निखिल बेल्लारीकर
भारतातल्या, किंबहुना आशियातल्या पहिल्या वृत्तपत्राची आणि त्याच्या अवलिया संस्थापक-पत्रकाराची कहाणी सांगणारे हे पुस्तक माध्यमस्वातंत्र्याच्या दडपणुकीपासून पहिले वृत्तपत्र आणि त्याचा कर्ताही कसे सुटले नाहीत, हेही दाखवून देते..
माध्यम-संशोधक अॅण्ड्रय़ू ओटिस यांनी भारतातील पहिल्या वृत्तपत्राची कहाणी लिहिलेली आहे. जेम्स ऑगस्टस हिकी नामक आयरिश नागरिकाने कोलकात्यात (तेव्हा- कलकत्ता) १७८० साली ‘हिकीज् बेंगॉल गॅझेट’ नामक वृत्तपत्र सुरू केले. अवघ्या दोन वर्षांतच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि चर्च या दोन महत्त्वाच्या संस्थांमधील भ्रष्टाचार उघडकीला आणून त्याने अनेक उच्चपदस्थांची इतकी गोची केली, की त्याची अनेक प्रकारे गळचेपी करण्यात आली. वृत्तपत्र बंद पाडून, त्याला जबर दंड ठोठावून कैक वर्षे तुरुंगात खितपत ठेवले. हा इतिहास ओटिस यांनी तब्बल पाच वर्षे भारत, ब्रिटन आणि जर्मनी या तीन देशांतील अनेक पुराभिलेखागारे पालथी घालून साकार केला आहे. भारतातल्या पत्रकारितेबद्दल लिहिताना हिकीचा उल्लेख आधी ओझरता केला जायचा; पण या पुस्तकामुळे त्याला न्याय मिळाला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पुस्तकाची प्रस्तावनाही वाचनीय आहे. विशेषत: भारतातील पुराभिलेखागारांबद्दलची माहिती दुर्मीळ व महत्त्वाची आहे.
हिकी हा एक अवलिया आणि खटपटय़ा होता. आर्यलडमध्ये इ.स. १७३०च्या सुमारास त्याचा जन्म झाला. कधी मुद्रक, कधी वकिलाचा मदतनीस कारकून, कधी खलाशी, तर कधी शल्यचिकित्सकाचा मदतनीस अशा अक्षरश: चिक्कार नोकऱ्या केल्या. त्या सर्वात मनासारखी प्राप्ती न झाल्यामुळे नशीब काढण्यासाठी अनेक युरोपीयांप्रमाणे त्याने शेवटी आपला मोर्चा भारताकडे वळवला. युरोपहून मुंबई, तिथून श्रीलंका आणि मग बंगाल असा प्रवास करत तो १७७३ सालच्या आसपास कोलकात्याला पोहोचला. काही काळाने त्याने काही पैसे कर्जाऊ घेऊन कोलकाता ते चेन्नई (तेव्हा- मद्रास) यांदरम्यान व्यापार करण्यासाठी एक छोटे जहाज विकत घेतले. मात्र दोनेक वर्षांनी व्यापारात तोटा आल्यानंतर देणेकऱ्यांनी तगादा लावला. कर्ज एकरकमी फेडण्यास अक्षम असल्याने ते फिटेपर्यंत त्याला तुरुंगात राहावे लागले.
१७७६ साली हिकी तुरुंगात गेला; परंतु जाण्याआधी तोवर जमवलेले २००० रुपये त्याने गुप्तपणे एका मित्राला दिले. त्या पैशाने तुरुंगातच एक छापखाना विकत घेऊन तिथून छपाईची अनेक कामे तो करू लागला. दोनेक वर्षांनी न्यायालयात त्याची सुनावणी होऊन कर्जमाफीसोबतच निर्दोष मुक्तता करण्यात आली. वृत्तपत्र काढण्याआधीचा हिकीचा हा स्तिमित करणारा प्रवास पुस्तकात तपशीलवारपणे आलेला आहे. त्यातून तत्कालीन कोलकाता आणि हिकी हे रसायन काय होते, याची झलक मिळते.
मुक्ततेनंतर हिकीला काही काळाने ईस्ट इंडिया कंपनीतर्फे एक मोठे कंत्राट मिळाले. कंपनीच्या वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक अतिभव्य नियमावली तेव्हा तयार करण्यात आली होती. जुनी नियमावली कैक ठिकाणी अस्पष्ट आणि परस्परविरोधीही असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन अनेक ब्रिटिश अधिकारी भ्रष्टाचार करीत. नव्या नियमावलीमुळे या सर्वाना आळा बसणार होता. कंपनीचा मुख्य कमांडर सर आयर कूट याच्याशी बोलून हिकी नियमावलीच्या छपाईची अंदाजे किंमत सादर करणार, एवढय़ात कूटने कोलकाता सोडले. यादरम्यान गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्सच्या दोघा मित्रांनीही एक छापखाना सुरू केला होता. कंपनीसंबंधी छपाईची कैक कामे त्यांना मिळू लागली. याशिवाय नवीन नियमावलीमुळे भ्रष्टाचाराला कमी वाव राहणार असल्यामुळे अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीच हिकीच्या कामात अनेक अडथळे आणायला सुरुवात केली. काही महिन्यांनंतर निम्म्यापेक्षा जास्त पाने छापूनही कंपनीचा थंडा प्रतिसाद पाहून हिकी चिडला व ते काम थांबवून त्याऐवजी स्वत:चे वृत्तपत्र काढण्याचा निर्णय त्याने घेतला. तत्कालीन युरोपीय समाजात वृत्तपत्रांना महत्त्वाचे स्थान असल्यामुळे याद्वारे त्याला पैशांसोबतच लोकांवर प्रभावही पाडता येणार होता. हा घटनाक्रम पुस्तकाच्या पहिल्या भागात येतो.
‘बेंगॉल गॅझेट’ची सुरुवात..
हिकीचे वृत्तपत्र १७८० साली सुरू झाले. हे वृत्तपत्र दर शनिवारी प्रकाशित व्हायचे अन् एका प्रतीची किंमत एक रुपया होती. त्याआधीही कोलकात्यात १७६८ साली विलियम बोल्ट्स या कंपनीतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या बडतर्फीनंतर एक वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कंपनीतील अंतर्गत भानगडी बाहेर येण्याच्या भीतीने तो हाणून पाडण्यात आला. सामान्य युरोपीयांना ‘ओपन टु ऑल पार्टीज्, बट इन्फ्ल्युअन्सड् बाय नन’ अशा जाहिरातीमुळे त्याबद्दल उत्सुकता होती. वृत्तपत्रातील हिकीचे लेखन, त्याद्वारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे दिसून येणारे अनेक पैलू हा या पुस्तकाचा गाभा आहे. पुस्तकाचा दुसरा आणि सर्वात मोठा भाग याने व्यापलेला आहे.
वृत्तपत्रातून हिकीने रस्त्यांची डागडुजी, सांडपाण्याची व्यवस्था, समाजातील स्त्रियांचे स्थान अशा अनेकविध विषयांना वाचा फोडून सर्वसामान्य जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. अशातच कोलकात्यात एक खूप मोठी आग लागून १५ हजारच्या आसपास झोपडय़ा आणि छोटी घरे भस्मसात झाल्यामुळे पुनर्रचनेची गरज भासू लागली. त्याकरिता जनतेवर १४.७ टक्के कर बसवण्यात आला. सुरुवातीला याचे समर्थन करूनही, जनतेला विश्वासात न घेता हा इतका मोठा कर एकदम लादणे त्याला आवडले नाही. याच सुमारास पहिले इंग्रज-मराठा युद्ध व हैदर अलीसोबतच्या पोल्लिलूरच्या लढाईत कंपनीचे खूप नुकसान झाले. त्यामुळे इंग्रजांच्या लष्करी सर्वश्रेष्ठतेवरचा हिकीचा विश्वास उडून तो युद्धाच्या मानवी पैलूंची, त्यातल्या दु:खाची चर्चा करू लागला. युद्धाचे दुष्परिणाम, धान्यांच्या वाढलेल्या किमती, दुष्काळ, आदी अनेक पैलूंवर त्याने लिखाण केले. त्याच्या सर्वदूर प्रसिद्धीमुळे इंग्लंड-अमेरिकेमधीलही अनेक वृत्तपत्रे भारतातील माहितीचा प्रमुख स्रोत म्हणून ‘बेंगॉल गॅझेट’चा वापर करू लागली, हा महत्त्वाचा दुवाही हे पुस्तक अधोरेखित करते.
त्याच सुमारास कोलकात्यात ‘इंडिया गॅझेट’ नामक एक वृत्तपत्र सुरू झाले. ‘बेंगॉल गॅझेट’ हे सर्वसामान्यांचा आवाज उठवणारे वृत्तपत्र होते, तर ‘इंडिया गॅझेट’मध्ये उच्चभ्रू आणि शासनाची तळी उचलून धरण्यात येत असे. ब्रिटिश लोक भारतीयांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत, हा सूर तिथे कायम आळवण्यात येत असे. हळूहळू शासनाच्या जाहिराती ‘बेंगॉल गॅझेट’ऐवजी ‘इंडिया गॅझेट’मध्ये छापून येऊ लागल्या. हिकीवरही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याची अप्रत्यक्षपणे टीका होऊ लागली. त्याला उत्तर म्हणून हिकीने ‘मी पत्रकार का झालो?’ अशा शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्यातच व्यापार खात्याच्या प्रमुखावर त्याने लाच देऊ केल्याबद्दल कडक टीका केली. यामुळे त्यावर हेस्टिंग्जची इतराजी होऊन त्याने हिकीला कंपनीच्या पोस्टाच्या वापरास बंदी घातली. प्रत्युत्तरादाखल हिकीने २० हरकाऱ्यांना सेवेत दाखल करून घेतले आणि त्यांच्याद्वारे वृत्तपत्र वितरण कायम ठेवले. त्याचे वर्गणीदारही या काळात वाढले.
हिकी आता सरकारवर पूर्वीपेक्षा तीक्ष्ण नजर ठेवून होता. त्याने काही सरकारी कंत्राटांमधील भ्रष्टाचाराचे अक्राळविक्राळ स्वरूप उघड केले. कंपनीच्या सैनिकांना पुरवले जाणारे अन्न आणि ओझेवाहू बैल यांसाठीच्या कंत्राटाची किंमत चार लाखांपासून हेस्टिंग्जने दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली. याखेरीज बर्दमान जिल्ह्य़ात नदीकाठी बंधारे बांधण्याच्या पूलबंदी कंत्राटाची किंमत २५ हजारांवरून ९० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. शिवाय एलायजा इम्पी याची सदर दिवाणी अदालतच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक हा सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्यावरचा मोठाच घाला होता. अशा मनमानी नेमणुकांचाही समाचार घेतानाच हिकीने इशारा दिला की- ‘लोकांना जर हे सरकार आपले प्रतिनिधित्व करत नाही असे वाटल्यास ते उठाव केल्याशिवाय राहणार नाहीत.’ या शह-काटशहांच्या राजकारणाबद्दल वाचताना आधुनिक काळाबद्दलच वाचतो आहोत असे वाटणे, हे या पुस्तकाचे एक वैशिष्टय़ आहे.
त्यादरम्यान कोलकात्याहून चेन्नईला जाताना कर्नल पीअर्सच्या सैन्याला नागपूरकर भोसल्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या सैन्यातील शिपायांच्या अनेक तक्रारींना त्याने वाचा फोडली. त्यातच अनेक सैनिक पीअर्सला सोडून पळून गेले. हिकीच्या अफवांवर लक्ष देऊ नये अशा अर्थाचे पत्र पीअर्सने हेस्टिंग्सला पाठवले. या प्रकरणाबद्दल लिहिताना हिकीने हेस्टिंग्सला उद्देशून हुकूमशहा, मुघल असे शब्द वापरून- ‘सततच्या युद्धांमुळे हेस्टिंग्जची लैंगिक क्षमता नष्ट झालेली आहे’ असा अश्लाघ्य आरोपही केला. कंपनीच्या शिपायांनी हेस्टिंग्जच्या साम्राज्यवादाविरुद्ध उठाव करावा, असे सुचवणारे एक पत्रही त्याने छापले. उपरोध, बोचरा विनोद, जनसामान्यांबद्दलची कळकळ आणि सत्तेलाही शहाणपणा शिकवण्याचे धारिष्टय़ ही त्याची मुख्य अस्त्रे होती.
लवकरच हिकीने चर्चमधील भ्रष्टाचाराकडेही वक्रदृष्टी वळवली. जॉन झाकारिया कीरनॅण्डर हा तत्कालीन कोलकात्यातील एक प्रतिष्ठित पाद्री होता. मूळचा स्वीडनचा असलेला कीरनॅण्डर १७४० च्या आसपास भारतात प्रथम तमिळनाडूमधील कडलूर इथे आला. पुढे तब्बल १७ वर्षे तो तिथेच राहून १७५७ मध्ये कोलकात्यात आला. तत्कालीन गव्हर्नर जनरल रॉबर्ट क्लाइव्हने कॅथलिक चर्चमधील पोर्तुगीजांना हाकलून कीरनॅण्डरला ते चर्च बहाल केले. झटून काम केल्यामुळे कीरनॅण्डरच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. एखादे अतिभव्य चर्च उभारण्याच्या इच्छेपोटी त्याने बांधकाम व्यवसायातून खूप पैसा मिळवला. एक कफल्लक पाद्री ते धनाढय़ कंत्राटदार हा कीरनॅण्डरचा प्रवास रोचक आहे. यातील अनेक बारकावे आणि खाचाखोचा लेखकाच्या खास ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ शैलीत वाचण्याची मजा वेगळीच आहे.
कीरनॅण्डरचा समाचार
कीरनॅण्डरचे वय झाल्यामुळे त्याच्यानंतर चर्चची जबाबदारी स्वीकारण्यासाठी जर्मनीहूनच जोसेफ डीमर हा तरुण पाद्री १७७९ साली कोलकात्यात आला. चर्चची कामे हाती घेतल्यावर, विशेषत: जमाखर्चाचे हिशेब बघताना त्याला धक्काच बसला. चर्चला दिलेल्या अनेक देणग्यांची चर्चा शहरभर असताना हिशेबात मात्र त्यांचा उल्लेखही नव्हता! सर्वात मोठा धक्का म्हणजे कीरनॅण्डरने बांधलेले चर्च व शाळा या त्याच्या वैयक्तिक मालकीच्याच राहिल्या. असे असूनही निव्वळ त्याच्या शब्दावर विसंबल्याने कंपनीतर्फे जणू ट्रस्टच्या मालकीची असल्याप्रमाणे त्यावर कर आकारला जात नसे. याखेरीज डीमरच्या कुटुंबाची मिशन हाऊसमधील हकालपट्टी आणि त्याला पगाराचा काही भाग न देणे यामुळे डीमरचा संताप अनावर झाला.
१७८१ साली त्याने हिकीशी संपर्क साधून ही हकीगत त्याच्या कानावर घातली. हिकीने आपल्या नेहमीच्या शैलीत कीरनॅण्डरचा खरपूस समाचार घेतला. साहजिकच कोलकाताभर कीरनॅण्डरबद्दल कुजबुज होऊ लागली.
हिकीला प्रतिटोला
यावर प्रतिटोला अपेक्षितच होता. एके दिवशी हिकीला कोर्टाकडून समन्स आले. त्याच्यावर मानहानीचे एकूण पाच आरोप लावण्यात आले- तीन हेस्टिंग्जकडून, तर दोन कीरनॅण्डरकडून. नुकसानभरपाईबद्दल त्याला सुरुवातीला चार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तो सरन्यायाधीश एलायजा इंपीमुळे तब्बल दसपटीने वाढवण्यात आला. इंग्लंडमधील काही खटल्यांचा हवाला देत, आपल्या मूलभूत हक्कांवर न्यायाधीशांनी गदा आणल्याचा युक्तिवाद करून हिकीने नुकसानभरपाईची रक्कम कमी होण्याकरिता दोन अर्ज करून सर्व न्यायाधीश आणि हेस्टिंग्ज यांची खिल्ली उडवणारे एक प्रहसनही छापले. न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप, वादी आणि प्रतिवाद्यांकडून वापरल्या जाणाऱ्या आणि विशेषत: हिकीने वापरलेल्या अनेक क्ऌप्त्या यांचे वर्णन पुस्तकात अतिशय रोचक उतरले आहे. विशेषत: ‘कोर्टरूम ड्रामा’ वाचताना मराठीतील प्रसिद्ध ‘सा. आदेश विरुद्ध अत्रे’ या खटल्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही!
न्यायालयात ज्युरी आणि न्यायाधीश अशी दुहेरी व्यवस्था होती. हिकीच्या वृत्तपत्रातील उल्लेख नि:संदिग्धपणे हेस्टिंग्जलाच लागू आहेत हे ठरवणे ज्युरीचे; तर ते उल्लेख मानहानीकारक आहेत की नाही, हे ठरवणे न्यायाधीशाचे काम होते. हे उल्लेख हेस्टिंग्सलाच लागू आहेत असे नक्की सांगता येत नसल्याचे हिकी व त्याच्या वकिलांनी ज्युरीच्या गळी उतरवले. परिणामी हेस्टिंग्जला ‘क्लाइव्हचा फालतू वारसदार’ असे म्हटल्याच्या आरोपातून हिकी निर्दोष सुटला. पण षंढ, मुघल इत्यादी उल्लेखांबद्दल मात्र तो दोषी ठरला. याखेरीज कीरनॅण्डरचीही सुनावणी झाली. बऱ्याच भवति न भवतिनंतर कीरनॅण्डरला ‘पैशाच्या हावेने प्रभावित झालेला’ असे संबोधल्याबद्दल हिकीला दोषी ठरवण्यात आले. आणि कंपनीच्या लष्कराला हेस्टिंग्जविरुद्ध उठाव करायला चिथावणी दिल्याचा लेख प्रकाशित केल्याबद्दल व त्याद्वारे केलेल्या मानहानीबद्दलही हिकी दोषी ठरला. सरन्यायाधीश इंपीने त्याला १९ महिने तुरुंगवास आणि २५०० रुपये दंड किंवा दंड न भरल्यास दोन वर्षे अशी शिक्षा सुनावली.
पण हिकीचे दुर्दैव इतक्यावरच थांबले नाही. हेस्टिंग्जने दिवाणी न्यायालयात त्यावर पुन्हा दावा दाखल केला. तिथे हिकीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हिकीने बदल्यादाखल या सर्व नामवंतांची टवाळी करणारे आणखी एक पत्रक छापले. अखेरीस तुरुंगात बसून हे सर्व उद्योग करणे अशक्य झाल्यावर हिकीने दिवाळखोरी जाहीर केली. लवकरच त्याचा छापखानाही जप्त करण्यात आला. अशा प्रकारे फक्त दोन वर्षांत भारतातले पहिले वृत्तपत्र बंद पाडण्यात आले. सत्तेपुढे शहाणपण सांगण्याचा हा प्रयत्न कायदेशीरपणाच्या आवरणाआड कसा दडपून टाकला गेला, हे मुळातूनच वाचणे रोचक आहे. हा घटनाक्रम पुस्तकाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात येतो.
हिकीचे लेखन युरोपात पोचल्याने कीरनॅण्डरवर खूप टीका झाली. जर्मनीतील मातृसंस्थेने शेवटी त्याच्याशी संबंध तोडले. मुख्यत: सुप्रीम कौन्सिल सदस्य फ्रान्सिसने पुरवलेल्या माहितीच्या आधारावर ईस्ट इंडिया कंपनीच्या पर्यवेक्षक कमिटीचा अध्यक्ष एडमंड बर्कने इंपीला बडतर्फ करून इंग्लंडला परत बोलावले. वॉरन हेस्टिंग्जही यातून सुटला नाही. १७८४ च्या नवीन कायद्यानुसार कंपनीच्या अनिर्बंध सत्तेवर अनेक बंधने आली होती. एडमंड बर्कने हेस्टिंग्जवर महाभियोगाचा खटलाही चालू केला. मात्र यातून हेस्टिंग्ज निर्दोष मुक्त झाला.
इकडे १७८४ साली हिकीची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. त्याने पुन्हा वृत्तपत्र सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न करून त्यानंतर नियमावली छापल्याचे पैसे मिळावेत म्हणून कंपनीमागे तगादा लावला. बऱ्याच खटपटींनंतर अखेर १७९५ साली हिकीला कसे तरी ४३ हजारांऐवजी फक्त सातेक हजार रुपये मिळाले. पुढे १८०२ साली एका व्यापारी गलबतावर हिकीचा मृत्यू झाला. हिकीने लक्ष्य केलेले अधिकारी आणि हिकी या सर्वाच्या उत्तरायुष्याबद्दलचे पुस्तकातील लेखन वस्तुनिष्ठ तरीही लालित्यपूर्ण आहे.
पण वृत्तपत्रांनी त्यानंतर लगेचच भारतात बाळसे धरले. हिकीने कैक जनसामान्यांना आपला आवाज शासनापर्यंत पोचवण्यासाठी एक मार्ग दाखवला. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, शासनाची माध्यमांवरील दडपशाही या सदाबहार विषयांच्या भारतातील प्रथम चर्चा पाहण्यासाठी हे पुस्तक अनिवार्य आहे. आजही तत्कालीन चर्चामधील अनेक मुद्दे तितकेच ताजे वाटतात, हेच त्या विषयाचे आणि पुस्तकाचेही मोठेच यश आहे!
‘हिकीज् बेंगॉल गॅझेट : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज् फर्स्ट न्यूजपेपर’
लेखक : अॅण्ड्रय़ू ओटिस
प्रकाशक : ट्रांकेबार (वेस्टलॅण्ड बुक्सची शाखा)
पृष्ठे: ३१७, किंमत : ५३१ रुपये
nikhil.bellarykar@gmail.com