सचिन दिवाण

फेसबुक या समाजमाध्यमाची उपकंपनी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वी त्यांच्या भारतातील ग्राहकांच्या खासगी माहितीविषयीच्या धोरणात (प्रायव्हसी पॉलिसी) बदल जाहीर केला. याने ग्राहकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर गदा येईल, अशी भीती व्यक्त केली गेली. त्याने ग्राहकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाल्याने त्याच्या अंमलबजावणीस तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. पण त्यातून कंपनीच्या मनात काय घाटत आहे याचा अंदाज आला. आजवर आपण या गोष्टी मोफत आहेत, असे समजत होतो. पण जगात काहीच मोफत नसते. त्याची किंमत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वसूल होतच असते. याबाबतीत आपल्याला हे कळण्यास किंवा वळण्यास थोडा उशीर झाला इतकेच.

फेसबुक आणि त्याच्या अन्य संलग्न सेवांचे सध्या जगात जवळपास दोन अब्ज वापरकर्ते आहेत. त्यापैकी निम्मे कोणत्याही वेळी ऑनलाइन असतात किंवा इंटरनेटवरून त्या सेवांचा लाभ घेत असतात. मानवी इतिहासात इतक्या प्रचंड व्याप्तीने संवादप्रक्रियेची व्यवस्था कधीच स्थापन झाली नव्हती. ती किमया फेसबुकने करून दाखवली आहे. अर्थात, आता मानवाने तयार केलेला हाच भस्मासुर त्यालाच गिळंकृत करेल की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

या बदलाची सर्व प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून आणि इत्थंभूत समजून घ्यायची असेल तर स्टीव्हन लेव्ही यांचे ‘फेसबुक : द इनसाइड स्टोरी’ हे पुस्तक अत्यंत उत्तम साधन आहे. स्टीव्हन लेव्ही हे अमेरिकेतील नामांकित आणि आघाडीचे तंत्रज्ञानविषयक पत्रकार आहेत. त्यांनी फेसबुकचे तरुण संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांच्यासह साधारण ३०० जणांच्या मुलाखती घेऊन, कंपनीच्या संमतीने तिची अधिकृत माहिती मिळवून, त्याला आपल्या अनेक वर्षांच्या स्वतंत्र अभ्यासाची, शोधपत्रकारितेची आणि विश्लेषणाची जोड देऊन हे पुस्तक सिद्ध केले आहे. आज फेसबुक व्हॉट्सअ‍ॅपच्या किंवा अन्य सेवांच्या संदर्भात जे निर्णय घेत आहे, त्यामागे कंपनीची किंवा त्याहून तिचे मालक झुकरबर्ग यांची काय मनोभूमिका आहे, यात डोकावायचे असेल तर हे पुस्तक म्हणजे एक मोलाचा दस्तावेज आहे. फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आदी सेवा आपल्या पंखाखाली घेतल्यानंतर काही काळ त्यांच्या मूळ निर्मात्यांना कामाची मोकळीक होती. पण हळूहळू त्यांच्या कामात झुकरबर्ग यांचा हस्तक्षेप वाढू लागला. इतका की, अनेकांना अपमानास्पद परिस्थितीत फेसबुक सोडून जावे लागले. यांतील अनेक वादांच्या मुळाशी ग्राहकांच्या माहितीच्या खासगीपणाचे संरक्षण हाच मुद्दा होता, हे या पुस्तकातील अनेक संवादांवरून आणि वर्णनांमधून सिद्ध होते.

याची मुळे मार्क झुकरबर्ग आणि फेसबुकच्या विकासात व मनोवृत्तीत आढळतात, असे हे पुस्तक सुचवते. मार्कचे वडील त्यांच्या परिसरातील सुस्थापित डॉक्टर आणि गणित तसेच तंत्रज्ञानाचे भोक्ते. त्याही काळात त्यांच्या घरी सुरुवातीचे प्राथमिक स्वरूपाचे संगणक होते आणि वडील त्याचा वापर त्यांच्या वैद्यकीय व्यवसायात रुग्णांच्या नोंदी ठेवण्यासाठी करत असत. त्यातूनच लहान मार्कच्या मनात संगणक आणि एकंदर तंत्रज्ञानाच्या बाबतीत संस्कार झाले. मार्क अभ्यासू, वृत्ती तंत्रज्ञाची, स्वभाव काहीसा अबोल आणि आत्मकेंद्री, पण बाणा लढाऊ. शाळेत त्याने जी अनेक पारितोषिके मिळवली होती, त्यात शाळेच्या तलवारबाजी संघाच्या कप्तानपदाचाही समावेश होता. त्याच्या मते जगातील प्रत्येक व्यवस्था ही एखाद्या अभियांत्रिकी प्रणालीप्रमाणेच काम करते आणि प्रत्येक प्रणाली सुधारण्यास नेहमीच वाव असतो. त्याचा जगाकडे किंवा कोणत्याही समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन एखाद्या अभियंत्याचा असतो. तसेच त्याची प्रवृत्तीही एखाद्या गोष्टीकडे तितक्याच अलिप्त किंवा भावनारहितपणे पाहण्याची असते. पुढे जेव्हा फेसबुकचा विस्तार होत गेला तेव्हा कंपनी चालवतानाही त्याने याच तत्त्वांचा अंगीकार केला. काही वेळा ती भूमिका खूप यशस्वी ठरली, तर अनेकदा तिचा तोटाही झाला.

साधारण २००२-०३च्या दरम्यान १७-१८ वर्षांचा असताना त्याने हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथील वसतिगृहात राहात असताना त्याला संगणकाच्या कोडिंगचा नाद लागला. सुरुवातीला हे काम नस्ती उठाठेव या प्रकारचे होते. पण मार्क ते मनापासून, तन्मयतेने करत असे. वसतिगृहाच्या खोलीतच त्याने एकदा ‘फेसमॅश’ नावाची अगदी प्राथमिक आणि स्थानिक स्वरूपाची समाजमाध्यम प्रणाली बनवली. त्यात महाविद्यालयाच्या मुला-मुलींचे छायाचित्रासह प्रोफाइल बनवता येत असत. ते मित्र किंवा मित्रांचे मित्र वगैरे पाहू शकत. त्यात एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या छायाचित्राला अन्य जण मानांकन (रेटिंग) देऊ शकत असत. असे करत कॅम्पसवरील सर्वात सुंदर तरुण किंवा तरुणी ठरवली जात असे. तसेच तुमच्या वर्गात कोणत्या सुंदर मुली आहेत, त्यांनी कोणते विषय निवडले आहेत, कोणत्या तासाला तुम्ही तिच्याबरोबर बसू शकाल अशी माहितीही मिळत असे! महाविद्यालयाच्या आवारात ही प्रणाली रातोरात प्रसिद्ध झाली.

मात्र त्याने अनेक जण नाराजही झाले. महाविद्यालयामधील दोन स्त्रीवादी संघटनांना हा प्रकार स्त्रीत्वाचा अपमान करणारा वाटला. त्याबद्दल महाविद्यालय प्रशासनाकडून मार्कवर शिस्तभंगाची कारवाईही झाली. पण मार्क नियमांबाबत कायमच बेफिकीर राहिला आहे. त्याही दिवशी शिक्षा भोगून झाल्यावर मार्कने वसतिगृहाच्या खोलीत पार्टी केली आणि त्या वेळी नेमके त्याच्या शेजारच्या खोलीतील मित्राचे वडील आले होते. त्यांच्या समजावणीचे विचारही त्याने ऐकले नाहीत. उलट ४ फेब्रुवारी २००४ रोजी जेव्हा मार्कने वसतिगृहातूनच सुरुवातीच्या ‘दफेसबुक(डॉट)कॉम’ची स्थापना केली- तेव्हा त्याचे वय १९ वर्षे होते- अन् त्या मित्राला काही पैसे भरून भागीदारी देऊ केली होती. त्याने ती वडिलांच्या दबावामुळे नाकारली. आता तो कायमच आपला निर्णय चुकल्याचे सांगतो. ‘दफेसबुक(डॉट)कॉम’ तयार करताना मार्कने गोपनीयता (प्रायव्हसी) हा आपला खास मुद्दा असल्याचे म्हटले होते. त्या वेळी ते खरेही होते. तेव्हा वापरात असलेल्या ‘फ्रेण्डस्टर’ किंवा ‘मायस्पेस’ या समाजमाध्यम स्थळांपेक्षा ‘दफेसबुक’ बऱ्याच प्रमाणात वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित आणि खासगी ठेवण्याची रचना करत असे. मात्र एकीकडे हा नैतिकतेचा टेंभा मिरवत असताना ही बाब लक्षात घेण्यासारखी होती की, मार्कने सुरुवातीला ‘फेसमॅश’ची निर्मिती करताना मुला-मुलींची छायाचित्रे महाविद्यालयाच्या रजिस्टर आणि सॉफ्टवेअरमधून चोरून (हॅक करून) घेतले होते. हा विरोधाभास पुढे मार्क झुकरबर्गच्या संपूर्ण व्यावसायिक जीवनात आढळेल.

मार्क उत्तम कोडर होता यात संशय नाही. पण त्याच्या कित्येक उत्पादनांच्या विकासात त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. नंतर अनेक वेळा मार्कने त्या उत्पादनांवर पूर्ण मालकी प्रस्थापित करताना या मूळ विकासकांना (डेव्हलपर्सना) बाजूला सारले. इतकेच नव्हे, महाविद्यालयामधील त्याचा मित्र एडय़ुआर्दो सॅव्हरीन याने त्याला ‘दफेसबुक’ सुरू करण्यासाठी अगदी सुरुवातीला एक हजार डॉलरची मदत केली होती. तो कंपनीचा सहसंस्थापक होता. मार्कने नंतर मोठी गुंतवणूक मिळण्याची सोय झाल्यानंतर त्यालाही बाजूला केले.

पुढील काळात ‘दफेसबुक’चे ‘फेसबुक’ झाले. कंपनीचा आवाका विस्तारत गेला. अनेक लहानमोठय़ा कंपन्या आणि उत्पादने फेसबुकच्या छताखाली आली. सेवा विस्तारत आणि सुधारत गेल्या. ग्राहकवर्ग वेगाने वाढला, तसाच नफाही वृद्धिंगत होत गेला. सामान्य जनांसह अनेक प्रसिद्ध आणि बडय़ा व्यक्ती फेसबुक वापरू लागल्या. पूर्वी ‘याहू’ कंपनीत कार्यरत असलेले संगणकतंत्रज्ञ जॅन काऊम आणि ब्रायन अ‍ॅक्टन यांनी स्वतंत्रपणे व्हॉट्सअ‍ॅप विकसित केले होते. त्यात माहितीची देवाणघेवाण होताना ग्राहकांचा खासगीपणा जपला जावा हे मूलभूत तत्त्व होते. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ‘एण्ड टु एण्ड एन्क्रिप्शन’ तंत्र वापरले होते. म्हणजे ज्याने संदेश पाठवला आणि ज्याला तो पाठवला आहे त्या दोघांशिवाय मधल्या कोणालाच तो वाचता येणार नाही. त्याचे वहन सांकेतिक लिपीतून होते. व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता जशी वाढू लागली तशी झुकरबर्गची नजर त्यावर पडली. त्याने व्हॉट्सअ‍ॅप ताब्यात घेतले. सुरुवातीला काऊम आणि अ‍ॅक्टन यांना फेसबुकअंतर्गत कामाची स्वायत्तता होती. व्हॉट्सअ‍ॅपकर्त्यांना त्यात जाहिराती प्रसारित करून फायदा मिळवणे अपेक्षित नव्हते. पण एक-दोन वर्षांतच झुकरबर्गचा तगादा सुरू झाला. त्याने या दोघांना स्पष्ट सुनावले, बस्स झाली तुमची नेटिझन्सची सेवा; आता तुमच्या उत्पादनातून नफा मिळायला सुरुवात झाली पाहिजे. काऊम आणि अ‍ॅक्टन यांनी ते व्हॉट्सअ‍ॅपच्या मूळ ध्येयधोरणांशी विसंगत असल्याचे सांगताच त्यांना कंपनीत त्रास देण्यास सुरुवात झाली. अखेर त्यांना अपमानास्पद स्थितीत कंपनी सोडणे भाग पडले. तसाच प्रकार इन्स्टाग्रामच्या बाबतीतही झाला. झुकरबर्गला त्याच्यापेक्षा कोणीच मोठे झालेले नको होते. तशी शंका जरी आली तरी तो त्याला बरोबर बाजूला करत असे. अखेर फेसबुक ही अधिकारशाहीच्या बाजूने झुकू लागली.

एकीकडे फेसबुकचा मानवी इतिहासातील विक्रम म्हणून गौरव होत होता. झुकरबर्गला अनेक देशांत राष्ट्राध्यक्षांच्या बरोबरीने सन्मान मिळत होता. पण २०१६ साली अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना पराभूत करून डोनाल्ड ट्रम्प अनपेक्षितपणे निवडून आले आणि फेसबुकचे ग्रह पालटण्यास सुरुवात झाली. फेसबुकने त्यांच्या न्यूजफीड सेवेद्वारे खोटय़ा बातम्या (फेकन्यूज) पसरवून हे साध्य केल्याच्या शंका व्यक्त होऊ लागल्या. दोन वर्षांनी फेसबुकने त्यांच्या ८७ दशलक्ष ग्राहकांची गोपनीय माहिती केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीच्या परस्पर स्वाधीन केल्याची माहिती उजेडात आली आणि सर्वाची लाडकी कंपनी रातोरात टीकेची धनी बनली. २०१० साली याच फेसबुकवरून झालेल्या जनजागरणाने इजिप्त आणि आखातात ‘अरब स्प्रिंग’ घडली होती. तेव्हा सर्वानी फेसबुकचा लोकशाहीचा कारणकर्ता म्हणून गौरव केला होता. आता अचानक त्यांची तुलना सायबर दहशतवाद्यांशी होऊ लागली. कंपनीची चौकशी होऊन दंड ठोठावण्याची, तिची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी विभाजन करण्याची मागणी झाली.

पण फेसबुक या सगळ्याला पुरून उरले. काही वर्षे धक्का बसला तरी आजही एकंदर फेसबुकचा विस्तार वाढतच आहे. लेखकाच्या मते, त्याचे गमक झुकरबर्गच्या धडाडीत आणि सतत कंपनीत व तिच्या उत्पादनांत बदल करत राहण्यात आहे. कित्येकदा इतक्या मोठय़ा आकाराच्या कंपन्या बदल करण्यास धजावत नाहीत किंवा त्यांना ते झेपत नाही. झुकरबर्गने हे बदल रेटून नेले. अनेकदा अगदी जवळच्या सहकाऱ्यांचा रोष ओढवून घेऊनही. फेसबुकने जग पुरते बदलून टाकले यात शंका नाही. परंतु त्याच्यासारख्या समाजमाध्यमांनी माहितीचे लोकशाहीकरण केले म्हणून त्यांना डोक्यावर घ्यावे की माहितीची नवी मक्तेदारी तयार केली म्हणून टीका करावी, हा प्रश्न उरतोच!

sbdiwan@gmail.com

 

Story img Loader