|| पंकज भोसले

गेल्या दीड दशकात दरवर्षीच भरणाऱ्या जयपूर साहित्य उत्सव अर्थात ‘लिटफेस्ट’चे नेहमीचे यश आणि यंदाचे वेगळेपण टिपणारा हा वृत्तान्त..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

गेल्या दोन आठवडय़ांत एका चित्रपटाने निर्माण केलेल्या द्वेष आणि आवेशपूर्ण वातावरणात साहित्याशी संबंधित राष्ट्रवेधी घटनांकडे अंमळ दुर्लक्ष झाले. त्यातील पहिले ठळक उदाहरण होते, पश्चिम बंगालमधील ‘बोईमेला’ म्हणजेच ग्रंथ महोत्सवाचे. करोनाने दिलेल्या एक वर्षांच्या खंडानंतर एका राज्यातील वाचनभूक किती वाढू शकते,याचे उदाहरण कोलकात्यातील त्या महोत्सवाने देशासमोर ठेवले. १८ लाख वाचकांनी तब्बल २० कोटी रुपयांची पुस्तकखरेदी फक्त १५ दिवसांच्या कालावधीत केली. अखिल भारतीय या नावाने आपण जो काही संमेलनाचा घाट वर्षोनुवर्षे घालतो, त्यात महत्प्रयासाने होणाऱ्या ग्रंथविक्रीची त्रोटकता या आकडेवारीवरून लक्षात यावी. दुसरे उदाहरण होते, ते जयपूर आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे अर्थात ‘जयपूर लिटफेस्ट’चे. यात होणारी ग्रंथविक्री पश्चिम बंगाल महोत्सवाच्या जवळपासही जाणारी नसली (ग्रंथविक्री हे या लिटफेस्टचे ध्येयही नसले), तरी त्यातले नियोजन आणि वाचकांना आकर्षित करण्याचे समीकरण ही बाब महोत्सवाच्या यशस्वितेची पावती म्हणावी लागेल.

साहित्यिक, विचारवंत,संगीतकार, कलाकार, पर्यावरणतज्ज्ञ, राजकारणी, पत्रकार अशा विविध स्तरांवरील ६०० हून अधिक ताजी पुस्तके लिहिलेल्या नामांकित लेखकांच्या विचारांच्या फैरी मुलाखती- चर्चासत्र- वादसंवाद आदी विविध घटकांतून अनुभवू देणारे हे भक्कम व्यासपीठ गेल्या दीड दशकात तयार झाले आहे. येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत एकाचवेळी सुरू राहणारी चार आणि दिवसभरात सरासरी चालणारी ३० ते ३२ सत्रे ही लेखक, लेखनप्रक्रिया आणि पुस्तकाच्या अनुषंगाने समाज अभिसरण यांच्यावर प्रकाश टाकतात. दिवसाला यातील आपल्या आवडीच्या किमान पाच वक्त्यांचा माग घेणेही साहित्य आणि विचारांचा मॉल अनुभवण्यासारखे आहे. मॉलमधून आपण अत्यावश्यक चिजांसह अनेक चैन-चंगळीची उगाखरेदी करतो. इथे खरेदी नसली तरी, अनुभवांची पोतडी दुथडी भरून जाण्यास विविध घटक कारणीभूत ठरतात.

पंधरा वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या या महोत्सवाची कीर्ती करोनापूर्व काळात इतकी झाली, की नोबेल आणि बुकर पारितोषिकप्राप्त आणि हे पुरस्कार पटकावण्याच्या यादीत संभाव्य असलेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांची इथे गर्दी होऊ लागली. राष्ट्रीय माध्यमांकडून येथे घड़णाऱ्या चर्चा आणि वादंगांची दखल घेतली जाऊ लागली. करोनापश्चात दक्षतेमुळे यंदा बहुतांश बडय़ा आंतरराष्ट्रीय लेखकांनी महाकाय गर्दीऐवजी आभासी चर्चासत्रांना पसंती दिली. पहिले पाच दिवस ऑनलाइन आणि नंतरचे पाच दिवस क्लार्क आमेर या पंचतारांकित हॉटेलच्या अंगण आणि परसदारात होणाऱ्या या महोत्सवाला दक्षिणोत्तर राज्यांतील हौशी साहित्यप्रेमींची गर्दी ही चकित करणारी होती. (अनेकदा येथील वारी करणाऱ्यांच्या मते पूर्वी ‘डिग्गी पॅलेस’ हॉटेलच्या मैदानवजा प्रांगणात यापेक्षा पाच पट गर्दी असे, ती कोविडने कमी केली)

इथल्या गर्दीत केवळ आपण वाचलेल्या भारतीय इंग्रजी किंवा आंतरराष्ट्रीय लेखकांना केवळ ऐकायलाच नाही, तर त्यांना विचारायला ढिगांनी प्रश्न घेऊन आलेली तरुणाई भेटते. साहित्यिकांना निर्मिती प्रक्रियेविषयी आणि लेखन अधिकाधिक धारदार करण्याच्या क्ऌप्त्या विचारणारे होतकरू लेखकांचे ताफेही इथे दिसतात. अन् केवळ तारांकित व्यक्तींबरोबर आपली प्रतिमा कॅमेराकैद करण्याची आकांक्षापूर्ती करणारा पुस्तकछबूंचा जथाही इथे सापडतो.

व्यासपीठांवरून पुस्तक प्रकाशन, पुस्तकाचे पारायण आणि कार्यक्रमानंतर लेखकासमवेत गप्पा मारत पुस्तक खरेदीचे प्रलोभन अशा अनेक क्लृप्तय़ांनी ग्रंथ वाचकापर्यंत पोहोचविण्याचे इथले कसब वाखाणण्याजोगे यासाठी की इथे जे उपलब्ध आहे, ते सर्वात ताजे आहे. नव्या-जुन्या-छोटय़ा-बडय़ा सर्वच प्रकाशकांना आपले सांप्रतकालीन लेखक लोकांपर्यंत आणायचे असतात. त्यांच्या पुस्तकांचे विक्रीमूल्य चर्चासत्रांतून व्यक्त झाल्यानंतर, ते अधिकाधिक वाचकांना उपलब्ध व्हावे यासाठी खटाटोप सुरू होतो. म्हणजे एखाद्या प्रकाशकाचे पूर्वीचे एखादे पुस्तक कितीही खपविक्रमी असले, तरी त्याच्याच प्रती यानिमित्ताने येथे विकण्याचा सोपा मार्ग कुणी अंगीकारत नाही.

आपल्याकडे जसे पाच-पाच दशके एकाच लेखकाची पुस्तके विक्रमी खपताहेत म्हणून श्यामची आई, कोसला आणि बटाटय़ाची चाळ यांची दरसाल परमोच्च उलाढाल होते, तसा इथला मामला नाही. जुने कितीही थोर असले, तरी वाचकांना नवे शोधायची संधी देणारी आणि तशी शिस्त लावणारी सवय या महोत्सवाने करून दिली आहे. हा या महोत्सवाचा वेगळेपणा कौतुकपात्रच.

विल्यम डर्लेम्पल, शशी थरूर या इथल्या नेहमीच्या व्यासपीठवीरांव्यतिरिक्त महोत्सवाचे इथले आकर्षण होते, नोबेल पारितोषिक मानकरी अभिजीत बॅनर्जी आणि अब्दुलरजाक गुर्ना. यंदाचे बुकर पारितोषिक विजेते डेमन गालगट, दोन दशकापूर्वी बुकर पटकावणारे डीबीसी पिअरे, दोनदा बुकर पारितोषिकासाठी अंतिम यादीत पोहोचलेले आणि यंदा बुकर निवडसमितीत असलेले नायजेरियाचे लेखक चिगोझे ओबियामा. सोमाली लेखिका नदीफा मुहंमद. पैकी बुकर आकर्षणांपैकी डीबीसी पिअरे यांच्याव्यतिरिक्त कुणी उपलब्ध झाले नाही. चिगोझे ओबियामा यांचे सत्र ऐनवेळी रद्द झाले. करोनाच्या लाटा अद्याप अन्यत्र आहेत, याची ही खूण.

पहिला दिवस गायक रेमो फर्नाडिस यांनी गाजवला. दुसऱ्या दिवशीही लेखकांऐवजी सिनेकलाकारांची सत्रे सर्वाधिक गाजली. अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यावर पीयूष पांडे लिखित ‘कुछ पाने की जिद’ नावाचे हिंदी पुस्तक नुकतेच पेंग्विनने प्रकाशित केले आहे. वाजपेयी या दिवशी ‘प्युअर इव्हिल: द बॅड मेन ऑफ बॉलीवूड’ या बालाजी विठ्ठल यांच्या पुस्तकानिमित्ताने सुरू करण्यात आलेल्या चर्चासत्रात होते. उदय भाटिया यांच्या ‘बुलेट्स ओव्हर बॉम्बे’ या पुस्तकावरच्या चर्चासत्रातही ते होते. वीस-बावीस वर्षांत त्यांच्या सत्या चित्रपटातील भिकू म्हात्रेबद्दल पुरेसे चर्वितचर्वण झाले आहे. तरीही निवेदकांचे प्रश्न सत्यानुषंगीक येणे टळत नाही आणि वाजपेयी सत्याच्या सत्यकथांची उजळणी करण्याचे थांबत नाहीत. बॉलीवूड आणि मनोरंजनाचे नवफलाट ओटीटी देखील मला धोपट भूमिकांत अडकवू शकत नाहीत,हे त्यांचे नवविधान त्यादिवशीचे वृत्तखेचक बनले होते. नीना गुप्तांच्या सच कहु तो या बेधडक आत्मचरित्राची झलक त्यांच्या सत्रात जाणवली. त्या सत्राइतकी गर्दी नंतर कुठल्याच सत्राला होऊ शकली नाही.

भारतीय लेखकांत जीत थायिल, सुदीप चक्रवर्ती, सिनेसमीक्षक अनुपमा चोप्रा, पत्रकार वीर संघवी, शोभा डे यांच्या चर्चासत्रांना उत्तम प्रतिसाद मिळाला. हिंदीमधील अतितरुण आणि खुपविके लेखक दिव्य प्रकाश दुबे,निशांत जैन यांचा बराच चाहतावर्ग महोत्सवात दिसत होता. भाषिक चर्चासत्रांमध्ये सर्वाधिक श्रोता त्यांना लाभला. इंग्रजी असो किंवा कोणतीही भाषा, त्या भाषांना कमी न लेखता आपली हिंदी भाषा आपल्या लेखन-वाचनातून पुढे नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पुस्तकांची विक्रीही याठिकाणी बरी झाली. प्रभात रंजन हे हिंदीतील गंभीर आणि लोकप्रिय दोन्ही साहित्यक्षेत्रांत सहजपणे वावरणारे. आंतरराष्ट्रीय लेखकांच्या पुस्तकांच्या दालनात त्यांची मूळ आणि अनुवादित पुस्तके दिमाखात विराजमान होती. त्यांनी हिंदीतील बदलत्या विक्री प्रवाहावर बरीच चर्चा केली आणि वैयक्तिक मुलाखतीमधून हिंदी लेखकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यासपीठांतून मिळणाऱ्या मुबलक संधींवरही चर्चा केली. साहित्य अकादमीशी संलग्न असलेल्या ‘वाणी प्रकाशन’ या दिग्गज संस्थेच्या जडण घडणीवर एक चर्चासत्र होते. या सत्रात वाणी प्रकाशनाचे सर्वेसर्वा अरुण महेश्वरी यांनी हिंदीतील खूपविक्या पुस्तकांना मिळणारी रक्कम, लेखकांना दिले जाणारे मानधन यांविषयी काही मुद्दे मांडले. एका आगामी पुस्तकासाठी वाणी प्रकाशनाने लेखकाला आगाऊ ६३ लाख इतकी रक्कम दिल्याचे त्यांनी सांगितले. सात-आठ राज्यांमध्ये प्रमुख लिखित आणि बोलण्याची भाषा असलेल्या हिंदीतील ग्रंथविक्रीचा आवाका या उदाहरम्णावरून लक्षांत यावा.

विविध भाषांतून इंग्रजीत भाषांतरित झालेल्या साहित्यावर चर्चा ऐकताना इथे लक्षात येतो तो मल्याळम् कथन साहित्याचा इंग्रजीत होत असलेला सर्वाधिक अनुवाद. गेल्या तीन-चार वर्षांत जेसीबी पारितोषिकाचे बहुतांश स्पर्धक हे मल्याळम लेखकांची इंग्रजी अनुवादित पुस्तके आहेत. या महोत्सवात जेसीबीसाठीच्या लघु आणि दीर्घयादीतील पुस्तके होती आणि त्यांच्यावर चर्चाही विस्तृत प्रमाणात झाली.

बहुतांश लेखकांची करोना काळातील साहित्य निर्मितीची अवघड प्रक्रिया इथल्या व्यासपीठांवरून समोर आली. रोज पहाटे साडेचारचा गजर लावून २०० शब्दांची बेगमी करत कादंबरी पूर्ण करणारी शिवानी सिबल. तीन खर्डे तीन राष्ट्रांत पूर्ण करून ‘डेथ इन सोनागाछी’ ही कोलकात्यावरील कादंबरी लिहिणारी रिजुला दास यांची सत्रे श्रवणीय होती. तर डीबीसी पिअरेंनी आपल्या कथानिर्मिती प्रक्रियेबद्दल उद्बोधक माहिती दिली.

या महोत्सवातील मुख्य चर्चासत्रांइतकेच आकर्षण विविध प्राांतिक, भाषिक लेखक-पत्रकारांचा परस्परांशी चालणारा मैत्रसंवाद. आनंद बझार पत्रिकेला दीड आठवडय़ापूर्वीच शंभर वर्षे झाली. त्यानिमित्ताने तिथल्या वृत्तपत्रांमध्ये अजूनही शाबूत असलेले ललित साहित्य. रविवारच्या विशेष पुरवण्यांतून नित्यनेमाने येणाऱ्या नव्या कथा, नवे लेखक, धारावाहिक कादंबऱ्यांबद्दल माहिती करून घेता आली. कन्नड, मल्याळम् आणि तेलुगू भाषेतही कथा साहित्याला कोणत्याही काळात गौण मानले गेले नसल्याचे तपशील प्राप्त झाले.

एका समकालीन तेलुगू कथाकाराची मुलाखत घेतल्यानंतर ती ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेली मुलाखत त्याला पाठवली. त्या लेखकाने आपल्या राज्यात मराठी जाणणाऱ्या तेलुगू व्यक्तीला ती तातडीने दाखवून समजून घेतली. त्यानंतर आपल्या इंग्रजीत भाषांतरित झालेल्या कथांपैकी निवडक कोणत्याही दहा कथा मराठीत भाषांतर करण्याची विनंती केली. दक्षिण भारतीय लेखकांना आपले साहित्य इतर भाषांत जाण्याची तत्परता किती आहे, हे या उदाहरणातून लक्षात आले.

पर्यावरण समस्या, रशिया युक्रेन युद्ध, तळागाळातून तयार होणारे साहित्य, नव्या सरकारच्या काळात प्रकाशनविश्वावर जीएसटीच्या रूपाने आलेली संकटे, पायरसीमुळे पुस्तक उद्योगाचे मोडलेले कंबरडे आदी विविध प्रश्नांसह नेहरू, सावरकर, वाजपेयी यांच्या कार्यकर्तृत्वाच्या पोवाडेसदृश सत्रांना अपेक्षित अशी निवडकांची गर्दी होती.

आपल्या आवडीच्या असो किंवा नावडीच्या, एकामागोमाग एक चर्चासत्रांचा फडशा पाडणे एका व्यक्तीसाठी अवघड प्रक्रिया आहे. वैचारिक रवंथीकरणाची फुरसत न मिळू देता इथल्या ‘मॉलिक’ साहित्यानुभवाची गाडी भरधाव वेगाने सुरू राहते. चांगले आणि हवे ते टिपण्याची आपली क्षमता किती, त्यावर महोत्सवाची वैयक्तिक मौलिकता ठरू शकते.

साहित्याच्या भाषांतराला तंत्रज्ञानामुळे वरदान लाभले आहे. पूर्वी मला एखाद्या शब्दाच्या उच्चारासाठी फ्रेन्च किंवा स्पॅनिश व्यक्तीशी संपर्क साधावा लागे. आता गूगलद्वारे ही प्रक्रिया अतिसुलभ झाली आहे. – प्रभात रंजन, हिंदी कथाकार, अनुवादक.

जेव्हा सारे जग स्वप्नांमध्ये बुडालेले असते आणि माझ्या भवताली त्यांच्या स्वप्नांची गर्दी झालेली असते, तेव्हा त्या स्वप्नांना पकडून मी लिहायला बसतो. – डीबीसी पिअरे,

 बुकर विजेता कादंबरीकार.

नव्या सरकारने प्रकाशनसंस्थांना मदत केली नाही. उलट शासकीय पुस्तक खरेदी पूर्ण बंद केली. याचा प्रचंड फटका प्रकाशकांना बसला. त्याशिवाय जीएसटीचा भार टाकल्याने या उद्योगाला तोटाच अधिक सहन करावा लागला.

Litfest West Bengal Boimela Granth Festival akp 94

pankaj.bhosale@expressindia.com