|| डॉ. अनिरुद्ध फडके
‘हृदय’ या अवयवाच्या रचना-कार्याबद्दलचे एकेकाळचे मानवी अज्ञान ते पुढे विविध हृदयरोग, त्यांवरील नवनवीन उपचारपद्धती, औषधे, शस्त्रक्रिया यांच्या शोधांपर्यंत- वैद्यकशास्त्राने हृदयाचे गूढ कसे उकलले, याचा ऐतिहासिक वेध घेणाऱ्या पुस्तकाची ही ओळख..
Heart has its own reasons of which reason knows nothing. – Blaise Pascal
प्रसिद्ध गणिती व तत्त्वज्ञ ब्लेझ पास्कल याचे वरील उद्गार हृदयरोगशास्त्राच्या संदर्भातील नसले, तरी त्यातून सतराव्या शतकात हृदयाची रचना व हृदयक्रिया याबद्दल असलेल्या अज्ञानाची कल्पना करता येते. प्रेम, भीती, राग यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. ते माणसाला जाणवतात म्हणूनच हृदयाला भावभावनांचे केंद्र-उगमस्थान मानले जात असे. हृदयाला कप्पे असतात आणि एखाद्या अणकुचीदार शस्त्राने हृदयाला इजा झाल्यास तात्काळ मृत्यू उद्भवतो हेही सर्वाना ठाऊक होते. गेलन या सुप्रसिद्ध रोमन वैद्यकतज्ज्ञाने लिहिलेला ग्रंथ तेव्हा वैद्यकशास्त्रात प्रमाण मानला जाई. गेलनच्या मते, रक्त हे यकृतात तयार होत असते. तिथून ते हृदयाच्या उजव्या बाजूच्या कप्प्यात जाते. उजव्या व डाव्या कप्प्यांच्या मधल्या छोटय़ा छिद्रांतून ते हृदयाच्या डाव्या कप्प्यात जाते आणि तिथून शरीरभर पोहोचते. हृदयाच्या दर ठोक्याबरोबर सर्वत्र जाणारे रक्त शरीरातले अवयव पूर्णपणे वापरतात आणि रक्त पुन्हा हृदयाकडे येत नाही. हृदयाची रचना व कार्य याबाबतच्या या संकल्पना पूर्णपणे चुकीच्या असल्याचे आज आपण जाणतो. हृदयाकडे अशुद्ध रक्त आल्यानंतर ते फुप्फुसांमध्ये जाते व तिथे रक्तशुद्धीकरण होऊन ते हृदयाच्या डाव्या बाजूला येणे ही प्रक्रिया वैद्यकशास्त्राला पूर्णपणे समजण्यास सतरावे शतक उजाडावे लागले.
नंतरच्या काळात, विशेषत: गेल्या शंभर वर्षांत हृदयाच्या कार्याबद्दलच नव्हे, तर विविध प्रकारचे हृदयरोग व हृदयरोगावर उपचार करण्यासाठी नवनवीन औषधे, अँजिओप्लास्टी, हृदयशस्त्रक्रिया यांचा शोध लागला. ‘हार्ट : अ हिस्टरी’ या डॉ. संदीप जौहर यांच्या पुस्तकात हृदयाचे गूढ वैद्यकशास्त्राने कसे उलगडले, त्याची कहाणी आहे. डॉ. जौहर हे अमेरिकेतले निष्णात हृदयरोगतज्ज्ञ आहेत. हृदयरोगशास्त्राची वाटचाल सांगताना ते त्यात आपले वैयक्तिक अनुभवही लिहितात. शाळेत असताना बेडकाच्या हृदयावर केलेला प्रयोग, वैद्यकीय विद्यार्थी असताना हृदयाचे विच्छेदन करतानाचे अनुभव, हृदयशस्त्रक्रिया पहिल्यांदा पाहतानाचे अनुभव यांची गुंफण करताना ते आपल्या आजोबांच्या हृदयविकाराने झालेल्या मृत्यूबाबतही तर्कसंगत विचार मांडतात.
गेलन या रोमन वैद्यकतज्ज्ञाने मांडलेल्या चुकीच्या संकल्पना पुढच्या काळात अनेक संशोधकांच्या कार्यामुळे मोडीत निघाल्या. इ. स. १२४२ मध्ये इब्न-अल-नफीस या अरब संशोधकाने हृदयाच्या डाव्या आणि उजव्या जवनिकेत छिद्रे नसल्याचे प्रतिपादन केले. हे निष्कर्ष अरेबिक भाषेत असल्याने युरोपमध्ये पोहोचले नाहीत. पुढे लिओनार्दो द विंची (इ. स. १५११) व व्हेसालियस (इ. स. १५४३) यांनी शवविच्छेदन करून हृदयाचे स्नायू, त्यातल्या झडपा, कप्पे यांची रेखाटने केली. रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेत अशुद्ध रक्त हृदयाकडून फुप्फुसामध्ये जाते आणि पुन्हा हृदयाच्या डाव्या बाजूस येते हा विचार सर्वप्रथम मांडला मायकेल सव्र्हेटस या अभ्यासकाने. हा विचार मांडणारा निबंध सव्र्हेटसच्या धर्मविषयक इतर लिखाणाबरोबरच्या संग्रहातच प्रसिद्ध झाला. त्याचे धर्मविचार तत्कालीन चर्च व धर्मगुरूंना पाखंडी वाटले. १५५३ साली सव्र्हेटसला त्याच्या ग्रंथाबरोबरच जिवंत जाळण्यात आले. यानंतर सुमारे पाऊणशे वर्षांनी- १६१५ मध्ये विल्यम हार्वे या इंग्रज वैद्यकतज्ज्ञाने हृदयक्रिया आणि रक्ताभिसरणाची संकल्पना विस्ताराने मांडली. परंतु या संशोधनाचे निष्कर्ष प्रस्थापित विचारांच्या विरोधात असल्याने हार्वेने पुढची १३ वर्षे ते प्रसिद्ध केले नाहीत.
हृदयाची रचना, कार्यप्रणाली जरी उलगडली असली तरी हृदयाचे रोग कशामुळे होतात? त्यावर काय उपाययोजना करता येईल? हृदयरोग टाळता येईल का? हृदयरोगामुळे मोठय़ा प्रमाणावर होणारी प्राणहानी कमी कशी करता येईल? या प्रश्नांची उत्तरे विसाव्या शतकातील वैद्यकशास्त्राने झपाटय़ाने शोधून काढली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला, की पुरेसा रक्तपुरवठा हृदयाला होऊ शकत नाही. मग रुग्णाच्या छातीत दुखू लागते. कधी कधी या रक्तवाहिनीत अचानक रक्ताची गुठळी होते. रक्तपुरवठा पूर्णपणे थांबल्यास हृदयविकाराचा झटका येतो. ही घटना इतक्या वेगाने घडते, की काही मिनिटांत हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होतो. अचानक मृत्यू आलेल्या रुग्णाच्या शवविच्छेदनानंतर रक्तवाहिन्यांचे अरुंद होणे, रक्ताची गुठळी होणे या गोष्टी स्पष्ट झाल्या.
वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षांपासूनच हृदयातील रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूस मेदपदार्थ साचू लागल्याचेही लक्षात येऊ लागले. आता गरज होती ती, हृदयरोग कुणाला व्हायची शक्यता सर्वाधिक ते निश्चित करण्याची व त्यासाठी जीवनशैलीचा अभ्यास मोठय़ा प्रमाणावर करण्याची. हे आव्हान पेलण्यासाठी ‘फ्रेमिंगहॅम स्टडी’ हा प्रकल्प दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच अमेरिकेत हाती घेण्यात आला. हृदयरोगामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या अमेरिकेत झपाटय़ाने वाढत होती. राष्ट्राध्यक्ष रुझवेल्टही हृदयविकाराने त्रस्त होते. रुझवेल्ट यांचा मृत्यू जरी मेंदूतील रक्तस्रावाने झाला असला, तरीही अमेरिकी जनता व सरकार हृदयविकारावर मात करण्यासाठी उत्सुक होते. १९४८ साली फ्रेमिंगहॅम या २४,००० लोकसंख्येच्या गावात सुरू झालेले हे संशोधन गेली कित्येक दशके सुरू आहे. १९५७ साली रक्तदाबामुळे हृदयरोगाचा धोका चारपटीने वाढत असल्याचे सिद्ध झाले. १९६० साली धूम्रपानामुळे हृदयरोगाचा धोका वाढण्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आला. कोलेस्टेरॉल हा रक्तातील मेदपदार्थ व हृदयरोग यांचा संबंध जोडण्यात आला. १९९८ साली फ्रेमिंगहॅमच्या संशोधकांनी एकेका व्यक्तीसाठी पुढील दशकात होणाऱ्या हृदयविकाराचा संभाव्य धोका जाणून घेण्यासाठी ‘फ्रेमिंगहॅम रिस्क स्कोअर’ प्रसिद्ध केला.
हृदयात एखादी नळी सरकवून हृदयाच्या कप्प्यातील, महारोहिणीतील दाब मोजणे व प्रत्यक्ष हृदयाच्या रक्तवाहिनीत असलेला अडथळा एक्स-रे फिल्मवर चित्रित करणे, हे होते हृदयविकारावरील उपचारातले पुढले टप्पे! रक्तवाहिनीतला अडथळा एक फुगा फुगवून नाहीसा करणे (अँजिओप्लास्टी) आणि पुन्हा अडथळा उद्भवू नये म्हणून त्यात एक स्प्रिंग (स्टेंट) बसवणे हे वैद्यकशास्त्राचे सर्वोच्च यश. लाखो हृदयरुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या वा आयुष्यमान वाढवणाऱ्या या तंत्राची सुरुवात मोठय़ा गमतीशीर प्रसंगाने झाली..
वर्नर फॉर्समन हा तरुण वैद्यक १९२९ साली जर्मनीतल्या एका रुग्णालयात काम करत होता. क्लॉड बर्नाड या सुप्रसिद्ध फ्रेंच शास्त्रज्ञाने घोडय़ांच्या हृदयात छोटीशी नळी घालून तिथल्या रक्तदाबाची नोंद केल्याचे वर्नरला ठाऊक होते. मानवी शरीरातही असा प्रयोग करून पाहण्याची परवानगी त्याने आपल्या विभागप्रमुखांकडे मागितली. ही मागणी थेट फेटाळण्यात आली. यापूर्वी जिवंत व्यक्तीच्या हृदयाशी असा खेळ कुणी केला नव्हता. त्यात प्रचंड धोका असण्याची खात्री बहुतेक वैद्यकांना होती. वर्नरने एका परिचारिकेशी गोड बोलून तिच्याकडे असलेल्या किल्लीने हृदयरोग-प्रयोगशाळा उघडली. आत शिरताच त्याने परिचारिकेला एका टेबलाला बांधून ठेवले. स्वत:च्या डाव्या हातावर छोटा छेद घेऊन एका रक्तवाहिनीतून एक छोटीशी नळी आत सरकवली. मग त्यात एक विशिष्ट इंजेक्शन देऊन स्वत:च्याच हृदयाचा एक्स-रे काढला! वर्नर फॉर्समनने या प्रयोगावर आधारित शोधनिबंध १९२९ साली प्रसिद्ध केला तेव्हा खळबळ माजली. एका प्रख्यात सर्जनने तर, ‘‘तू इस्पितळात नव्हे, तर सर्कसमध्ये काम करण्याच्या लायकीचा आहेस!’’ असे वर्नरला सुनावले. पुढल्या दोन दशकांमध्ये इतर अनेक संशोधकांनी मात्र या तंत्रात आणखी सुधारणा केली. १९५६ सालच्या वैद्यकीय नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या यादीत फॉर्समनचे नाव झळकले!
१९५८ साली अमेरिकेतल्या क्लिव्हलॅण्डमधल्या डॉ. मेसन सोन्स यांनी सर्वप्रथम हृदयाच्या रक्तवाहिनीत नळी सरकवून आज ज्याला ‘अँजिओग्राफी’ म्हणतात त्याची मुहूर्तमेढ रोवली. १९६० साली हृदयाचे ठोके नियंत्रित करणारा ‘पेस मेकर’ अस्तित्वात आला. १९६१ साली हृदयरोग्यांसाठी ‘अतिदक्षता विभाग’ सर्वप्रथम सुरू करण्यात आला. आज सर्रास दिसणारा ‘कार्डियोग्राम’ (ईसीजी)चा मॉनिटर तेव्हापासून २४ तास रुग्णाच्या स्थितीवर नजर ठेवण्यासाठी वापरला जाऊ लागला. १९६३ ते १९७४ दरम्यान रक्तवाहिनीचा व्यास वाढवण्याचे ‘अँजिओप्लास्टी’ हे तंत्र विकसित झाले.
हृदयाभोवती जसे गूढ वलय शेकडो वर्षे होते, तशीच हृदयाबद्दलची एक प्रकारची भीती वैद्यकतज्ज्ञांच्या मनात होती. जन्मापासून अखंड पंपासारखा काम करणारा हा अवयव. हृदयक्रिया थांबल्यावर काही मिनिटांतच मृत्यू होऊ शकतो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस शरीरातील बहुतेक अवयवांवरच्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्या, तरी हृदयावर शस्त्रक्रिया कल्पनातीत होती. धडधडत्या हृदयावर टाके कसे घालणार? हृदयाला एखादे छिद्र पडताच अफाट रक्तस्राव होणार हे स्पष्ट असताना कोणीही अशी शस्त्रक्रिया कशी करू शकेल? हृदयक्रिया शस्त्रक्रियेपुरती थांबवली तर मेंदू व इतर अवयव कसे तग धरू शकतील? मग पुन्हा हृदयक्रिया सुरू करता येईल का? या सगळ्या बिकट प्रश्नांमुळेच इ. स. १८७५ साली युरोपातला त्या वेळचा सर्वश्रेष्ठ शल्यचिकित्सक थिओडोर बिलरोथ म्हणाला होता, ‘हृदयावरची शस्त्रक्रिया म्हणजे शस्त्रक्रियेतला वेश्याव्यवसाय असल्यासारखी अभद्र गुन्हेगारी कल्पना आहे.’
अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची वैद्यकशास्त्राची अथक परंपरा आहे. १८९३ साली छातीत सुरा खुपसलेल्या एका रुग्णावर पहिली शस्त्रक्रिया झाली. हृदयशस्त्रक्रिया प्रत्यक्षात अतिशय सुरक्षित करताना वैद्यकशास्त्राने सर्व अडथळे एकेक करून पार केले. विविध अवयवांना रक्तपुरवठा कृत्रिमरीत्या सुरू ठेवून हृदय काही काळ बंद करून पुन्हा चालू करता येणाऱ्या ‘ओपन हार्ट सर्जरी’चा उगम झाला. हृदयातील रक्तवाहिनीतील अडथळे दूर करणाऱ्या ‘बायपास सर्जरी’चा लाभ लक्षावधी रुग्णांनी घेतला. हृदयातल्या झडपा बदलण्याची शस्त्रक्रिया जगभर होऊ लागली. हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया १९६७ साली सर्वप्रथम यशस्वी झाली. १९८२ साली कृत्रिम हृदय वापरण्यास प्रारंभ झाला. अवघ्या तीन दशकांत वैद्यकशास्त्राने अचाट प्रगती साधत हृदयरोगावरील उपचारपद्धतीत क्रांतिकारी बदल घडवून आणले.
डॉ. संदीप जौहर यांनी हृदयरोगाबद्दल जसे शास्त्रीय दृष्टिकोनातून विवरण केले आहे; तसेच त्यांनी मानवी भावना व हृदयाचे कार्य, हृदयविकार यासंबंधीही विवेचन केले आहे. हृदयविकार व भावनिक कल्लोळ यांच्या परस्पर संबंधांबद्दल सुरू असलेल्या संशोधनाबाबतही ते लिहितात. हे पुस्तक वाचनीय असले, तरी त्यातील काही त्रुटी मात्र खटकतात. एक म्हणजे, ‘इतिहास’ असे म्हटल्यास त्यात कितीतरी ऐतिहासिक टप्प्यांचा उल्लेखही दिसत नाही वा ओझरता दिसतो. उदाहरणार्थ, ईसीजीचा (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) शोध, बायपास शस्त्रक्रियेच्या विकासातील टप्पे, रक्तवाहिन्यांमधली गुठळी विरघळून टाकणारी ‘थ्रॉम्बोलिसिस’ ही उपचारपद्धती, रक्तवाहिन्यांत गुठळी होऊ नये म्हणून दिल्या जाणाऱ्या ‘अॅस्पिरिन’ या औषधाची कहाणी आणि कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या औषधांचा विकास. कदाचित खूपच तांत्रिक उल्लेख आले तर सर्वसामान्य वाचकाला रस वाटणार नाही, म्हणून ते टाळले असावेत.
वैद्यकशास्त्राची १९५० ते २००० सालातली प्रगती पाहता एक प्रश्न सतत मनाला भेडसावत राहतो. या संशोधकांनी जे धाडसी प्रयोग केले ते आजच्या नैतिक व कायदेविषयक चौकटीत बसले असते का? नक्कीच नाही. शेकडो प्राण्यांवर प्रयोग झाले, धोकादायक शस्त्रक्रिया पहिल्यांदाच मानवी रुग्णांवर केल्या गेल्या. नव्या उपचारपद्धती विकसित होताना हजारो रुग्णांचे प्राण गेले. आजच्या रुग्णांनी जसे या संशोधकांच्या ऋणात राहायला हवे तसेच त्या वेळच्या रुग्णांच्या व प्राण्यांच्याही!
- ‘हार्ट : अ हिस्टरी’
- लेखक : डॉ. संदीप जौहर
- प्रकाशक : पेंग्विन-व्हायकिंग
- पृष्ठे : २६९, किंमत : ५९९ रुपये
ayphadke@gmail.com