांच्या कलाकृतीपेक्षा मॅडलिन टियान हिची ‘डू नॉट से वी हॅव नथिंग’ ही कादंबरी अनेक प्रकारे वेगळी आहेच. त्यात परदृष्टीचा कथातिहास असला, तरी वादग्रस्ततेचा अंमळही अंश नाही, हे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे.
‘डू नॉट से वी हॅव नथिंग ’
- लेखिका : मॅडलिन टियान प्रकाशक : ग्रँटा
- पृष्ठे : ४८० , किंमत : ४७८ रु.
- [ही पेपरबॅक आवृत्तीची, सवलतीतील किंमत आहे]
pankaj.bhosale@expressindia.com