भिन्न प्रकृती, वेगवेगळे कालखंड, निरनिराळे सामाजिक-राजकीय अवकाश, मात्र ध्यास एकच.. त्या त्या काळातील परिस्थितीजन्य अभाव दूर करून, ओढगस्त मानवजातीची आणि समाजाची आर्थिक दु:स्थितीतून मुक्तता करण्याचा! हे मोठे स्वप्न अनेक काळांतल्या अनेकांचे. अॅडम स्मिथ, कार्ल मार्क्स, जॉन मेनार्ड केन्स आणि अन्य अनेक ते अमर्त्य सेन आणि वर्तमानातील बरेच जण. या महाप्रवाहातील हे सारे वाटाडे. त्यांचा हा सारा प्रवासपट साकल्याने आपल्यापुढे एका छोटेखानी पुस्तकरूपात खुला झाला आहे.
इतिहासाचा अस्सल ध्यास सोडा, आंधळी श्रद्धा असणाऱ्यांचेच आज अमाप पेव आहे. थोराडांचे सोडाच, विद्यार्थ्यांमध्येही सर्वेक्षण घेतले तर नावडत्या विषयांमध्ये इतिहासाचा वरचा क्रमांक असेल. पण इतिहास तोही आर्थिक तत्त्वज्ञानाचा इतिहास रंजक असू शकतो, हे विनय भरत-राम यांनी शक्य करून दाखविले आहे. इतक्या विचारधारा, इतक्या विभूती आणि भला मोठा कालखंड तरी अगदी सहज उलगडत जाणारे गाणे भासावे अशी किमया त्यांचे ‘इव्होल्यूशन ऑफ इकॉनॉमिक आयडियाज् : अॅडम स्मिथ टू अमर्त्य सेन अॅण्ड बियॉण्ड’ हे पुस्तक साधते. राम हे एक उद्योजक आणि अर्थशास्त्राचे अतिथी प्राध्यापक म्हणून गेली ३० वर्षे कार्यरत आहेत. आपल्या प्राध्यापकी अभिनिवेशाच्या विपरीत हा अतिशय गंभीर विषय त्यांनी तोंडओळख स्वरूपात का होईना, पण अत्यंत सोपा करून मांडला आहे. जगाच्या पाठीवर उत्क्रांत होत आलेला अर्थविचार आणि त्याचा कालक्रम तसेच वेध घेतल्या गेलेल्या तत्त्वज्ञांची जंत्रीच भली मोठी आहे. तरी ती त्यांच्या या शैलीने अवघ्या १८२ पानांच्या या पुस्तकात ग्रथित होऊ शकली, हे विशेषच. अर्थात अधिक सखोल अभ्यासाची गोडी निर्माण होईल, असा हा पाठय़पुस्तकी धावता आढावा निश्चितच आहे. पुस्तकाची मांडणीही वर्गातील शिकवणीत शिक्षक-विद्यार्थी संवादासारखी, गोष्टीवेल्हाळ धाटणीची आहे.
आधुनिक अर्थशास्त्राच्या निर्मितीत अॅडम स्मिथचे नाव अग्रक्रमाने येते. स्मिथच्या ‘थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स’पासून (सन १७५९) हा संवादपट सुरू होतो. स्मिथने ‘अदृश्य हाता’ची संकल्पना पुढे आणली. त्याच्या मते माणूस कितीही स्वार्थी असला तरी इतरांबद्दल सद्भावना, परोपकार, संस्कारातून रुजविली गेलेली मूल्ये वगैरे जणू अदृश्य हातच; तोच त्याच्या वर्तनाचे मार्गदर्शन करीत असतो. हा अदृश्य हातच बाजारपेठेतील फायदा आणि लोभाच्या भावनेने आलेल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये समन्वय साधत असतो. या अदृश्य हाताच्या रहस्याची मोहिनी युरोपातील औद्योगिक क्रांतींनंतर बळावलेल्या- भौतिक सुखांच्या न संपणाऱ्या भुकेच्या मीमांसेपासून ते २००८-२००९ मधील जागतिक वित्तीय अरिष्टाच्या कारणांचा ऊहापोह करताना कायम असल्याचे दिसले आहे. ‘स्वत्व आणि नीती-विवेकातील द्वंद्व हेच दोषांना, संकटाला कारण ठरते’ असे स्मिथ सांगतो. तोच धागा पकडून, ‘दोष व्यवस्थेचा नसून घसरण झालेल्या नीतिमूल्यांचा आणि महत्त्वाच्या आर्थिक संस्था हाती असणाऱ्या बेजबाबदार आणि अनीतिमान व्यक्तींचा’ असल्याचे सांगितले गेल्याचे आपण अनुभवले आहे. मागणी-पुरवठय़ाच्या तत्त्वावर चालणाऱ्या बाजारपेठेचा उलगडा हे स्मिथचे योगदान असामान्यच ठरते.
मुक्तबाजाराची ‘नीती’
‘स्व-हित साध्य करतानाच एकूण समाजाचे कल्याण आणि आर्थिक अभ्युदयातही भर पडते,’ असे स्मिथचे मानणे. ‘त्यामुळे समाजाच्या सर्वोत्तम समृद्धीसाठी व्यक्तीला आर्थिक व्यवहारात सर्व र्निबधापासून मुक्त ठेवायला हवे,’ अशा धोरणाचा औद्योगिक क्रांतीतून उदय पावलेल्या इंग्लंडमध्ये अनुनय केला पाहिजे, असा त्याचा आग्रह राहिला. ‘लेसे फेअर’ अर्थात अनिर्बंध अर्थव्यवस्थेच्या या फ्रेंच संज्ञेची सिद्धांतरूपात त्याने मांडणी केली. स्मिथनंतर थॉमस माल्थस यांचा वाढत्या लोकसंख्येची समस्या लक्षात घेणारा ‘लोकसंख्या सिद्धांत’ (सन १७९८) आला. औद्योगिक भांडवलशाहीने लोकांचे जीवनमान सुधारत होते, खेडय़ांतील लोक रोजगारासाठी शहरांकडे लोटू लागले. रोगराई, साथ, भुकेने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. माल्थसच्या काळात जगाची लोकसंख्या जवळपास अब्जभर होती, त्यानंतरच्या सव्वादोनशे वर्षांत ती सात अब्जांवर पोहोचली आहे. तरी त्या वेळी त्याने लोकसंख्येच्या भौमितीय पद्धतीने (१,२,४,८,१६) वाढीच्या, त्या उलट उदरभरणासाठी अन्नधान्य उत्पादन वाढीच्या गणितीय पद्धतीने (१,२,३,४,५) वाढीचे इंगित सिद्धांतरूपात मांडले होते. प्रकृतीच्या या नियमाला माल्थसने ‘निर्विवाद सत्य’ म्हणून संबोधले आणि त्याच्या महादुष्ट परिणामांची त्याने जी मीमांसा केली, तिचा आपल्याकडील प्रारंभिक नेहरूवादी पंचवार्षिक योजनांवरही प्रभाव दिसला आहे.
भांडवलशाहीच्या उदयाच्या त्या काळात फ्रेंच अर्थतज्ज्ञ जा-बाप्टिस्टे से कृत ‘उद्योजकतेच्या व्याख्ये’ची भर पडली. ‘भांडवल, ज्ञान आणि श्रम यांची एकत्र मोट बांधणारा आणि त्यायोगे नफ्यासाठी व्यवसाय करणारा तो ‘उद्योजक’,’ असे त्यांनी सांगितले. त्याच्या प्रसिद्ध ‘से सिद्धांता’तून – ‘वस्तूंचा पुरवठा स्वत:च मागणी निर्माण करीत असतो आणि बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा अधिक अशी स्थिती संभवणे अवघडच’ असे प्रमेय पुढे आले. लोक पसा कमावतील, उपभोगावर खर्च करतील, त्यातून नव्याने उत्पादन आणि क्रयशक्तीत भर पडेल आणि बाजारात पुरवठय़ाचे चक्र सुरूच राहील, असे हे समीकरण होते. तथापि लोकांकडून उपभोगाऐवजी बचतही केली जाऊ शकेल, हा पलू दुर्लक्षिला गेला. त्यानंतर तब्बल १३० वर्षांनंतर महामंदीच्या झळा सोसलेल्या अर्थव्यवस्थेत बचत आणि व्ययाचे समीकरण केन्सकडून पुढे आले.
समाजवादातला ‘अर्थ’
भांडवलशाहीच्या प्रारंभिक उद्याच्या काळात त्या व्यवस्थेशी असहकार पुकारणाऱ्या जॉन स्टुअर्ट मिल, रॉबर्ट ओवेन, जेरेमी बेन्थम यांनी स्वप्नाळू समाजवादाचे काही प्रयोगही राबविले. भांडवलशाहीला मानवी चेहरा प्रदान करण्याचे हे प्रयोग आजच्या आधुनिक चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठय़ावर असलेल्या भांडवलशाहीत वेगवेगळ्या अंगाने चíचले अथवा अधोरेखित होत आहेतच. तथापि बेन्थम यांनी काहीशे वर्षांपूर्वी सांगितलेला सुख, वेदना आणि उपयुक्तता (प्लेजर, पेन अॅण्ड युटिलिटी) सिद्धांत आज जसाचा तसा नसला तरी आधुनिक खर्च-लाभ (कॉस्ट-बेनिफिट) विश्लेषणात वापरात येतोच.
औद्योगिकीकरणासह कामगार समुदाय एक वर्ग म्हणून आकार घेत होता. युरोपातील अनेक देशांत अपयशी का होईना कामगारांचे क्रांतिकारी उठाव दिसून आले होते. या सर्व घडामोडींचा कार्ल मार्क्स चिकित्सकपणे विचार करीत होता. ‘द कंडिशन ऑफ वìकग क्लास इन इंग्लंड’ हे फ्रेडरिक एंगल्सचे पुस्तक १८४४ मध्येच प्रसिद्ध झाले होते. पुढे मार्क्स इंग्लंडला कायमस्वरूपी वास्तव्यासाठी आला आणि मार्क्स-एंगल्स यांचे घनिष्ठ साहचर्य सुरू झाले. युगप्रवर्तक ठरलेले समाजविकासाचे शास्त्रीय तत्त्व ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ या पुस्तकातून त्या दोघांनी १८४८ साली जगापुढे मांडले. शोषण, दमनाविरुद्ध लोक पेटून उठू शकतात हे दिसू लागले असताना, भांडवलशाही पिळवणुकीविरोधातील या उठावांना बदलकारी तत्त्वज्ञानाचा पाया मार्क्स-एंगल्सने मिळवून दिला. आपला ‘वरकड मूल्याचा सिद्धांत’ विशद करताना, मार्क्सने डेव्हिड रिकाडरे (थॉमस माल्थसचा सहकारी आणि त्याच्याप्रमाणे निराशावादी अर्थप्रवाहाचा प्रतिनिधी) याच्या श्रम मूल्याच्या सिद्धांताला अधिक टोकदार बनविले. पारंपरिक अर्थाने वस्तूची विक्री किंमतच वस्तूचे मूल्य मानले जाते. तथापि ‘वस्तूचे खरे मूल्य हे त्या वस्तूच्या उत्पादनासाठी खर्च पडलेल्या मानवी श्रमावरून ठरते,’ असे रिकाडरेने सांगितले होते; तर मार्क्सने ‘भांडवलदारांचा नफा हे दुसरे तिसरे काही नसून श्रमातून निर्माण झालेले वरकड मूल्य’ असल्याचे सांगितले. अर्थव्यवस्थेतील नफा, व्याज आणि भाडे कामगारांनी निर्माण केलेल्या वरकड उत्पादनाचा भाग असल्याचे मार्क्सचे गणिती प्रमेय अर्थशास्त्रातील एक मूलभूत क्रांतिकारी सिद्धांत ठरला आहे. जगभर मार्क्सवाद संपला अशी हाकाटी सुरू असली, तर विद्यमान व्यवस्थेतील अरिष्टे, पराकोटीची आर्थिक विषमता, पददलितांचे शोषण, अनाचार, घोटाळे पाहता, समाजवादातूनच भांडवलशाहीची मृत्युघंटा वाजविली जाईल, असा मार्क्सने सांगितलेला राजकीय तत्त्वविचार आजही अनेकांना प्रेरणा व मनोबल देत आला आहे.
कल्याणकारी अर्थशास्त्र
अॅडम स्मिथपासून ते जॉन मेनार्ड केन्सच्या अर्थशास्त्रीय प्रेरणा या मूलत: उदारमतवादी अशाच होत्या. हाच उदारमतवादी वारसा पुष्ट करणारा प्रवाह भांडवलशाहीच्या अत्युच्च अवस्थेत अमर्त्य सेन यांच्याकडून सुरू आहे. मार्क्सवादाच्या प्रभावाने म्हणा, पण व्यवस्थाअंताची भाषा न करता, भांडवलशाही व्यवस्थेच्या चौकटीतच श्रमिकांना आर्थिक न्याय कसा मिळेल, यावर रोख देणारा प्रवाहही मधल्या काळात सुरू राहिला होता. भांडवलदार दुष्टाव्याने वागतो याची कबुली देतानाच, भांडवलशाही नव्हे तर भांडवलदाराची नियत सुधारण्याचा आग्रह धरणाऱ्या विचारधाराही आल्या. तथापि अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थकारणाची शास्त्रीय पायाभरणी करताना, ‘सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढीने सर्वंकष मानवी कल्याणाची पुरेपूर खातरजमा केली जाऊ शकते काय?’ असा मूलगामी प्रश्न उपस्थित केला. दरडोई उत्पन्नातील वाढीच्या आधारे मांडली जाणारी भौतिक समृद्धी ही सामाजिक कल्याणाच्या परिपूर्णतेची खातरजमा नसल्याचे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले.
समृद्धी, भौतिक सुखाच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगवेगळ्याच. उणे-अधिक मूर्तरूप मिळाल्याने यापैकी काही अर्थशास्त्रीय संकल्पनांना त्यांच्याच नावे जनकत्वही प्राप्त झाले. आर्थिक मुक्तीचा ध्यास सारखाच असला तरी, तेथपर्यंत जाणारा मार्ग, साधने आणि साध्य वेगवेगळा असल्याने तो व्यवहारात साकारणाऱ्या राजकीय प्रेरणाही वेगळ्याच राहिल्या आहेत. म्हणूनच या अर्थविचारांनी प्रसंगी एकमेकांविरोधात उभा दावा मांडलेला आपल्याला दिसतो. जसे गत शतकातील महामंदीच्या (१९२९-३०च्या) काळात, त्या परिस्थितीवर उतारा म्हणून मार्क्सवाद विरुद्ध केनेशियन अर्थअनुयायांमध्ये संघर्ष पेटल्याचे दिसून आले. तर विद्यमान शतकातील २००८-२००९च्या आर्थिक मंदीतही मूळ केनेशियन धाटणीचे नव-उदारवादी आणि पतविषयक सुधारणावादी तर दुसरीकडे शुद्ध भांडवली विरुद्ध कल्याणकारी अर्थवादाचे पुरस्कत्रे यांचा झगडा सुरूच असल्याचे दिसते. थॉमस पिकेटी, क्रूगर, स्टिग्लिट्झ, रघुराम राजन, रुचिर शर्मा आदी या संघर्ष आणि निरंतर उत्क्रांतीच्या प्रक्रियेचे वर्तमान प्रतिनिधी असल्याचे लेखक सांगतात.
त्या त्या काळावर प्रभुत्व गाजविणाऱ्या अर्थवेत्त्यांच्या सिद्धांतांसह त्यांचे वैयक्तिक जीवन आणि तत्कालीन सामाजिक परिस्थितीचीही ओळख अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना करवून द्यावी, हा या लेखनप्रपंचाचा उद्देश स्पष्टच आहे. त्यामुळे ही स्थित्यंतरे उलगडत नेताना ओळीने संगती लावून गुंफता येतील असे आणि इतकेच अर्थशास्त्री निवडले गेलेत. कदाचित निवडीचा हा निकष म्हणूनच टीकेचा विषयही होऊ शकेल. आर्थिक इतिहासकारांमध्ये जेथे ज्या मुद्दय़ांवर मतभेद आहेत, ते ते मुद्दे टाळून शक्य तितक्या तटस्थतेने निरूपणावर त्यांचा भरही विशेषच.
भविष्यकाळ काय असेल याचा थांग लावणे कुणालाच शक्य नाही. परंतु भविष्याला अपेक्षित वळण लावता येणे शक्य आहे. म्हणूनच सर्व सामाजिक विज्ञानाचा अधिपती असलेला अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या सव्वा दोन शतकाच्या वारशाचे नेमके भान मात्र असायला हवे. त्यासाठी या इतिहासात डोकावून पाहायलाच हवे.
‘इव्होल्यूशन ऑफ इकॉनॉमिक आयडियाज् : अॅडम स्मिथ टू अमर्त्य सेन अॅण्ड बियॉण्ड’
लेखक : विनय भरत-राम
प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
पृष्ठे : १८४, किंमत : ४९५ रुपये.
सचिन रोहेकर sachin.rohekar@expressindia.com