|| शशिकांत सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेक्सपीअर, गोगोल, मार्क्‍स, वर्डस्वर्थ, काम्यू, अपडाइक.. अशा तब्बल १०० लेखकांच्या हरवलेल्या, अर्धवट राहिलेल्या हस्तलिखितांविषयी अभ्यासू, पण रोचक माहिती देणाऱ्या पुस्तकाची ही ओळख..

अल्बर्ट काम्यू लिखित ‘ले प्रीमियर होम’, शेक्सपीअरचे नाटक ‘कार्डेनिओ’, वर्डस्वर्थची ‘द रिक्ल्यूज’ यांत कोणते साम्य आहे? हे साम्य आहे ते नामशेष होण्यात किंवा अर्धवट राहण्यात. जगभरातील अनेक लेखकांना सतावणारी गोष्ट म्हणजे- ‘रायटर्स ब्लॉक’! याच्यामुळे अनेकदा लेखकाची साहित्यकृती अर्धवट राहते. अगदी जॉन किट्ससारखा कवी किंवा जे. आर. आर. टॉल्किनसारखा लोकप्रिय लेखक यांचे बरेच लेखन अर्धवटच राहिले.

खरे तर लेखकाचे जे काही भावविश्व असते, ते त्याच्या साहित्याच्या वाचनातून आपल्यापर्यंत पोहोचते. परंतु समजा, जगातील सर्व पुस्तके सर्व स्वरूपांत (छापील, किंडल वगैरे) नष्ट झाली, तरीही मार्क ट्वेनचा हकलबरी फिन वा ‘मृत्युंजय’मधील कर्ण किंवा बाबुराव अर्नाळकरांच्या झुंजारकथा अथवा ‘अरेबियन नाइट्स’मधील सुरस गोष्टी हे सारे आपल्या मनात साठून राहिलेले असणार. किंबहुना कागद नसतानाही वर्षांनुवर्षे साहित्य एक-दुसऱ्यापर्यंत पोहोचत होतेच, तसेच पुढेही पोहोचत राहणारच.

या पार्श्वभूमीवर, प्रोफेसर बर्नार्ड रिचर्ड्स यांच्या ‘द ग्रेटेस्ट बुक्स यू विल नेव्हर रीड’ या पुस्तकाकडे पाहावे लागते. कालौघात लोपलेल्या साहित्याचा त्यांनी घेतलेला शोध या पुस्तकात मांडला आहे. शीर्षकापासूनच आकर्षून घेणारे हे पुस्तक वाचण्याइतकेच चाळण्यातही गंमत आहे. पानोपानी असलेली लेखकांची छायाचित्रे, त्यांच्याभोवती माहितीच्या चौकटींची मांडणी यांमुळे हे देखणे पुस्तक हाती आल्यावर खाली ठेवावेसेच वाटत नाही. किंबहुना ते हातात आल्यावर आपलेसे करावे वाटते!

पुस्तकात जवळपास शंभर लेखकांच्या साहित्यकृतींचा परिचय आहे. यातल्या अनेक साहित्यकृती अर्धवट स्वरूपात प्रसिद्ध झाल्या आणि त्या नावाजल्यादेखील गेल्या. उदा. ‘द मॅन विदाऊट क्वालिटीज्’ ही ऑस्ट्रियन लेखक रॉबर्ट म्युजिलची जवळपास सतरा-अठराशे पानांची (त्रिखंडात्मक) कादंबरी आज उपलब्ध आहे. पण ती अर्धवट आहे हे कळल्यावर आश्चर्य वाटते.

अर्नेस्ट हेमिंग्वेने त्याच्या उमेदवारीच्या काळात लिहिलेल्या पहिल्या कादंबरीचे हस्तलिखित चक्क हरवले. झाले असे की, १९२२ च्या नोव्हेंबरमध्ये हेमिंग्वे पत्रकार म्हणून एका शांतता परिषदेचा वृत्तांत लिहिण्यासाठी स्वित्र्झलडला गेला होता. काही दिवसांनी त्याची पत्नी पॅरिसहून त्याला भेटायला तिथे येणार होती. तिने त्याच्या काही कथांचे आणि पहिल्या कादंबरीचे हस्तलिखित सोबत घेतले होते. रेल्वेच्या प्रवासात ती मधे पाणी आणायला उतरली आणि परत आली तो हस्तलिखित ठेवलेली सुटकेस गायब झालेली. त्या हस्तलिखितातील फक्त दोन कथा इतरत्र प्रती असल्याने वाचल्या. ही माहिती पुस्तकात वाचायला मिळते.

पुस्तकाची रचना साधारणपणे अशी आहे : पुस्तकाचे नाव- म्हणजे हरवलेल्या/ गहाळ झालेल्या किंवा अपूर्ण राहिलेल्या पुस्तकाचे नाव, त्याखाली लेखकाचे छायाचित्र, अल्पचरित्र, समीक्षकीय नोंदी आणि इतर माहिती. तसेच त्या-त्या पुस्तकाचे वर्णन आणि त्यानंतर समांतर अशी पुस्तके वा लेखकाच्या इतर पुस्तकांची छायाचित्रे, संबंधित माहिती असलेली नियतकालिके किंवा इतर टिपणं, एखादा सिनेमा त्यावर झाला असल्यास त्याचे चित्र आणि ‘व्हॉट हॅप्पन नेक्स्ट?’ म्हणजे ते पुस्तक लिहिण्याच्या प्रकल्पानंतर लेखकाने आयुष्यात काय केले याबद्दलची माहितीही वाचायला मिळते. अनेक पुस्तकांचे चांगले ‘डॉक्युमेन्टेशन’ यात असल्यामुळे अमुक पुस्तक हरवले वा लिहिले गेले नाही, याच्या नेमक्या नोंदींचे पुरावे पुस्तकात जागोजागी आहेत. उदा. हेमिंग्वे एझरा पाउंडला लिहिलेल्या पत्रात म्हणतो की, ‘माझे हस्तलिखित हरवल्याचे तुला कळले असेल.’

या पुस्तकाचे मोठे वैशिष्टय़ म्हणजे- हरवलेल्या, अर्धवट राहिलेल्या ‘पुस्तकां’ची मुखपृष्ठे! ग्राफिक्स डिझायनरने काळाची नेमकी नोंद घेऊन ती केली आहेत. उदा. शेक्सपीअरच्या नाटकासाठी केलेले चित्र हे त्याच्या पुस्तकांच्या पारंपरिक मुखपृष्ठांसारखे आहे. ग्रॅहम ग्रीनच्या पुस्तकासाठी केलेले मुखपृष्ठ हे पूर्ण निळ्या रंगात आणि खुर्चीच्या छायाचित्राच्या स्वरूपात आहे. केवळ एक रान आणि नदी दाखवणारे रॉबर्ट म्युजिलच्या पुस्तकाचे मुखपृष्ठही लक्ष वेधून घेते. लेखकांची उत्कृष्ट छायाचित्रे हाही या पुस्तकाचा निखळ ठेवा आहे. यात तरुणपणीचा जॉन अपडाइक, तसेच चक्क हसणारा आणि अंडाकृती टोपीतला काम्यूही दिसतो!

‘लास्ट लव्ह’ या काफ्कावरील नोंदीत लेखक म्हणतो : ‘१९२३ साली काफ्का प्रेमात पडला. डोरा डायमंट नावाच्या स्त्रीच्या. ती एका कट्टर जर्मनवादी कुटुंबातून पळून आली होती. दोघेही बर्लिनमध्ये भाडय़ाने घेतलेल्या घरात राहू लागले. मात्र, तिथे काफ्काची तब्येत बिघडत गेल्याने डोरा आणि तो ऑस्ट्रियामधल्या सेनेटोरियममध्ये रवाना झाले. तिथे काफ्काचा रोग अधिकच बळावला.. अन् डोराच्या कुशीतच त्याने प्राण सोडला.’

डोराने काफ्काची सगळी हस्तलिखिते त्याच्या मृत्यूनंतरही जपून ठेवली होती. पण नाझींनी १९३३ मध्ये ती ताब्यात घेतली. अशा प्रकारच्या नोंदी पुस्तकप्रेमी मंडळींना नक्कीच आवडतील.

तसेच पुस्तकात दिलेली लेखकांची चरित्रात्मक माहिती ‘विकिपीडिया’सारखी कोरडी नाही. लेखकांचे इतर लेखकांशी असलेले संबंध, त्यांच्यावरील प्रभाव, त्यांची पार्श्वभूमी, राहणीमान, वास्तव्य यांचा प्रभाव.. असे अनेक मुद्दे त्यात येतात. उदाहरणार्थ, गोगोलची ‘डेड सोल्स’ ही कादंबरी अपूर्ण आहे हे सांगतानाच तिचा प्लॉट पुश्किनने सुचवला होता ही माहिती मिळते. रोममध्ये सहा वर्षे वास्तव्य केल्यावर आणि जगापासून स्वत:ला तोडून घेतल्यावर गोगोल भक्तिभावात रममाण झाला. परमेश्वराने आपल्याला लेखनाची देणगी दिली आहे- विशेषत: रशियन लोकांना काही तरी सांगण्यासाठीच त्याने आपल्याला पाठविले आहे, अशी गोगोलला खात्रीच होती. हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्या मनाची घडणही आपल्या ध्यानात येते.

एक नोंद कार्ल मार्क्‍सविषयी आहे. मार्क्‍सने त्याच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी एक कादंबरी लिहिली, जी त्याच्या मित्रवर्तुळात टीकेचा विषय ठरली आणि काळाच्या ओघात नष्टही झाली. पुढे मार्क्‍स अर्थशास्त्राकडे वळला आणि त्याचे ललित लेखन मागे पडले. हा सारा प्रवास सचित्रपणे चार पानांत येतो.

जेन ऑस्टिनने लिहिलेली एक कादंबरी अपूर्ण राहिलीच, पण ती पूर्ण करायचा अनेकांनी प्रयत्न केला, हे वाचून आश्चर्य वाटते. तिच्या पुतणीने आणि नंतर पुढच्या पिढीने सतत हे पुस्तक प्रकाशित करण्याचा ध्यास घेतला.

जॉन अपडाइकच्या परिचयात लेखक म्हणतो : ‘शिलिंग्टन या शहरात तो वाढला. या शहराने त्याच्या कल्पनेतल्या शहराला जन्म दिला. अपडाइकने वैयक्तिक आयुष्यातले संदर्भ उचलत कथा-कादंबऱ्या लिहिल्या. कदाचित हे एका दुबळ्या साहित्यनिर्मितीचे केंद्र ठरले असते. पण अपडाइकच्या हाती त्याचे सोने झाले.’

अशा प्रकारे लेखक आणि लेखनकलेबद्दलची समज वाढवणारा मजकूर पुस्तकभर वाचायला मिळतो. ‘बुक्स ऑन बुक्स’ म्हणजे पुस्तकांवर लिहिलेल्या पुस्तकांची संख्या जगात प्रचंड आहे. मायकेल दिर्दाचे ‘बुक बाय बुक’ असो किंवा ‘पेपर हाऊस’सारखी कादंबरी असो, इंग्रजीत पुस्तकांवरची पुस्तके मुबलक आहेत. मराठीतही गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, सतीश काळसेकर, निरंजन घाटे, निखिलेश चित्रे, नितीन रिढे यांचे लेखन अनेकांनी वाचले असेल. आता वाचनयादीत या पुस्तकाची भर पडायला हरकत नाही!

shashibooks@gmail.com

  • ‘द ग्रेटेस्ट बुक्स यू विल नेव्हर रीड’
  • लेखक : प्रो. बर्नार्ड रिचर्ड्स
  • प्रकाशक : ऑक्टोपस
  • पृष्ठे: २५५, किंमत : सुमारे १,८०० रुपये