मानवी इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे असे बरेचदा म्हटले जाते. सशस्त्र संघर्षांला मानवाच्या उत्क्रांतीमध्ये, समाजाच्या जडणघडणीत, संस्कृतींच्या उभारणीत किंवा फेररचनेत इतके महत्त्व आहे. माणसाचा युद्धाशी संबंध जितका जुना आणि गहिरा आहे तितकाच युद्धाच्या वैधतेचा प्रश्नही पुरातन आहे. कुरुक्षेत्रात कौरव-पांडव सेना समोरासमोर उभी ठाकली आहे आणि महाप्रतापी अर्जुनाच्या मनात ऐन वेळी किंतु निर्माण होतो आणि तो श्रीकृष्णाला म्हणतो, ‘दृष्ट्वेमान् स्वजनान् कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्। सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति॥’ आणि अर्जुनाचा सखा त्याला सल्ला देतो, ‘हतो वा प्राप्यसि स्र्वग जित्वा वा भोग्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय:॥’ अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे, हे माझे आप्तस्वकीय, भाऊबंद, गुरू युद्धाला समोर उभे ठाकलेले पाहून माझी गात्रे शिथिल पडत आहेत, माझ्या तोंडाला कोरड पडली आहे आणि माझ्या हातातून हे महाप्रतापी गांडीव धनुष्य गळून पडत आहे. तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतो की, युद्धात धारातीर्थी पडलास तर स्वर्गात स्थान मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील. तेव्हा जया-पराजयाचा किंवा परिणामांचा विचार करू नकोस. क्षत्रिय म्हणून रणांगणात उभा असताना युद्ध करणे हे तुझे आद्यकर्तव्य आहे आणि ते तू कर. (आजच्या भाषेत सांगायचे तर इट्स अ विन-विन सिच्युएशन, गो फॉर इट.)
भारतात जशी ही धर्मयुद्धाची कल्पना पूर्वापार होती तशी ती जगातील अन्य संस्कृतींमध्येही थोडय़ाफार फरकाने अस्तित्वात होती. धर्मयुद्धाचे अनेक नियमही होते.. सूर्यास्ताला युद्ध थांबवणे, शरणागतावर शस्त्र चालवायचे नाही, योद्धय़ांनी आपापल्या दर्जानुसार प्रतिस्पध्र्याशी युद्ध करावे, उदाहरणार्थ रथीने रथीशी, महारथीने महारथीबरोबर युद्ध करावे, इत्यादी.
मात्र दुसरीकडे असेही म्हणतात की, ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर’. प्रेम आणि युद्धात सारे काही क्षम्य असते. युद्ध म्हणजे ठरवून, समजून-उमजून केलेला विनाश, विध्वंस. काहीही करून जिंकणे महत्त्वाचे. तसे असेल तर युद्धात नियमांची काय गरज आहे? हा प्रश्न जसा अर्जुनाला पडला होता तसाच तो आजच्या आधुनिक सैनिकांनाही पडतो, ते ज्यांच्या वतीने लढतात त्या राष्ट्रांनाही तो भेडसावतो. म्हणूनच जीनिव्हा कन्व्हेन्शन, हेग कन्व्हेन्शन अशा युद्धासंबंधी आचारसंहिता, नियमावली तयार झाल्या आहेत. प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्या कितपत पाळल्या जातात हा प्रश्न आहेच. पण युद्धातील नीतिमत्ता हा वेगळा विषय आहे, एवढे नक्की.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या ‘व्हॉट एव्हरीवन नीड्स टू नो’ या पुस्तकमालेतील ‘मिलिटरी एथिक्स’ हे पुस्तक युद्धातील नीतिमत्ता या विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ जॉर्ज ल्युकास यांनी लिहिले आहे. (जॉर्ज ल्युकास नावाचेच अमेरिकी चित्रपट निर्मातेही आहेत. त्यांच्या नावाशी गल्लत करता कामा नये.) पुस्तकाला अमेरिकेच्या मरीन कोअरचे निवृत्त जनरल जॉन आर. अॅलन यांची प्रस्तावना आहे. लेखक ल्युकास हे अमेरिकी नौदल अकादमीत प्राध्यापक आहेत. तिथेच त्यांनी पूर्वी ‘डिस्टिंग्विश्ड चेअर इन एथिक्स’ हे अध्यासन भूषविले होते. युनिव्हर्सिटी ऑफ नोत्र दाम येथे ते सध्या सन्माननीय संशोधक-प्राध्यापक आहेत. तर केस वेस्टर्न रिझव्र्ह युनिव्हर्सिटीतील इनामुरी सेंटर फॉर एथिक्समध्ये व्हिजिटिंग फेलो आहेत. इंटरनॅशनल सोसायटी फॉर मिलिटरी एथिक्सचे ते अध्यक्ष आणि रूटलेज हँडबुक ऑफ मिलिटरी एथिक्स (२०१५) चे ते संपादक आहेत.
ठरावीक ‘युद्धस्य कथा रम्या’ या सदरातील हे पुस्तक नाही. त्यामुळे सामान्य वाचकांना त्यात कितपत थेट रस असेल हे सांगणे कठीण आहे. कारण त्यात युद्धाची रोमहर्षक वर्णने नसून युद्धाच्या तात्त्विक, नैतिक अंगांच्या अनुषंगाने काथ्याकूट आहे. मात्र तसे करताना त्यांनी ठिकठिकाणी परलेले संदर्भ आणि उदाहरणे इतकी विस्तृत आहेत की, त्यातून त्यांची विषयावरील पकड किती मजबूत आहे ते जाणवते. ऐतिहासिक संदर्भ देताना त्यांनी अर्जुन आणि श्रीकृष्णामधील संवादाचा सुरुवातीला उल्लेख केलेला प्रसंगही पुस्तकात दिला आहे. प्राचीन ग्रीक, रोमन, इस्लामी, चिनी आदी संस्कृतींमधील संदर्भही आले आहेत. चिनी युद्धनीतिज्ञ सन-त्सु याचे ‘आर्ट ऑफ वॉर’, प्रशियन सेनानी आणि युद्धनीतिज्ञ कार्ल फॉन क्लाऊजवित्झचे ‘फॉम क्रिग’ (ऑन वॉर) ही गाजलेली पुस्तके यापासून ते थेट जगभरच्या युद्धभूमींवरील ताजी उदाहरणे देत त्यांनी विषय मांडला आहे.
सैनिकी पेशाचा नैतिक आधार, युद्धातील नीतिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा, युद्धातील नीतिमत्तेची एतिहासिक पाश्र्वभूमी, युद्धातील नीतिमत्ता आणि धर्मयुद्धाची किंवा न्याय्य युद्धाची परंपरा (जस्ट वॉर ट्रॅडिशन), युद्धासाठीचे समर्थनीय कारण, एखाद्या देशाचा युद्धाचा न्याय्य हेतू (राइट इंटेन्शन), सैनिकांचे प्रत्यक्ष युद्धातील आणि युद्धजन्य परिस्थितीतील वर्तन अशा बाबींचा समावेश सुरुवातीच्या भागात केला आहे. तर उत्तरार्धात सैनिकी पेशासमोरील नीतिमत्तेसंबंधी आव्हाने यावर विस्तृत चर्चा आहे. युद्धात आता खासगी भाडोत्री सैनिक वापरण्याची पद्धत (प्रायव्हेट सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टिंग) प्रचलित होऊ लागली आहे. एखाद्या प्रकल्पासाठी खासगी कंत्राटदाराने कामगार पुरवावेत तशीच ही व्यवस्था आहे. दोन देशांच्या संघर्षांत लढण्यासाठी तिसऱ्याच देशाचे गरजू सैनिक ठरावीक मोबदला देऊन, ठरावीक काळासाठी पुरवले जाऊ लागले आहेत. त्यातून नैतिकतेचे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. एखाद्या देशातील संघर्षांत बडय़ा देशांनी मानवतेच्या नावाखाली हस्तक्षेप करण्याचे प्रकार (ह्य़ुमॅनिटेरियन रिलीफ ऑपरेशन्स) वाढत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर क्षेपणास्त्रे, वैमानिकरहित ड्रोन, लढाऊ यंत्रमानव अशी यंत्रे युद्धात वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. पण सैनिकांमध्ये माणूस म्हणून हल्ल्याचे जे तारतम्य असेल ते या यंत्रांमध्ये असेलच असे नाही. त्यामुळे त्यांच्या वापरासंबंधी नवे प्रश्न उभे राहत आहेत. संगणक आणि माहिती-तंत्रज्ञानाचा युद्धभूमीवरील आणि नागरी जीवनातील वापर जसा वाढत आहे तसा सायबर युद्धाचा धोका वाढत आहे. त्या आघाडीवर नैतिकतेचे कोणते मुद्दे उद्भवतात, अशा बाबींचा ऊहापोह पुस्तकाच्या उत्तरार्धात आहे.
पुस्तकात गणवेशधारी सैनिकांसाठीचे नियम या विषयावर बरेच विवेचन आहे. दोन स्वतंत्र, सार्वभौम देश (नेशन स्टेट्स) त्यांच्या अधिकृत सैन्यानिशी जेव्हा जाहीर घोषणा करून युद्ध सुरू करतात तेव्हा आंतरराष्ट्रीय नियम पाळणे एकवेळ ठीक. पण तशी ‘आदर्श’ व्यवस्था सगळ्यांच युद्धक्षेत्रांत नसते. जबाबदार देशांच्या कृतीही बरेचदा बेजबाबदार असू शकतात. आर्य वंशाचा मोठेपणा मिरवणारा हिटलरचा नाझी जर्मनी ज्यूंचे शिरकाण करतो, पौर्वात्य सभ्यतेचा मेरुमणी समजला जाणारा जपान अमेरिकेच्या पर्ल हार्बर तळावर बेसावध असताना हल्ला चढवतो, मानवता, समता, बंधुत्व आणि लोकशाहीचा डंका पिटणारी अमेरिका दुसरे महायुद्ध संपवण्यासाठी जपानवर दोन संहारक अणुबॉम्ब टाकते, मानवतेच्या नावाखाली संयुक्त राष्ट्रांच्या सहमतीच्या बुरख्याखाली व्हिएतनाममध्ये हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकेचे सैनिक ‘माय लाय’ गावात हत्याकांड घडवतात, ‘एजंट ऑरेंज’सारखी विषारी द्रव्ये सामान्य जनतेविरुद्ध वापरतात, आफ्रिकेतील रवांडा-बुरुंडीत संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत हुतू आणि तुत्सी जमातींचे हत्याकांड घडते, कोसोवो आणि बोस्नियाच्या संघर्षांत स्र्ोब्रेनित्झा येथेही तसाच नरसंहार होतो, इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेन त्याच्याच देशातील कुर्द बंडखोरांवर रासायनिक अस्त्रांनी प्रहार करतो अशा कृतींचा समाचार घेण्यास कोणते नियम वापरणार? दहशतवादाने आणि एखाद्या देशाने पुरस्कृत केलेल्या दहशतवादाने युद्धात गुंतलेल्या देशांच्या सीमारेषा पुसट केल्या आहेत. इस्लामकि स्टेट (आयसिस)ने इराक, सीरिया आणि अन्यत्र घातलेला धुमाकूळ आपल्यासमोर आहे. तसेच पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतात चालवलेले हल्ले ही नवी आव्हाने आहेत. त्यांची हाताळणी करताना कोणते नियम वापरायचे याची समर्पक उत्तरे देण्यात पुस्तक कमी पडते. प्रमाणबद्ध प्रतिकार (प्रपोर्शनेट रिटॅलिएशन) हे आधुनिक काळातील न्याय्य युद्धाचे एक तत्त्व आहे. पण मग एक ‘९/११’ घडल्यावर अमेरिका संपूर्ण इराक आणि अफगाणिस्तान बेचिराख करते; तर गेली कित्येक दशके पाकिस्तानी दहशतवादाचा बळी ठरलेल्या भारतालाही आत्मसंरक्षणार्थ तो हक्क आहे का, याचे थेट उत्तर पुस्तकात मिळत नाही. ही या पुस्तकाची त्रुटीच आहे. तरीही युद्धशास्त्राच्या अभ्यासकांसाठी एका वेगळ्या पैलूचा मागोवा घेणारे हे पुस्तक नक्कीच उपयोगी आहे.
मिलिटरी एथिक्स : व्हॉट एव्हरीवन नीड्स टु नो
लेखक : जॉर्ज ल्युकास
प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
पृष्ठे : २५३, किंमत : ६९५ रुपये
sachin.diwan@expressindia.com