|| गजू तायडे

‘फेक न्यूज’च्या परिणामांशी झुंजणाऱ्या आजच्या जगात ‘टिनटिन’ नावाच्या मूळ बेल्जियन, परंतु नंतर जगाचा नागरिक बनलेल्या एका निरागस, बुद्धिमान आणि साहसी ‘वार्ताहरा’नं नव्वदीत पदार्पण केलं आहे..

Loksatta Lokrang Shades of greedy people on stage play
रंगभूमीवरील लोभस माणसांच्या छटा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
Sharayu Sonawane
मालिकांच्या महासंगमाबाबत ‘पारू’ फेम शरयू सोनावणे काय म्हणाली? घ्या जाणून…
Premachi Goshta Fame swarda thigale aerial yoga in aata hou de dhingana season 3
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मुक्ताचं ‘हे’ कौशल्य पाहून चकित व्हाल, ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांचीही झाली हालत खराब
tula shikvin changalach dhada adhipati big misunderstanding about wife akshara
अधिपतीचा अक्षराबद्दल मोठा गैरसमज! ‘ते’ दृश्य पाहताच होणार राग अनावर, नव्या अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
फसक्लास मनोरंजन

‘टिनटिन’चा आणि माझा परिचय झाला, तेव्हा माझं जनसमजानुसार कॉमिक्स वाचण्याचं वय उलटून गेलं होतं. (मात्र, जनसमजाकडे दुर्लक्ष करून मी अजूनही कॉमिक्स वाचतो!) परतवाडा नावाचं तेव्हाचं अर्धशहर सोडून मुंबईला जे.जे.त अ‍ॅडमिशन घेतल्यावर माझ्या हाती पहिलं ‘टिनटिन’ कॉमिक पडलं. तोवर माझ्या जन्मगावात मी किती तरी हिंदी आणि इंग्रजी कॉमिक्स चावून-चावून वाचली होती.. विकत घेऊन, लायब्रऱ्यांतून आणून, मित्रांकडून उसनी घेऊन वगैरे.

‘टिनटिन’नं माझ्यापुढं कॉमिक्सची नवी दुनिया खुली केली. (तशी ती ‘अ‍ॅस्टेरिक्स’ आणि ‘मॅड’नंदेखील केली, पण त्याबद्दल नंतर कधी तरी.) सर्वात पहिल्यांदा वाचलं ते ‘टिनटिन इन तिबेट’ आणि वेडय़ासारखा ‘टिनटिन’च्या प्रेमात पडलो. त्यानंतर झपाटय़ानं ‘टिनटिन’च्या संपूर्ण मालिकेचा फडशा पाडणं आलंच. एवढय़ा वर्षांत ‘टिनटिन’ची बरीच पारायणं झाली आणि पहिल्यांदा वाचताना जे जाणवलं नव्हतं ते नव्यानं उलगडू लागलं.. चित्रांबद्दल आणि आशयाबद्दलही!

‘टिनटिन’ची पुन्हा आठवण येण्याचं कारण म्हणजे वाचलेली एक बातमी- ‘टिनटिन’नं नव्वदाव्या वर्षांत प्रवेश केल्याप्रीत्यर्थ एर्जेची आणि अर्थातच ‘टिनटिन’चीही मायभूमी असलेल्या बेल्जियमच्या सरकारनं ‘टिनटिन’च्या गौरवार्थ जारी केलेलं पाच युरोचं नाणं. एखाद्या कॉमिक पात्रावर एखाद्या देशानं असं अधिकृत नाणं काढणं विरळाच. या बातमीनं माझ्यासारख्या ‘टिनटिन’च्या जगभरातल्या चाहत्यांना मोठा आनंद वाटला असणार, यात शंकाच नको!

१० जानेवारी १९२९ ही ‘टिनटिन’ची जन्मतारीख. (या लेखात सगळीकडे इंग्रजी भाषिक देशांतल्या उच्चारांप्रमाणे ‘टिनटिन’ लिहिलं असलं, तरी त्याचा फ्रेंच उच्चार ‘तांतां’ किंवा ‘त्यांत्यां’च्या जवळपासचा होतो. ‘टिनटिन’चा मराठीत अनुवाद झालाच, तर त्याला ‘तात्या’ म्हणायला हरकत नसावी!) जॉर्ज रेमी ऊर्फ एर्जे (Hergé) हा बेल्जियन लेखक आणि चित्रकार त्याचा जन्मदाता. ‘ल व्हिंटीम सिएक्ल’ (Le Vingtième Siècle) या नियतकालिकाच्या ‘ल पती व्हिंटीम’ (Le Petit Vingtième) या मुलांसाठीच्या साप्ताहिक पुरवणीतल्या ‘टिनटिन, रिपोर्टर, इन द लँड ऑफ द सोव्हिएट्स’ या कॉमिक स्ट्रिपमधून टिनटिन आणि त्याचा कुत्रा ‘स्नोई’ यांनी पदार्पण केलं. या कथेला मुळात प्लॉट वगैरे असा नव्हताच. एकामागून एक थरारक दृश्ये लिहिताना आणि चितारताना एर्जे इम्प्रोवाइझ करत गेला आहे. तो वाचकांना मोटारी, विमानं, रेल्वेगाडय़ा आणि नावांमधून गरागरा फिरवत स्टालिनच्या रशियाची सफर घडवतो.

एर्जेनं चित्रकलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं. त्याची सुरुवातीची कामगिरी सुमार आहे आणि ‘टिनटिन, रिपोर्टर, इन द लँड ऑफ द सोव्हिएट्स’ या त्याच्या पहिल्यावहिल्या, तसंच ‘टिनटिन इन द काँगो’ या दुसऱ्या कॉमिक स्ट्रिपमधली त्याची कामगिरी त्याच्या कारकीर्दीतली सर्वात निकृष्ट असावी असं एर्जेच्या अनेक समीक्षकांचं म्हणणं आहे. मात्र, ‘टिनटिन इन अमेरिका’ या तिसऱ्या पुस्तकापासून पुढं एर्जे लेखक व चित्रकार म्हणून सातत्यानं बहरत गेलेला दिसतो.

एर्जेची पहिली स्ट्रिप- ‘टिनटिन, रिपोर्टर, इन द लँड ऑफ द सोव्हिएट्स’ – १९३० मध्ये पुस्तकरूपात प्रकाशित झाली. मराठी प्रकाशक नवख्या साहित्यिकाच्या काढतात तशा फक्त पाचशे प्रती काढल्या गेल्या होत्या. आज अत्यंत दुर्मीळ झालेल्या त्या पहिल्या आवृत्तीच्या प्रतींच्या किमतींचा केवळ अंदाजच करता येईल. त्यानंतर १९६९ मध्ये त्याच्या पुन्हा पाचशे प्रतीच काढल्या गेल्या- एर्जेच्या खासगी संग्रहासाठी! सर्वासाठी असलेली आवृत्ती प्रकाशित व्हायला मात्र चार दशकांपेक्षा जास्त काळ जावा लागला. कारण कथेत व्यक्त झालेला दृष्टिकोन काहीसा जुना झाला आहे आणि नवीन पिढीला तो काळ अपरिचित आहे, असं प्रकाशकांना वाटत होतं. असं असूनही १९७३ मध्ये काढलेली सर्वासाठी खुली आवृत्ती आणि पुढच्या कित्येक आवृत्त्या लाखोंनी खपल्या. तोवर ‘टिनटिन’ची नंतरची बहुतेक पुस्तकं प्रकाशित होऊन गेली होती.

‘टिनटिन, रिपोर्टर, इन द लँड ऑफ द सोव्हिएट्स’ ते १९८६ साली पुस्तकरूपात आलेल्या ‘टिनटिन अँड आल्फ-आर्ट’पर्यंतचा हा सारा फक्त २४ पुस्तकांचा पसारा. (खरं तर तेवीसच, कारण ‘टिनटिन अँड आल्फ-आर्ट’ हे ‘टिनटिन’च्या इतर पुस्तकांसारखं नाही. या पुस्तकावर एर्जेनं १९७८ साली काम सुरू केलं होतं. मात्र, १९८३ मध्ये त्याचं निधन झाल्यानं ते अपुरंच राहिलं. आपल्यानंतर इतर कुणीही ‘टिनटिन’च्या कथा पुढे सुरू ठेवू नयेत अशी एर्जेची इच्छा होती, असं सांगून इतरांच्या हातून ही कथा पूर्ण करून घेण्यास एर्जेच्या पत्नीनं- फॅनी व्लामिंकनं नकार दिला. मग एर्जेनं केलेली पेन्सिल स्केचेस् आणि नोट्स यांनाच संकलित करून हे पुस्तक काढलं गेलं. ईव्ह रोदियेसारख्या काही कॉमिक्स क्रिएटर्सनी ही कथा स्वत: पूर्ण करून तिच्या आवृत्त्या काढल्या, मात्र त्या अनधिकृत आहेत.) १९३० पासून १९७६ पर्यंत ४६ र्वष व्यापणाऱ्या या पुस्तकांनी टिनटिनला ‘कल्ट फिगर’ आणि त्याच्या कहाण्यांना ‘कल्ट लिटरेचर’ बनवलं.

टिनटिन कोणत्याही आदर्श कथानायकाप्रमाणे बुद्धिमान, उदात्त, निष्कपट, प्रामाणिक, साहसी, मित्रकर्तव्याला जागणारा वगैरे आहे. मात्र, त्याची शरीरयष्टी नायकांप्रमाणे पीळदार, उंच नसून तो लहानखुऱ्या चणीचा ‘टीनएजर’ आहे. त्याच्या आई-वडिलांचा, भाऊ-बहिणींचा वा कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याचा उल्लेख त्याच्या कथांमधून केलेला नाही. त्याचा कुत्रा स्नोई हा त्याचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. स्नोई बोलतो, विचारही करतो; मात्र ते फक्त वाचकांनाच दिसतं, टिनटिनला किंवा पुस्तकातल्या इतर पात्रांना नव्हे. नंतर ‘द ब्लू लोटस’मध्ये टिनटिनला भेटलेला ‘चँग’ तर त्याचा जणू काही सख्खा भाऊच बनला.

बाकीची काही अफलातून पात्रंदेखील टिनटिनच्या कुटुंबाचाच भाग आहेत असं समजायला हरकत नाही. यांत पहिल्या क्रमांकावर आहे कॅप्टन हॅडॉक हा दर्यावर्दी. हॅडॉक साधाभोळा, मात्र डोक्यानं तापट आहे. व्हिस्कीच्या प्रेमात तो आकंठ बुडालेला असतो आणि शिव्यादेखील अनुप्रासात देतो. त्याशिवाय- कानानं अधू, विसरभोळा, परंतु प्रचंड बुद्धिमान प्रोफेसर कॅलक्युलस; मिशांच्या ठेवणीतला अगदी बारकासा फरक सोडला तर हुबेहूब एकमेकांसारखी दिसणारी, वागणारी (तरीही जुळे भाऊ  नसलेली), गडबडगुंडा, गाढवपणा करण्यात आणि गोंधळ घालण्यात पटाईत असलेली इंग्लिश गुप्त पोलिसांची उद्धट जोडगोळी थॉमसन आणि थाँप्सन; बिअ‍ॅन्का कॅस्टाफिओरे ही अतिविशाल ऑपेरा गायिका.. वगैरे मंडळीदेखील टिनटिनचं कुटुंबच म्हणता येईल. रास्टापॉपुलोस, डॉ. म्युलर ही खरं तर व्हिलन कंपनी; पण एर्जेची किमया अशी की, तीदेखील वाचकांना टिनटिनचं विस्तारित कुटुंबच वाटू शकतं.

टिनटिन पेशानं वार्ताहर; पण गंमत अशी की, पहिलं पुस्तक सोडलं तर तो वार्ताकन करणं, न्यूज स्टोऱ्या लिहिणं वगैरे वार्ताहरानं करायला हव्यात अशा गोष्टी करताना कधीच दिसत नाही. एकामागून एक साहसांमध्येच तो गुंतलेला असतो किंवा तो असेल तिथं साहसंच त्याचा माग काढत येतात असंही म्हणता येईल. टिनटिनच्या साहसकथांचा कॅनव्हास जगभरातले, सर्व खंडांतले कित्येक देश व्यापतोच, शिवाय त्याच्या ‘डेस्टिनेशन मून’ आणि ‘एक्स्प्लोअर्स ऑन द मून’ या दोन भागांतल्या कथेला अवकाशाचा आणि चंद्राचाही पट आहे. टिनटिनच्या साहसांमधून त्याचे वाचक किती तरी अपरिचित ठिकाणांमधून, वेगवेगवेगळ्या संस्कृतींमधून आणि बिकट प्रसंगांमधून प्रवास करतात.

‘द ब्लू लोटस’आधीच्या आणि ‘द ब्लू लोटस’पासूनच्या अशी टिनटिनच्या कथांची विभागणी करता येते. पहिल्या चार पुस्तकांनंतर एर्जेला टिनटिनच्या कथांमध्ये आणखी जास्त वास्तवदर्शिता असावी असं वाटू लागलं. अशातच त्याची गाठ चँग चोंग-चेन या ब्रसेल्सच्या आर्ट अ‍ॅकॅडमीत शिल्पकला शिकणाऱ्या तरुणाशी पडली. मोठय़ा कळकळीनं आणि तपशिलांत खोलवर जाऊन चँगनं एर्जेपुढं चीनचा विस्तीर्ण सांस्कृतिक, कलात्मक आणि राजकीय पट उलगडला. आजवर ठाऊक नसलेलं जग एर्जेच्या नजरेला पडलं आणि तो यातली शक्य तेवढी माहिती आपल्या कथनांत आणि चित्रांत अंतर्भूत करण्याच्या मागं लागला. इथून एर्जेच्या कारकीर्दीला वेगळं वळण मिळालं आणि ‘द ब्लू लोटस’ हे मास्टरपीस साकार झालं! आपल्या मित्राविषयी कृतज्ञता म्हणून एर्जेनं ‘द ब्लू लोटस’मधल्या लहान चिनी मुलाला ‘चँग’ हेच नाव दिलं. इथून पुढच्या सर्व टिनटिन कथांमध्ये काटेकोर अभ्यास आणि सखोल संशोधन दिसून येतं.

वेगवेगळ्या देशांतल्या पात्रांच्या तोंडी असलेल्या काही स्पीच बलून्समध्येदेखील बरेचदा एर्जेनं तिथली स्थानिक भाषा आणि त्या भाषेचीच लिपी वापरली आहे. उदाहरणार्थ- ‘टिनटिन इन तिबेट’! या कथेतल्या काही भारतीय पात्रांच्या स्पीच बलून्समध्ये हिंदी भाषा आणि देवनागरी लिपी वापरली आहे.

टिनटिनच्या काही कथांमध्ये मानवी अधिकारांचे पडसादही उमटलेले दिसतात. उदाहरणार्थ, ‘द रेड सी शार्क्‍स’मध्ये गुलामांच्या आधुनिक व्यापारासारख्या विषयाला स्पर्श केला गेला आहे. ‘टिनटिन अँड द पिकारोज’मध्ये टिनटिन जनरल अल्काझारला त्याची सत्ता पुन्हा मिळवून देण्यात मदत करतो. एका अटीवर : त्यानं सूडभावनेनं हत्याकांडं घडवून आणू नयेत. अमेरिकेत त्या काळी सर्रास केल्या जाणाऱ्या ‘लिंचिंग’चादेखील एर्जे उपहास करतो. तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणावर, माफिया टोळ्यांवर एर्जेने केलेल्या भाष्यांचा एक अंतप्र्रवाहही ‘टिनटिन’च्या गोष्टींमधून वाहत असल्याचे लक्षात येते.

दुसऱ्या महायुद्धात, १९४० मध्ये बेल्जियम जर्मनांच्या ताब्यात असताना ‘ल व्हिंटीम सिएक्ल’ हे नियतकालिक बंद पडलं आणि एर्जेला ‘द क्रॅब विथ द गोल्डन क्लॉज’ ही स्ट्रिप जर्मनांनी प्रकाशनाची परवानगी दिलेल्या ‘ल स्वा’ (Le Soir) या नियतकालिकात छापून आणावी लागली. (काहींच्या मते एर्जेचं हे कृत्य जर्मनधार्जिणं होतं.)

एर्जे त्याच्या चित्रांतल्या तपशिलांविषयी, बारकाव्यांविषयी अत्यंत जागरूक होता. चित्रे अचूक आणि यथार्थ असावी म्हणून स्थानं, इमारती, वाहनं, वेशभूषा वगैरेंचा तो बारकाईनं अभ्यास करायचा. या वास्तवदर्शी चित्रणाला भक्कम जोड होती ती रेखाटनाच्या ‘लिन्य क्लेअर’ (Ligne claire) किंवा ‘क्लिंर लाइन’ या शैलीची. एर्जे या रेखाटनशैलीचा प्रणेता आणि विकासक मानला जातो. या शैलीत समान रुंदी असलेल्या स्वच्छ, स्पष्ट रेषा वापरल्या जातात. पोत, सावल्या, करडय़ा छटा वगैरे दाखवण्यासाठी एकमेकींना छेदणाऱ्या रेषांची जाळी (क्रॉस हॅचिंग), ठिपके वगैरेंचा अवलंब केला जात नाही. छाया आणि प्रकाशातला भेद नगण्य असतो. रंग प्राथमिक आणि ठळक असतात. व्यंगचित्रात्मक पात्रांचे चित्रण बरेचदा वास्तवदर्शी पाश्र्वभूमीवर केले जाते. आज ही शैली जुनाट समजली जात असली, तरी एर्जेच्या काळात ती अत्यंत लोकप्रिय होती आणि अनेक कॉमिक्स क्रिएटर ती अनुसरत असत.

१९५२ मध्ये ‘एक्स्प्लोअर्स ऑन द मून’ या कथेला सुरुवात करताना एर्जेला काळजीपूर्वक केलेल्या रेखाटनांची आणि तांत्रिक बाबींतील अचूकपणाची मोठी निकड भासू लागली आणि मग अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यानं ‘स्टुडिओ एर्जे’ची स्थापना केली.

टिनटिन आणि एर्जेला आंतरराष्ट्रीय पातळीवर अगणित पुरस्कार आणि मानसन्मान लाभले. टिनटिनच्या कथा सुमारे ६० भाषांत अनुवादित झाल्या आहेत (भारतात फक्त बंगाली भाषेत). १९८२ मध्ये बेल्जियन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीनं एका लघुग्रहाला एर्जेचं नाव दिलं. टिनटिनच्या कथांवर अनेक ‘टिनटिनॉलॉजिस्ट्स’नी संशोधनही केलं आहे. रेडिओ, टेलिव्हिजन, नाटकं, चित्रपट वगैरे माध्यमांतूनही टिनटिन साकारला गेला आहे.

व्यंगचित्रकार जॉर्ज प्रॉस्पे रेमीनं, अर्थात एर्जेनं जगभर भटकंती करणाऱ्या धाडसी टिनटिनची प्रामुख्यानं लहान मुलांसाठी निर्मिती केली, तेव्हा पुढे जाऊन हा एवढा प्रचंड जागतिक सांस्कृतिक वारसा बनेल याची त्याला कल्पना आली असेल का?

‘फेक न्यूज’च्या परिणामांशी झुंजणाऱ्या आजच्या जगात ‘टिनटिन’ नावाच्या मूळ बेल्जियन, परंतु नंतर जगाचा नागरिक बनलेल्या एका निरागस, बुद्धिमान आणि साहसी वार्ताहरानं नव्वदीत पदार्पण केल्याबद्दल त्याची पुस्तकं आधी वाचली नसल्यास वाचून आणि आधी वाचली असल्यास पुन्हा वाचून आपण मनापासून सदिच्छा व्यक्त करू या!

लेखक व्यंगचित्रकार आणि कॉमिक्स क्रिएटर आहेत.

त्यांचा ईमेल : gajootayde@gmail.com

Story img Loader