पंकज भोसले – pankaj.bhosale@expressindia.com
तुर्कस्तानच्या कादंबरीकार एलिफ शफाक या तेथील पुरुषसत्ताक समाजजीवनातील सद्य:स्थितीतील उतरंड आंतरराष्ट्रीय माध्यमांतून निर्भीडपणे मांडतातच; पण पुरुषी दांभिक प्रवृत्ती आणि तिला पोषक सामाजिक/ राजकीय वातावरणातून होणाऱ्या अन्यायाचा कडवा इतिहासही त्यांच्या कादंबऱ्यांमधून डोकावतो. तिथल्या उपेक्षितांचे अंतरंग खोदून काढणारी त्यांची ‘टेन मिनिट्स, थर्टी एट सेकंड्स इन धिस स्ट्रेन्ज वर्ल्ड’ ही यंदा ‘बुकर’च्या स्पर्धेत असणारी कादंबरीही त्यास अपवाद नाही..
यंदा ‘बुकर’च्या लघुयादीत कादंबरी आल्यानंतर एलिफ शफाक यांच्यावर प्रकाशझोत सर्वाधिक पडला असला, तरी सुमारे तपभरापासून जगभरासाठी महिला हक्क कार्यकर्त्यां आणि तुर्की लेखिका म्हणून त्यांची अनेक वर्तुळांत ख्याती आहे. पण तुर्कस्तान सरकारच्या दृष्टीने त्या अक्षम्य गुन्हेगार आहेत. देशातील ऐतिहासिक संदर्भाची खरीखुरी वाच्यता आपल्या लेखनातून करीत असल्यामुळे २००६ पासून त्यांच्या पुस्तकांवर तुर्कस्तानमध्ये रोष आहे. स्त्रियांसह लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची पुरुषी दांभिक प्रवृत्ती आणि तिला पोषक सामाजिक आणि राजकीय वातावरण यांवर जोरदार प्रहार करीत असल्याने शफाक यांच्या कादंबऱ्या तुर्कस्तानमध्येही देशी भाषेतील सर्वाधिक खपणाऱ्या पुस्तकांमध्ये गणल्या जात आहेत. अन् ‘टेन मिनिट्स, थर्टी एट सेकंड्स इन धिस स्ट्रेन्ज वर्ल्ड’ प्रकाशित झाल्यानंतरच्या थोडय़ाच काळात त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांवर बंदी घालण्याची प्रक्रिया तुर्कस्तानच्या सरकारी यंत्रणांकडून सुरू झाली आहे. गेल्या तीन वर्षांत, कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते म्हणून त्या तुर्कस्तानमध्ये जाऊ शकल्या नाहीत. याच तीन वर्षांत एर्दोगान सरकारकडून कडव्या धर्मवादाला बळ पुरवले गेल्याने महिला हक्कांची कुचंबणा, सामाजिक हिंसा आणि समलिंगी समुदायावरील अन्यायात प्रचंड वाढ झाली आहे. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रासह आंतरराष्ट्रीय माध्यमांतून तुर्कस्तानमधील पुरुषसत्ताक समाजजीवनातील सद्य:स्थितीतील उतरंड रंगविणाऱ्या शफाक कादंबऱ्यांमधून अन्यायाचा कडवा इतिहास भिन्न पद्धतीने मांडत आहेत.
मध्य-पूर्वेतील राष्ट्रांमध्ये दुसऱ्या महायुद्धापश्चात वाढत गेलेला धर्मभोळेपणा आणि त्या घुसळणीत बिघडत गेलेले महिलांचे जगणे इथल्या कोणत्याही सजग विचारी कलाकृतींमधून प्रगटणे स्वाभाविक आहे. एकाच वेळी सुधारत चाललेल्या पाश्चात्त्य जगाची जाणीव आणि दुसऱ्या बाजूला स्वदेशात धर्माला ढाल म्हणून पुढे करीत सुरू झालेली सामाजिक पीछेहाट डझनाहून अधिक लेखिकांना व्यक्त होण्यास प्रवृत्त करीत आहे.
तसेच कित्येक चित्रपटांचे विषय हे येथील स्त्रियांच्या अशक्य वाटेल अशा भीषण जगण्यावर बेतलेले आहेत. इराणच्या अझर नफिसी यांची ‘रीडिंग लोलिता इन तेहरान’ किंवा इजिप्तमधील नवाल अल् सदावी यांची ‘वूमन अॅट पॉइंट झीरो’ या कादंबऱ्यांमधून पुरुषसत्ताक अन्यायाचे सारखेच रूप समोर येते. तसेच जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये गेली दोन दशके गाजलेले मध्य-पूर्वेतील चित्रपट हे स्त्रियांवरील अन्यायाच्या अधिकाधिक चकित करणाऱ्या कथांचे असल्याचे लक्षात येते. या सगळ्याच लेखिका, चित्रकर्त्यांवर राष्ट्राची बदनामी करीत असल्याचा ठपका ठेवून कारवाई झाल्याचा प्रकारही सारखाच दिसतो. तरीही जगण्याशी लढताना इथल्या व्यवस्थेच्या विरोधात साहित्य-कलाकृतींतून बंडखोरी करणारी आजची पिढी आपल्या कथा सांगण्यासाठी नवनवे कल्पक मार्ग अंगीकारत आहे.
स्वत:चे समलैंगिकत्व जगजाहीर करणाऱ्या एलिफ शफाक यांचा जन्म तुर्कस्तानचा असला, तरी प्रगत विचार, स्वजाणीव, देशाटनातून आलेली उमज आणि स्त्रीवादासह कट्टर मानवतावादाच्या पुरस्कारातून तयार झालेली उपरोधिक नजर त्यांच्या साहित्याला पारंपरिक अन्यायकथांपासून वेगळे ठरवतात. ‘टेन मिनिट्स, थर्टी एट सेकंड्स इन धिस स्ट्रेन्ज वर्ल्ड’ या कादंबरीची रचना पाहिली, तरी ते लक्षात येईल. दोन वर्षांपूर्वी कॅनडामधील वैद्यकीय अभ्यासकांनी- ‘मानवी मृत्यूनंतरही मेंदू दहा मिनिटे अडतीस सेकंद काम करतो,’ असे संशोधन जाहीर केले होते. वैद्यकीय जगतात अद्याप या संशोधनातील दाव्याबद्दल मतमतांतरे आहेत. मात्र, एलिफ शफाक यांनी २०१७ साली वृत्तबद्ध झालेल्या या संशोधनाला आपल्या कादंबरीच्या मांडणीचा भाग केले. कादंबरी सुरू होते ती १९९० सालात घडणाऱ्या एका खुनाच्या घटनेपासून. टकीला लैला या इस्तंबूलमधील वारांगनेची हत्या करून तिच्या प्रेताला कचराभूमीत विल्हेवाटीसाठी फेकून देण्यात आलेले असते. लैलाच्या मृत्यूनंतर दहा मिनिटे अडतीस सेकंद जिवंत असलेला तिचा मेंदू १९४७ च्या जन्मापासूनच्या जगण्याचा आढावा घेताना दिसतो. यात तुर्कस्तानातील आडभागांतून होणारे इस्तंबूलमधील स्थलांतर, तिथल्या समाजजीवनातील महिलांचे स्थान, महिला आणि लहान मुलांवर नातेवाईकांकडूनच केला जाणारा अत्याचार, धर्माचे दाखले देत बेगडी रूढी-परंपरांचा वाढत जाणारा अंगीकार, पाप-पुण्याच्या भ्रामक कल्पना या सगळ्यांवर आसूड ओढलेला दिसतो.
तुर्कस्तानमध्ये १९९० सालापर्यंत एक भीषण कायदा अस्तित्वात होता. वारांगनेवर बलात्कार झाल्यास तिच्यावर कोणताही मानसिक किंवा शारीरिक आघात होत नसल्याचे कायद्याने मान्य केले होते. त्यामुळे एखाद्याने बलात्कार करून पीडिता ही वारांगना असल्याचे सिद्ध केल्यास त्याला गुन्ह्य़ाच्या शिक्षेत प्रचंड मोठी सूट मिळत होती. या कायद्यामुळे देशभरात स्त्री अत्याचारांमध्ये वाढ थांबत नव्हती आणि वारांगनांच्या उघड हत्या घडत होत्या. त्याहून वाईट म्हणजे, कुटुंबाने नाकारलेल्या, स्थलांतरित, वारांगना आणि निर्वासित स्त्रियांचे मृतदेह मरणानंतरही सुखाने चिरनिद्रा घेऊ शकत नव्हते. इस्तंबूलच्या सीमेवर उभारलेल्या स्मशानभूमीत त्यांच्या प्रेतांना नावाऐवजी क्रमांकानुसार पुरले जात होते. शफाक यांनी पाहिलेल्या या भवतालाला ‘टेन मिनिट्स, थर्टी एट सेकंड्स इन धिस स्ट्रेन्ज वर्ल्ड’चा भाग केले आहे.
कादंबरीचा अर्धा भाग शीर्षकाबरहुकूम दहा मिनिटे आणि अडतीस सेकंदांत विभागला आहे. प्रत्येक मिनिटात टकीला लैलाच्या स्मृती देशासह आंतरराष्ट्रीय घटनांची नोंद घेताना दिसतात. त्यात गंध, चव आणि आकार यांच्या वर्णनाला महत्त्व आहे. इस्तंबूलपासून हजार मैल दूर असलेल्या बहुपत्नीत्वाची प्रथा मिरवणाऱ्या घरात लैलाचा १९४७ साली जन्म होतो. जन्मल्यानंतर तिच्या वडिलांकडून वांझ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहिल्या पत्नीकडे लैलाची रवानगी होते आणि सख्ख्या आईला काकी संबोधण्याचे बिंबविले जाते. स्वत:च्या मुलीला नवऱ्याच्या विचित्र निर्णयामुळे सवतीकडे सोपविणाऱ्या लैलाच्या आईचे भ्रमिष्ट मन पूर्णपणे वेडामध्ये परावर्तित होते.
त्या छोटय़ाशा गावातील मोठय़ाशा घरामध्ये मार्टिन ल्यूथर किंगच्या अमेरिकेतील मानवी हक्क चळवळीपासून तिथल्या अध्यक्षांच्या हत्येपर्यंतच्या घटनांचे पडसाद उमटलेले दिसतात. एल्विस प्रेसलेच्या गाण्यांचा लैलावर पडलेला प्रभाव समोर येतो. चकचकीत मासिकांच्या मुखपृष्ठांवर पाहिलेल्या हॉलीवूड अभिनेत्रीसारखे नटून-थटून राहण्याची ओढ तिच्या मनात तयार होते. सहाव्या वर्षी वडिलांच्याच भावाकडून लैंगिक शोषणाची बळी बनलेली लैला १६ व्या वर्षांपर्यंत बंडखोरीचा पवित्रा धारण करते. स्वत:वरील अत्याचाराला दडपण्याचा कुटुंबाकडून प्रयत्न होतो, तेव्हा ती घर सोडून इस्तंबूल शहरात पळून जाते. तिथे मानवी तस्करी करणाऱ्यांच्या हाती लागून वेश्या व्यवसायात ढकलली जाते.
कुटुंबात धर्माचा आधार घेऊन झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाहून अधिक यातना लैलाला वेश्यागृहात अनुभवायला मिळतात. मात्र, त्या परिस्थितीतही आपल्या पाच आप्तांच्या मैत्रीवर जगण्याची आस टिकवून ठेवते. पैकी नॉस्टॉल्जिया नलान, झैनब वन ट्वेंटी टू, हॉलीवूड हुमेयारा, आणि झमीला या तिच्या आयुष्यात इस्तंबूलमध्ये आल्यानंतर दाखल होतात. सबॉटेज सिनान हा तिचा लहानपणीचा सर्वाधिक घट्ट मित्र असतो. या सगळ्यांच्या विशेषनामांची आणि जगण्याचीही तिरपागडी कथा शफाक यांनी येथे सादर केली आहे. या सगळ्यांचे एकच वैशिष्टय़ म्हणजे या सर्व व्यक्ती समाजाकडून पूर्णपणे नाकारल्या गेल्यामुळे आपल्यासारख्याच लैलाच्या सान्निध्यात आलेल्या असतात. यातील कुणाची काम देण्याच्या बहाण्याने आफ्रिकेतून इस्तंबूलमधील वेश्यागृहात रवानगी झाली आहे, तर कुणी शस्त्रक्रियेद्वारे लिंगस्थलांतर करून स्त्रीत्व प्राप्त केले आहे. कुणी बुटके, तर कुणी आत्यंतिक कृश आहे. लैलाच्या हत्येनंतर कचऱ्याच्या पिशवीत गुंडाळलेला तिचा मृतदेह प्रशासन नकोशा व्यक्तींसाठी राखलेल्या स्मशानात पुरते. त्यानंतर समाजासाठी अगदीच अज्ञात असलेले लैलाचे हे आप्त तिचा मृतदेह तेथून बाहेर काढण्यासाठी सज्ज होतात.
धर्माच्या अवडंबरामुळे समाजात ओळख हरवत चाललेला उपेक्षितांचा, स्थलांतरितांचा जथा इथे आपले जगणे अधिक चांगले करण्यासोबत मैत्रीचे नाते निभावण्यासाठी परिस्थितीशी झगडताना दिसतो. शफाक यांच्या अफाट अशा राजकीय आणि सामाजिक जाणिवांचे संदर्भ या कादंबरीमधील पानापानांत विखुरलेले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची आंदोलने, साम्यवादी विचारधारेचा पुरस्कार, चित्रकला, चित्रपट आणि संगीतामधील अभिजात परंपरांचेही तपशील आहेत.
मध्य-पूर्वेच्या समाजेतिहासात कधीच नोंद न होऊ शकणाऱ्या उपेक्षितांचे अंतरंग खोदून काढणारी शफाक यांची ही कादंबरी अनेक बाबींनी यंदाच्या ‘बुकर’साठीची प्रबळ स्पर्धक आहे. ‘या कादंबरीतील बऱ्याच गोष्टी खऱ्या असून सर्वच गोष्टी निव्वळ कल्पना आहेत,’ अशी गमतीशीर सूचना करून पुढे शफाक वाचकाला घाऊक प्रमाणात अस्वस्थपणा पुरवतात. वर गेल्या दशकभरात साहित्य आणि सिनेमांमधून स्त्री अन्यायकथांचा खूप सारा मारा अनुभवून आपले मन त्याबाबत निबर झाल्याचा भ्रम मोडीत काढतात.
‘टेन मिनिट्स, थर्टी एट सेकंड्स इन धिस स्ट्रेन्ज वर्ल्ड’
लेखिका : एलिफ शफाक
प्रकाशक : व्हायकिंग
पृष्ठे: ३२०, किंमत : १,३१९ रुपये