मराठाकालीन लढायांपासून ते ‘गोवामुक्ती’पर्यंतच्या मोहिमांचा अभ्यास करून ‘सेनादलांच्या संपूर्ण क्षमतांचा आपण कधी वापरच केला नाही’, किंवा ‘तीन सेनादलांत अधिक संवाद हवा’, असे परखड निष्कर्ष काढणारे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. एका विद्यमान हवाईदल अधिकाऱ्यांनी ते लिहिले असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे..
भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धांवर आजपर्यंत स्वतंत्रपणे आणि विस्तृत बरेच लिखाण झाले आहे. पण त्यात प्रामुख्याने तात्कालीन सेनाधिकाऱ्यांनी आपापल्या अनुभवांवर आधारित, काहीशा मर्यादित दृष्टिकोनातून लिहिलेली वर्णने आहेत. विद्यापीठीय पंडित आणि लष्करी अधिकारी या दोन्ही प्रकारच्या लिखाणात समग्र दृष्टीचा अभाव जाणवतो. त्यातही लष्करी इतिहास (मिलिटरी हिस्टरी) या दृष्टीने भारतात आजवर फारसे लिखाण झालेले नाही. परदेशांप्रमाणे मिलिटरी हिस्टरी ही विद्याशाखाही भारतात नावारूपास आलेली नाही. अगदी सेनादलांच्या आणि रेजिमेंट्सच्या नोंदींमध्येही सातत्य आणि परिपूर्णता नाही. तसेच त्या-त्या वेळच्या कारवाया आणि युद्धांतून घेतलेले धडे संकलित करून त्यातून एक राष्ट्रीय धोरण (डॉक्ट्रिन) तयार करण्याचा प्रयत्न झालेला दिसत नाही. त्यामुळे भारतात सामरिक संस्कृती (स्ट्रॅटेजिक कल्चर) रुजू शकलेले नाही. तिन्ही सेनादलांतील समन्वयाचा अभाव हीदेखील गंभीर बाब आहे. यापुढील लष्करी कारवायांत त्याची अधिकाधिक गरज भासणार आहे. लष्करी भाषेत ज्याला ‘जॉइंटमनशिप’ किंवा ‘ट्राय सव्र्हिस इथोस’ म्हणतात ते पुरेशा प्रमाणात विकसित झालेले नाहीत. या उणिवांकडे एअर व्हाइस मार्शल अर्जुन सुब्रमण्यम यांनी आपल्या ‘इंडियाज वॉर्स- अ मिलिटरी हिस्टरी १९४७-१९७१’ या ताज्या पुस्तकात लक्ष वेधले आहे. त्यांच्या पुस्तकाने ही उणीव काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जुन सुब्रमण्यम भारतीय हवाई दलात एअर व्हाइस मार्शल पदावर कार्यरत असून त्यांच्याजवळ मिग-२१, मिराज-२००० अशा लढाऊ विमानांच्या उड्डाणाचा, हवाई दस्त्यांच्या नेतृत्वाचा, हवाई दलाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. डिफेन्स अॅण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज या विषयात त्यांनी पीएचडी मिळवली असून अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून विस्तृत लिखाण केले आहे.
पुस्तकात कोणताही गौप्यस्फोट किंवा नवी माहिती उघड केल्याचा दावा नाही. पण उपलब्ध माहिती वेगळ्या संदर्भात सांगड घालून मांडली आहे आणि ती उपयुक्त ठरली आहे. त्या अनुषंगाने लेखकाची मांडणी आणि कथनशैली ही या पुस्तकाची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताची एक समर्थ लोकशाही म्हणून जी वाटचाल झाली त्यात सेनादलांचे भरीव योगदान आहे, याकडेही लेखकाने लक्ष वेधले आहे. आझाद हिंद फौजेच्या देशप्रेम आणि त्यागाबद्दल संपूर्ण आदर राखूनही असे म्हटले आहे की, उठावानंतर या सैन्याला देशाच्या स्वातंत्र्योत्तर सैन्यात सामावून घेतले गेले नाही. त्यात लष्करी शिस्तीचा भाग होता. किंबहुना या कठोर धोरणामुळेच शेजारी देशांच्या तुलनेत भारतीय सेनादले राजकारणापासून दूर राहिली आहेत आणि ती भारतीय लोकशाहीची एक शक्ती आहे. युद्धांचे उच्च पातळीवरील व्यूहात्मक (स्ट्रॅटेजिक), प्रत्यक्ष युद्धभूमीवरील डावपेचात्मक (ऑपरेशनल अॅण्ड टॅक्टिकल) आणि मानवी (ह्य़ूमन) पैलू व्यापक वाचकवर्गासाठी प्रवाही आणि वाचनीय पद्धतीने मांडण्यातील लेखकाची हातोटी वादातीत आहे.
मुघल सत्तेच्या ऱ्हासानंतरच्या काळातील भारत, मराठा साम्राज्य, शीख आणि अन्य सत्ता, ब्रिटिशांचे राज्य, पहिले आणि दुसरे महायुद्ध, स्वातंत्र्य चळवळ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना, नाविक आणि वैमानिकांचे उठाव, स्वातंत्र्यप्राप्ती, संस्थानांचे विलीनीकरण या संक्रमणांतून झालेली तिन्ही सेनादलांची उत्क्रांती, जडणघडण आणि विकास याने पुस्तकाचा सुरुवातीचा भाग व्यापला आहे. त्यानंतर हैदराबाद व गोवामुक्ती कारवाया, जम्मू-काश्मीरवरील नियंत्रणासाठी झालेले १९४७-४८ सालचे युद्ध, १९६२ सालचे चीनबरोबरचे युद्ध, १९६५चे भारत-पाक युद्ध आणि बांगलादेशमुक्तीसाठी लढले गेलेले १९७१ सालचे युद्ध असा भाग आहे. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात लेखकाने कौटिल्याची कूटनीती भारताच्या आधुनिक काळातील सुरक्षेच्या संदर्भात कशी प्रस्तुत आणि उपयोगी आहे, हे सांगितले आहे. अखेरीस उपसंहार, अधिक वाचनासाठीच्या सूचना, संदर्भ व टिपा आहेत. यातील ७० पाने संदर्भसूची आहे. त्यातून लेखकाने संशोधनासाठी घेतलेल्या मेहनतीचा प्रत्यय येतो.
खास लष्करी भाषेतील कथनशैली हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़. उदाहरणादाखल विमानचालनाच्या (एव्हिएशन) सुरुवातीच्या दिवसांत वैमानिकांमध्ये एक शब्दसमूह प्रचलित होता- ‘सीट ऑफ द पँट्स फ्लाईंग’. त्याचा अर्थ अगदी अश्लील नसला तरी फारसा शिष्टसंमतही नाही. साधारण १९३०-४०च्या काळातील विमाने तांत्रिकदृष्टय़ा तितकीशी प्रगत नव्हती. हिमालयाच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये उड्डाणे करताना त्यांच्या यंत्रणा फारशा नीट चालत नसत. जोराचे थंड वारे, कमी दृश्यमानता यांचा सामना करताना वैमानिकांची कसोटी लागे. अशा वेळी कोणतीही बाह्य़ आणि तांत्रिक मदत उपलब्ध नसताना केवळ आपल्या अंत:प्रेरणेवर विसंबून राहून (ड्रायव्हर्सच्या भाषेत ज्याला गाडीचे जजमेंट म्हणतात) परिस्थितीतून मार्ग काढावा लागे. ‘गट फीलिंग’शी मिळताजुळता त्याचा अर्थ आहे. भारतीय हवाई दलातील सुरुवातीच्या काळातील बाबा मेहर सिंग, हृषिकेश मूळगावकर, अॅस्पी आणि मिनू इंजिनीअर, मिकी ब्लेक, बर्टी यांसारख्या लढवय्या वैमानिकांनी (यातील काही पुढे हवाईदल प्रमुख झाले) गिलगिट, स्कार्दू, लडाखच्या पर्वतराजींवर जीव धोक्यात घालून जी उड्डाणे केली त्या संदर्भात हा वाक्प्रचार वापरला आहे.
स्वतंत्र भारताने आजवर लढलेल्या युद्धांतून एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते, ती म्हणजे युद्ध चिघळेल या भीतीने सेनादलांच्या संपूर्ण क्षमतांचा आपण कधी वापरच केला नाही. जम्मू-काश्मीरमधील सुरुवातीचे युद्ध, चीनचे आक्रमण, कारगिल युद्ध या वेळी हवाई दलाचा वापर करण्यास आपण कचरलो किंवा तो उशिरा केला. युद्धात कमावले पण वाटाघाटींत गमावले, असेही अनेकदा घडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आक्रमक ठरू नये, आपली अहिंसावादी प्रतिमा डागाळू नये यासाठी आपले राजकीय नेतृत्व गरजेपेक्षा जास्त सावध होते. त्याचा प्रत्यय काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेणे, तसेच हैदराबाद मुक्तीसाठी सैन्याचा वापर होऊनही त्याला पोलीस कारवाई म्हणून संबोधणे, गोवामुक्तीसाठी स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे जावी लागणे आणि त्यासाठी आपल्या मनात अपराधीपणाची जाणीव असणे यातून येतो. यासाठी एक कारण असू शकते. दुसऱ्या महायुद्धाच्या आणि त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळातील जागतिक स्तरावरचे विस्टन चर्चिल, माऊंटबॅटन, आयसेनहॉवर, हो-ची-मिन्ह, माओ-त्से-तुंग असे अनेक नेते प्रत्यक्ष युद्धभूमीवर तावूनसुलाखून घडले होते. नेहरू, गांधी, पटेल यांच्यासारखे भारतीय नेते अहिंसेच्या मुशीत, नागरी आंदोलनांतून आणि वास्तववादापासून काहीशा तुटलेल्या स्वप्नाळू आदर्शवादातून तयार झाले होते. त्यामुळे राज्याची (स्टेट) दंडशक्ती वापरण्याबाबत त्यांच्या मनात संदेह किंवा अपराधीपणा होता. याचा फटका देशाच्या सुरक्षेला बसला, याकडेही लेखकाने लक्ष वेधले आहे.
पुस्तकात काही लहानसहान त्रुटी आहेत. मराठय़ांच्या इतिहासाबद्दल पुस्तकात अत्यंत आदराने उल्लेख आले आहेत. पण शिवाजी महाराजांच्या शासनकाळात मराठी सत्ता शिखरावर असताना दक्षिणेच्या पठारावरील सध्याच्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बहुतांश भूभाग त्यांच्या अमलाखाली होते, असा एक उल्लेख (पान ३१ वर) आहे. वास्तविक शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य शहाजी महाराजांच्या पुणे, सुपे, चाकण, इंदापूर आणि तंजावर या जहागिऱ्या आणि सह्य़ाद्रीच्या कुशीतील आणि कोकणातील चिंचोळी पट्टी एवढय़ापुरते मर्यादित होते. त्याचा पुढे विस्तार होत गेला.
लेखकाने म्हटले आहे की, १८५७च्या राष्ट्रीय उठावानंतर ब्रिटिशांच्या मनात विशेषत: मराठे आणि बंगाली यांच्याबद्दल क्रांतिकारी जनसमूह म्हणून धडकी भरली होती. त्यामुळे भारतीय लष्करातील रेजिमेंट्सची उभारणी लढाऊ जमातींवर आधारली असली तरी मराठे आणि बंगाली यांचा सहभाग १८५७ नंतर केवळ ‘सॅपर्स’ म्हणजे लष्करी अभियंत्यांच्या तुकडय़ांपुरताच मर्यादित ठेवण्यात आला. तसे असेल तर ‘मराठा लाइट इन्फंट्री’च्या मोठय़ा इतिहासाचा मेळ लागत नाही. ‘मराठा लाइट इन्फंट्री’ची पहिली तुकडी ‘जंगी पलटण’च्या रूपात १७६८ साली स्थापन झाली आणि त्यानंतर तिचा व्याप आणि कीर्ती वाढतच गेली. महार रेजिमेंटच्या माध्यमातूनही मराठय़ांनी मोठा पराक्रम गाजवला आहे. पण या रेजिमेंटच्या तुकडय़ा १८९२ आणि १९२१ साली बंद केल्या गेल्या. १९४१ साली महार रेजिमेंट नव्याने उभी करण्यात आली.
जम्मू-काश्मीरच्या युद्धात १९४८च्या उन्हाळ्यात पाकिस्तानने पूंछ भागात २५ पौंडांच्या तोफा, ४.२ इंचांच्या उखळी तोफा आणि ३.७ मिलीमीटरच्या हॉवित्झर तोफा दाखल करून आपली स्थिती भक्कम केली असा उल्लेख (पान १४८ वर) आहे. येथे ३.७ मिलीमीटरच्या हॉवित्झर तोफा हा उल्लेखही अनवधानाने चुकीचा झाला असावा. कारण तोफांचा व्यास ३.७ मिलीमीटर इतका, म्हणजे बंदुकीच्या गोळीपेक्षा कमी असणे शक्य नाही. तेथे क्यूएफ ३.७ इंची हॉवित्झर प्रकारच्या डोंगराळ प्रदेशात वापरावयाच्या तोफा असा उल्लेख अपेक्षित असावा. या झाल्या किरकोळ त्रुटी. पण स्वतंत्र भारताचा लष्करी इतिहास म्हणून हे पुस्तक पुरेसे आणि परिपूर्ण आहे म्हणता येणार नाही. लेखकाने समावेश केलेला कालखंड आणि पुस्तकाचा आवाका मोठा आहे. त्याबद्दल कौतुकच. पण बांगलादेश मुक्तीयुद्धानंतरचे सियाचीन हिमनदी परिसरातील संघर्ष , भारतीय शांतीसेनेच्या श्रीलंकेतील कारवाया, मालदीवच्या उठावात बजावलेली भूमिका, कारगिल युद्ध, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येतील फुटीर कारवायांविरुद्ध भारतीय लष्कराची कामगिरी आणि आता नव्या युगात उभे ठाकलेले असमान युद्ध (इरेग्युलर वॉरफेअर) आणि ‘नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर’ यांचे आव्हान अशा बाबींचा समावेश झाल्यास पुस्तक अधिक परिपूर्ण बनू शकेल. पुस्तकाचा विस्तार प्रमाणाबाहेर होण्याच्या शक्यतेमुळे हे टाळले असावे. पण किमान दुसऱ्या खंडात हे विषय हाताळले जाणे अपेक्षित आहे. त्याबाबत निश्चित असे काही पुस्तकात म्हटलेले नाही.
या विषयाच्या अनुषंगाने एक बाब, पुस्तकात नसली तरीही, नमूद करावीशी वाटते. सेनादलांच्या शौर्य आणि बलिदानाबद्दल पुरेसा आदर बाळगूनही, व्यापक पातळीवर सेनादलांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होणे गरजेचे आहे. दरवेळी परिस्थिती प्रतिकूल होती, साधनसामग्रीचा अभाव होता, हल्ला अचानक झाला होता अशी कारणे देऊन सेनादलांना आपले हात झटकून सर्व जबाबदारी राजकीय नेतृत्वावर टाकता येणार नाही. १९४७-४८च्या युद्धात देशाचे सर्वोच्च लष्करी नेतृत्व ब्रिटिश होते, त्यांनी आपले हितसंबंध जपण्यासाठी भारताच्या हिताकडे दुर्लक्ष केले हे समजू शकते. पण जम्मू-काश्मीर संस्थानावर हल्ला होणार असल्याच्या योजनेची (ऑपरेशन गुलमर्ग) माहिती पाकिस्तानी लष्कराच्या बानू ब्रिगेडमधील मेजर ओंकार सिंग कालकत या हिंदू अधिकाऱ्याने भारतात पळून येऊन दिली होती. चिनी हल्ल्यापूर्वीही आक्रमकतेचे संकेत मिळत होते. प्रत्येक वेळी आपण कसे निद्रावस्थेत पकडले जातो. चिनी आक्रमणावेळची लष्कराची पडझड किती प्रत्यक्ष होती आणि किती मनोवैज्ञानिक होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला केव्हा ना केव्हा समाधानकारकरीत्या द्यावी लागतील. त्यासाठी लष्करी इतिहास लिहिला जाणे, हेंडरसन-ब्रुक्स-भगत समितीच्या अहवालासारखी अन्यही कागदपत्रे खुली होणे आवश्यक आहे. तेव्हाच निकोप मूल्यमापन होऊन राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि संस्कृती आकार घेऊ शकेल. लेखकाने या मार्गावरील पहिले पाऊल उचलणे म्हणूनच कौतुकास्पद आहे. सामान्य वाचक तसेच अभ्यासक आणि समीक्षक यांच्यासाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि संग्राह्य़ आहे.
गणवेशधारी सभ्यतेचे उपकार..
भारतीय सेनादलांबाबत अत्यंत सकारात्मक भावना इटलीच्या दक्षिण किनाऱ्यावरील तरांतो या शहरातील नागरिकांची आहे. भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने ती नुकतीच इंटरनेटवरील इतिहासविषयक याहू ग्रुपवर व्यक्त केली होती. अर्जुन सुब्रमण्यम यांच्या ‘इंडियाज वॉर्स- अ मिलिटरी हिस्टरी १९४७-१९७१’ मध्ये ती समाविष्ट केली आहे. हा नौदल अधिकारी १९६७ साली आयएनएस ब्रह्मपुत्रा या भारतीय युद्धनौकेवर तैनात होता. त्यांची युद्धनौका ग्रीसला जात होती पण ग्रीसमध्ये त्या वेळी राजे कॉन्स्टंटाइन यांच्याविरुद्ध बंड झाल्याने युद्धनौका इटलीकडे वळवून तरांतो बंदरात धक्क्याला लावली. भारतीय नौका बंदरात दाखल झाल्याचे कळताच उत्साही शहरवासीयांचे लोंढेच्या लोंढे बंदरावर जमा झाले. त्यांनी भारतीयांचे स्वागत करण्यासाठी फुले, रोषणाई, पताका, फलक, वाद्यवृंद अशी जय्यत तयारी केली होती. नौकेवरील कर्मचाऱ्यांना शहरात घरोघरी मेजवानीची आमंत्रणे येऊ लागली. भारतीय नाविकांनाही हा प्रकार उमजेनासा झाला. या नौदल अधिकाऱ्याला आइन्स घोष या महिलेच्या घरी भोजनाचे निमंत्रण मिळाले. दुसऱ्या महायुद्धात तरांतो येथे युद्धकैदी असलेले भारतीय नौदलातील निवृत्त शल्यविशारद आणि रिअर अॅडमिरल जे. एन. घोष यांच्याशी आइन्स यांनी विवाह केला होता. त्यांच्या घरी जेवताना या नौदल अधिकाऱ्याला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील हृद्य आठवणी उलगडल्या जाऊ लागल्या. फॅसिस्ट मुसोलिनीचा इटली दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी मुक्त करण्यास सुरुवात केली होती. जुलै १९४३ मध्ये इटलीत ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत आणि अन्य देशांचे संयुक्त सैन्य उतरले. २४ सप्टेंबर १९४३ रोजी तरांतो मुक्त केले गेले. पण त्यानंतर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी इटलीत धुमाकूळ घातला. स्थानिकांची मालमत्ताच नव्हे, तर अनेक महिलांची अब्रू लुटली. पण तरांतोच्या नागरिकांनी अभिमानाने सांगितले की हे सगळे करण्यात भारतीय सैनिक नव्हते. उलट भारतीय सैनिकांनी अन्य देशांच्या सैनिकांना तसे करण्यापासून रोखले. प्रसंगी त्यांच्याशी लढूनही इटलीच्या नागरिकांना संरक्षण दिले, त्यांच्या लेकी-सुनांची अब्रू वाचवली. इटलीचे, विशेषत: तरांतोचे नागरिक भारतीय सैनिकांचे हे उपकार आजही विसरलेले नाहीत. त्यामुळेच १९६७ साली अचानक भारतीय नौदलाचे जहाज त्यांच्या किनाऱ्यावर लागताच नागरिकांना प्रेमाचे उत्स्फूर्त भरते आले. आयएनएस ब्रह्मपुत्राच्या कर्मचाऱ्यांचा तरांतोच्या टाऊन हॉलमध्ये सत्कार करण्यात आला आणि ते पुढील प्रवासाला निघाले तेव्हा निरोप देण्यासाठी अख्खे शहर बंदरावर लोटले होते.*
त्यापुढील गोष्ट म्हणजे सध्या इटलीच्या एन्रिको लेक्झी या जहाजावरील दोन नौसैनिकांनी केरळच्या किनाऱ्याजवळ दोन भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालून मारल्याचे प्रकरण गाजत आहे. त्या मृत मच्छीमारांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी तरांतोच्या मेयरनी दाखवली आहे.
(* ‘इंडियाज वॉर्स’ या पुस्तकाआधारे)
इंडियाज वॉर्स- अ मिलिटरी हिस्टरी
१९४७-१९७१,
लेखक : अर्जुन सुब्रमण्यम,
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स इंडिया,
पृष्ठे : ५६२, किंमत : ७९९ रुपये.
– सचिन दिवाण