स्वाती चतुर्वेदी या पत्रकार. महिला पत्रकारांना फेसबुक वा  त्याहीपेक्षा ‘ट्विटर’सारख्या  समाजमाध्यमांतून ज्या प्रकारे टोमणेबाजी आणि शाब्दिक चारित्र्यहनन यांना सामोरं जावं लागतं, त्याविरुद्ध त्या ठामपणे उभ्या राहिल्या. म्हणजे १० जून २०१५ रोजी त्यांनी ‘ल्यूटन्सइन्सायडर’ या ट्विटर-पत्त्यावरून (किंवा, ‘ट्विटर हँडल’वरून) आपलं अत्यंत हीन पातळीचं चारित्र्यहनन आणि शाब्दिक छळ होत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनीही रीतसर गुन्हा दाखल केला. एका काँग्रेसनेत्याशी चतुर्वेदी यांचे ‘संबंध’ आहेत, असं गृहीत धरून त्यांच्या विरुद्ध गलिच्छ आणि असभ्य शब्दांत राळ उडवली जात होती.  एवढं झाल्यावर तो ट्विटरपत्ता गप्प झाला. पण बाकीचे राळ उडवतच होते. चतुर्वेदी यांच्या लक्षात आलं : हा त्रास एकटीचा नाही. अनेकजणींचा आहे. जल्पक किंवा ‘ट्रोल’ हे समाजमाध्यमांवरले समाजकंटक खोटी माहिती सहज पसरवून, त्याआधारे बदनामी करण्यापर्यंत मजल मारत आहेत. मग त्यांनी ठरवलं  : पत्रकारितेच्याच मार्गानं या सामाजिक अरिष्टाशी लढायचं. माहिती मिळवणं सुरू झालं. त्यातून सिद्ध झालेलं हे पुस्तक, त्यातल्या माहितीमुळे गेल्या पंधरवडय़ात बातमीचा विषय झालं.

या बातमीत, कुणा साधवी खोसला नावाच्या युवतीनं दिलेली माहिती धक्कादायक होती : भाजपच्या समाजमाध्यम-पथकात आपण काम करत असताना याच पक्षाच्या ‘माहिती-तंत्रज्ञान कक्षा’कडून आपल्याला थेट सांगितलं गेलं की, ‘आमीर खानचं जाहिरात-कंत्राट रद्द करण्यासाठी स्नॅपडील या इंटरनेट-विक्रीस्थळाला भाग पाडावे’ – याचा अर्थ असा की, आमीर खानने त्या वेळी ‘पत्नी उद्वेगाने देश सोडून जाऊ म्हणाली’ असे जे उद्गार काढले होते, त्याची किंमत मोजणं आमीरला भाग पडावं, यासाठी सत्ताधारी पक्षच प्रयत्नशील होता. हा आरोप गंभीर असल्यानं पुस्तकाच्या बातमीत त्याचा उल्लेख अगदी अग्रस्थानी झाला. पण पुढे हा आरोप काही धसाला लागला नाही. असं का झालं?

याचं र्अधमरुधच का होईना, पण काही प्रमाणात संभाव्य उत्तर ठरू शकणारी माहिती पुस्तकात आहे. कोणती बातमी बिनमहत्त्वाची करून टाकावी, कोणत्या माहितीला महत्त्व द्यावे, हेदेखील समाजमाध्यमांच्या साह्यने ‘ठरवण्या’चे प्रयत्न होतात. त्यासाठी मनुष्यबळ वापरले जातेच, पण काही म्होरक्ये हे खास सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त लाभलेलेही असतात, असं हे पुस्तक सांगतं. हे ‘ट्विटर’ या समाजमाध्यमापुरतं खरंही आहे.

ट्विटरवरला ‘फॉलोअर’ हा अनुयायीच असतो असं नाही. तो नित्यवाचक असतो, किंवा अमुक ट्विटरपत्त्यावरून जे सांगितलं जात आहे ते वाचनीय आहे असं ‘फॉलोअर’चं मत (कदाचित सहमतीमुळे) असू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यांचे नित्यवाचक आहेत, अशा २६ जणांनी सातत्यानं इतकी गलिच्छ आणि असभ्य भाषा वापरली आहे की, त्यांना ‘ट्रोल’च म्हणावं लागेल. त्या २६ जणांची यादीच पुस्तकाच्या अखेरीस आहे. भाजपच्या ‘समाजमाध्यम कक्षा’ची दररोजची शब्दकळा वापरायची तर, हे सारेजण भाजपचे ‘ट्विटर-योद्धे’ आहेत. या समविचारी (पण असभ्य, अर्वाच्च्य भाषा वापरणाऱ्या) ‘योद्धय़ां’ना देशाच्या पंतप्रधानांनी एकदा सामूहिक चहापानाला बोलावलं होतं. त्या वेळचे मोदींसोबतचे फोटो अनेकांनी ट्विटरवरून प्रसृत केले आणि अनेकदा या फोटोंसह आपापली अर्वाच्च भाषा सुरूच ठेवली. टीकाकारांची तोंडं बंद करण्यासाठी भाजपकडून असभ्य भाषेचा वापर होतो आणि पंतप्रधान त्याला आशीर्वादच देतात, असं या पुस्तकातून सूचित होतं.

अर्थात, या ओघात अनेकपरींची माहितीदेखील या पुस्तकातून मिळते. कुणाचे किती नित्यवाचक, हेही कळतं. भाजपचा समाजमाध्यम कक्ष हा देशातल्या कोणत्याही राजकीय वा सामाजिक संघटनेच्या चमूपेक्षा कितीतरी मोठा आहे आणि जुनाही आहे. या संदर्भात, भाजपच्या समाजमाध्यम-धोरणाचे एक शिल्पकार आणि रा. स्व. संघातून भाजपचे पदाधिकारी झालेले राम माधव यांची मुलाखतही लेखिका चतुर्वेदी यांनी घेतली आहे. त्यात ‘पूर्वग्रह छापील वा चित्रवाणी माध्यमांकडेही असतात. त्यांचं प्रतिबिंब उमटणारच.’ असं समर्थन करतात. असभ्य शब्द आमचे नाहीत, भाजप एकाही जल्पकाला पाठिंबा देत नाही, असं ते निक्षून सांगतात. पण मग मोदी हे अनेक असभ्य, अर्वाच्च जल्पकांचे आजही नित्यवाचक कसे काय, हा प्रश्न उरतो.

भाजपला पूरक किंवा अल्पसंख्याकविरोधी ठरणाऱ्या ‘कैरानातून हिंदूंचे स्थलांतर’ यासारख्या अफवा ट्विटरवरून भाजप-समर्थित जल्पकांनीच उठवल्या, असंही चतुर्वेदी यांनी पुस्तकात साधार नमूद केलं आहे.  पुढल्या काळातही हीच स्थिती राहिली, तर एकंदर कठीण आहे, अशा सुरानंच या पुस्तकाची अखेर होते. या पुस्तकावर ‘एकांगी’ वगैरे नेहमीचे आक्षेप घेतले जाताहेत. पण भाजपबद्दल लेखिकेनं दिलेली माहिती खोटी आहे का, याचं ‘हो’किंवा ‘नाही’मध्ये उत्तर कधीही मिळणार नाही, असं दिसतं.

 

‘आय अ‍ॅम अ ट्रोल’

लेखिका :  स्वाती चतुर्वेदी,

प्रकाशक :  जगरनॉट

पृष्ठे :  १९५, किंमत :  २५० रुपये

‘जगरनॉट अ‍ॅप’वरील ईपुस्तक : ३० रुपये