नंदा खरे nandakhare46@gmail.com

रॉबर्ट जे. बरोज (Burrowes) या मानसशास्त्रज्ञाचा ‘द सायकॉलॉजी ऑफ फॅसिझम’ हा लेख ‘स्कूप’ (Scoop) या ई-पत्रिकेत अलीकडेच प्रकाशित झाला. इतरही कमी-जास्त अकादमीय ई-स्थळांनी तो उचलून धरला आहे. लेख दोन भागांत आहे. पहिल्या भागात फॅसिझमचे लक्षणगुण तपासले आहेत; तर दुसऱ्या भागात फॅसिस्ट मनोवृत्ती कशी घडते आणि कशी आटोक्यात आणावी, यावर चर्चा आहे. असे म्हणू की, एक भाग निदान करण्याचा, तर दुसरा इलाज करण्याचा आहे.

congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and Congress president Mallikarjun Kharge.
Razakar violence explained: रझाकारांनी खरगेंच्या कुटुंबीयांची हत्या केली? योगी आदित्यनाथांच्या टीकेमागचा खरा इतिहास काय?
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज

लेखात दोनदा बरोज एक यादी देतो, नेमक्या त्याच क्रमाने. तो सांगतो की, अमेरिका (यूएसए), युरोप, इस्राएल, सौदी अरबस्तान, म्यानमार व इतरत्र फॅसिझम वाढतो आहे. ही सर्व क्षेत्रे दुसऱ्या महायुद्धात फॅसिझमग्रस्त होती आणि त्यांनी तो वाद नाकारला होता, हे लक्षणीय आहे. ‘हाऊ फॅसिझम वर्क्‍स : द पॉलिटिक्स ऑफ अस अ‍ॅण्ड देम’ या तत्त्वज्ञानाचा प्रा. जेसन स्टॅन्लीच्या पुस्तकाच्या आधाराने बरोज दहा लक्षण-गुण नोंदवतो.

आपल्या भूतकाळाविषयीच्या खोटय़ा मिथकांवर विश्वास; भ्रष्टाचाराचे मूळ दडवण्यासाठी प्रचारतंत्रांचा वापर; बौद्धिकतेला विरोध; ‘सामान्य माणसां’चा उदोउदो; स्त्रिया, अल्पसंख्य वगैरे साधी समता मागत नसून सत्ता मागतात, असे सांगून त्यांची टर उडवणे; अभिजनांचे विचार पसरवून पर्यायी (स्वातंत्र्य, समता आदी) विचारांवर हल्ले करणे; वास्तवात सत्तेवर असलेल्यांना ‘पीडित’ मानणे; तथ्यांऐवजी भ्रामक समजुती वापरून सत्ता कमावणे; ‘बाहेरच्या’ गटांवर कायद्याचा बडगा उगारणे आणि अभिजन कष्टाळू असतात, तर ‘बाहेरचे’ आळशी आणि ऐतखाऊ असतात असा प्रचार करणे- अशी ही लक्षणांची यादी आहे.

‘फ्री एन्क्वायरी’ मासिकाच्या २००३ च्या वासंतिक अंकातील ‘फॅसिझम एनीवन?’ या लेखात लॉरेन्स डब्ल्यू. ब्रिट यांनी अशीच एक चौदा लक्षणांची यादी दिली होती. तिच्यात ‘आपण आणि ते’ हा विचार जास्तच तेज केला गेला आहे. यातील ‘ते’च्या यादीत ‘डावे’, उदार धर्मनिरपेक्षतावादी, परधर्मीय, पारंपरिक शत्रू, स्त्रिया, ‘वेगळे’ असे सारे धरले जातात. त्यांच्याविरुद्ध एक होण्याची आवाहने सतत केली जातात. लष्कराचे उदात्तीकरण केले जाते. अभिजनांना विरोध करणे म्हणजे देशावर, धर्मावर हल्ला मानला जातो. ‘प्रोपगंडा’ यशस्वी करायला माध्यम-नियंत्रण, राजकारणी आणि उद्योजक यांचे साटेलोटे, निवडणुका येनकेन मार्गानी ‘जिंकणे’ वगैरे बाबीही आहेत. इथे फॅसिझम आणि हिंसा यांचा संबंध थेट, उघड मानला आहे.

‘शांती आणि संघर्ष अध्ययन’ या अभ्यासशाखेच्या जनकांपैकी एक असलेल्या योहान गाल्टुंग या गणितज्ञ-समाजशास्त्रज्ञाने हे नाते अमेरिकेपुरते जास्तच स्पष्ट केले आहे. तो सांगतो की, परक्यांवर बॉम्ब-ड्रोन-स्नायपर हल्ले, देशांतर्गत विरोधकांवरही सैनिकी शस्त्रास्त्रांचा वापर आणि सर्वावर सतत पाळत ठेवणे, ही अमेरिकेची ओळख झाली आहे.

एकूणच राजकीय निरीक्षकांना उजव्या पक्षांवर स्वार होऊन फॅसिझम घोडदौड करताना दिसतो. असे का व्हावे? तेही आजच्या ‘प्रबोधित’ युगात? स्वातंत्र्य, समता, लोकशाही, मानवाधिकार, सारे समाज-मनात खोलवर रुजले आहेत ना? विशेषत: पाश्चात्त्य देशांत? आपल्या निवडणुका खुल्या, न्याय्य आणि कॉर्पोरेट देणग्यांपासून मुक्त असतात ना? आजचे निरीक्षक या सर्व प्रश्नांना ‘नाही’ असे उत्तर देतात. पूर्वी कधी तरी उत्तर ‘हो’ येत असे, यावरही ते शंका घेतात.

एक वेगळाही प्रकार आहे. विकिपीडियावर ‘डेमोक्रसी इंडेक्स’ यावर एक टिपण आहे. प्रत्येक देश-राष्ट्राला काही ‘गुण’ देऊन ते गुण जितके जास्त तितकी तिथली लोकशाही ‘खरी’ अशी मांडणी आहे. इथे मात्र बरोजची यादी (अमेरिका, युरोप, इस्राएल, सौदी अरबस्तान, म्यानमार) जरा वेगळी दिसते. जास्त लोकशाही म्हणजे वरचा क्रम अशी यादी आहे. अमेरिका घसरते आहे, परंतु आजही २१ व्या क्रमांकावर आहे. तिचे वर्णन ‘सदोष लोकशाही’ असे आहे. ‘पूर्ण लोकशाही’ अशा वर्णनाच्या यादीत १४ युरोपीय देश आहेत. इस्राएल ‘सदोष’ आणि ३० व्या क्रमांकावर आहे. सौदी अरबस्तान १५९ वा आहे, ‘हुकूमशाही’ वर्णनात. म्यानमार त्याच वर्णनात, परंतु १२० व्या क्रमांकावर आहे. तुलनेसाठी भारत (‘सदोष’, क्रमांक – ४२) आणि पाकिस्तान (‘मिश्र राज्यव्यवस्था’, क्रमांक – ११०) हे आपल्याला रस असलेले देशही पाहावे!

म्हणजे, बरोज या मानसशास्त्रज्ञाचे फॅसिझमवाढीचे निदान राज्यशास्त्रज्ञांना मान्य नाही. युरोपपुरते तरी दोघांमध्ये मतभेद आहेत; जरी इतर बाबतींत एकमत आहे! एक वेगळीही शक्यता आहे. बरोज सांगतो, ‘फॅसिझम हे राजकीय लेबल आहे. अशा प्रकारच्या सर्व लेबलांप्रमाणेच त्याचा पाया मानसिकतांमध्ये आहे. फॅसिस्टांची राजकीय वर्तणूक त्यांच्या मानसिकतांमधून समजते; इतर सर्वच वर्तणुकींसारखी.’

इतरही मुद्दे आहेत. लोकशाही निर्देशांक कसकसे बदलत गेले आहेत, हेही तपासले जायला हवे. बरोज अमेरिकी आहे की युरोपीय? विकिपीडियातला लेख अमेरिकी आहे की युरोपीय? फॅसिझम ही एकच लोकशाहीविरोधी विचारधारा नाही. याचा अर्थ- ‘घटती लोकशाही म्हणजेच वाढता फॅसिझम’ असे म्हणता येत नाही. मग, इतर कोणकोणते अर्थ निघू शकतात?

आणि शेवटी या सगळ्यांचा आपल्याशी संबंध कोणता? एक मात्र खरे की, अमेरिका, युरोप, इस्राएल यांनी दुसऱ्या महायुद्धात फॅसिझमला विरोध केला होता. तरीही आज त्या क्षेत्रांत फॅसिझमकडे जाणारी उजवी विचारसरणी बळावते आहे. हिंसेने प्रश्न सोडवता येतात आणि हुकूमशाहीकडे झुकणारी शासनपद्धती चांगली, ही मते सार्वत्रिक होत आहेत.

फॅसिस्ट-घडणीची यंत्रणा

फॅसिस्ट घडतात ते त्यांच्यावर बालपणी झालेल्या हिंसेमुळे, असे बरोज सांगतो. यंत्रणा अशी :

पालकवर्गी लोक त्यांच्या पाल्यांवर प्रेम करण्याऐवजी हिंसेचा वापर करतात. ते पाल्य, ती मुले बालपणी तर स्वत:चा सक्षम बचाव करू शकत नाहीतच, परंतु पुढील आयुष्यातही स्वत:ला वाचवू शकत नाहीत. मूळ हिंसेमुळे त्या मुलांच्यात आधी एक हतबल भाव उपजतो आणि पुढे स्वत:विषयी घृणा उपजते. परंतु या हतबलतेला, आत्मघृणेला जाणीवपूर्वक सामोरे जाणे अत्यंत वेदनादायी आणि भीतीदायक असते. यामुळे ते भाव नेणिवेत लोटले जातात.

आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांना विरोध करता येत नसल्याने, ज्यांची भीती वाटत नाही अशांवर मुले अत्याचार करू लागतात. हे प्रौढपणी जास्तच तीव्र होते. भिन्नलिंगी, भिन्नवंशी, भिन्नधर्मी, भिन्नवर्गी, भिन्न काहीही असलेले लोक प्रौढपणी फॅसिस्टांचे लक्ष्य ठरतात. त्यातही जे सर्वात दुबळे, ते आधी तुडवले जातात. एक अत्यंत संकुचित दृष्टिकोन उपजतो.. ‘आपण आणि ते’ असा! आणि भिन्न मत असलेले अर्थातच द्वेषाचे कारण ठरतात; कारण ते नेणिवेतली भीती चेतवतात.

यामुळे फॅसिस्टांना ‘आज्ञाधारक’ म्हणजे ‘चांगला’ असे वाटू लागते. चांगुलपणाचा संबंध प्रेम, सहवेदना, सहानुभूती, इतरांना मदत करणे वगैरेंशी जुळतच नाही.

स्वत:ची हतबलता, आत्मघृणा सारे नेणिवेतले भाव ‘त्या’ (विरुद्ध) गटावर, परक्यांवर कलम केले जातात. हिंसा केली जाते आणि तिची गरज एखाद्या व्यसनासारखी वाढत जाते. हिंसा परिणामकारक वाटू लागते आणि पुढे तर नैतिकही वाटू लागते.

प्रेम, सहानुभूती आणि सदसद्विवेक हे चक्र फिरतच नाही. त्याची जागा हिंसा वाढवत नेणारे दुष्टचक्र घेते. ते जास्त जास्त वेगाने फिरू लागते.

पुढे काय?

यावर इलाज काय? कोणताही सोपा, एकोत्तरी, ‘मॅजिक बुलेट’ इलाज नाही. दीर्घ काळच्या हिंसेतून उपजलेला प्रश्न दीर्घ काळच्या समुपदेशनानेच सोडवता येतो, असे बरोज सांगतो. त्यातही समुपदेशन करणाऱ्या ‘काऊन्सेलर’ला ‘सखोल ऐकण्याची कला’ अवगत असावी लागते. बरे, स्वत:विषयीची घृणा आणि भीती नेणिवेत लोटलेले फॅसिस्ट समुपदेशनाची गरजही नाकारतात. म्हणजे, त्यांची हिंसा भोगतच आपल्याला जगत राहावे लागते.

माझी मानसशास्त्राशी तोंडओळखही नाही. परंतु हा फॅसिस्टांचे समुपदेशन करण्याचा प्रकार मला एका जुन्या, दिल्ली प्राणिसंग्रहालयातल्या घटनेची आठवण करून देतो. एक वेडसर माणूस वाघाच्या कटघरात उतरला. प्रत्यक्षात वाघ जवळ आल्यावर तो वारंवार वाघाला नमस्कार करत काही तरी विनवू लागला. वाघाने त्याच्या मानाने सौम्य असे दोन-तीन पंजाचे फटकारे मारले. माणूस मेला. वाघ इतरत्र गेला.

पुढच्या पिढय़ांत फॅसिस्ट उद्भवू नयेत यासाठी काय करावे, तेही बरोज सांगतो. प्रेम, सदसद्विवेक यांचे स्वत:ला बळ देणारे चक्र फिरवायला लागावे हा त्या सल्ल्याचा गाभा आहे. हे परिणामकारक ठरेलही, परंतु मधल्या काळात वाघाने आपल्याला पंजा मारलेला असेल!

एक भीतीदायक शक्यता मात्र बरोज वर्तवतो. इतरांचे कितीही नियंत्रण करता आले, तरी फॅसिस्टांचे खोल रुजलेले भेदरलेपण, हतबल भाव हे कमी होतच नाहीत. ते पुन:पुन्हा नवनव्या गटांवर नियंत्रण कमावून भय, घृणा कमी करू जातात आणि असा ‘हक्का’चा गट म्हणजे फॅसिस्टांची मुले. थोडक्यात, फॅसिझम सहज ‘शाश्वत’ होऊ  शकतो!

मानसशास्त्राचे मला ज्ञान नसले, तरी लहानपणी कमीजास्त हिंस्र पालकवर्गी लोक भोगलेली मुले मोठेपणी असहिष्णू आणि हिंस्र होतात, याची बरीच उदाहरणे परिचितांमध्ये आणि साहित्यकृतींमध्ये मला भेटलेली आहेत. त्यामुळे बरोजने रेखलेली फॅसिस्ट-घडणीची यंत्रणा मला विश्वासार्ह वाटते. फॅसिझमचे लक्षणगुण, त्यांच्या याद्या याबाबतही असेच म्हणता येईल.

आणि सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवहारांची मुळे अर्थव्यवहारांत सापडतात (इति मार्क्‍स); तशी प्रौढ वर्तणुकीची मुळे- विशेषत: विकृतींची- बालपणातल्या अनुभवांत सापडतात, हे मला मान्य आहे. तेव्हा एका भीतीदायक घटिताची कारणमीमांसा समजून घेण्यासाठी मला बरोज उपयुक्त वाटतो.

‘हाऊ फॅसिझम वर्क्‍स : द पॉलिटिक्स ऑफ अस अ‍ॅण्ड देम’

लेखक : जेसन स्टॅन्ली

प्रकाशक : रॅण्डम हाऊस

पृष्ठे : २१२, किंमत : ४९९ रुपये