|| सुकुमार शिदोरे
पंजाबातील गावा-शहरांमध्ये फिरून जनमानस टिपणारे हे पुस्तक पंजाबातील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकवते, तिथल्या धार्मिक राजकारणाचे व तळागाळात रुजलेल्या जातीय मानसिकतेचे कंगोरे उलगडून दाखवते आणि अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या युवा पिढीच्या अस्वस्थ वर्तमानाचीही जाणीव करून देते..
‘पंजाब : जर्नीज् थ्रू फॉल्ट लाइन्स’ हे पंजाबच्या विविध पलूंचा आत्मीयतेने मागोवा घेणारे पुस्तक आहे. लेखक अमनदीप संधू शीख असून त्यांचे घराणे पंजाबातले असले, तरी त्यांनी बरेचसे आयुष्य पंजाबबाहेर घालवले. वडिलांची नोकरी ओदिशामधील रुरकेलामध्ये असल्यामुळे अमनदीप यांचा जन्म तेथेच झाला. बालपण ओदिशात, शालेय शिक्षण पंजाबात, पण एमएचे शिक्षण हैदराबादला झाले आणि सांप्रत वास्तव्य बंगळूरुला आहे. सहचारिणी (लक्ष्मी) केरळीय आहेत. अमनदीप यांच्या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत; पण पंजाबवर पुस्तक लिहिण्याची त्यांची फार दिवसांची इच्छा होती, ती अखेर फलद्रूप झाली आहे.
या पुस्तकाच्या लिखाणाच्या निमित्ताने मुद्दाम अलीकडची काही वर्षे लेखकाने पंजाबमध्ये सजगतेने भ्रमण केले. दुरून साजरा वाटणारा पंजाब खरा कसा आहे, हे जाणून घेण्याचा डोळसपणे प्रयत्न केला. ‘‘तुला पंजाब समजून घ्यायचा असेल तर तिथली प्रेतं मोजायची तयारी ठेव,’’ लेखकाच्या छायाचित्रकार मित्राने सल्ला दिला होता. हा सल्ला बऱ्याच अंशी बरोबर होता. देशाच्या विभाजन प्रक्रियेत पंजाबचे दोन तुकडे करून ते दोन नवीन देशांमध्ये वाटले गेले; तेव्हाच्या यातना व धार्मिक कत्तली पंजाबने सहन केल्या. त्यानंतर दहशतवादाच्या कालखंडात हजारो माणसे मारली गेली, तर अलीकडच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा प्रदेश आज नवसरंजामशाही व प्रतीकात्मक कर्मकांडांना बळी पडतो आहे का? सामान्य शेतकरी व शेतमजूर यांच्यावर का अन्याय होत आहे? काल दहशतवादाकडे आकृष्ट होणारी युवा पिढी आज अमली पदार्थाना आपलेसे करीत आहे, ते का? सर्वच राजकीय पक्षांनी स्वहिताशिवाय काहीच साध्य केले नाही का? समानता व न्यायावर आधारित शीख धर्माचे खरेखुरे पालन होत आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केला. पुस्तकात १६ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाला बोलके शीर्षक दिलेले आहे. उदा.- रोष, रोग, आस्था, पाणी, जमीन, कर्ज, जात, सीमा इत्यादी.
‘पंज’ म्हणजे पाच आणि ‘आब’ म्हणजे पाणी. पाच नद्यांचा देश म्हणजे पंजाब. पर्शियन शब्दांपासून बनवलेले हे नाव मोरोक्कोहून आलेल्या एका प्रवासी-संशोधकाने दिले आहे, अशी माहिती येथे सुरुवातीलाच मिळते. १९६० च्या दशकातील हरितक्रांतीमध्ये पंजाब अग्रणी होता, तरी यथावकाश परिस्थिती अनेक कारणांनी खालावली आणि आजमितीस उदारीकरणाच्या काळात पंजाबच्या शेतकऱ्यांना व शेतमजुरांना सतत अवघड समस्यांचा सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, लेखक पंजाबात असताना सप्टेंबर २०१५ मध्ये शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. कापसाचे पीक रोगग्रस्त झाले होते, तर बासमती तांदळाचा हमीभाव कमी करण्यात आला होता. मध्य-पंजाबमधील साखरेचे कारखाने बंद पडले होते आणि ऊस उत्पादकांना कारखान्यांकडून थकबाकीदेखील मिळत नव्हती. अशा स्थितीत विविध मागण्यांकरिता शेतकरी व कामगार यांच्या ११ संघटनांनी संयुक्तपणे रेल-रोको आंदोलन केले. पथराला गावानजीकच्या भारतीय किसान युनियनच्या एका विशाल सभेला लेखक हजर राहिला. जमीनदारीचे उच्चाटन करणाऱ्या व शिखांचे पहिले राज्य स्थापन करणाऱ्या अठराव्या शतकातील बंदा बहाद्दर यांचा उद्घोष अकाली दल-भाजप सतत करीत असते. मात्र, याच पक्षांचे सरकार शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करीत होते. याशिवाय आणखी एक बाब लेखकाच्या लक्षात आली. आंदोलकांना गावातील गुरुद्वाऱ्याने ‘लन्गर’ (सामूहिक भोजन) नाकारला होता. याचे कारण उघड होते; हा गुरुद्वारा अकाली दल-भाजप सरकारशी संलग्न होता. अर्थात तांत्रिकदृष्टय़ा तो शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या नियंत्रणाखाली होता. सरकारी धोरणांना विरोध करणाऱ्या आंदोलकांना या अशा गुरुद्वाऱ्याने का म्हणून लन्गर द्यावा? तथापि आंदोलकांना लन्गर नाकारण्याची कृती शीख धर्माशी अजिबात सुसंगत नव्हती, हा मूळ मुद्दा आहे. राजकीय हेतूने गुरुद्वाऱ्याचा वापर होत असल्याचे येथे स्पष्टपणे दिसून येते. वास्तविक लन्गरची प्रथा ही शीख धर्म समानतेच्या तत्त्वाला किती उच्च लेखतो, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
शीख धर्मीयांमधील जट (जाट) या उच्च जातीचे प्राबल्य व दलितांचे शोषण हा ‘जात’ या प्रकरणाचा गाभा आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये संगरूर जिल्ह्य़ातील झलूर येथील दलितांवरील भीषण अत्याचारांची व या अत्याचारांच्या पूर्वपीठिकेची लेखकाने विस्तृत मीमांसा केली आहे. त्या भागाला आपल्या पत्नीसह भेट देऊन आढावा घेताना लेखकाच्या मनात येते – ‘हेच का ते लोक आणि हाच का तो प्रदेश, ज्यांच्याबद्दल मला अभिमान होता? हिंदू धर्मातील अन्याय्य जातिव्यवस्थेला ठामपणे अव्हेरून शीख धर्म प्रस्थापित झाला होता. समानतेचा व न्यायाचा पुरस्कार करणाऱ्या शीख धर्माचे अनुयायी जातीय भेदभावाला बळ देतात, हे शोचनीय नव्हे काय? शीख धर्म गुरू ग्रंथसाहिबला मानतो; जीवित गुरूंना मानत नाही. असे असूनही अनेक ‘गुरू’ आपापले ‘डेरे’ चालवत आहेत..’ अशा काही प्रमुख डेऱ्यांना लेखकाने भेट दिली. त्यांच्यामध्ये वादग्रस्त गुरमीत रामरहीम याचा डेरा सच्चा सौदाचाही समावेश आहे. अशा डेऱ्यांना प्रबळ सामाजिक व राजकीय पाठबळ लाभते. दलितांतील ‘चमारां’चा रविदासीया पंथ आहे. त्यांच्या भवनातील सेवेकऱ्याने लेखक ‘जट’ आहे हे पेहेरावावरून ओळखले आणि त्याला लन्गरमध्ये वेगळे (अधिक चांगले) भोजन दिले; पण त्याने असे का करावे, हा प्रश्न लेखकाला पडतो.
शीख धर्मीयांच्या परंपरा, आख्यायिका व चालीरीतींचे बारकाईने केलेले परीक्षण ‘पतित’ या प्रकरणात वाचायला मिळते. शरीरावरचे केस काढणाऱ्या (म्हणजे ढोबळपणे सांगायचे झाल्यास दाढी न राखणाऱ्या) शिखांना ‘सेहेजधारी’ ही उपाधी आहे. लेखक स्वत: सेहेजधारी शीख आहे. गुरुद्वारा प्रबंधक समितीची कार्यप्रणाली कॉर्पोरेटप्रमाणे आहे आणि त्यामुळे अकाली दल-भाजप सरकारच्या साहाय्याने प्रबंधक समितीमधील मताधिकार कायद्यात बदल घडवून सेहेजधारी शिखांचे अधिकार लीलया काढून घेण्यात आले, असे लेखकाचे म्हणणे आहे. सर्वसमावेशक व व्यापक तत्त्वज्ञानाने परिप्लुत असा शीख धर्म आहे. त्या संदर्भात मनुष्याच्या शरीरावर केस असणे किंवा नसणे याला महत्त्व देणे अनाकलनीय असल्याचे लेखक म्हणतो. सध्या बादल परिवाराच्या नियंत्रणात असलेल्या प्रबंधक समितीला लेखकाने बरेच खडे सवाल केले आहेत; ते शीख धर्मीयांमधील वैचारिक घुसळण जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरावेत.
फुटीरतावादी शिखांचे गट बंदुकीच्या बळावर शिखांचे एकधर्मीय राज्य स्थापन करण्यात अयशस्वी ठरले; पण भाजप मात्र (रा. स्व. संघाच्या साहाय्याने) मतपेटीद्वारे सत्तेवर आला आणि आज देशाला एकधर्मीय हिंदू राष्ट्र बनवू पाहत आहे, तसेच शीख धर्म हा एक स्वतंत्र धर्म असला तरी भाजप त्याला हिंदू धर्मात समाविष्ट करण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न करीत आहे, असे लेखकाचे निरीक्षण आहे.
शीख समाजाला हादरवणारी एक घटना म्हणजे, ऑक्टोबर २०१५ मध्ये बारगरी या ठिकाणी घडलेला गुरू ग्रंथसाहिबच्या विटंबनेचा प्रकार. त्या प्रकाराने पंजाबच्या जनतेला रोष अनावर झाला. त्यात उद्भवलेल्या जनआंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात दोन जणांचे बळी गेले. सत्ताधारी अकाली दलाने जनतेच्या सात्त्विक क्षोभाला कमी लेखून या प्रकरणी आतंकवाद्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. उलटपक्षी अकालीच या खेदजनक प्रकाराला जबाबदार आहेत, असाही आरोप झाला. डेरा सच्चा सौदाच्या गुरमीत रामरहिमलाही संशयित मानले गेले. हे गुंतागुंतीचे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियांमध्ये अजूनही अडकलेले आहे. तसे पाहिल्यास, शीख धर्मावरील संकटांची (‘धरम दे संकट’ची) परंपरा खूप जुनी आहे. अगदी सोळाव्या शतकात पंजाबवरील बाबरच्या आक्रमणापासून जून १९८४ मध्ये भारतीय लष्कराने अमृतसरच्या दरबार साहिब (सुवर्ण मंदिर)वर केलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’नामक मोहिमेपर्यंत अगणित प्रकार घडले आहेत. १९८४ सालची लष्करी कारवाई भिंद्रनवालेच्या दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आवश्यक होती, असा बहुतांशी भारतीयांचा समज असला, तरी त्या कारवाईने सर्वसामान्य शीख तीव्रतेने दुखावले गेले हे नाकारता येणार नाही. या पाश्र्वभूमीवर, ‘लाशां’ (प्रेते) शीर्षकाच्या प्रकरणात दहशतवादग्रस्त पर्वाची मीमांसा केलेली आहे. दिवसा पोलिसांचे, तर रात्री दहशतवाद्यांचे राज्य असलेल्या त्या कालखंडात ८,०४९ दहशतवादी, १,७६१ पोलीस कर्मचारी आणि ११,६९४ निरपराध लोक मारले गेले. गेल्या अडीच दशकांत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही जवळपास तेवढीच आहे; पण त्याची कोणी दखल घेत नाही, असे लेखक म्हणतो. दहशतवादग्रस्त काळातील पंजाबातील बेकायदेशीर चकमकी, अनेक सामान्य नागरिकांना जबरदस्तीने ‘अदृश्य’ करणे आणि इतर पोलीस अत्याचार यांच्यामुळे, तसेच १९८४ साली शिखांवरील दिल्लीतील अत्याचारांमुळे सरकार व जनतेतील परस्परविश्वासाचा बंध नाहीसा झाला. दहशतवादग्रस्त कालखंडातील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांना मानमरातब देण्यापेक्षा पंजाबशी दिलजमाई करणे आवश्यक होते, असे लेखकाला वाटते.
सप्टेंबर २०१६ मधील उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याच्या काळात लेखकाने पंजाब-पाकिस्तान सीमेवरील खेडय़ांमध्ये दौरा केला. भाताचे पीक शेतांमध्ये कापणीसाठी सज्ज होत होते आणि शेतकऱ्यांना त्यांची घरे व शेते वाऱ्यावर सोडून विस्थापित होण्याचे सरकारी आदेश आले होते. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड क्षोभ होता. सरकारने युद्धाचे वातावरण तयार केले होते; देशात इतरत्र अतिरेकी देशाभिमानाचा महापूर लोटला होता. तेव्हा सीमेवरचे काही शेतकरी त्यांच्या दारुण परिस्थितीसाठी राज्य व केंद्र सरकारांना जबाबदार धरून त्यांना शेलक्या शब्दांची लाखोली वाहत होते. युद्ध होईल असे सीमेवरच्या कोणालाही वाटत नव्हते; युद्ध होऊच नये, असे अगदी तेथील शालेय मुलांचेही मत होते. पंजाबच्या शेतकऱ्यांचा हा आक्रोश इतर भारतीयांच्या कानांपर्यंत पोहोचलादेखील नाही. लेखकासोबत खेडुतांनी आधीच्या युद्धांच्या आठवणी जागवल्या. कारगिल युद्धाच्या दरम्यान लष्कराने शेतांमध्ये माइन्स (स्फोटके) पेरली होती; ती काढून टाकण्यासाठी लष्कराला तीन वर्षे लागली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मात्र फक्त एका वर्षांपुरती मिळाली, अशा त्यांच्या आठवणी होत्या. भारत-पाक युद्धांमध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांनी नेहमीच भारतीय सन्याला मदत केली असली, तरी त्यांना- वास्तविक पंजाबलाच- नेहमी दुर्लक्षित करण्यात आले आहे, ही लेखकाची खंत आहे. वाघा सीमेवर रोज सायंकाळी भारत-पाक संयुक्त लष्करी समारंभात दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज उतरवले जातात, हे आपण जाणतो. पण या सोपस्काराची नाटकी व आक्रस्ताळी शैली लेखकाला मंजूर नाही. पण तसाच समारंभ सीमेवरच्या फिरोझपूरजवळील हुसेनीवाला येथेही असतो; मात्र हा समारंभ दोन्ही देशांची पथके लष्करी शिस्तीत, पण सुसंस्कृतपणे पार पाडतात आणि सीमेच्या दोन्ही बाजूंचे प्रेक्षकही संयमित प्रतिसाद देतात, हे लेखकाने आवर्जून नोंदवले आहे.
तसे पुस्तकात लेखकाने अनेक बाबींचे विवेचन केले आहे. शिरोमणी अकाली दल, काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष यांची वाटचाल व धोरणे, १९६० च्या दशकातील हरितक्रांती, सतलज-यमुना लिंक कॅनालचा विवाद, अकालींचा आनंदपूर साहिब ठराव (१९७२), १९८२ चा ‘धर्मयुद्ध मोर्चा’, कृषी क्षेत्राची जडणघडण, आडत्यांचे महत्त्व, शेतकऱ्यांचे प्रश्न, २०१७ ची निवडणूक व राजकीय पक्ष, युवकांमधले अमली पदार्थाचे वाढते व्यसन, सर्वसामान्य पंजाबींची स्वभाव-वैशिष्टय़े, अगत्यशीलता, बंडखोर प्रवृत्ती.. असे अगणित पलू पुस्तकात कथनाच्या ओघात चर्चिले गेले आहेत. पंजाबातील महिलांच्या प्रश्नांबाबत लेखक काही लिहू शकला नाही, या उणिवेची त्याला जाणीव आहे. पंजाबचा शोध घेताना लेखक स्वत्वही शोधत आहे. तो शीख धर्माच्या कर्मकांडांपेक्षा धर्मात समाविष्ट मूल्यांना महत्त्व देऊ इच्छितो. पितृसत्ताकता, सरंजामशाही व प्रतीकात्मक कर्मकांडांमध्ये गुरफटलेल्या पंजाबला उन्नतीच्या वाटेवर नेण्यासाठी जगातील सर्व पंजाबी जनतेला हातभार लावावा लागेल. लेखकाचे पंजाबवरील प्रेम व सद्य:स्थितीबाबतचे असमाधान, पंजाबच्या प्रगतीसाठी तळमळ, स्वतंत्र व खुले विचार आणि ओघवती लेखनशैली ही या पुस्तकाची वैशिष्टय़े आहेत. पुस्तक निश्चितच विचारप्रवर्तक आहे.
sukumarshidore@gmail.com