सामाजिक शास्त्रं आणि भाषाविज्ञान, सौंदर्यशास्त्र यांनी मिळून बनणाऱ्या ‘मानव्यविद्या’ शाखेकडे आपणा भारतीयांचं किती दुर्लक्ष असतं याची एक खूण म्हणजे, ‘होमी के. भाभा’ हे नाव आपल्याला माहीत नसणं. आपल्याला आपल्या देशाच्या अणू कार्यक्रमाचे उद्गाते म्हणून होमी जहांगीर भाभा माहीत असतात; पण ‘संस्कृत हीच भारताची एकमेव राष्ट्रभाषा का नको?’ किंवा ‘भारतात फोफावलेली पाश्चात्त्य शिक्षणपद्धती समूळ उपटून काढून आपण त्या जागी गुरुकुल पद्धती का नाही आणत?’ अशा आपल्यापैकीच काही जणांना आपल्याच देशाबद्दल तळमळीनं पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरं का असू शकत नाहीत (किंवा ती खरंच शोधली तर त्यातून काय काय निघेल) हे समजून घेण्याची दृष्टी देऊ करणारे होमी के. भाभा हे आपल्याला माहीतच नसतात!

वरचं वाक्य पुन्हा वाचावं लागलं तरी हरकत नाही. सध्या तरी होमी के. भाभा हे आपल्याला माहीत नसतात, एवढंच त्यातून लक्षात ठेवू या (माहीत असले तर उत्तमच, पण प्रस्तुत लिखाण अखेर वर्तमानपत्री आहे). हे होमी के. भाभा पद्मभूषण (२०१२) किताबाने सन्मानित आहेत आणि नुकतंच त्यांना ‘हम्बोल्ट प्राइझ’ जाहीर झालं आहे. जर्मनीतल्या हम्बोल्ट फाऊंडेशनतर्फे दरवर्षी १०० विद्वानांना काही ना काही फेलोशिप वगैरे मिळत असलं, तरी त्या संस्थेचा जो काही सर्वोच्च पुरस्कार असतो, तो या होमी के. भाभांना मिळाला आहे. ‘ग्रंथमानव’ हे सदर अधूनमधून प्रकटणारं असलं तरी, लिखाणामुळेच जगभर ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींची विशेष दखल घेणाऱ्या या सदरात होमी के. भाभांबद्दल लिहिण्यासाठी एवढं निमित्त पुरेसं आहे. यापुढल्या मजकुरात आपण त्यांना ‘भाभा’च म्हणू.

वसाहतोत्तर (पोस्टकलोनिअल) संस्कृतींचे अभ्यासक म्हणून होमी के. भाभा ओळखले जात असले, तरी मुळात ते भाषा आणि साहित्य यांचे अभ्यासक. भाषाविज्ञानातून समाजाकडे पाहण्याची जी दृष्टी मायकल फुको, जाक डेरिडा आदी पाश्चात्त्य (फ्रेंच) विद्वानांनी दिली, त्यांच्या पुढल्या पिढीतले भाभा. केवळ शब्दांकडे नव्हे तर चित्र-शिल्पांसह सर्व प्रकारच्या अभिव्यक्तींकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ‘मजकूर आणि संदर्भ’ यांच्या अभिक्रियांकडे अभ्यासू नजरेनं पाहणाऱ्या भाभा यांच्यावर- ते मूळचे मुंबईत जन्मले/ वाढलेले आणि मुंबईच्याच एल्फिन्स्टन कॉलेजात शिकून पुढे ऑक्सफर्डला शिकायला गेल्यामुळे- वसाहतोत्तरवाद ‘लादला’ गेला की काय, हे चटकन समजण्यास मार्ग नाही. मात्र, संस्कृती व समाज यांच्या अभ्यासासाठी पाश्चात्त्य संकल्पना पुरेशा नाहीत अशी एडवर्ड सैद यांच्या लिखाणापासून पुढे जात राहिलेली वसाहतोत्तरवादाची (पाश्चात्त्यांच्या दृष्टीनं) ‘समांतर’ रेषा, हाच आपला हमरस्ता असं भाभांनी ठरवल्याचं त्यांच्या लिखाणातून दिसतं. या हमरस्त्यामार्गे ते अनेक ज्ञानप्रांतांमध्ये मुशाफिरी करतात. त्यामुळेच, डेरिडाची ‘अदर’ ही संकल्पना एका मर्यादेनंतर कुचकामी आहे, हे भाभांनी दाखवून दिलं. आता डेरिडाचा ‘अदर’ किंवा ‘ज्याबद्दल परात्मभाव आहे तें/ती/तो’ हा मुळात संस्कृतीअभ्यास, साहित्याभ्यास आणि ‘बंडखोरी’ची संकल्पना अभ्यासणं या शाखांमधला; पण ‘अदर’ सतत बदलू शकतो, तो तुमच्यासारखाच होऊ शकतो, तेव्हा तुम्ही पुन्हा बदललेले असता का, अशा स्वरूपाचा प्रश्न भाभांच्या लिखाणातून आला. ‘अदर’ला अचल मानल्यास पुढे त्यावर ‘आयडेंटिटी’ चढते, हे भाभांनी दाखवून दिलं.

भाभा हे चित्र/शिल्पादी दृश्यकलांच्या क्षेत्रांत दबदबा राखून आहेत, त्याचाही संबंध त्यांच्या सैद्धान्तिक कर्तृत्वाशी आहे. ‘आपण भारतीयच पद्धतीनं चित्रं काढायची’ असा मुलाहिजा पार सोडून देण्याची धमक वीसेक वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या तरुण चित्रकारांमध्ये ठामपणानं आली आणि लहानपणापासून हिंदी-इंग्रजी सिनेमे पाहिलेली ती दृश्यकलावंतांची पिढी ‘माझी प्रतिमासृष्टी ‘हायब्रीड’ आहे’ असं म्हणू लागली, तेव्हा त्यातला ‘हायब्रीड’ हा शब्द थेट भाभांचाच होता. मुंबईत १९९६ आणि ९७ साली (तेव्हा विद्यार्थी असलेल्या वा तरुण) चित्रकारांनी भाभांची परिसंवादांतली भाषणं ऐकली, त्याआधी ‘नेशन अ‍ॅण्ड नॅरेशन’ (१९९०, संपादित) आणि ‘द लोकेशन ऑफ कल्चर’ (१९९४) ही भाभांची पुस्तकं प्रकाशित होऊन आपल्याकडल्या अभ्यासकांपर्यंत झिरपली होती. भारताला १९४७ साली मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव जवळ आलेला असतानाच्या काळात, भाभांनी मांडलेल्या ‘संस्कृती’, ‘सांस्कृतिक वैविध्य’ आणि ‘राष्ट्रीयत्व’ यांविषयीच्या नव्या विचारांची चर्चा जगभरच्या विद्वानांमध्ये होती. हे नवे विचार कोणते?

‘संस्कृती’ ही जगताजगताच तयार होत असल्यामुळे ती ‘काय आहे’ हे सांगितलं जाणं किंवा तिला घट्ट रूपात बांधण्याचा प्रयत्न करणं, हा मुळातच ‘सांगणाऱ्या’च्या दृष्टिकोनाचा मामला असतो.. (इथं, सावरकर ते नेहरू, साने गुरुजी ते गोळवलकर गुरुजी, टिळक ते गांधी यांचं संस्कृतीविषयक चिंतन/लिखाण आठवून पाहा) दुसरं असं की, ‘सांगणारे’ कोण आहेत किंवा ‘सांगण्याचा हक्क’ (राइट टु नॅरेट) कोणाला मिळतो आहे, हेही महत्त्वाचं किंवा प्रभावकारक ठरत असतं.. (इथं याआधीच्या कंसातल्या नेतेमंडळींना दीड सेकंदांपुरतं विसरा आणि हल्लीच्या खासदार साध्व्या, मंत्री अभिनेत्री किंवा ‘भारत’ टोपणनावाच्या अभिनेत्याला मिळालेलं ‘भारतरत्न’ हे आठवून पाहा) ..याखेरीज ‘सांस्कृतिक भिन्नता’ आणि ‘सांस्कृतिक वैविध्य’ यांतही फरक करता येईल : सांस्कृतिक भिन्नता जेव्हा स्पष्ट असते तेव्हा सहजीवन कप्पेबंद असू शकतं; ‘सांस्कृतिक वैविध्या’च्या स्थितीत मात्र संस्कृतिसंकर आणि तरीही भिन्नता टिकवण्याचा ध्यास यांचे ताणतणाव पाहायला मिळतात (आता इथं, आपलाच मोबाइल मुळात कोणत्या देशातला आहे, त्यावर कोणकोणत्या संस्कृतींतल्या काय काय प्रतिमा आहेत, हे पाहिलंत तरी पुरे!) या ताणतणावांतून घडणाऱ्या ‘राष्ट्रीयत्वा’कडे पाश्चात्त्य दृष्टिकोनातून पाहता येणं कठीण आहे- राष्ट्रीयत्वाची भावना ‘संक्रमणावकाशा’त (‘लिमिनल स्पेस’मध्ये) असू शकते, हे समजून घ्यावं लागेल.. संस्कृती आणि राष्ट्र यांचा जो संबंध आपल्याला पटला होता, तो आता पटतो का याची तपासणी करणारा ‘तिसरा अवकाश’ तयार होतो आहे.. असं सगळं भाभा सांगत होते. हे विचार इथं खूप सुलभ करून सांगण्याच्या प्रयत्नामुळे जुने वाटतील, पण त्यासाठी भाभांनी वापरलेल्या संकल्पना (हायब्रिडिटी, एनन्सिएशन, मिमिकरी, लिमिनल स्पेस, थर्ड स्पेस) या विचारांची नवी कवाडं उघडून देणाऱ्या आहेत. भाभांच्या एकंदर प्रतिपादनातून ‘पोस्टनॅशनलिस्ट’ विचारांचा प्रत्यय येत असला, तरी अशा एखाद्या ‘वादा’चा शोध लावणं हे त्यांनी स्वत:चं काम मानलेलं नाही/नसावं. भाभा हे असलेल्यांचा नव्या वादांचा अपुरेपणा दाखवत, पाश्चात्त्यांपल्याडच्या जगाच्या प्रश्नांशी भिडत आहेत. संस्कृती कशी आहे, हे भाभांच्या लेखी भले ‘कल्पित’ असेल; मानवी मूल्यं ही ‘रचित’ आहेत असंही ते सुचवत असतील.. पण मूलत: ते या वास्तवाच्या बाजूनं किंवा विरोधातले नाहीत. वास्तव पाहून सैद्धान्तिक ज्ञानाची फेररचना करत राहणं, त्यासाठी आवश्यक भासणारी आयुधं तयार करणं, हे त्यांचं काम. ते भाभा आवडीनं करत आहेत!

 

अभिजीत ताम्हाणे
abhijeet.tamhane@expressindia.com