भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा इतिहास (इस्रो) आतापर्यंत लिहिलाच गेला नाही, अशातला भाग नाही. डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी या संस्थेच्या वाटचालीतील काही भाग यापूर्वी पुस्तक रूपात लिहिला आहे. आता मंगळयान सोडून दोन वर्षे झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘फ्रॉम फिशिंग हॅम्लेट टू रेड प्लॅनेट’ या नावाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. एक प्रकारे हा इस्रोच्या वाटचालीचा अधिकृत संदर्भग्रंथच आहे. ज्यांना भारताच्या अवकाश संशोधनातील वाटचालीत रस आहे, असे लोक हा ग्रंथ इस्रोच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात.
थुंबा या मच्छीमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातून सुरू झालेली इस्रोची वाटचाल अचंबित करणारी आहे हेच या ग्रंथातून जाणवते. एके काळी या गावात सायकलवरून अग्निबाणाचे सुटे भाग वाहून नेले जात असत. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे अध्वर्यू असलेले विक्रम साराभाई, सतीश धवन यांच्यापासून अगदी अलीकडे मंगळ मोहिमेचे संचालन करणारे अरुणन यांच्यासारख्या दिग्गज (खरोखरीच दिग्गज..) अवकाश वैज्ञानिकांचे लेख एकत्र कुठेच मिळणार नाहीत, ते या पुस्तकात तुम्ही वाचू शकता. यापैकी काही दिवंगत वैज्ञानिकांचे लेख अन्य पुस्तकांमध्ये विखुरलेले होते, ते या ग्रंथाने एकत्र गुंफले आहेत, हे या पुस्तकाचे एक वैशिष्टय़च.
हे पुस्तक इस्रोचे अवकाश प्रक्षेपक, उपग्रह, चांद्रयान मोहीम, मंगळ मोहीम यांची माहिती देते शिवाय त्याच्या जोडीला इस्रोचा इतिहासही उलगडत जाते. पुस्तकाचे प्रकाशन अलिकडेच ज्येष्ठ वैज्ञानिक व मंगळ मोहिमेमागचे खरे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले प्रा. यू.आर.राव यांच्या हस्ते झाले. इस्रोने प्रारंभीपासूनच कसा अभिनव दृष्टिकोन ठेवला याचा उलगडा या पुस्तकातून होतो. देशाच्या विकासासाठी इस्रोने काय केले याचे उत्तरही मिळते. या पुस्तकाचे संपादन पी.व्ही.मनोरंजन राव यांनी केले असून बी.एन.सुरेश व व्ही.पी. बालगंगाधरन हे इस्रोचे निवृत्त वैज्ञानिक सहसंपादक आहेत. या पुस्तक प्रकाशनाचा जो कार्यक्रम झाला त्यापासून प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यात आले होते व नंतर पत्रक काढून त्याची माहिती देण्यात आली यामागचा उद्देश न समजण्यासारखा आहे.
भारतीय अवकाश कार्यक्रमाची मुहूर्तमेढ जरी विक्रम साराभाई यांनी केली असली, तरी त्यांना तितकीच मोलाची साथ सतीश धवन यांनी दिली. साराभाई यांचे डिसेंबर १९७१ मध्ये निधन झाले त्या वेळी धवन अमेरिकेत कॅलटेक येथे अभ्यास-रजेवर होते. त्या वेळी त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोन आला, त्यांनी धवन यांना ताबडतोब मायदेशी येण्यास सांगितले. त्या वेळी धवन भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक होते त्यामुळे तेथील मंडळाचा सल्ला घेतला त्या वेळी जे.आर.डी टाटा व आर.चोकसी हे संचालक मंडळात होते. देशाची गरज असेल, तर तसा विचार करायला हरकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. मग धवन इंदिरा गांधी यांना भेटले तेव्हा त्या म्हणाल्या, की इस्रोची धुरा सांभाळण्यास तुम्हीच योग्य आहात, असे इस्रोतील अनेकांनी सांगितले आहे. ‘इंदिरा गांधींनी इस्रोसाठी केलेले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे धवन यांची नेमणूक!’ असा अहेर संपादकांनी प्रस्तावनेतच दिला आहे. धवन यांनी अखेर इस्रोची धुरा खांद्यावर घेतली व ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासह अनेक वैज्ञानिकांना संस्थेत आणले. इस्रोची वेगळी कार्यसंस्कृती धवन यांच्या काळात निर्माण झाली. विशेष म्हणजे अवकाश खात्याचे सचिव असूनही धवन यांना दिल्लीत कार्यालय नव्हते. अशा अनेक आठवणी या पुस्तकात आहेत.
या पुस्तकाची संकल्पना सप्टेंबर २०१२ मध्ये इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष राधाकृष्णन यांनी मांडली होती २०१३ मध्ये भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या पन्नाशीलाच हा ग्रंथ प्रकाशित व्हायचा होता पण आवश्यक लेख जमवण्याचे काम अवघड होते. या पुस्तकात छायाचित्रांचा समावेश केलेला नाही कारण मग तो ग्रंथ फारच अवाढव्य झाला असता त्यामुळे या पुस्तकाचा आणखी एक खंड वेगळा प्रसिद्ध केला जाणार आहे, त्यात छायाचित्रे असणार आहेत. लेखकाची मूळ शैली कायम ठेवून यात संपादन केले आहे. काही वेळा लेखांचे पत्रकारितेच्या शैलीने लोकांना समजेल अशा भाषेत पुनर्लेखन केले आहे, त्यामुळे वाचकांना अवकाश विज्ञान सोपे वाटेल असेच हे लेखन आहे. या पुस्तकाचे संदर्भमूल्य निश्तिच मोठे आहे, त्यामुळे तो आपल्या संग्रहात असायलाच हवा.
या पुस्तकाच्या छापील प्रतीची किंमत ८९९ रुपये आहे खरी, पण जिज्ञासूंना http://www.isro.gov.in/pslv…/fishing-hamlet-to-red-planet-download-e-book ‘ या इंटरनेट-पत्त्यावरून या पुस्तकाची अख्खी ई-प्रत मोफत वाचता येईल! ही लिंक किचकट वाटत असेल, ‘पीएसएलव्ही..’ (तीन टिंबे) वगैरे लिहिताना घोटाळा होत असेल, तर केवळ पुस्तकाचे नाव इंग्रजीत इंटरनेटवर शोधून ई-प्रतीपर्यंत पोहोचता येईलच.

rajendra.yeolekar@expressindia.com