अभिजीत रणदिवे rabhijeet@gmail.com

ही चित्रकादंबरी (ग्राफिक नॉव्हेल) म्हणजे ‘संवादांतून उलगडणारा स्मृतिपट’ आहे.. या आठवणी फक्त मीराच्या नाहीत, तिच्या मुलाच्याही आहेत आणि हळूहळू एकोप्याऐवजी भेदांनाच महत्त्व देऊ लागलेल्या एका राष्ट्राच्याही आहेत. मात्र, घालमेल वाढत असूनही लेखिका आशावादी आहे..

परदेशस्थ भारतीयांनी आपले अनुभव साहित्य म्हणून खपवायचे आणि त्यातल्या एग्झॉटिकपणाच्या जोरावर देशविदेशातल्या ‘ग्लोबल नागरिकां’ची वाहवा मिळवायची यात आता काहीच नवीन उरलेलं नाही. अशा वेळी या प्रकारच्या एखाद्या पुस्तकाची दखल घ्यावीशी वाटण्यासाठी त्यात काही तरी वेगळं असायला हवं. मीरा जेकबना आपल्या ‘गुडटॉक’ या पुस्तकात ते साधलं आहे. ‘अ मेम्वार इन कन्व्हस्रेशन’ हे उपशीर्षक वाचून खरं तर धोक्याची घंटा वाजते, कारण माणसांनी एकमेकांशी बोलत बसायचं आणि भूतकाळाविषयी शब्दबंबाळ उमाळे काढायचे हा तर अगदीच ठोकळेबाज प्रकार आहे. पण ‘गुडटॉक’ त्या चौकटीबाहेर पडू शकतं याची दोन प्रमुख कारणं आहेत. एक तर, इथल्या संभाषणांच्या केंद्रस्थानी असलेला ‘झी’ (झाकिर) हा मुलगा पहिल्यापासूनच वाचकाला गुंतवून ठेवतो आणि ‘ग्राफिक नॉव्हेल’च्या शैलीतलं हे स्मृतिचित्र प्रसंगी शब्दबंबाळ होण्याचा धोका पत्करूनही त्याच्या दृश्य स्वरूपामुळे वेधक ठरतं.

पुस्तकाची सुरुवात २०१४ साली, सहा वर्षांच्या झीपासून होते. त्याला मायकेल जॅक्सननं पछाडलेलं आहे. झीला पडलेल्या प्रश्नांमधून पुस्तक आपल्याला त्याच्या आणि त्याच्या आईच्या म्हणजेच मीराच्या भावविश्वातल्या एका अतिमहत्त्वाच्या विषयाकडे नेतं : आपली वांशिक ओळख नक्की काय आहे आणि अमेरिका नावाच्या या तथाकथित स्वातंत्र्यप्रिय आणि समताप्रिय देशात आताच्या काळात त्या ओळखीचं काय करायचं? मायकेल जॅक्सनचं कृष्णवर्णीय असणं आणि नंतर ‘गोरं’ होणं यातून विषयाला वाचा फुटते. पुस्तक ‘ग्राफिक’ असल्यामुळे झी आपल्या आईप्रमाणे ‘ब्राऊन’ आहे हे आपल्याला दिसतंच. त्याचे वडील (जेड) मात्र गोरे आहेत. (खरं तर ज्यूवंशीय; अगदी आताआतापर्यंत ‘गोरे’ लोक ज्यूवंशीयांना ‘आपल्या’ वंशाचे समजत नसत.) त्याची आई मीरा अमेरिकेत जन्मलेली असली तरी तिचे आईवडील भारतातून आलेले सीरियन ख्रिश्चन आहेत, हे आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं जातं. न्यू यॉर्क शहरातल्या बहुवंशीय वस्ती असलेल्या ब्रूकलिन उपनगरात मीरा, जेड आणि झी राहतात हेदेखील आपल्याला समजतं.

झीला पडणारे प्रश्न मायकेल जॅक्सनच्या रंगावर थांबणारे नसतात. हळूहळू त्यात समकालीन घटनांचं प्रतिबिंब पडायला लागतं. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात मायकेल ब्राऊन नावाच्या नि:शस्त्र कृष्णवर्णीय टीनएजरवर गोऱ्या पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला. पोलिसांची वर्णभेदी वर्तणूक त्यानिमित्तानं एक राष्ट्रीय मुद्दा म्हणून चर्चिली जाऊ लागली (# BlackLivesMatter). त्या पाश्र्वभूमीवर ‘गोऱ्यांना काळ्यांची भीती वाटते का?’ या झीच्या प्रश्नावर ‘कधीकधी वाटते’, असं म्हणण्यावाचून मीराला पर्याय नसतो, पण मग त्याचा पुढचा (अतिशय तर्कशुद्ध) प्रश्न मात्र त्या कुटुंबाला हादरवून टाकणारा असतो : ‘मग बाबालाही आपली भीती वाटते का?’

मुलाच्या प्रश्नांना त्याचं वय लक्षात घेऊन शक्यतो सोप्या शब्दांत, त्याला कळतील असे संदर्भ घेऊन, तरीही खरीखुरी आणि परखड उत्तरं द्यायचा मीराचा प्रयत्न आहे, कारण अखेर ते प्रश्न या देशातल्या त्याच्या भवितव्याशी निगडित आहेत. वास्तव गुंतागुंतीचं आणि प्रसंगी भयप्रद जरी वाटलं, तरीही जगण्याविषयीची आणि भविष्याविषयीची आशा मुलाच्या मनात जागी ठेवण्याची मीराची धडपड आहे. याच अमेरिकेत लहानाची मोठी होत असताना मीराला स्वत:विषयी पडलेले प्रश्न झीच्या न संपणाऱ्या प्रश्नमालिकेमुळे तिला आठवू लागतात. तिच्या आईवडिलांचं लग्न ठरवून झालेलं असतं; १९६८ साली लग्न करून ते अमेरिकेत येतात; तिथे तिचे वडील सर्जन म्हणून यशस्वी होतात, वगैरे तपशिलाचा भाग मीरा सांगतेच, पण कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मार्टनि ल्यूथर किंग ज्युनिअरची हत्या मीराचे आईवडील अमेरिकेत येताच आठवडय़ाभरात झाली, या तपशिलाची भर मीरा जेव्हा घालते तेव्हा आपण मूळ विषयापासून फारसे दूर जाऊ इच्छितच नाही, कारण ते शक्यच नाही, याची ती वाचकाला जाणीव करून देते. वंशश्रेष्ठत्वाचा मुद्दा आला की सगळेच कमीअधिक अपराधी कसे ठरतात, ते ठसवताना मीरा आपल्या सीरियन ख्रिश्चन मुळांची आठवण करून देते – युरोपातून ख्रिस्ती मिशनरी भारतात आले त्याच्या किती तरी आधीपासून, म्हणजे इ.स. ५२पासून ‘आपण’ सीरियन ख्रिश्चन भारतात स्थायिक झालो आहोत, याची जाणीव तिला तिच्या नातेवाईकांनी लहानपणीच करून दिलेली असते. त्यामुळे नंतर वसाहतीच्या काळात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या भारतीय वंशाच्या इतर ख्रिश्चनांपेक्षा ते स्वत:ला वेगळं मानत असतात. इतकंच नव्हे, तर मीरा काळी आहे म्हणून ‘फेअर अँड लव्हली’ वापरायचा सल्लाही त्यांच्याकडूनच तिला लहानपणी मिळालेला असतो.

हळूहळू पुस्तकाची रचना लक्षात येऊ लागते. अमेरिकेतच जन्मलेल्या आणि स्वत:ला अमेरिकनच समजणाऱ्या मीराला आयुष्यभर वेगवेगळ्या लोकांनी अनेक प्रकारे ती ‘वेगळी’ (‘द अदर’ या अर्थानं) असल्याची जाणीव करून दिलेली असते. एकविसाव्या शतकातल्या अमेरिकेत मोठं होणाऱ्या झीला आपली ओळख (आयडेंटिटी) नक्की काय आहे याविषयी पडलेल्या प्रश्नांना सामोरं जाणं मीराला जसजसं भाग पडतं, तसतशी स्वत:च्या ओळखीविषयी स्वत:ला वेळोवेळी पडलेले प्रश्न/ आलेले कडू-गोड अनुभव या सगळ्याकडे दुर्लक्ष करून स्वत:ला निव्वळ अमेरिकन म्हणवून घेत जगणं आता आई म्हणून मुलासमोर पुरेसं पडेनासं झालंय, याची जाणीव तिला होऊ लागते. मीराचा भूतकाळ आणि झीचा वर्तमानकाळ एकमेकांत किती गुंतलेले आहेत ते तिला पदोपदी लक्षात येऊ लागतं. त्यामुळे पुस्तकात दोन धागे आहेत – एक मीराच्या भूतकाळापासून वर्तमानापर्यंत येणारा आणि दुसरा २०१४ पासूनचा, झीच्या वर्तमानातला. त्यांची एकमेकांत गुंफण अशा प्रकारे केली आहे की अमेरिकेचा वर्तमानकाळ तिच्या भूतकाळावर किती अवलंबून आहे याचीही वाचकाला जाणीव होत राहते आणि एका मिश्रवंशीय कुटुंबाच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा एका मिश्रवंशीय राष्ट्राच्या भूतकाळाशी आणि वर्तमानाशी किती घट्ट संबंध आहे, हा धागाही दिसत राहतो.

इथे पुस्तकाच्या दृश्यरचनेचाही उल्लेख केला पाहिजे. प्रसंगाची पाश्र्वभूमी म्हणून पुस्तकात छायाचित्रं, रेखाटनं, वर्तमानपत्रातली कात्रणं वगैरे वापरली आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी कोणत्याही प्रसंगात वापरलेले दृश्याकार हे जणू ठोकळे (बिल्डिंग ब्लॉक्स) किंवा मुखवटे (कटआऊट) म्हणावेत असे आहेत. म्हणजे प्रसंग जरी वेगळे असले तरीही तेच तेच चेहरे आणि त्यांवरचे तेच तेच भाव आपल्याला दिसत राहतात. माणसाची ओळख संदर्भानुरूप जरी बदलत राहिली तरी त्याचं बाह्य़ रूप बदलत नसतं. हे कितीही फसवं किंवा अविश्वसनीय वाटलं तरीही वास्तवात ते असंच असतं याची जाणीव जणू पुस्तकाच्या या दृश्यमांडणीतून सतत होत राहते.

विषय जरी गंभीर असला तरी पुस्तकातल्या अनेक प्रसंगांना विनोदाची झालर आहे. उदा. विविध गोऱ्या-काळ्या पुरुषांबरोबरचे (आणि स्त्रियांबरोबरचेही) मीराचे डेटिंगचे अनुभव आणि तिच्या आईवडिलांचे तिच्यासाठी सुयोग्य जोडीदार शोधण्याचे प्रयत्न एका पातळीवर गमतीशीर आहेत; पण त्यातून स्वत:ला कमी लेखणारी, इतरांकडून इवलीशी तरी स्तुती लाभावी याचा सतत ध्यास घेतलेली मुलगी दिसत राहते. वंशभेद कायम आपल्या त्वचेवर लेपून जगणारी, न्यूनगंडानं ग्रासलेली मीरा वर्तमानात आपल्या मुलाला तशाच गंडापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची त्यामुळे जाणीव होते. आपण आपल्यातला न्यूनगंड जर ओलांडू शकलो, तर मुलाच्या प्रश्नांना आपण अधिक मोकळेपणे भिडू शकतो हे मीराला हळूहळू कळू लागतं. म्हणजे हा जितका झीचा तितकाच मीराचाही प्रवास आहे.

पुस्तक जसजसं २०१४ कडून २०१६ कडे येतं तसतसं हेदेखील लक्षात येऊ लागतं, की झीला पडणाऱ्या प्रश्नांमागे आणि खरं तर पुस्तकाच्या अस्तित्वामागे आणखी काही तरी आहे : पुस्तकात आतापर्यंत ज्याचा फारसा उल्लेख झालेला नाही, पण जो सर्व पुस्तकभर अस्तित्वात आहे असा हा ‘खोलीतला हत्ती’ (एलिफंट इन द रूम) म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेला आणि बघताबघता अमेरिकन उदारमतवाद्यांच्या नाकावर टिच्चून जिंकणारा ट्रम्प आहे.

‘बाबा’ जेडचे ज्यूवंशीय आईवडील ट्रम्पचे पाठीराखे होतात तिथपासून पुस्तकाला अधिक गंभीर वळण लागतं. आपल्या ब्राऊन नातवावर प्रेम करणारे त्याचे गोरे आजीआजोबा, लोकांच्या वंशभेदी भावना भडकावत प्रचार करणाऱ्या माणसाला मत देऊ शकतात, या वास्तवाला सामोरं जाण्यासाठी आणि तरीही कुटुंबातला स्नेहभाव जपण्यासाठी झीच्या आईवडिलांना (जेड आणि मीराला) जी धडपड करावी लागते आणि त्यातून जे ताणतणाव निर्माण होतात, तो भाग मुळातूनच वाचण्यासारखा आहे. अमेरिकी गोऱ्या समाजाचा लसावि काढत ट्रम्पनं आपल्या ढोबळ पण चलाख आणि ठसकेबाज प्रचारशैलीतून बहुसंख्याकांच्या मनात वसत असलेल्या द्वेषमूलक आणि नीच प्रवृत्तींना पद्धतशीरपणे खतपाणी घातलं आणि त्यांची मतं आपल्याकडे वळवून घेतली. हे सगळं होत असताना मीरा-जेड-झीसारख्या नागरिकांचं काय झालं ते पुस्तकात दिसतं. भावनातिरेकानं आणि अपशब्दांनी बरबटलेल्या या वातावरणात झीला वास्तवाची जाणीव होणं अपरिहार्य तर आहेच, पण त्याला ते अधिक समंजसपणे आणि शांतपणे समजून घेता यावं यासाठीची मीराची धडपड आणि आपलं चुकतंय की काय, अशी तिला सतत वाटणारी भीती यांचं मिश्रण कथानकाच्या या भागावर सावट आणतं.

वरवर पाहता चांगले वाटणारे लोक थोडं खरवडून पाहता पूर्वग्रहदूषित असलेलेच दिसतात असा निराशावादी दृष्टिकोन बाळगावा, की लोक द्वेषानं भारलेले दिसले तरीही ती तात्पुरती स्थिती असते आणि बरेचसे लोक मूलत: चांगलेच असतात असा आशावादी दृष्टिकोन बाळगावा, हा प्रश्न अखेर ज्याचा त्यालाच सोडवावा लागतो. दिवस किती वाईट आले आहेत आणि भविष्य कितीही कठीण आहे असं वाटलं तरीही लोक मुलांना जन्म देत असतात आणि जगरहाटी चालूच असते. ज्या जगात आपण आपल्या मुलाला वाढवतो आहोत ते कसंही असो, ते समजून घेता यावं आणि आपलं भविष्य वर्तमानापेक्षा अधिक बरं करण्यासाठी जी धडपड त्याला करावी लागणार आहे त्यासाठी त्याला सक्षम करता यावं असा ध्यास घेऊन मीरा जेकब यांनी स्वत:ला काही कठीण प्रश्न विचारत, स्वत:चा शोध घेतघेत हे पुस्तक लिहिलं आहे. लेखिकेकडे सोपी उत्तरं नसली तरीही ‘संवाद जोवर चालू आहे तोवर आशा आहे’ हे स्पष्टपणे दाखवून देण्यात ती यशस्वी झाली आहे. पुस्तकातले संदर्भ आणि त्याची मुळं जरी अमेरिकेत घट्ट रोवलेली असली तरीही समाजमाध्यमांनी आणि प्रसारमाध्यमांनी सततचा विखारी, द्वेषमूलक आणि एकांगी प्रचार करून जनतेला कोणत्या तरी ध्रुवाकडे आकर्षति करणं हे काही अमेरिकेपुरतं मर्यादित नाही. त्यामुळे आताच्या ‘ग्लोबल तरीही लोकल’ वास्तवात जगणाऱ्या अनेकांना पुस्तकातले प्रश्न, त्याहीपेक्षा त्यांची उत्तरं शोधण्याची धडपड परिचित वाटू शकेल आणि अंतर्मुखही करू शकेल.

‘गुडटॉक’

लेखिका : मीरा जेकब

प्रकाशक : ब्लूम्सबरी

पृष्ठे: ३६८, किंमत : ५९९ रुपये

 

Story img Loader