आसिफ बागवान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कायम प्रसिद्धीवलयात राहिलेले पोलीस अधिकारी राकेश मारिया यांचे हे आत्मकथन त्यांच्या अस्सल मुंबईकर असण्याचे दाखले देणारे आहेच; शिवाय तपास अधिकारी म्हणून त्यांनी हाताळलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर निवडकपणे का होईना, प्रकाश पाडणारे आहे…

मुंबई पोलीस दलातील घडामोडींनी सध्या राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासी इमारतीबाहेरील गाडीत स्फोटके आढळणं, या गाडीची मालकी सांगणाऱ्या व्यावसायिकाचा गूढ मृत्यू, त्याच्या हत्येप्रकरणात सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचा कथित सहभाग, या संपूर्ण प्रकरणाच्या हाताळणीतील ढिलाईबद्दल पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची झालेली उचलबांगडी आणि त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट केलेला हप्तेखोरीचा आरोप… या सगळ्या घडामोडींनी पोलीस दलातील राजकारण, अर्थकारण आणि गुन्हेगारीकरण या साऱ्यांचंच अस्तित्व ठळकपणे दाखवून दिलं. अर्थात, या गोष्टी प्रथमच स्पष्ट झाल्या आहेत असं नाही. या ना त्या माध्यमातून त्या नेहमीच समोर येत राहिल्या आहेत. विशेषत: पोलीस दलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून, आत्मचरित्रांतून पोलीस दलातील ‘आतल्या’ घडामोडी समोर येत राहतात. एखादा पोलीस अधिकारी जेव्हा ‘आता मी बोलणार आहे’ असं सांगत आपलं आत्मचरित्र वाचकांच्या हवाली करतो, तेव्हा त्या पुस्तकातून अनेक स्फोट, गौप्यस्फोट होणं अपेक्षित असतं. मुंबईच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदापासून मुंबई पोलीस आयुक्तपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहून निवृत्त झालेले राकेश मारिया यांचं ‘लेट मी से इट नाऊ’ हे आत्मचरित्र हाती पडतं, तेव्हा त्यातूनही असेच धक्कादायक उलगडे, आतल्या बातम्या उघड होण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षाच या आत्मचरित्राकडे वाचकांना खेचून घेते.

राकेश मारिया हे नेहमीच प्रसिद्धीवलयात राहिलेलं नाव आहे. मुंबई हादरवून सोडणारी १९९३ ची बॉम्बस्फोट मालिका असो वा २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला असो; मुंबईच्या मनावर ओरखडा उमटवणाऱ्या अनेक गुन्हेगारी घटनांचे तपास अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या राकेश मारिया यांची एकूण कारकीर्द भारतीय पोलीस सेवेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. मात्र, मारिया यांची कारकीर्द म्हणजे केवळ सेवाज्येष्ठतेनुसार येणाऱ्या पायऱ्या चढत गाठलेले शिखर नाही. संघटनकौशल्य, पोलिसी चातुर्य, कामाप्रति निष्ठा, खबऱ्यांचं उत्तम जाळं अशा विविध गुणांनिशी मारिया यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. १९९३ ची बॉम्बस्फोट मालिका, गेट वे ऑफ इंडिया येथील स्फोट, २६/११चा हल्ला, संजय दत्तची अटक, शिना बोरा हत्याकांड अशा अनेक प्रकरणांचा यात समावेश आहे. सर्वसामान्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरलेल्या या घटना. त्यावर उलटसुलट चर्चा नेहमीच होत राहते. मात्र, मारिया हे प्रत्यक्ष या घटनांच्या तपासात केंद्रस्थानी राहिले असल्यामुळे ‘लेट मी से इट नाऊ’ हे आत्मचरित्र या घटनांवर नव्याने प्रकाश पाडण्याचीही अपेक्षा असते. ही अपेक्षा मारिया यांनी बऱ्यापैकी पूर्ण केली आहे.

अस्सल मुंबईकर…

मारिया हे अस्सल मुंबईकर. मूळचे पंजाबचे असलेले मारिया यांचे वडील विजय हे हिंदी चित्रपटसृष्टीत बस्तान बसवण्यासाठी मुंबईत आले. ‘काजल’, ‘प्रीतम’, ‘नीलकमल’ या साठ-सत्तरच्या दशकांतील काही चित्रपटांच्या निर्मितीत विजय यांचा वाटा होता. संगीत, पटकथा आणि अभिनय या क्षेत्रांतही विजय यांनी काहीअंशी नाव कमावले होते. चित्रपटनिर्मिती करणारी ‘कलानिकेतन’ ही कंपनीही त्यांनी चालवली. चित्रपटसृष्टीशी मारिया यांची जवळीक असण्याचे हेही एक कारण मानले जाते. वांद्र्यातील सेंट पॉल रस्त्यावरील घरात लहानाचे मोठे झालेले राकेश मारिया हे बास्केटबॉल, कराटे, फुटबॉल अशा विविध खेळांत पारंगत होते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक आंतरशालेय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय क्रीडास्पर्धांत चमक दाखवली. १९७९ सालच्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत कराटे या क्रीडाप्रकारात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वही केले होते. हे क्रीडाप्रेम सुरूच असताना, विविध गुन्हेगारी/तपास कथा- कादंबऱ्यांचे त्यांचे वाचन मारिया यांना भारतीय पोलीस सेवेकडे आकृष्ट करणारे ठरले. पदवीच्या अंतिम वर्षाला असतानाच त्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली. तोपर्यंत त्यांच्या कुटुंबात कोणीही अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले नव्हते.

होईन तर ‘आयपीएस’च!

मात्र, अभ्यासातही हुशार असलेल्या मारिया यांनी भारतीय प्रशासकीय सेवेची मुख्य परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पार केली. लक्ष्य केवळ ‘आयपीएस’ होणे हेच असल्याने मुलाखतीपूर्वी दिल्या जाणाऱ्या प्रश्नावलीत आपण करिअरसाठी ‘आयपीएस’ हाच पर्याय पाचही रकान्यांत भरला होता, असेही ते सांगतात. त्याबाबत मुलाखतकत्र्याने विचारले असता, ‘एकतर मी आयपीएस होईन किंवा काहीच नाही’ असे उत्तर दिल्याची आठवणही ते सांगतात. वरकरणी हे सगळं अगदी सहज घडलं असं वाटेलही; तसेच मारिया यांनी पुस्तकात त्यासाठी जेमतेम दोन-तीन पानेच खर्चिली असली, तरी त्यातून मारिया यांची जिद्द, चिकाटी आणि ताण न घेता कामगिरी पार पाडण्याचे गुण दिसून येतात.

महाराष्ट्र पोलीस दलामधील मारिया यांची पहिली नेमणूक १९८३ साली अकोल्यात साहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून झाली. तेथून पुढचा त्यांचा प्रवास हा आदर्शवत राहिला. खामगाव, उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर अवघ्या चार वर्षांतच त्यांची मुंबईत पोलीस उपायुक्तपदी नेमणूक झाली. त्यानंतर मुंबईशी असलेला त्यांचा संबंध काही अपवाद वगळता कारकीर्दीच्या शेवटपर्यंत कायम राहिला. मुंबईतील विविध पोलीस पदांवर असताना आलेले अनुभव मांडतानाच मारिया यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी तपास केलेल्या काही घटनाही मांडल्या आहेत. मात्र या घटना केवळ पुंजक्यात येत नाहीत, तर मारिया यांनी त्या घटनांची मांडणी करताना मुंबईचा गुन्हेगारी इतिहासही पेरला आहे. मुंबईतील अधोविश्व, मटका व्यवसाय, गिरणी कामगार संप, खटाव मिलच्या मालकाची हत्या, टोळीयुद्धे, रेल्वेहद्दीतील ठळक गुन्हेगारी घटना यांवरही ते प्रकाश पाडतात. त्यामुळे हे आत्मचरित्र वाचताना मुंबईची रंजक कथा वाचत असल्याचाही अनुभव येतो. मारिया यांच्या आत्मचरित्रात हे प्रसंग ‘पोलीसडायरी’सारखे येत नाहीत, तर ते एखाद्या निष्णात पटकथाकारासारखे प्रत्येक घटनेतलं नाट्य अधिकाधिक खुलवत त्या प्रसंगांची कथा बनवतात. हा गुण बहुधा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला असावा! मात्र, त्यामुळे हे आत्मचरित्र अधिक रंजक बनले आहे.

मारिया यांच्या आत्मचरित्राचा दुसरा मोठा भाग मुंबईतील दहशतवादी कारवाया, हल्ले यांच्यावर केंद्रित आहे. साहजिकच १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपास त्यात अग्रभागी येतो. ही स्फोटमालिका व तिच्या तपासाबद्दल सांगण्याआधी मारिया यांनी या घटनांमागची पार्श्वभूमीही विशद केली आहे. त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे मुंबईतल्या या घटनांविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असलेल्यांकरिताही हे आत्मचरित्र वाचनीय ठरतं.

कार्यक्षम तपास अधिकारी

बॉम्बस्फोटाच्या घटना, त्यातील तपासाचे दुवे, आरोपींचा माग काढताना घडलेले प्रसंग मारिया यांनी या प्रकरणांमध्ये मांडले आहेत. अभिनेता संजय दत्त याच्या घरी सापडलेला शस्त्रसाठा आणि त्यानंतर संजय दत्तला अटक होईपर्यंतचा सर्व घटनाक्रम बारीकसारीक तपशिलांसह त्यांनी आत्मचरित्रातून उघड केला आहे. मात्र, ‘या सर्व तपास प्रकरणांचे श्रेय आपलेच’ अशी टिमकी त्यांनी वाजवलेली नाही, हे या आत्मचरित्राचे आणखी एक वैशिष्ट्य. ते या तपासाचे श्रेय आपले सहकारी आणि खबरी यांनाही प्राधान्याने देतात. काही प्रकरणांचा उलगडा निव्वळ अपघाताने झाला, हेही ते प्रांजळपणे मान्य करतात. एक कार्यक्षम तपास अधिकारी म्हणून कोणकोणत्या गोष्टींचे भान राखणे आवश्यक आहे, हे या प्रकरणांतून समोर येते.

या प्रकरणांपर्यंत मारिया यांची बहुतांश कारकीर्द वरच्या दिशेने जाताना दिसते. पोलीस दलातील राजकारण, बदल्यांमधील अर्थकारण, हेवेदावे यांचा उल्लेख तोपर्यंत आढळतच नाही. पोलीस दलाची सध्या बनलेली एकंदर प्रतिमा पाहता, ही गोष्ट अपचनीय वाटते. मात्र, आत्मचरित्र म्हणून काय उघड करायचे आणि काय नाही, हा अधिकार अंतिमत: लेखकाचा असतो. स्वत:शी प्रामाणिक राहून लिहिण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, काही बाबतींत परिस्थिती अथवा व्यक्ती यांच्या दबावामुळे ते साध्य होत नाही हेही खरेच!

मारिया यांच्या कारकीर्दीला वलय मिळवून देणारे आणखी एक प्रकरण म्हणजे २००८ साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला. या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला जिवंत पकडल्यानंतर त्याचा कबुलीजबाब घेऊन त्या माहितीच्या आधारे तपासाचे धागे जुळवण्याच्या कामात मारिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोठी कामगिरी बजावली. त्याबद्दल त्यांची प्रशंसाही झाली. या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नियंत्रण कक्षातून पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांच्या पथकांशी समन्वय साधण्यात मारिया यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक झाले.

मात्र, त्याच वेळी कामा रुग्णालयाजवळील दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे मारिया हे वादातही सापडले. कामटे यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांचे मारिया यांनी या आत्मचरित्रातून सविस्तर खंडन केले आहे. त्यासाठी नियंत्रण कक्षात झालेले संभाषण, कामटे यांच्या वडिलांशी झालेली भेट, खुद्द कामटे यांच्या पत्नीशी झालेली चर्चा असे सर्व तपशील मारिया यांनी मांडले आहेत. दहशतवादी हल्ला होत असताना प्रत्यक्ष मैदानात उतरता न आल्याबद्दलही ते खंत व्यक्त करतात. ‘लेट मी से इट नाऊ’चा उगमही या स्पष्टीकरणातूनच झाला असावा, असे वाटण्याइतपत मारिया यांनी त्या प्रकरणाला पुस्तकात जागा दिली आहे.

असेच आणखी एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे शिना बोरा हत्याकांड. या प्रकरणाने मारिया यांच्या मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या कारकीर्दीवरच प्रश्न निर्माण केले. त्या वेळी उद्भवलेली परिस्थिती आणि सर्व घटना यांचे सविस्तर वर्णन मारिया यांनी आत्मचरित्रात केले आहे. शिना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांच्या चौकशीत हेतुपुरस्सर अधिक रस दाखवत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांची तातडीने पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली. मात्र, ‘माझ्या जागी नेमण्यात आलेले अहमद जावेद यांचे मुखर्जी दाम्पत्याशी निकटचे संबंध होते. जावेद आणि देवेन भारती या दोन्ही अधिकाऱ्यांना त्या वेळी पाठीशी घालून मला बळीचा बकरा करण्यात आले,’ असा आरोपही मारिया यांनी आत्मचरित्रात केला आहे. एवढेच नव्हे, तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबाबत दुटप्पी भूमिका कशी घेतली, याबद्दल थेट फडणवीस यांच्याशी झालेल्या मोबाइल संदेश-नोंदींचा तपशील देत मारिया यांनी भाष्य केले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाने त्यांची सर्व कारकीर्द झाकोळली गेल्याची खंतही आत्मचरित्रात दिसते.

आत्मचरित्रात केवळ आयुष्याचा घटनाक्रम येत राहिला की ते एकसुरी होते. उलट आयुष्याला आकार देणाऱ्या, त्यावर परिणाम घडवणाऱ्या अवतीभवतीच्या घटनांचा त्यात अंतर्भाव झाला, तर ते आत्मचरित्र त्या काळाचा एक संदर्भग्रंथ बनते. मारिया यांचे आत्मचरित्र काही प्रमाणात त्या वर्गातलेच आहे.

asif.bagwan@expressindia.com