|| राहुल कोसंबी

केरळातील कोझिकोडेच्या समुद्रकिनारी १० ते १३ जानेवारीदरम्यान ‘केरळ लिटरेचर फेस्टिव्हल’ संपन्न झाला. दरवर्षी एक निवडक देश आंतरराष्ट्रीय पाहुणा म्हणून निमंत्रित करणाऱ्या या महोत्सवाने यंदा शिरस्ता मोडत तो मान मराठी भाषेला दिला! त्या चार दिवसीय साहित्य महोत्सवाचे हे वार्ताकथन..

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी इंग्रजी लेखिकेला कशाला बोलावलंत..’ असा खास महाराष्ट्रीय पुरोगामीपणाला शोभून दिसणारा तर्क देत नयनतारा सहगल या विख्यात लेखिकेला महाराष्ट्र अपमानित करत होता, त्याचदरम्यान आम्ही महाराष्ट्रातील काही निवडक निमंत्रित १० ते १३ जानेवारी या काळात कोझिकोडे (कोळीकोड किंवा कालीकत) येथे संपन्न झालेल्या ‘केरळ लिटरेचर फेस्टिव्हल’ला उपस्थित होतो. प्रत्यक्ष परदेशात न भरवताही हा साहित्य उत्सव त्याच्या पहिल्या आयोजनापासूनच आंतरराष्ट्रीय होता. या फेस्टिव्हलचे यंदाचे चौथे वर्ष. अ. भा. म. साहित्य संमेलनाचा विचार करता हा ‘फेस्टिव्हल’ नुकताच रांगू लागला आहे; पण आयोजनातील भव्यता व आंतरराष्ट्रीयता आणि त्याच वेळी खास केरळी संस्कृती आणि मल्याळी भाषेचा स्पर्श आपल्याला समृद्ध अनुभव देऊन जातो. पाचशेहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक लेखक, कवी, विचारवंत व कलाकार या वर्षी या फेस्टिव्हलला निमंत्रित होते. गेल्या वर्षीपर्यंत एक निवडक देश आंतरराष्ट्रीय पाहुणा म्हणून निमंत्रित केला जात असे, पण यंदापासून भारतातीलच एका भाषेला तो मान मिळावा असे प्रकर्षांने आयोजकांना वाटले आणि इतर कोणत्याही भाषेआधी त्यांनी मराठी भाषेलाच हा मान दिला! त्यातही दलित साहित्याची चर्चा केंद्रस्थानी ठेवली. मराठी साहित्यावर केंद्रित या उत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून दहा साहित्यिकांनी हजेरी लावली. कवी, समीक्षक आणि भाषांतरकार चंद्रकांत पाटील, कादंबरीकार श्याम मनोहर, नाटककार सतीश आळेकर आणि मकरंद साठे, कवयित्री अनुराधा पाटील, त्यानंतरच्या पिढीतील तीन महत्त्वाचे कवी प्रफुल्ल शिलेदार, प्रज्ञा दया पवार व श्रीधर नांदेडकर आणि मी असे नऊ जण विविध कार्यक्रमांत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकलो, पण प्रसिद्ध कादंबरीकार राजन गवस काही कारणांमुळे येऊ  शकले नाहीत. मराठी साहित्यातील कादंबरी, कविता, नाटक आणि दलित प्रवाह यांची गंभीर तोंडओळख व्हावी या उद्देशाने या सर्वाना निमंत्रित केले होते.

कोझिकोडेच्या समुद्रकिनारी एकाच ठिकाणी, पण चार वेगवेगळ्या मंडपांत चार दिवस भरगच्च कार्यक्रमांची अक्षरश: रेलचेल होती. चार दिवसांत चर्चा, लेखक भेट, कविसंमेलन आणि परिसंवादांचे तब्बल १८५ कार्यक्रम, १७ चित्रपट आणि राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय संगीत, नाटक आणि नृत्यांचे सहा भव्य कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी व्याख्यानांची सुरुवातच मुळी मराठी साहित्याच्या चर्चेने झाली. समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी मराठी साहित्याची तोंडओळख मल्याळम् वाचकांना करून दिली. महानुभाव पंथाच्या साहित्यापासून वारकरी संप्रदायाच्या साहित्यामार्गे पंडिती-शाहिरी लेखनाला स्पर्श करत १९ व्या आणि २० व्या शतकात बहरत गेलेल्या मराठी साहित्याच्या बदलत्या रूपांचा आणि प्रवाहांचा धावता, पण रोचक आढावा त्यांनी करून दिला. ख्यातनाम मल्याळी आणि इंग्रजी कवी के. सत्चिदानंदन यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर झालेल्या कविता वाचनात चंद्रकांत पाटील, अनुराधा पाटील, प्रफुल्ल शिलेदार, प्रज्ञा दया पवार आणि श्रीधर नांदेडकर यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या आपल्या कविता वाचल्या. पुन्हा संध्याकाळी ‘समकालीन मराठी रंगभूमी’ या विषयावर नाटककार सतीश आळेकर आणि मकरंद साठे यांनी विस्तृत विवेचन केले.

या दिवसातील इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांबद्दलही सांगितलेच पाहिजे. ‘आपल्या आजूबाजूचे साहित्य’ या विषयावरील चर्चेत लोकप्रिय मल्याळी लेखक एम. मुकुंदन आणि सुप्रसिद्ध कोंकणी लेखक दामोदर मावजो यांनी सहभाग घेतला. समकालीन साहित्याची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षात त्यांनी अतिशय व्यापक चर्चा केली. सर्व प्रकारची वाढती असहिष्णुता, अभिव्यक्तीचा संकोच, वाढता मूलतत्त्ववाद आणि यांसमोर उभा दावा मांडणारा लेखक, त्याची भूमिका आणि त्याचे लेखन याबाबत अतिशय रोखठोक मते या दोन्ही लेखकांनी मांडली. सच्चा लेखक राजकीय सैद्धांतिक चौकटीच्याही पल्याड जात नेहमीच शोषित-अन्यायग्रस्त जनतेची बाजू घेत असतो, याबाबत दोघांचेही एकमत होते.

‘इमॉर्टल इंडिया : यंग कन्ट्री, टाइमलेस सिव्हिलायझेशन’ या आपल्या नव्या पुस्तकावर लोकप्रिय लेखक अमिश त्रिपाठी वाचकांशी संवाद साधत होते. भारतीय पौराणिक साहित्याचा समकालीन लोकप्रिय आविष्कार ते आपल्या लेखनातून करत आले आहेत. ‘भारताचा पहिला साहित्यिक पॉपस्टार’ असे त्यांचे वर्णन केले जाते. आपल्या विवेचनात शबरीमला मंदिराच्या वादावर बोलताना त्यांनी अगदी रोखठोक भूमिका घेतली. ‘स्त्रियांचा अपमान होणाऱ्या देशातून यथावकाश देवच पलायन करतात..’ अशी सुरुवात करत त्यापाठीमागचे तात्त्विक विवेचन त्यांनी केले.

पहिल्या दिवसाचे सर्वात महत्त्वाचे व्याख्यान अर्थातच रामचंद्र गुहा यांचे म्हणता येईल. ‘समानतेचा भारतीय मार्ग’ या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. भारतात जातीय आणि लिंगभावावर आधारित असमानता अजूनही सिद्धांत आणि व्यवहार या दोन्ही पातळ्यांवर निर्लज्जपणे पाळली जाते, हे त्यांनी ठामपणे सांगितले. फक्त हिंदूच नव्हे, तर त्याच्या संपर्कात आलेले सगळेच धर्म- मग ते त्यांच्या धार्मिक मूल्यव्यवस्थेत या दोन्ही असमानता मान्य करत नसले, तरीही प्रत्यक्षात मात्र या असमानता अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात! याविरुद्धचा लढा भारताने स्वातंत्र्य चळवळीसह सुरू केला होता, हे गुहांनी प्रथम नामदार गोखले यांच्या निरीक्षणांच्या अवतरणांतून दाखवून दिले. गोखले यांचे राजकीय शिष्य महात्मा गांधींनीही अस्पृश्यतेला कलंकच मानले. त्यांनी भारतात शूद्र व दलितांनी ढोबळपणे जातिव्यवस्थेविरुद्ध आणि काटेकोरपणे अस्पृश्यतेविरुद्ध चालवलेल्या लढय़ांच्या दबावामुळे आपल्या अस्पृश्यताविरोधी मांडणीत आमूलाग्र बदल केले. केरळातील नारायण गुरू, अय्यंकली यांच्या लढय़ांनी आणि नंतर महाराष्ट्रात डॉ. आंबेडकरांनी चालवलेल्या दलित चळवळीमुळे गांधीजींच्या जात आणि अस्पृश्यतेबाबतच्या विचारांत आणि त्याविरोधातील लढय़ात गुणात्मक फरक पडला, असे गुहा म्हणतात. त्यांनी गांधी आणि आंबेडकर यांच्यातील जाणीवपूर्वक वाढवलेल्या वादाला वैचारिक धारेवर धरले. जात आणि लिंगभावाधारित असमानता गांधी आणि आंबेडकर यांना एकमेकांविरोधात उभे करून नव्हे, तर एकमेकांना पूरक बनवतच निर्णायकपणे लढता येऊ  शकेल. पण त्यासाठी भारताला धार्मिक क्षेत्रातील, विशेषत: देवासमोरची जात-लैंगिक असमानता, कायद्यासमोरील आणि शेवटी एकूणच सामाजिक वावरातील जात-लैंगिक असमानता घालवण्यासाठी सज्ज व्हायला हवे.

दुसऱ्या दिवशी कर्नाटकी शास्त्रीय संगीतातील गायक टी. एम. कृष्णा यांची मुलाखत महत्त्वाची ठरली. शास्त्रीय संगीत आणि सामाजिक-राजकीय विषयांवरील स्पष्ट भूमिकांमुळे कृष्णा हे अलीकडे सातत्याने चर्चेत आहेत. हिंदुत्ववादी गटांचा त्यांच्यावरील राग देशभरातील विविध मंचांवर दिसून आला आहे. मुलाखतीत संगीतातील रागांच्या शास्त्रीयतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तथाकथित शास्त्रीय संगीताची पवित्रता, त्यातील जात-पितृसत्ता, अगदी पेहराव ते बैठक व्यवस्थेतील छुप्या जातिव्यवस्थेचा खरपूस समाचार त्यांनी घेतला. याच दिवशी सुविख्यात लेखक शशी थरूर यांचे व्याख्यान आणि मुलाखत अशी दावत होती. ‘पं. नेहरूंनी भारतीय लोकशाहीला दिलेले योगदान’ या विषयावर त्यांनी आपली विस्तृत मांडणी केली. नेहरू किंवा गांधी घराणेशाहीच्या अपप्रचाराला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. स्वत:ची वाढती लोकप्रियता व्यक्तिपूजेत परावर्तित होऊ  नये म्हणून खुद्द नेहरूंनीच एकदा एका लोकप्रिय मासिकात टोपणनावाने लेख लिहून जनतेला यापासून परावृत्त होण्याचा सल्ला दिला होता, याची आठवण थरूर यांनी करून दिली. संख्यात्मक व गुणात्मकरीत्याही प्रदीर्घ लोकप्रियता नेहरूंच्या वाटय़ाला स्वातंत्र्योत्तर काळात आली होती. पण त्यांनी नेहमीच देशात आणि पक्षांतर्गत लोकशाहीलाच कौल दिला. स्वातंत्र्यानंतर लगेचच गांधीजींची हत्या झाली आणि पुढे दोनेक वर्षांतच सरदार पटेलही मृत्यू पावले. सुभाषबाबूंबद्दल नुसत्या अफवाच होत्या आणि समोर कोणीही तुल्यबळ विरोधी पक्ष नव्हता, तरीही नेहरूंनी लोकशाहीची कास सोडली नाही. जागतिक पातळीवर नवस्वतंत्र झालेल्या देशांपैकी अनेक देश हुकूमशाहीकडे वळले होते, परंतु नेहरूंनी नेटाने लोकशाही जवळजवळ एकहाती भारतात रुजवली. भारतीय शैलीचा धर्मनिरपेक्षतावाद, समाजवाद आणि विज्ञानवादी भूमिकांचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला, असे थरूर म्हणाले. मुलाखतीतही त्यांनी ही मांडणी आणखी पुढे नेली. इथे एक निरीक्षण मुद्दामच नोंदवले पाहिजे. रामचंद्र गुहा आणि शशी थरूर हे वर्गमित्र. एक सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ-इतिहासकार, तर दुसरा आंतरराष्ट्रीय लोकप्रिय लेखक आणि राजकारणी! या दोघांच्या या विशिष्ट स्थानांमुळे दोघांच्याही मांडणीत मूलभूत विरोध जाणवला. सवर्णासाठीचे दहा टक्के आरक्षण आणि शबरीमला वाद यावरील दोघांचे विचार अगदी विरुद्ध टोकाचे होते. गुहा थेट विरोधात, तर थरूर समर्थक!

तिसऱ्या दिवशी अभिनेता प्रकाश राज, राजदीप सरदेसाइ, सागरिका घोष यांच्या सत्रांना समांतरपणे मराठीविषयक काही आणि माझे एक वेगळे सत्र होते. ‘समकालीन मराठी साहित्य’ या सत्रात श्याम मनोहरांनी त्यांच्या ताज्या, पण अप्रकाशित कादंबरीच्या इंग्रजी अनुवादित अंशाचे वाचन केले. ‘भारतातील युवा उद्रेक’ या विषयावरील सत्रात प्रस्तुत लेखक दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिद आणि पत्रकार निखिला हेन्री यांच्यासह सहभागी होता. सध्याच्या वाढत्या असहिष्णू वृत्तींसमोर युवकांनीच मोठे आव्हान उभे केले आहे आणि संक्रमण काळातही लोकशाहीवरील लोकांचा विश्वास दृढमूल केला आहे, हा या चर्चेचा मध्यवर्ती सूर होता. याबरोबरच प्रस्तुत लेखकाने ‘समकालीन दलित साहित्य’ या विषयावरील सत्रातही विचार मांडले. त्यात दलित साहित्याचा प्रारंभ, त्याची सामाजिक- सांस्कृतिक- आर्थिक- राजकीय पाश्र्वभूमी आणि त्यामुळे दलित जाणिवेच्या आविष्करणाला मिळालेले विशिष्ट रूप यापासून सुरुवात करत नंतरच्या काळात एकूणच दलित विचारधारा, दलित ओळखीचे राजकारण, आवर्तात सापडलेली संघटना व चळवळ, जगण्याच्या मुळावरच उठलेली जागतिक भांडवली व्यवस्था आणि त्याचा तार्किक परिणाम म्हणून सर्जनशीलतेलाच आलेले अरिष्ट याचा चिकित्सक आढावा घेतला गेला. त्याच दिवशी ‘२१ व्या शतकातील मराठी कविता’ या विषयावरील सत्रात कवी श्रीधर नांदेडकर आणि प्रफुल्ल शिलेदार यांनी महत्त्वपूर्ण मांडणी केली. युव्हाल नोह हरारी आणि अरुंधती रॉय यांचीही सत्रे झाली. परंतु पेंग्विनतर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘द रॅडिकल इन आंबेडकर’ या पुस्तकाचे लेखक आनंद तेलतुंबडे यांना याच पुस्तकावरील चर्चेसाठी अटकेच्या टांगत्या तलवारीमुळे येता आले नाही, हे खेदजनक आहे.

थोडक्यात, ‘गांधीवाद’, ‘नेहरूवाद’ आणि ‘आंबेडकरवाद’ यांची समकाळाशी सुसंगत राहत नवी अर्थनिर्णयने प्रसवू शकणारी मूल्यांकने, विश्लेषणे यांचा जागर यानिमित्ताने आयोजकांना घालता आला. उत्सवाचे भव्य व नेटके आयोजन, सत्रांचे विषयवैविध्य आणि त्यांची तार्किक-कलात्मक मांडणी स्मरणात राहील. विशेषत: तिथे तरुणांचा सहज आणि जिज्ञासू वावर, त्यांचे निर्भीड प्रश्न आणि जाणून घेण्याची प्रचंड लालसा. हे सगळे एकत्रित पाहिल्यावर वाटले, किमान केरळला तरी आपल्या भविष्याची चिंता करण्याचे कारण नाही!

rahulkosambi25@gmail.com

Story img Loader