रेश्मा भुजबळ
अनेक वर्ष हिंदू-मुस्लीम असा सलोखा जपणाऱ्या काश्मीर खोऱ्यातल्या शांततेला ९० च्या दशकात धर्माच्या नावाखाली वेठीस धरले गेले, यात दोन्ही धर्मातील लोक भरडले गेले. तेव्हापासून सातत्याने धगधगत असणाऱ्या काश्मीरमधील परिस्थितीच्या झळा सहन करणाऱ्या एका किशोरवयीन मुलीने तिच्या नजरेतून केलेले, तिला सहन कराव्या लागणाऱ्या स्थितीचे विलक्षण आणि मर्मभेदक वर्णन म्हणजे फराह बशीर यांचे ‘रुमर्स ऑफ स्प्रिंग’.
पुस्तकाची सुरुवातच दोन मृत्यूंनी होते. एक म्हणजे लेखिकेची अतिशय प्रिय आजी, बोबेहचा मृत्यू आणि दुसरा मृत्यू हा प्रतीकात्मक – तिच्या पौगंडावस्थेचा. बोबेहच्या अंत्यसंस्काराची तयारी आणि त्या अनुषंगाने, अनेक कथा किंवा आठवणी या फ्लॅशबॅकसह इथे जोडलेल्या आहेत. बोबेहच्या अंत्यसंस्काराच्या दिवसाच्या अनेक टप्प्यांनुसार कथेतील प्रकरणे येतात. संध्याकाळ, रात्र, आधीचे तास (अर्ली अवर्स), पहाट, सकाळ तसेच ‘आफ्टरलाइफ’! हे प्रत्येक प्रकरण फराहच्या जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करते. हे काश्मिरी जीवनाचे असे भाग आहेत ज्याची कल्पना बाहेरील व्यक्ती करू शकत नाही. फराह हळुवारपणे वाचकांना बंदुकांच्या आणि युद्धांच्या वृत्तपत्रातील प्रतिमांपासून जरा बाजूला नेऊन, घरांच्या आतील भागात घेऊन जाते.
काश्मीरकडे अनेकदा राजकारण आणि हिंसाचाराच्या दृष्टिकोनातूनच पाहिले जाते. मात्र, सततची संचारबंदी, गोळीबार आणि लष्करी ताफ्यांचे आवाज तसेच मृत्यूच्या छायेत वावरणाऱ्या, वाढलेल्या एका किशोरवयीन मुलीच्या जीवनाचे हृदयद्रावक वर्णन करून फराह मानवतेच्या दृष्टिकोनातूनही काश्मीरचा विचार करायला भाग पाडते. फराहच्या एका मैत्रिणीला जीन्स पँट घातल्याने तिच्यावर अॅसिड फेकून विद्रूप केले जाते. काश्मीरमध्ये जीवनाची प्रत्येक साधी कृती असो वा कितीही खासगी आनंद असो, हे सारे दहशतीच्या सावटाखालीच असते, याचे हे ज्वलंत उदाहरण देताना फराह या घटनेनंतर केसांची पोनीटेल घालणे, लहान मोजे घालणे हे बंद करून इस्लामिक पोशाख करण्यास सुरुवात करते. मैत्रिणीवर गुदरलेल्या प्रसंगामुळे संभ्रमात पडलेली, दुखावलेली आणि धास्तावलेली फराह डोक्यावर स्कार्फ घालत, केस झाकून घेत, आपण कुणाच्याही नजरेत येऊ नये, शक्य तेवढे विद्रूपच दिसावे यासाठी वेगवेगळे प्रयोग करते. त्या वयातील नटण्या-मुरडण्याची ऊर्मी अशा प्रकारे दाबून टाकली जाते.
फराहने तिचे आयुष्य काही घटनांनंतर दोन भागांत विभागण्यास सुरुवात केली – १९८९ पूर्वी आणि नंतर. १९८९ नंतर सर्व काही बदलले. कुटुंबातील प्रत्येक जण बदलला. कसा ते ती वाचकाला विश्वासात घेऊन सांगते.
दमा असणारा तिचा एक शेजारी ताज्या हवेसाठी म्हणून घराची खिडकी काय उघडतो आणि त्याच वेळी बंदुकीची एक गोळी त्याचा वेध घेते. त्यात तो जागीच मारला जातो. मृत्यूला इतक्या जवळून पाहणारी फराह मग आपल्या वेदनाही दाबून टाकण्याचा प्रयत्न करत राहते. तिला मासिक पाळीच्या काळात असह्य वेदना होत असतात. मात्र, औषध आणायला पाठवून किंवा स्वत: जाऊन आपल्या कुटुंबाचा किंवा स्वत:चा जीव धोक्यात येईल अशी भीती वाटल्याने तो त्रास ती निमूट सहन करते.
या आणि अशा अनेक घटनांमुळे, तिथल्या अस्थिर वातावरणामुळे ती चिंता, छातीत धडधडणे, औदासीन्य, निद्रानाशाने ग्रासली जाते. त्यातच तिला स्वत:चे केस उपटण्याचीही सवय लागते. ‘‘अतिशय निर्घृणपणे केलेल्या या कृतीने मला खूप दिलासा दिला. मी वैयक्तिक वेदनांवर लक्ष केंद्रित करू शकले, लहानपणी मला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे निर्माण झालेल्या वेदनांना सामोरे जाता येत नव्हते आणि ते व्यक्त करण्याची भाषाही माझ्याकडे नव्हती. त्यामुळे केस उपटणे ही खरोखरच चिंता आणि भीतीची भाषा होती,’’ असे फराह सांगते. तिला पीटीएसडी म्हणजे ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’चे (दु:खद/यातनामय घटनेनंतरच्या तणावातून आलेला मनोविकार) निदान होते. काश्मीरमधील स्थितीमुळे तिच्यासारखी अनेक मुले-मुली या आजाराला बळी पडत असतील हे कदाचित समोरही आले नसेल असे फराह म्हणते. तिचा एक मित्र नेहमी विनोदाने म्हणत असतो की, काश्मीरमध्ये पीटीएसडी याचा अर्थ ‘पेरेनिअली ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ (यातनामय घटना संपतच नाहीत म्हणून आलेला तणाव) असावा. तेच वास्तव ती इथे मांडते.
‘क्रॅकडाऊन’ किंवा शोध मोहीम आणि ‘संचारबंदी’ जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या काळात लहान मुलांचे बालपण कोमेजून जाते. लहान मुले सायंकाळी घरातील अंगणात लपाछपी किंवा इतर खेळ खेळणे विसरली आहेत. त्याऐवजी ते, सैनिक आणि अतिरेकी यांच्यातील ‘चकमकीची’ दृश्ये साकारतात किंवा लाकडी फळी आणि फेकून दिलेल्या तारांपासून खेळण्यातल्या बंदुका बनवण्यात व्यग्र असल्याचे पाहायला मिळते, असे फराह सांगते.
तिच्या वडिलांनी सौदी अरेबियातून विकत आणलेली म्युझिक सिस्टीम भर दुपारी साठवणीच्या खोलीत नेऊन नाझिया हसनच्या ‘डिस्को दिवाने’वर (हे गाणे १९८१ पासूनच भारतभरात लोकप्रिय झालेले होते) फराह नृत्य करते. अशा प्रकारे दडपण, दहशतीच्या स्थितीतही क्वचित आनंदी राहण्याचा फराहचा प्रयत्न वाचताना आपल्याही चेहऱ्यावर स्मित उमटवून जातो.
लेखिकेच्या आठवणींद्वारे तिच्या नजरेतून आपल्याला इतिहासात डोकावता येते. यात १९९० मध्ये खोऱ्यातून शीख आणि काश्मिरी पंडितांचे पलायन तिच्या नजरेतून समजते. फराहच्या शेजारी राहणारी लक्ष्मीश्री कौल १९९० मध्ये अचानक तिच्या कुटुंबासह गायब होते. १९९२ चे मध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरण आणि १९९३ मध्ये हजरतबल मशिदीला घातलेला वेढा या फराहच्या नजरेतून वाचायला मिळतात.
फराह बशीर उच्चशिक्षणासाठी काश्मीरबाहेर पडल्या आणि पत्रकार झाल्या. ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या माजी छायाचित्रकार आणि सध्या कम्युनिकेशन कन्सलटंट अशी त्यांची आताची ओळख. फराह यांचे हे पहिलेच पुस्तक. काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलकही यातून दिसत राहते. फेरान, कांगा, काहवा आणि ननचायपासून ते लग्न आणि अंत्यसंस्कारप्रसंगी दिल्या जाणाऱ्या विशिष्ट पारंपरिक खाद्यपदार्थाचे बारकावे आणि वर्षभर धान्य, भाजीपाला साठवून ठेवण्यासारख्या पद्धती यातून ती अधिक स्पष्ट होते. काश्मिरी भाषेचा जगात कुठे ना कुठे कसा संबंध आहे हे काश्मीरमधील आणि काश्मीरमध्ये नसलेल्या वाचकालाही यातून समजते.
वर्तमानपत्रांचे महत्त्व फराहच्या विविध प्रकरणांमध्ये जाणवते. वर्तमानपत्रातील जाहिरातींमधून दाखवली जाणारी स्वप्ने आणि बातम्यांतून उघड होणारे वास्तव यांचे वर्णन ती करत राहाते, तेव्हा काश्मिरींच्या दैनंदिन जीवनातील विरोधाभास वाचकापर्यंत पोहोचतो. वर्तमानपत्रातील ‘स्मरण’ (श्रद्धांजलीच्या छोटय़ा जाहिराती) विभाग वाचून तिला दिलासा मिळतो. वार्धक्याने, आजारपणाने, सामान्य परिस्थितीत नागरिकांचा मृत्यू होतो आहे.. सारेच जण गोळी लागून मरत नाहीत.. याचेच तिला बरे वाटत राहते. स्मरण विभागातील पानांवर बोबेहचे नाव पाहून, बोबेह नैसर्गिक कारणांमुळे मरण पावली हे जाणून तिला काही क्षण शांततेचे अनुभवायला मिळालेले असतात. बोबेहच्या मृत्यूपासून सुरू झालेला पुस्तकाचा किंवा फराहच्या त्या दहा वर्षांच्या कालावधीतला प्रवास आशेच्या अंधूक किरणाने संपतो खरा, पण अशा अनेक तरुण-तरुणींच्या आयुष्यातला वसंतासारखा बहराचा काळ कसा झाकोळून गेला असेल, याची जाणीव पुस्तक मिटल्यानंतरही होत राहते.
reshmavt@gmail.com