अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिल्लीच्या जामिया, जेएनयू, गार्गी कॉलेज आदी ठिकाणचे गोळीबार/हल्ले फार अलीकडले. त्याच्या ३१ वर्ष आधी, एक जानेवारी १९८९ रोजी सफदर हाश्मी यांची हत्या ज्या प्रकारे झाली, तो प्रकारही असाच होता. कुणालातरी शत्रू मानायचं आणि त्या मानीव शत्रुपक्षापैकी जे कुणी चटकन हाती लागणारे असतील त्यांच्यावर हल्ला करून दहशत प्रस्थापित करायची. हेच सफदर हाश्मीबद्दल झालं. आता जणू दिल्लीचंच उपनगर मानल्या जाणाऱ्या गाझियाबाद भागात १९८९ मध्ये झालं. हिंसक जमाव पळूनही गेला. पोलिसांनी तक्रार दाखल करायलाही वेळ लावला. ‘हल्ला बोल’ हे पुस्तक वाचताना ताजे संदर्भ सहज आठवतात खरे, पण हे पुस्तक या संदर्भापेक्षा कितीतरी पलीकडचं आहे. एका पिढीचा, एका चळवळीचा आणि काळाचा मागोवा घेणारं आहे. हे चरित्र सफदर हाश्मीचं आहे, पण ते त्यानं रुजवलेल्या पथनाटय़ चळवळीचंही आहे (सफदर हाश्मी आज असते तर पासष्टीचे असते. पण पस्तिशीत मृत्यू झाल्यानं त्याचं वय तिथंच गोठल असं मानून ‘अरेतुरे’ करतो आहे).
पथनाटय़ करतानाच सफदर आणि चमूवर हल्ला झाला. ती घटना वाचकांसमोर उभी करतानाच, सफदरची मृत्यूशी झुंज कशी सुरू होती आणि ती कशी संपली, याचं वेगवान वर्णन पहिल्या ५० पानांत येतं. पुस्तकाच्या उप-शीर्षकात म्हटल्याप्रमाणे आधी मृत्यूचा आणि मग आयुष्याचा पट उलगडतो. तीन भागांच्या या पुस्तकातला पहिला भाग एखाद्या चित्रपटासारखा आहे. इथं लेखक सुधन्वा देशपांडे आधी स्वत:च्या, मग इतरांच्याही नजरेतून काय घडलं- कसं घडलं हे सांगत जातात. लिखाणाची ही पद्धत पुढेही कायम राहाणार असते. ही पद्धत ‘मौखिक इतिहास’ या शाखेला जवळची. पण हा इतिहास फक्त एका व्यक्तीचा नाही.. सफदर हाश्मी या पुस्तकाच्या केंद्रस्थानी असला, तरी त्यानं जे केलं त्या कामाचा, त्यामागच्या प्रेरणांचा आणि प्रेरित झालेल्या/ होणाऱ्या अनेकांचा तो इतिहास आहे.
हे अनेकजण फक्त बिनचेहऱ्याचे कार्यकर्ते नसून बादल सरकार, हबीब तन्वीर, ऋ त्विक घटक असे कलाक्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करणारेही आहेत. नाटक, चित्रपट यांसारख्या कला व्यक्तिनिष्ठ नसून समाजनिष्ठच असतात हे अंतर्यामी पटलेले हे तिघे कलावंत सफदरबद्दल किती ममत्व बाळगून होते, याचा प्रत्यय वाचकाला येतो. सफदर हा समाजनिष्ठ कलाविचाराला आणखी पुढे नेणारा होता. त्याला अभिप्रेत असलेली कला ही समाजाला थेट भिडणारी तर होतीच, पण ती समाजातून आलेली आणि समाजातल्या लोकांनाही कलावंत म्हणून घडवणारी होती! ‘मी पहिल्यांदा पथनाटय़ात गायलो तेव्हा इतका उत्साहित झालो, अॅड्रिनालिन इतकं वाढलं की उंच पट्टीतच सुरुवात केली आणि नंतर चिरकत गेलो’ हा स्वत:बद्दलचा प्रसंग सुधन्वा देशपांडे रंगवून सांगतात. पण मागचा सफदरही वाचकाला सतत दिसत असतो. हा सफदर पुढल्या अनेक पानांवर अधूनमधून सुधन्वाला गाण्याबद्दल सौम्य टोमणे मारत, त्याला ताळय़ावर आणणारा; सुधन्वा गाणार नाही तर सुरुवातीचं निवेदन त्याला करूदे, असाही विचार करणारा सफदर! घडवणारा सफदर. आणखी काही पानांवर सफदरनं पथनाटय़ या प्रकाराबद्दल केलेलं चिंतनही येतं. त्याही पुढे तिसऱ्या भागात एखाद्या उपकथानकासारखे हबीब तन्वीर येतात. दिग्दर्शकीय सूचना देताना ते कधीही ‘भावनां’च्या हिशेबात बोलायचे नाहीत, असं निरीक्षण लेखक नोंदवतो, उदाहरणं देतो.. इथवर आपण पाऊण पुस्तक वाचलेलं असतं ‘ हे विषयांतर कशासाठी?’ असा प्रश्न आता पडणार नसतो. सफदरची नाटय़शैली ही हबीब तन्वीर यांच्या शैलीवर आधारलेली कशी होती हे आपल्याला समजू लागलेलं असतं. त्याही पुढे, एखाद्या अभिनेत्याच्या भावना, त्यानं त्या भूमिकेत ‘ओतायच्या’, मग ‘अभिनयशिल्प’ साकारणार.. ही मांडणीच इथं अमान्य असून त्याऐवजी, कलावंत महत्त्वाचा नसून ज्याच्यासाठी हे सारं केलं जातं आहे तो प्रेक्षक महत्त्वाचा आहे, अशा विचारापर्यंत जाण्याचीही तयारी या पुस्तकातून घडते. अगदी अखेरीस, उपसंहारात सुधन्वा देशपांडे यांनी ‘अस्मितावादाला चिकटून राहिल्याखेरीज एखादा कलावंत कसा जगू शकतो हे सफदरकडून कळतं’ असं म्हटलं आहे, त्याचा मर्यादित अर्थ घेतला तर सफदर कसा जगन्मित्र होता वगैरे आठवेल, पण व्यापक अर्थानं ‘अस्मितावादाला न चिकटणं’ म्हणजे कलावंत म्हणून नायकत्वाची अस्मिता अमान्य करणं. हे कठीण आहे. ते सफदर करत होता. तसं जगत होता.
या उपोद्घातापासून मागे येऊन पुस्तकात भेटलेला सफदर कसा होता, याचा विचार करणं अवघड नाही. ‘अस्मितावाद नाकारणारा’ सफदर सगळय़ांचा आवडता, सगळय़ांना एकत्र करणारा, ‘घडवणारा’, म्होरक्या किंवा अग्रदूत होता हे खरं. पण याचा अर्थ असा की अंगभूत गुणांचं स्तोम माजवणारे, दुसऱ्याला खाली लोटून स्वत: वर चढणारे हिशेबी लोकदेखील सर्रास स्वत:ला ‘कलावंत’ म्हणवतात तसा सफदर नव्हता. खिल्ली उडवण्यात वाकबगार होता सफदर, पण समोरच्याला त्यातली गंमत कळली नाही हे लक्षात आल्यावर ‘अरे मी खिल्लीच उडवत होतो’ असं सांगणाराही होता. ‘काय हे .. पैशासाठी अंतर्वस्त्रांच्या जाहिरातींची गाणी (जिंगल) लिहितोस तू? काहीही काय? ’ असं सफदर बोलला म्हणून एकानं जिंगलवर पैसे कमावणंच सोडलं. काम शोधत फिरू लागला. तेव्हा सफदरनं सरळपणे ‘मनावर घेऊ नको ’ असं सांगून पुन्हा जिंगल-व्यवसायात आणलं. किंवा, पोरसवदा सुधन्वाला सफदरनं ‘बूट महागडे दिसतात’ असं चिडवल्यावर ‘काकांचे आहेत ते’ असं कानकोंडं उत्तर सुधन्वा देतो, मग काकांकडे बुटांची खाणच कशी असेल अशी टवाळी सुरू होते! नाटकवाले म्हणून जे तरुणपणी, मित्रांच्यात वावरले असतील, त्यांना ही टवाळी, ही खिल्ली नवी नाही. पण स्पर्धेत कुठेतरी ते दिवस संपतात. इथं सफदरच्या शब्दकोशात सहकाऱ्यांशी स्पर्धा हा शब्दच नाही. पथनाटय़ चळवळीसाठी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत कुणालाही सहकार्यच करायला सफदर कायम तयार. ‘जन नाटय़ मंडली’ (जनम) हे नाव कुणालाही- कोणत्याही भाषेत पथनाटय़ं करणाऱ्या गटाला- कोणतीही भाषा परकी न मानता वापरू देणं, ही ‘अस्मितावादी नसण्या’ची खूणगाठच.
त्यामुळेच सफदर पोटापाण्याचा एखादा उद्योग म्हणून दिल्लीतल्या ‘पश्चिम बंगाल सांस्कृतिक केंद्रा’त नोकरी करू लागला, तेव्हा अल्पावधीत बांग्ला भाषा शिकला. इतका की, ‘हा मूळचा बंगाली का?’ असा प्रश्न पडावा. सफदरची सहचरी माला ऊर्फ मलयश्री रॉय हीदेखील दिल्लीवासी, पण मूळची बंगाली. सफदर साधारण प्राथमिक शाळेपासून दिल्लीकर. या दोघांनी नोंदणीविवाह केला, त्यानंतर ‘मलयश्री हाश्मी’ आणि ‘सफदर रॉय’ अशी नावं घेण्याचं ठरवलं होतं. सरकारी यंत्रणांनी तसा नियम नसल्याचं सांगत ते हाणून पाडलं. हाही किस्सा तसा अवांतर. पण सफदरचा दृष्टिकोन त्यातून कळतो.
अशा अनेक किश्श्यांमधून सुधन्वा देशपांडे आपल्याला सफदपर्यंत नेतात. या सर्व किश्श्यांच्या केंद्रस्थानी सफदर आहे, पण हे प्रसंग ज्यांच्या आयुष्यांत घडले, त्या सर्वाची ओळखही या निमित्तानं पुस्तकाच्या पानोपानी होत राहाते. जनवादी महिला संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यां अशी ओळख असलेल्या एका स्त्रीचं कथन यात आहे.. ही स्त्रीवादी जरूर, पण शाळेतून आल्यावर भूक-भूक करणाऱ्या मुलाकडे रोजच्याप्रमाणे पाहू की आजच्या दिवस हे पथनाटय़ निव्वळ कुतूहलापुरतं तरी पाहू असा प्रश्न तिला पडला आहे. ही स्त्री म्हणजे कालिंदी देशपांडे. तो मुलगा सुधन्वा. ‘स्वत:सकट सारे आणि साऱ्यांसकट स्वत:’ ही सफदरशैली इथं कथनात आहे ती अशी.
या पुस्तकात, कम्युनिस्ट असण्याचा उल्लेख अपरिहार्यच आहे. सफदर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा. त्याचे वडीलही त्याच पक्षाचे. कधी सफदरला नक्षलवादाचं आकर्षण नसेल का वाटलं, याचाही शोध लेखक घेतो. नाही वाटलं ते का, हेही सांगतो. लेखक स्वत: कम्युनिस्ट घरातला. म्हणजे पुस्तक गोतावळय़ातलंच की! .. पण अशी टिप्पणी करताना, या गोतावळय़ातून तरी अशी पुस्तकं किती लिहिली गेली, याचाही ताळा करून पाहावा लागेल. थोडीफार आहेत ती आत्मचरित्रं, पण त्यांतही इतरांचे उल्लेख आहेत. ‘प्रिय अम्मीस’ सारखं एखादं पुस्तक आहे. पण इतिहासाची मूळ साधनं उपलब्ध असताना लिहिलं गेलेलं बृहदकथन म्हणावं, अशी पुस्तकं कमीच. सगळे साम्यवादी केवळ बोजड लिहायच्याच मागे लागल्यामुळे झालं असेल का असं? प्रश्न वाह्यात आहे. पण मुद्दा हा की हे पुस्तक तसं नाही. त्यात वाचकाला भिडणारं भरपूर काही आहेच, शिवाय वाचकाला त्याच्या पद्धतीनं पुस्तक वाचण्याची मुभाही आहे.
या पुस्तकाचं फलित हे की, पथनाटय़ हा जसा नवा ‘फॉर्म’ होता (कलाप्रकार न म्हणता ‘उपप्रकार’ म्हणा, पण नवा होता!) तसे नवे प्रकार शोधण्याची गरज नेहमीच असते. एखादा नवा आविष्कार सापडेपर्यंत उपलब्ध प्रकारांमध्ये प्रयोग करत राहणं आवश्यकच असतं. हे सफदरनंही लक्षात ठेवलं होतं आणि प्रेमचंदांपासून अनेकांचा आधार त्यानं नाटक उभारताना घेतला होता. दुसरीकडे, ‘दूरदर्शन’ हेच तेव्हा उपलब्ध असलेलं एकमेव चित्रवाणी माध्यम असलं, तरी ते हाताळण्याचा चंग सफदरनं बांधला होता. ‘मशीन’सारखं त्याचं पथनाटय़ हे पूर्णत: ‘दृश्यातून घडणारं नाटय़’ होतं. असे प्रयोग करण्याची प्रेरणा प्रत्येक पिढी असतेच. नवतेची आस असतेच, पण या नवतेची परंपरा (कॅनन) काय, हे अशा पुस्तकांतून उमगतं. त्या अर्थानं हे पुस्तक, पथनाटय़ आणि सामाजिक आशयाच्या कलेचं चारित्र्य स्पष्ट करण्यासाठी उपयोगी पडतं.
‘हल्ला बोल- द डेथ अँड लाइफ ऑफ सफदर हाश्मी’
लेखक : सुधन्वा देशपांडे
प्रकाशक : लेफ्टवर्ड बुक्स
पृष्ठे: २६४, किंमत :३५० रुपये