जयप्रकाश सावंत jsawant48@gmail.com
युक्रेनच्या ओडेसा शहरावर हल्ले होत असतानाही ‘तुझ्या कविता पाठव’ म्हणणारे ज्येष्ठ पत्रकार, साहित्य-संपादक इवगेनी गलुबोव्स्की.. आणि गलुबोव्स्कींशी इल्याची ओळख करून देणारे कवी वलिन्तीन मरोज.. शिवाय, मरोज यांनी वाचायला शिकवलेला कवी ओसिप मांदेलश्ताम.. या साऱ्यांनाच इल्या कामिन्स्की हा मूळचा युक्रेनी कवी आज अमेरिकेतून ‘पाहतो’ आहे..
युक्रेनमध्ये जन्मलेला आणि आता अमेरिकेत वास्तव्य असणारा ४४ वर्षांचा इल्या कामिन्स्की हे एक अजब व्यक्तिमत्त्व आहे. ‘डान्सिंग इन ओडेसा’ आणि ‘डेफ रिपब्लिक’ हे त्याचे दोन प्रकाशित कवितासंग्रह वाचक आणि समीक्षक यांच्याकडून नावाजले गेले आहेत. (‘ओडेसा’ हे युक्रेनमधले शहर आणि ‘डेफ’ यासाठी की चार वर्षांचा असताना झालेल्या गालगुंडांमुळे त्याला ऐकू कमी येते.) त्याने रशियन भाषेतून अनुवाद केलेल्या कवितांचे सहा संग्रह प्रकाशित झाले आहेत. अनेक वर्षे तो ‘वल्र्ड विदाऊट बॉर्डर्स’ आणि ‘पोएट्री इंटरनॅशनल’ या देशांच्या व भाषांच्या सीमा न मानणाऱ्या नियतकालिकांच्या कविता विभागांचे संपादन करत आहे. कामिन्स्कीने आंतरराष्ट्रीय कवितेची काही महत्त्वाची संकलनेही संपादित केली आहेत. शिवाय विस्थापित, अनाथ मुले अशांविषयीच्या सामाजिक कार्यात त्याचा सहभाग असतो. बीबीसीने सार्थपणे २०१९ साली त्याचा जग बदलणाऱ्या बारा कलावंतांत समावेश केला होता.
या कामिन्स्कीने युक्रेनमधील युद्धाच्या संदर्भात काही कवी आणि लेखकांच्या घेतलेल्या मुलाखती ‘पॅरिस रिव्ह्यू’च्या २४ मार्चच्या ब्लॉगवर दिल्या आहेत. त्याच्या सुरुवातीच्या भागात त्याने युक्रेनमधल्या त्याच्या स्वत:च्या वास्तव्यासंदर्भात सांगितलेली एक आठवण अतिशय हृद्य आहे :
तीस वर्षांपूर्वीचा काळ, ऐंशीच्या दशकाचा उत्तरार्ध.
१२ वर्षांचा कामिन्स्की ओडेसातील एका शाळेत शिकत आहे. एक दिवस त्याच्या वर्गाला भेट द्यायला एक प्रकाशक येतात. विचारतात, ‘तुमच्यापैकी कोणाला वर्तमानपत्रासाठी लिहायला आवडेल?’ सर्व हात वर जातात.
हे प्रकाशक, ‘पैसे मिळणार नाहीत’ असे सांगून हाच प्रश्न पुन्हा विचारतात तेव्हा मात्र एकच हात वर राहतो, इल्या कामिन्स्कीचा.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या कार्यालयात कामिन्स्कीची, हातात काठी घेतलेल्या एका वृद्धाशी भेट होते. हे वलिन्तीन मरोज आहेत. कामिन्स्कीने म्हटल्याप्रमाणे युक्रेनियन भाषेतले एक महान कवी. ते त्याच्या बाजूला बसून ओसिप मांदेलश्तामच्या कविता मोठय़ाने वाचत आहेत. काही ओळी वाचताना त्यांचा आवाज थरथरतो. ‘ऐकतोयस ना? ऐकतोयस ना? हा मांदेलश्ताम आहे. ज्याला ‘कुत्तरडा’ म्हणतात तोच हा मांदेलश्ताम. कोणीही या कुत्तरडय़ा कवीइतकं चांगलं लिहू शकत नाही. तुला माहीत आहे ना हा मांदेलश्ताम?’
इल्या ‘नाही’ म्हणतो. मरोज उठून उभे राहतात. इल्याचा हात धरून त्याला इमारतीच्या बाहेर काढतात आणि जवळच्या ट्रामच्या थांब्याकडे नेतात. ऑफिसमधून ट्रामच्या थांब्यापर्यंत, मग ट्राममध्ये आणि नंतर त्यांच्या घरात शिरेपर्यंत ते पूर्ण वेळ त्यांना पाठ असलेल्या मांदेलश्तामच्या कविता म्हणत असतात. इल्या त्यांच्या घरातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या हातात एक पुस्तकांची पिशवी असते आणि मरोज यांच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी, जिच्यावर लिहिलेले असते की त्याने पुढच्या आठवडय़ात मांदेलश्ताम यांच्या काही कविता वाचून पाठ केल्याशिवाय ऑफिसला यायचे नाही.
कामिन्स्की म्हणतो, अशा तऱ्हेने माझे शिक्षण सुरू झाले. (कवी मांदेलश्ताम (१८९१- १९३८) मूळचा पोलंडचा. जर्मनीहून तो रशियात शिकायला आला आणि तिथेच राहू लागला. मात्र १९२२ पासूनच तो साम्यवादी राजवटीला खुपू लागला आणि त्याला एकांतवासात जगावे लागले.)
त्याच वर्षी कामिन्स्कीची ओडेसा शहरातल्या ‘ओडेसा न्यूज’ या वृत्तपत्रातील इवगेनी गलुबोव्स्की या थोर पत्रकाराशीही ओळख झाली होती. ते त्याच्या शाळेत भाषण द्यायला आले होते. मरोज यांनी कामिन्स्कीला आवर्जून गलुबोव्स्कींविषयी काही अधिक माहिती पुरवली. मांदेलश्तामला अखेरची अटक आणि १९३८ साली सैबेरियात असतानाच त्याचा मृत्यू झाल्यानंतरच्या काळात ज्या काही लोकांनी त्याच्या कविता प्रकाशित केल्या, त्यांतले गलुबोव्स्की एक होते. मांदेलश्तामच्या पत्नी नजेझ्दा यांनी सिगारेटच्या पाकिटातल्या पातळ कागदावर टंकलिखित केलेल्या त्याच्या काही अप्रकाशित कविता गलुबोव्स्कींना दिल्या होत्या. त्यावेळची बंदी झुगारून आपण या कविता प्रकाशित करण्याचा मार्ग काढू असे गलुबोव्स्की म्हणाले, तेव्हा नजेझ्दा हसल्या होत्या आणि त्यांनी अविश्वासदर्शक मान हलवली होती. पण गलुबोव्स्कींनी त्या काळात खरेच मार्ग शोधला आणि कविता प्रकाशित केल्या. कामिन्स्की लिहितो, असे आहेत हे गलुबोव्स्की.
युक्रेनमधल्या वाढत्या ज्यूद्वेष्टय़ा वातावरणामुळे कामिन्स्की कुटुंबाने १९९३ साली तिथून बाहेर पडून अमेरिकेत स्थलांतर केले. मरोज नंतर २०१९ साली वारले. पण इल्या कामिन्स्की आणि ८५ वर्षांचे गलुबोव्स्की यांचा परस्परांशी संवाद सुरूच राहिला.
रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीपासून केलेल्या आक्रमणानंतर गलुबोव्स्कींनी कामिन्स्कीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये ओडेसातील हवाई हल्ल्यावेळचे सायरनचे आवाज, भीती आदींचे वर्णन केले आहे. पुढे गलुबोव्स्कींनी लिहिले आहे, ‘पण सध्या सर्व शांत आहे. आज ग्रीष्मातला एक सुंदर दिवस आहे.’
हे सांगताना कामिन्स्की म्हणतो, असेही आहेत गलुबोव्स्की!
कामिन्स्कीने त्यांना विचारले, मी कसली मदत करू? उत्तर आले, ‘ओह्, मला काही नकोय.’
कामिन्स्कीने पुन्हा मी काय करू शकतो विचारल्यावर त्वरित जे उत्तर आले, ते जुलमी सत्ताधीशांपेक्षा त्यांच्या विरोधात उभे राहणाऱ्या कवींना थोर मानणाऱ्या सर्वाना दिलासा देणारे आहे.
गलुबोव्स्कींनी लिहिले आहे, ‘पुतिन येतील आणि जातील. आम्ही इथे एक लिटररी मासिक काढतोय, त्याच्यासाठी तुझ्या कविता पाठव.’