अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फारशी पुस्तकं वाचत नाहीत. चांगले निर्णय घेण्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचायची आवश्यकता नाही; शहाणपण आणि व्यावसायिकता असली की, चांगले निर्णय घेता येतात, असं त्यांचं म्हणणं. राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करायचं तर तुम्ही चांगले वाचकही असले पाहिजेत, यावर ट्रम्प यांचा फारसा विश्वास नाही; परंतु अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या वाचनप्रेमाचे दाखले देणारं केविन जे. हेज् यांचं ‘जॉर्ज वॉशिंग्टन- अ लाइफ इन बुक्स’ हे पुस्तक वाचलं, की ट्रम्प यांच्या म्हणण्यातील निर्थकता ध्यानात येते. बातमी त्या पुस्तकाचीच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉशिंग्टन यांच्याविषयी माहिती देणारी अनेक चरित्रपर पुस्तकं आजवर लिहिली गेली. त्यातून अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानापासून राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीपर्यंतचे अनेक तपशील आले आहेत. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वाचनप्रेमाचा पैलू मात्र त्यातून सुटला आहे. ती उणीव केविन जे. हेज् लिखित पुस्तकानं दूर झाली. त्यामुळेच हे पुस्तक वॉशिंग्टन यांच्यावरील पुस्तकांत निराळं ठरतं.

सुरुवातीच्या काळात सैन्यात काम केल्यानंतर वॉशिंग्टन यांनी वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीविषयक पुस्तकं वाचून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोगही त्यांनी केले. दरम्यानच्या काळात व्हर्जिनियाच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून ते निवडले गेले. त्याच सुमारास अमेरिकेतील ब्रिटिशांच्या तेरा वसाहतींत ब्रिटिश शासनव्यवस्थेविरुद्ध असंतोष पसरण्यास सुरुवात झाली होती. १७६७ सालची बोस्टन टी पार्टी याचं द्योतक होतं. वसाहतींमधील पुढाऱ्यांनी स्वातंत्र्य चळवळ सुरू केली होती. त्यासाठी काँटिनेंटल काँग्रेसची स्थापनाही झाली. लवकरच वॉशिंग्टन तिचे प्रमुख झाले. सात वर्षांच्या संग्रामानंतर १७८३ मध्ये पॅरिस तह होऊन स्वातंत्र्ययुद्ध समाप्त झालं. पुढे १७८७ मध्ये फिलाडेल्फिया परिषदेद्वारे नवीन संविधान निर्माण होऊन वॉशिंग्टन १७८९ मध्ये पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. या काळात वॉशिंग्टन यांनी घेतलेले निर्णय, त्यावर त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचा पडलेला प्रभाव आणि वाचनामुळे वॉशिंग्टन हे एक महान नेते म्हणून कसे घडत गेले, याचा वेध हेज् यांनी या पुस्तकात घेतला आहे. वॉशिंग्टन यांची पत्रं, नोंदवह्य़ा, सुमारे एक हजार पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह यांच्या आधारावर आ पुस्तकाचं लेखन झालं आहे.  वॉशिंग्टन यांच्या वाचनाचे विविध टप्पे, त्यांच्यावर प्रभाव पाडणारी पुस्तके, त्याचा त्यांच्या लिखाणावर जाणवणारा ठसा, त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळातील धोरणांना या पुस्तकांमुळे कसा आकार येत गेला याची माहिती या पुस्तकात मिळते.

ट्रम्प यांच्या न-वाचक असण्याच्या पाश्र्वभूमीवर पहिल्या अमेरिकी अध्यक्षाच्या वाचनप्रेमाचा घेतलेला हा शोध महत्त्वाचा ठरतो.