|| डॉ. मनोज पाथरकर

विसाव्या शतकातील महत्त्वाचा कादंबरीकार जॉर्ज ऑर्वेलच्या निबंधांवर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या या सदराचा समारोप करताना ऑर्वेलचे लेखन स्वतंत्र विचार आणि चिकित्सक आकलनाचा वस्तुपाठ का ठरते, हे समजून घेणे अगत्याचे ठरेल..

‘अभिव्यक्तीला अटकाव’ या लेखापासून सुरू झालेला या सदराचा प्रवास ‘इंग्रजीतील भारतीय अभिव्यक्ती’पाशी येऊन थांबला. जॉर्ज ऑर्वेलच्या निवडक निबंधांचा परिचय करून देताना सार्वकालिक महत्त्व असलेल्या अनेक विषयांना या लेखमालेने स्पर्श केला. यातील काही लेख हुकूमशाहीचा वेध घेणारे होते, काही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करणारे होते, काही साहित्य, राजकारण आणि प्रचार यांच्यातील परस्परसंबंध तपासणारे होते, तर काही निवडक ब्रिटिश लेखकांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे होते. या लेखांच्या माध्यमातून ऑर्वेल विवेकाधारित मानवतावादी विचारपद्धती शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याची मते आपल्याला पटली नाहीत, तरी विचारप्रवृत्त करणारे खूप काही त्यांत सापडते.

पहिली गोष्ट म्हणजे, सुस्पष्ट भाषेच्या आवश्यकतेवर दिलेला भर! कारण भाषा आणि विचार यांचा जवळचा संबंध असतो. वापरून गुळगुळीत झालेले (किंवा अर्थ धुसर करणारे) शब्दांचे पुंजके टाळून लहान, अर्थवाही आणि नावीन्यपूर्ण शब्द वापरावेत, असे ऑर्वेल सुचवतो. वारंवार उद्घोष केल्या जाणाऱ्या काही विशिष्ट शब्दांचा (‘न्यूस्पीक’) उद्देश सत्य लपवण्याचा असतो. लोकशाहीत प्रचार आणि टीका दोन्ही आवश्यक असतात; मात्र सत्य नाकारण्याची वृत्ती हुकूमशाहीकडे नेते. म्हणूनच ऑर्वेलचे लेखन ‘हुकूमशाहीला विरोध आणि लोकशाही समाजवादाचे समर्थन’ या भूमिकेतून झालेले आहे. हुकूमशाही व्यवस्थेला ‘खरे’ स्वातंत्र्य मानवत नाही. कार्यक्षेत्राच्या निवडीबरोबरच विचार आणि भावनांवरही नियंत्रणे आल्याने प्रामाणिक साहित्यनिर्मिती अशक्य होते. अशा वेळी लेखकाने कला आणि प्रचार यांच्यातील संबंध लक्षात घ्यायला हवा. निर्मितिशीलता आक्रसून टाकणाऱ्या कर्मठ आणि दांभिक विचारसरणींचा स्वीकार करणे स्वत:वरच सेन्सॉरशिप लादून घेण्यासारखे असते. त्यातच, समाज बदलण्यापेक्षा किंवा बडय़ा धेंडांना धडा शिकवण्यापेक्षा लेखक-पत्रकारांवर तुटून पडणे सोपे असते. जनमताचा पाठिंबा नसेल, तर कायदा विचारस्वातंत्र्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरू शकतो.

एकीकडे जगातील अन्यायाची जाणीव लेखकाला विशुद्ध सौंदर्यवादी दृष्टिकोन बाळगणे अशक्य करते. तर दुसरीकडे, त्याने स्वतंत्र दृष्टिकोनातून सामाजिक – राजकीय चिकित्सा करण्याला सर्वसामान्य जनतेबरोबरच लेखकाचे समर्थन असलेल्या गटाकडूनही विरोध होतो. अशा वेळी आपल्याच गटाच्या अधिकृत विचारधारेला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य त्याने जपायला हवे. साहित्याचे मूल्यमापन करताना ऑर्वेल समाजातील ऐतिहासिक संघर्षांच्या मांडणीला महत्त्व देतो. डिकन्स, किपलिंग, वेल्स, स्विफ्ट यांसारख्या लेखकांच्या विशिष्ट कलागुणांबरोबरच त्यांच्या मर्यादाही तो वाचकांसमोर ठेवतो. त्याचबरोबर साहित्यकृती विशिष्ट विचार, मते आणि दृष्टिकोन उचलून धरत असली, तरी कला म्हणून तिची काही वैशिष्टय़े असतात हे तो दाखवून देतो. लेखनातील साहित्यगुण अनुभवण्यासाठी लेखकाची मते मान्य असण्याची गरज नसते. मात्र, त्यासाठी वाचकाला वैचारिक तटस्थता साध्य करावी लागते. ब्रिटिश लेखकांबद्दलच्या ऑर्वेलच्या निबंधांचा लक्षणीय विशेष म्हणजे, त्यांत समीक्षाविषयक सैद्धांतिक मुद्दे तांत्रिक भाषा न वापरता मांडलेले आहेत.

डाव्या, उजव्या किंवा उदारमतवादी अशा सर्वच विचारसरणींमधील सोयीस्कर दृष्टिकोन (Selective Vision) टाळून ऑर्वेल जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या गोष्टी उघड करतो. सर्वच विचारधारांचे पाईक सत्तेमुळे एकाधिकारशाहीकडे झुकताना पाहिलेले असल्याने तो नेहमीच त्या-त्या वेळच्या प्रस्थापितांविरुद्ध भूमिका घेतो. यात विरोधासाठी विरोध करण्याचा बेजबाबदारपणा नसतो. त्याला दाखवायचे असते, की व्यवस्थेतील अंतर्विरोधांमधून मार्ग काढताना सर्व संबंधितांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाल्यास इतिहासाचे पाऊल पुढे पडते. मात्र, जेव्हा हे अंतर्विरोध दडपण्यासाठी असंबद्ध कल्पनांचा उद्घोष केला जातो (आणि पडद्यामागून विशिष्ट गटाच्या हिताचे संवर्धन केले जाते), तेव्हा इतिहासाची पावले मागे पडतात. जेवढी ही पावले जास्त मागे जातात तेवढी भविष्यात प्रगतीची किंमत जास्त द्यावी लागते.

स्पेनमधील अनुभवातून ऑर्वेलचा रशियन समाजवादाबद्दल भ्रमनिरास झाला आणि ‘क्रांतीचा विश्वासघात’ या कल्पनेने त्याला पछाडून टाकले. मात्र, कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट – दोहोंवरही सारखेच आसूड ओढताना आर्थिक वर्चस्वाच्या बदलत्या स्वरूपाकडे त्याचे दुर्लक्ष झाले. त्याच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ व ‘१९८४’ या कादंबऱ्यांमध्ये यासंदर्भातील प्रश्नांची काहीशी एकांगी मांडणी झाली. खोटय़ा समाजवादाची भयानकता लक्षात आणून देऊन युरोपातील जनतेला ‘खऱ्या’ समाजवादासाठी क्रियाशील करण्याचा उद्देश त्यामागे होता.

ऑर्वेलच्या निबंधांचे वेगळेपण असे की, त्यांत आधुनिकतेच्या गुंतागुंतीचा सर्व अंगांनी विचार केलेला दिसतो. मूठभरांच्या ‘व्यवस्थापकीय’ राजवटीकडे वाटचाल करणाऱ्या जगात प्रत्येकाला त्यांचे हक्क देणारी लोकशाही अवतरणे कठीण झालेले आहे, असे त्याला वाटते. महासत्तांमधील आर्थिक – राजकीय संघर्षांमुळे हे आणखीनच जिकिरीचे झालेले आहे. अशा परिस्थितीत युरोपच्या एकीकरणातून आणि भारतासारख्या देशांच्या पुढच्या वाटचालीकडून ऑर्वेलला खूप अपेक्षा होत्या. अर्थात, यासाठी अद्भुतरम्य भूतकाळात न रमता सुनियोजित, प्रागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करावी लागेल. त्याच वेळी हेदेखील ध्यानात ठेवावे लागेल, की विज्ञान, सुव्यवस्था आणि नियोजन अश्मयुगीन कल्पनांसाठीही राबवले जाऊ  शकतात. त्यातच मध्यमवर्गाने कामगारांविरुद्ध भांडवलशाहीला समर्थन दिल्यास समाजवाद अशक्य होऊन अंतिमत: मध्यमवर्गच संकटात सापडेल, असे ऑर्वेलला वाटते. डाव्या विचारांना मिळालेल्या आव्हानातून नवी सैद्धांतिक मांडणी व्हायला हवी, असे तो सुचवतो.

ऑर्वेल बजावून सांगतो की, राष्ट्रवाद, धार्मिक कट्टरता आणि सरंजामी निष्ठा मानवी सुबुद्धतेपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. सत्तास्पर्धेशी जोडलेला ‘राष्ट्रवाद’ देशभक्तीपेक्षा वेगळा असतो. अतिराष्ट्रवादी दृष्टिकोन अस्थिर, सत्याबद्दल उदासीन आणि इतिहासाच्या पुनर्लेखनाचे समर्थन करणारा असतो. हा दृष्टिकोन पराभवातून जन्मलेला असेल, तर शत्रूवर कुरघोडी करण्याच्या नादात दूरदृष्टी गमावून बसतो. सुज्ञ माणसांना सत्तेपासून दूर ठेवतानाच बुद्धिभेद (परस्परविरोधी कल्पनांचा स्वीकार) आणि दांभिकतेचा पुरस्कार केला जातो. लोकशाहीतील सत्तास्पर्धेमुळे या प्रक्रियेला उत्तेजनच मिळते. अशा परिस्थितीत आधुनिक विज्ञाननिष्ठ विचारसरणीला पर्याय नाही, हे ऑर्वेल स्पष्ट करतो. मात्र, या विचारसरणीतून निर्माण होणारे जग यांत्रिक चंगळवादाचे नसावे असेही त्याला वाटते. म्हणूनच ‘अधिक नेमकेपणाने विचार करायला’ शिकवणाऱ्या शास्त्रीय शिक्षणाबरोबरच मानव्यविद्यांच्या अभ्यासावर तो भर देतो. (अन्यथा, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ समूहशरणतेचे बळी ठरू शकतात.)

ऑर्वेलचे गद्य लेखन वाचताना लक्षात येते की, त्याच्या विचारांत महत्त्वाचे विरोधाभास दडलेले आहेत. मूलत: त्याची भूमिका उदारमतवादी असल्याने धार्मिक कट्टरता, वंशवाद आणि वर्गभेद यांना विरोध करून तो राष्ट्रवादाला संकुचित ठरवतो. परंतु दुसरीकडे त्याला असेही वाटते की, हिटलरने उदारमतवाद्यांना ‘राष्ट्रवादा’चे अस्तित्व जाणवून दिले. राजकीय क्रियाशीलतेसाठी देश, धर्म वा नेत्यांप्रति श्रद्धा त्याला आवश्यक वाटते. (उदारमतवाद भावनिक ऊर्जा दडपून टाकतो, असेही तो सांगतो!) ऑर्वेलच्या मांडणीतील या विरोधाभासातून आधुनिकतेसमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न ठळकपणे समोर येतो. पारंपरिक पूर्वग्रह, बंधने आणि श्रेष्ठत्वाच्या कल्पना आधुनिकतेविरुद्ध असल्याने त्या सोडून देणे आवश्यक आहे. मात्र, त्या जागी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांवर आधारित कोणती ‘भावनिक’ मूल्ये व श्रद्धास्थाने निर्माण करायची? जोवर या प्रश्नाचे व्यावहारिक उत्तर सापडत नाही, तोवर यंत्रसंस्कृती अंगीकारलेला मानव बाजारव्यवस्थेतील सुखलोलुपता आणि स्पर्धा यांतच गुंतून राहण्याची शक्यता आहे.

माध्यमांवरील मालकीचे केंद्रीकरण आणि आपसांतील स्पर्धा यांमुळे हे प्रश्न आणखीच जटिल होत आहेत. काही मोजके अपवाद वगळता माध्यमे, विशेषत: दूरचित्रवाहिन्या प्रचाराचे साधन ठरत आहेत. अशा वेळी कादंबरीकार ऑर्वेलइतकाच पत्रकार ऑर्वेल महत्त्वाचा ठरतो. आज एकीकडे पत्रकारितेवर साम, दाम, दंड, भेद असा चहुबाजूंनी हल्ला होतोय, तर दुसरीकडे नवमाध्यमांनी प्रत्येकालाच सार्वजनिक संवादाची शक्ती बहाल केलेली आहे. समाजमाध्यमांवरील प्रचारकी टोळ्या राजकीय – वैचारिक विरोधकांना भंडावून सोडताना दिसतात. वरवर लोकशाहीधार्जिणा वाटणारा हा प्रकार हुकूमशाहीला साहाय्यक ठरू शकतो. विचार करण्याची यंत्रणाच बधिर करणारी माध्यमकेंद्री, चंगळवादी, घाईगर्दीची जीवनशैली सर्वदूर पसरते आहे. यातून जनानुरंजन करणाऱ्या साहित्य -कलांची लोकप्रियता वाढत असून आधुनिक -अभिजात कलाकृतींची (Modern Classics) परंपरा लुप्त होते आहे.

ऑर्वेलला द्रष्टा ठरवण्यापेक्षा त्याचे साहित्य आपल्याला समकालीन प्रश्नांच्या अदृश्य बाजू शोधण्याची दृष्टी देते, हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. भविष्याचा वेध घेताना खरे तर ऑर्वेल तेलाचे राजकारण, इलेक्ट्रॉनिक्स क्रांती किंवा उजव्या शक्तींचा वर्चस्ववाद यांची दखल घेण्यात कमी पडतो. मात्र, आधुनिकता आणि परंपरावाद यांच्यातील संघर्षांतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे चिकित्सकपणे पाहण्याची दुर्मीळ दृष्टी त्याच्याकडे आहे. ही दृष्टीच त्याला स्वत:च्या मातृभूमीची परखड चिकित्सा करण्याचे बळ देते. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाला विरोध करताना किंवा ब्रिटन अमेरिकेचा ‘आश्रित देश’ झाल्याचे सांगताना तो भावनाविवश होत नाही. विचारधारांच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारण्याचे महत्त्व तो पुन:पुन्हा लक्षात आणून देतो. ऑर्वेल आपल्याला पटवून देतो, की प्रचारतंत्र (Propaganda) आणि नागरिकांवरील पाळत (Surveillance) लोकशाहीसमोरील महत्त्वाची आव्हाने असली, तरी तिचा खरा शत्रू आहे – लोकांनी विचार करण्यास दिलेला नकार!

manojrm074@gmail.com

(समाप्त)

Story img Loader