|| गिरीश कुबेर
मुल्ला ओमरचा इस्लाम आणि लादेनचा इस्लाम निराळे आहेत, इथपासून ते मुल्ला ओमर कोणत्या परिस्थितीत मेला इथवरची बेट्टी डॅम यांची निरीक्षणे इतरांपासून फटकून असणारी आहेत… पण ती त्यांच्या अस्सल शोधावर आधारलेली असल्याने हे पुस्तक वाचनीय ठरते…
बेट्टी डॅम यांचे ‘र्लुंकग फॉर द एनिमी : मुल्ला ओमर अॅण्ड द अननोन तालिबान’ हे अप्रतिम पु्स्तक त्या परिसरात आणि एकूणच जागतिक राजकारणात रस असणाऱ्यांसाठी अत्यावश्यक वाचन ठरते. असे म्हणण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे हे पुस्तक या दुर्दैवी देशाविषयीच्या रक्तरंजित वर्तमानाचा प्रचलित इतिहास पूर्णपणे कालबाह्य ठरवते. हा इतिहास प्राधान्याने दोन पायांवर उभा आहे. यातील एक पाय म्हणजे अहमद रशीद यांचे लेखन. १९७९ साली अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाच्या फौजा जेव्हा घुसल्या तेव्हा त्या प्रदेशाचे जिवंत वार्तांकन करणाऱ्या काही मोजक्या पत्रकारांतील एक म्हणजे रशीद. त्यांची ‘तालिबान’ आणि नंतर ‘डिसेंट इन्टु केऑस’ ही दोन प्रमुख पुस्तके. ती वाचून प्रभावित न झालेली व्यक्ती विरळा. रशीद हे अनेक बड्या पाश्चात्त्य नियतकालिकांत नियमित लेखन करतात. त्यांच्या माध्यमी आणि ग्रंथलेखनाचा माग ठेवणाऱ्यांत प्रस्तुत लेखकाचाही समावेश आहे. रशीद मूळचे पाकिस्तानी. त्यामुळेही असावे, पण त्यांचे बरेचसे लेखन त्या देशाच्या नजरेतून झालेले आहे. रशीद यांच्याप्रमाणे बहुसंख्य पाश्चात्त्य अफगाण भाष्यकारदेखील त्याच दिशेने मांडणी करतात. ती अमेरिकाकेंद्री असते. म्हणजे तालिबानला घडवण्यात असलेला पाकिस्तानचा हात, तालिबान आणि अल कईदा यांचे कथित साटेलोटे आणि तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमर आणि अल कईदाचा ओसामा बिन लादेन यांचा दोस्ताना, सौदी अरेबियाकडून आणि म्हणून इस्लामच्या ‘वहाबी’ पंथांकडून तितक्याच कडव्या ‘तालिबानी’ इस्लामला कशी मदत होते वगैरे.
बेट्टी डॅम आपल्या पुस्तकातून या सर्व मांडणीतील फोलपणा दाखवून देतात. अफगाणिस्तान, सीरिया आणि इराक या देशांत पत्रकारिता करण्यात त्यांची हयात गेली. तरीही अन्य अनेकांप्रमाणे त्या दुर्लक्षित राहिल्या. याचे कारण त्या अमेरिकी वा इंग्लिश माध्यमसमूहाचे प्रतिनिधित्व करीत नव्हत्या. बेट्टी डॅम या मूळच्या डच. त्याच देशातील माध्यमगृहासाठी त्यांनी पत्रकारिता केली. अफगाणिस्तानातील अमेरिकी, ब्रिटिश पत्रकार आणि बेट्टी यांच्यातील मुख्य फरक म्हणजे पहिल्या गटातील पत्रकारांप्रमाणे त्या अशा गटाचा भाग झाल्या नाहीत. ही ‘गट पत्रकारिता’ किती धोकादायक आणि फसवी असते याची असंख्य उदाहरणे आपल्याकडेही आढळतील. हे गटी पत्रकार मुख्य माहितीसाठी अमेरिकी सूत्रांवर प्रामुख्याने अवलंबून असत. या प्रांतात अमेरिकी लष्कराने पत्रकारितेचा एक नवा प्रकार विकसित केला. ‘एम्बेडेड जर्नालिस्ट’ या नावाने तो ओळखला जातो. म्हणजे ‘ओवलेले पत्रकार’. लष्करी मोहिमांत संबंधित देश पत्रकारांना सैनिकांबरोबर ‘ओवून’ पाठवतात. हेतू हा की मोहिमांची ‘योग्य’ माहिती पत्रकारांस, आणि त्याद्वारे जगास, दिली जावी. ही माहिती अर्थातच एकतर्फी असते. पण तोच तर त्याचा हेतू असतो. सेमूर हर्ष यांच्यासारखा एखादा पत्रकार या सरकारी पत्रकारांत स्वत:ला ‘ओवून’ घेत नाही आणि म्हणून आपल्याच देशाचा ‘हुआंतानामो बे’सारखा गैरप्रकार उघडकीस आणू शकतो. बेट्टी डॅम या त्या जातकुळीतील. सरकारी सूत्रे, प्रवक्ते आदींवर फार विश्वास न ठेवता आपली माहिती स्वत: खणून काढण्यावर त्यांचा भर. असे करण्यात बरेच नवे काही हाताला लागण्याची संधी जशी असते तसाच धोकाही तितकाच असतो. पण तो स्वीकारणे हीच तर खरी नशा. ख्रिस्ती धर्मगुरूंचे लैंगिक अत्याचार उघडकीस आणणाऱ्या ‘बोस्टन ग्लोब’ या वर्तमानपत्राच्या पत्रकारितेवर आधारित नितांतसुंदर ‘स्पॉटलाइट’ सिनेमात संपादक मार्टी बॅरन म्हणतो : आपले नियत कर्तव्य उत्तमपणे पार पाडायचे असेल तर वर्तमानपत्राने (आणि पत्रकारांनीही) एकटे काम करायला शिकायला हवे. म्हणजे घोळक्यात राहण्याची गरज नाही. बेट्टी यांची पत्रकारिता या तत्त्वावर आधारित आहे. म्हणून त्या अफगाणिस्तानात थेट तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमर याच्याच मागावर निघतात. या प्रवासाचे उत्कृष्ट वर्णन म्हणजे हे पुस्तक. या मुल्ला माग मोहिमेत त्यांना अनेकांची मदत होते. हे अनेक जसे स्थानिक आहेत तसेच परदेशी, त्यातही अमेरिकी, गुप्तहेर यंत्रणा, लष्करी अधिकारी हेदेखील आहेत. सुरुवातीला या सर्वांची प्रतिक्रिया, तुला काय जमणार हे… अशीच असते. पण आपल्या प्रकाशनाची साथ आणि मुख्य म्हणजे चोख व्यवसायनिष्ठा यांच्या जोरावर बेट्टी आपली मोहीम सुरूच ठेवतात. या मोहिमेत प्रत्यक्ष हाताला लागलेल्या पुराव्यांतून, त्यांच्या त्यावरील भाष्यातून समोर येणारे वास्तव वाचकाला स्तिमित तर करतेच. पण त्यातून अशासारख्या लेखकांची गरजही ते दाखवून देते. त्यांच्या या प्रवासातून आणि अत्यंत तपशीलवार नोंदीतून आपल्या मनावरचा पाश्चात्त्य दंतकथांचा धुरळा दूर होऊ लागतो.
उदाहरणार्थ अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया यांचा इस्लाम हा पूर्णपणे भिन्न आहे आणि म्हणून तालिबान आणि अल कईदा यांच्यात साटेलोटे गृहीत धरणे किती मूर्खपणाचे आहे हे बेट्टी दाखवून देतात. सौदी इस्लाम हा प्रामुख्याने इस्लामचे वहाबी रूप. पण अफगाणी इस्लामी हे वहाबी असणे कमीपणाचे मानतात. त्यांचा इस्लाम हा सुफी पंथाशी अधिक जोडला गेलेला, ‘सलाफी’ इस्लाम आहे. प्रत्यक्षात अन्य इस्लामी, विशेषत: वहाबी आणि तालिबानी यांच्यात सुप्त संघर्षच होता. अल कईदाप्रमाणे ‘तालिबान्यांस’ जग जिंकण्याची इच्छा कधीही नव्हती. म्हणून अफगाणिस्तानच्या बाहेर तालिबानी कधी गेले नाहीत आणि धर्मप्रसाराचे प्रयत्नही त्यांच्याकडून झाले नाहीत. मूलत: ते ‘‘गड्या आपला गाव बरा…’’ याच मानसिकतेचे. पण हा फरक पाश्चात्त्यांनी कधीही समजून घेतला नाही. ‘सब घोडे बारा टके’ या न्यायाने हे सर्व इस्लामी दहशतवादी अशीच सोयीची हाताळणी संबंधितांकडून झाली. त्याचे काय परिणाम झाले हे बेट्टी उत्तमपणे उलगडून दाखवतात.
दुसरे सत्य यातून ढळढळीतपणे समोर येते ते म्हणजे पाकिस्तानला दिले जाणारे अनावश्यक श्रेय. तालिबान ही पूर्णपणे देशी निर्मिती होती. त्यांना आपल्याला वाटते तितकी पाक मदत मिळालेली नाही. उलट पाकिस्तानी हे अत्यंत स्वार्थी आणि मतलबी आहेत असाच मुल्ला ओमरसह सर्व तालिबान्यांचा ग्रह होता. मुल्ला कधीही पाकिस्तानात आसऱ्यास गेलेला नाही. पण आपण तालिबान्यांच्या मागे आहोत हे दाखवत पाकिस्तानने अमेरिकी मदत ओरपली. याचा तालिबानला भयंकर संताप होता. म्हणून तर मुल्लाने पाकिस्तानी मध्यस्थीचे प्रयत्न सातत्याने नाकारले. इतकेच काय पण पाकिस्तानी दूतांना अत्यंत अपमानित करून मुल्लाच्या दरबारातून काढता पाय कसा घ्यावा लागला याचा तपशीलवार वृत्तांत बेट्टी देतात. याबाबतही वास्तव समजून घेण्यात इतका जागतिक आंधळेपणा झाला की अमेरिकेच्या घुसखोरीनंतर मुल्ला पाकिस्तानात आश्रयास गेला असे सर्वमान्य सत्य स्वीकारले गेले. परंतु प्रत्यक्षात तो अफगाणिस्तानातच अमेरिकेच्या लष्करी तळानजीक एका पडक्या घरात जगत होता. त्या स्थळाचे नावानिशीवार सर्व तपशील यात आहेत. त्याने पराभव मान्य केला होता आणि तालिबानची सूत्रेही उत्तराधिकाऱ्याहाती सोपवून सर्वसंगपरित्याग केल्यासारखा तो जगत होता. तेथेच त्याचे निधन झाले. त्याच जागी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचे दफन केले. त्याच्या मृत्यूची खात्री पटवण्यासाठी त्याचा मुलगा आठवडाभरानंतर आल्यावर त्याचे थडगे पुन्हा खणले गेले आणि पुन्हा त्याचा रीतसर दफनविधी झाला. मुल्लाचा शेवटचा दिवस हा या पुस्तकाचा कळसाध्याय.
बेट्टी यांच्या या शोधपत्रकारितेने अनेक पाश्चात्त्य दावे निकालात निघत होते. म्हणून ‘ओवल्या’ गेलेल्या पत्रकारांकडून त्यांची उपेक्षा झाली. हेही तसे नेहमीचेच. पण ‘द गार्डियन’, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’सारखी वर्तमानपत्रे त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्या वर्तमानपत्रांच्या अफगाणिस्थानस्थित पत्रकारांना बेट्टी यांचा प्रामाणिकपणा ठाऊक होता. आपापल्या मायदेशातील लष्करास आणि सरकारांस बेट्टी यांचे लिखाण लाज आणेल, हे माहीत असूनही या सर्वांनी हे लिखाण छापले. तरीही ही वर्तमानपत्रे आणि खुद्द बेट्टी यांच्यावर कोणीही राष्ट्रद्रोहाचा आरोप केला नाही.
सतत आणि जोरकसपणे केला जातो म्हणून प्रचार काही काळ यशस्वी होत असेलही. पण जोरदार असूनही या प्रचारप्रवाहात वाहत जाणे नाकारून प्रवाहाविरोधात पोहणारे काही असतात. भले ते मोजके असतील. पण सत्य त्यांच्यामुळे टिकून राहते आणि प्रवाहपतितांच्या नाकावर टिच्चून ते असे समोर येते. त्या सत्यदर्शन आकलनासाठी हे पुस्तक वाचणे अत्यावश्यक ठरते.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber