|| शशिकांत सावंत
आधी अभियांत्रिकी शिक्षण घेणारा, मग गणिती तत्त्वज्ञानात रस निर्माण होऊन जर्मनीहून केम्ब्रिजला आलेला आणि बट्र्राण्ड रसेलच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला लुडविग विट्गेन्स्टाइन याला तत्त्वज्ञानावरची चर्चा भाषेकडे वळवण्याचे श्रेय निर्विवाद आहे. वैचारिक आणि चरित्रात्मक पुस्तकांमधून भेटणारा विट्गेन्स्टाइन अलौकिक प्रतिभावंत होता. त्याचे हे स्मरण कालच झालेल्या त्याच्या १३० व्या जयंतीनिमित्त..
विसाव्या शतकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वांमध्ये ‘टाइम’ साप्ताहिकाने चित्रकार म्हणून पाब्लो पिकासो, लेखक म्हणून जेम्स जॉइस, कवी म्हणून टी. एस. इलियट आणि तत्त्वज्ञ म्हणून लुडविग विट्गेन्स्टाइन यांची निवड केली. यातल्या लुडविग विट्गेन्स्टाइनच्या जन्माला २६ एप्रिल २०१९ रोजी, शुक्रवारी १३० वर्षे पूर्ण झाली.
युरोपमधल्या अत्यंत धनाढय़ घराण्यात लुडविग विट्गेन्स्टाइनचा जन्म झाला. त्याला आठ भावंडे होती. यापैकी दोन भाऊ संगीतकार होते. अन्य दोन भावांनी आत्महत्या केली. त्याचे वडील व्हिएन्नाचाच काय, पण शेजारच्या देशांचाही लोखंडाचा दर ठरवत. अभिजन कुटुंब असल्यामुळे लेखक, चित्रकार, कवी, संगीतकार यांचा त्याच्या घरी राबता होता. विट्गेन्स्टाइनचे बरेचसे शिक्षण घरीच झाले. नंतर तो जर्मन विद्यापीठात शिकला. गणित आणि इंजिनीअिरगमध्ये रस असल्यामुळे मँचेस्टर येथे तो एअरोनॉटिकल इंजिनीअिरगच्या शिक्षणासाठी १९०८ मध्ये गेला. तिथे बट्र्राण्ड रसेलचे ‘द प्रिन्सिपल्स ऑफ मॅथेमॅटिक्स’ आणि फ्रेडरिक फ्रेगचे ‘द फाऊंडेशन्स ऑफ अरिथमेटिक’ वाचून त्याला गणितीय तत्त्वज्ञानात रस निर्माण झाला. तेव्हा त्याला फ्रेगने केम्ब्रिजला जायचा सल्ला दिला. त्यामुळे १९१० साली तो केम्ब्रिजला पोहोचला. त्या काळात केम्ब्रिजमध्ये बटर्रण्ड रसेल, जी. ई. मूर यांसारखे तज्ज्ञ शिक्षक होते. रसेल तत्त्वज्ञानाचा वर्ग घेत असत. विट्गेन्स्टाइन रसेलच्या सहवासात आला.
रसेलने सुरुवातीला विट्गेन्स्टाइनबद्दल लिहिले होते : ‘एक थोडासा वेडपट वाटणारा जर्मन माणूस आला आहे. पण तो मला थकवून सोडतो.’ सुरुवातीचे काही दिवस रसेलची व्याख्याने ऐकल्यानंतर त्याने रसेलला विचारले की, ‘मी इंजिनीअर होऊ की, तत्त्वज्ञ होऊ?’ रसेल त्याला म्हणाला की, ‘तू एक काम कर, मी सांगतो त्या विषयावर निबंध लिहून आण. मग ठरवू.’ रसेलने आत्मचरित्रात लिहिले आहे : ‘मी त्याच्या निबंधाचे पहिले वाक्य वाचूनच ओळखले, की हा तत्त्वज्ञ होणार’! रसेलने आपला सहकारी जी. ई. मूर याला विट्गेन्स्टाइनबद्दलचे त्याचे मत विचारले. मूर म्हणाला, ‘ही इज अ ग्रेट मॅन! कारण मी वर्गात शिकवतो, तेव्हा साऱ्या विद्यार्थ्यांचे चेहरे शांत असतात. फक्त याचाच चेहरा गोंधळलेला दिसत असतो.’ साहजिकच तत्त्वज्ञानाचा अभ्यास कर असा सल्ला रसेलने विट्गेन्स्टाइनला दिला. पुढे विट्गेन्स्टाइन त्याचा प्रिय शिष्य बनला. इतका की, प्रेयसीला लिहिलेल्या पत्रातही रसेल विट्गेन्स्टाइनबद्दलच लिहीत असे! रसेल त्याच्याबद्दल पत्रात लिहितो : ‘तत्त्वज्ञानातले जे प्रश्न मी सोडवू शकलो नाही, ते बहुधा हा सोडवेल.’
रसेल त्याच्या प्रेमातच पडला. इतरही काही त्याचे आवडते विद्यार्थी होते; पण विट्गेन्स्टाइन अगदी वेगळा होता. वादात तो माघार घेत नसे. नवे नवे प्रश्न उपस्थित करी. त्याची पॅशन जबरदस्त होती; इतकी की, रसेल स्वत:चे प्रतिबिंब त्याच्यात पाहू लागला. ‘माझ्यापेक्षा तात्त्विक प्रश्नांची त्याची ओढ जास्त आहे. त्याला भेटलो हा एक आयुष्यातील आनंदाचा योग..’ अशा शब्दांत रसेल त्याचे वर्णन करतो. १९१२ साली लिहिलेल्या दोन पत्रांत रसेलने लिहिले आहे : ‘विट्गेन्स्टाइन एखाद्या कलावंताप्रमाणे लहरी आहे. अंतज्र्ञानी आहे. दर दिवशी तो सकाळी आशेने कामाला सुरुवात करतो आणि संध्याकाळी निराशेत गुरफटून जातो. कधी तो प्रचंड रागात येतो. अमुक मला समजलेच पाहिजे अन्यथा मी मरून जाईन, अशी टोकाची वृत्ती त्याच्यात आहे. कधी अगदी तणावात असताना एकदम विनोद करण्याचीही त्याची वृत्ती आहे.’
केम्ब्रिजमध्ये रसेल, मूर आणि केन्स यांच्याशी झालेल्या चर्चातून विट्गेन्स्टाइनने काही नोंदी केल्या. पण त्या नोंदी नीटपणे लिहायच्या आतच त्याला १९१४ साली युद्धावर सैनिक म्हणून जावे लागले. १९१४ ते १९१८ या काळात तो रशियन आघाडीवर लढत होता. शेवटच्या काळात त्याला तुरुंगवासही झाला. त्या काळात तो आपल्या वहीत तत्त्वज्ञानविषयक काही नोंदी लिहून ठेवत असे. तेही एक, दोन, तीन असे क्रमांक टाकून. युद्ध संपल्यावर त्याने ती वही रसेलला दाखवली. रसेलने ते लिखाण जसेच्या तसे छापायचा सल्ला दिला. १९२१ साली ते जर्मन भाषेत ‘ट्रॅक्टॅटस लॉजिको-फिलॉसॉफिकस’ या नावाने आणि पुढच्याच वर्षी ते इंग्रजीत प्रसिद्ध झाले. हा छोटेखानी ग्रंथ अवघ्या ८० पृष्ठांचा आहे. पण त्याने विट्गेन्स्टाइनला तत्त्वज्ञ म्हणून जगभर मान्यता मिळवून दिली. या ग्रंथाचे वर्णन ‘लंडन टाइम्स’ने ‘तत्त्वज्ञानावरील कविता’ असे केले आहे. खरेच आहे ते. वानगीदाखल ग्रंथातील पुढील काही वाक्ये पाहा : ‘जे दाखवता येते, ते सांगता येत नाही’, ‘तत्त्वज्ञानाचे कार्य म्हणजे बाटलीत अडकलेल्या माशीला बाटलीचे तोंड दाखवणे’, ‘जेथे शब्द खुंटतात, तेथे माणसाने गप्पच बसले पाहिजे.’ भाषाविषयक तत्त्वज्ञानाची कोडी आणि त्यांची विट्गेन्स्टाइनने केलेली उकल यांमुळे हा ग्रंथ अल्पावधीतच लोकप्रिय झाला. या ग्रंथाने तार्किक परमाणुवादाला (लॉजिकल पॉझिटिव्हिझम) जन्म दिला. ही विचारसरणी मांडणारी मंडळी ‘व्हिएन्ना सर्कल’ म्हणून ओळखली जातात.
‘ट्रॅक्टॅटस’मधील मांडणीवर शोपेनहॉवर आदी तत्त्वज्ञांचा प्रभाव दिसतो. फ्रेगच्या तर्कशास्त्र आणि भाषाविषयक मांडणीचाही प्रभाव त्यावर आहे. ‘ट्रॅक्टॅटस’ची रचना सात मूलभूत विधानांभोवती केली आहे; ती विधाने अशी : (१) जग म्हणजेच सर्व काही आहे. (२) सूक्ष्म आण्विक तथ्यांचे अस्तित्व म्हणजेच जग होय. (३) घडणाऱ्या घटनांची जी स्थिती असते, ती तथ्य. या तथ्याचे तार्किक चित्र म्हणजेच विचार होय. (४) शेवटी विचार हा एक गडद, संवेदनात्मक विधान आहे. (५) सर्व विधाने मूलभूत विधानांची ‘ट्रथ फंक्शन्स’ असतात. (६) या सत्यात्मक विधानांचे स्वरूप गणिती समीकरणाने दाखवता येते. (७) जिथे आपल्याला बोलता येत नाही, तिथे आपण गप्प बसले पाहिजे.
जग, विचार व भाषा आणि त्याद्वारे तत्त्वज्ञानाच्या समस्यांना विट्गेन्स्टाइन या ग्रंथात उत्तरे शोधू पाहतो. किंबहुना तत्त्वज्ञानातील सारे प्रश्न आपण या ग्रंथात सोडवले आहेत, असा त्याचा विश्वास होता. यानंतर तो बराच काळ परागंदा झाला. या काळात त्याने माळीकाम केले. एका छोटय़ा गावात शिक्षक म्हणून काम केले. त्या गावात एक रेल्वेगाडी अडकली, तेव्हा त्याने तिचे इंजिन दुरुस्त करून दिले. आपल्या बहिणीचे घर, घराची पूर्ण रचना त्याने एखाद्या आर्किटेक्टप्रमाणे करून दिली. अगदी कडीकोयंडय़ासकट (हे घर आता अभ्यासाचा विषय झाले आहे. त्यावर एक भलेमोठे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.).
विट्गेन्स्टाइन लहरी होता. तो सतत अस्वस्थ असे. त्याला नैराश्याचे झटकेही येत. त्याच्या वाटय़ाला घरची अफाट संपत्ती आली; पण ती त्याने एका मित्राकडे दान करण्यासाठी दिली आणि युरोपातील गरजू लेखक, चित्रकार, कवी यांना त्यातून मदत व्हावी असे सुचवले. रिल्केसारख्या महाकवीलाही यातून आर्थिक मदत मिळाली. पैसे वाटून टाकण्याचे कारण विट्गेन्स्टाइन सांगतो : तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात पैसा हा अडथळा आहे! तो अत्यंत साधेपणाने राहात असे. चहाच्या रिकाम्या खोक्यांवर झोपत असे.
१९२९ साली तो केम्ब्रिजला परतला. त्याने केम्ब्रिजमध्ये अध्यापन करावे असे रसेलला वाटत होते. मात्र, केम्ब्रिजमध्ये शिकवायचे तर पीएच.डी. असावी लागते. तेव्हा ‘ट्रॅक्टॅटस’ हा ग्रंथच पीएच.डी.चा प्रबंध म्हणून सादर कर, असे रसेलने त्याला सुचवले. त्यानुसार तो सादर करण्यात आला आणि रसेल व मूर यांनी त्याची तोंडी परीक्षा घेतली. अभिप्राय देताना मूरने लिहिले : ‘‘ट्रॅक्टॅटस’ हा अलौकिक प्रतिभेचा आविष्कार आहे. पण असे असले तरी केम्ब्रिज पीएच.डी.साठी असलेले सारे निकष तो पूर्ण करतो.’
त्यानंतर विट्गेन्स्टाइन केम्ब्रिजमध्ये शिकवू लागला. मात्र त्याचे शिकवणे इतर प्राध्यापकांसारखे नव्हते. नाटकात स्वगत म्हणावे, तसे तत्त्वज्ञानाबद्दल स्वत:शीच मोठमोठय़ाने तो बोलत असे. त्यात कधी तो ‘ट्रॅक्टॅटस’मधले मुद्दे खोडून काढत असे. समोरचे विद्यार्थी चकित होत. या काळात ‘ट्रॅक्टॅटस’मधील तत्त्वज्ञानाला छेद देणारी मांडणी त्याला सुचत होती. काही जण यास ‘मिड-विट्गेन्स्टाइन’ म्हणतात. नंतरच्या काळात मात्र विट्गेन्स्टाइनने गणित, मानसशास्त्र, विज्ञान अशा अनेक गोष्टींचा विचार करत नवीन मांडणी करण्याचा प्रयत्न केला.
तत्त्वज्ञान असे मानते की, जग वस्तूंनी भरलेले आहे. पण विट्गेनस्टाइनचे म्हणणे होते की, जग तथ्याने भरलेले आहे. अशी तथ्ये सत्य किंवा असत्य असतात. जर ती तशी नसतील तर बोलणेच खुंटले! त्याने तत्त्वज्ञानावरची चर्चा भाषेकडे वळवली. सुरुवातीला केम्ब्रिज आणि नंतर ऑक्सफर्ड फिलासॉफी या नावाने हे तत्त्वज्ञान रुजले. १९३० ते १९४० या काळात त्याने जे वर्ग घेतले त्याच्या नोंदी त्याच्या विद्यार्थ्यांनी ठेवल्या. त्याच्या शेवटच्या काळात विट्गेन्स्टाइन ‘फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स’ या पुस्तकावर काम करत होता. त्याने ते प्रसिद्ध करायचे ठरविले, पण आयत्या वेळी माघार घेतली. अखेरीस ते त्याच्या मृत्यूनंतर (१९५१) म्हणजे १९५३ साली प्रसिद्ध झाले. या पुस्तकात तत्त्वज्ञानाच्या पारंपरिकच काय, पण ‘ट्रॅक्टॅटस’मधील मांडणीलाही छेद दिलेला आहे.
विट्गेन्स्टाइनचे सहकारी आणि त्याचे शिष्य यांनी त्याच्यावर अतीव प्रेम केले. बहुतेक विद्यार्थ्यांनी त्याच्या आठवणी लिहिल्या. त्यातून पुस्तके तयार झाली. त्यातील नॉर्मन माल्कम याचे ‘लुडविग विट्गेन्स्टाइन : अ मेमॉयर’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. त्यात माल्कमने अनेक आठवणी सांगितल्या आहेत. विट्गेन्स्टाइनला रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आवडत. मारधाड सिनेमेही आवडत. तो फारसे वाचत नसे. त्याने केलेल्या निवडक लेखनात फ्रेझरच्या ‘गोल्डन बो’वरील टीकालेख उत्कृष्ट आहे. विद्यार्थ्यांनी त्याच्या व्याख्यानांच्या केलेल्या नोंदींवरून ‘ब्ल्यू बुक’ आणि ‘रेड बुक’ ही दोन पुस्तके सिद्ध झाली. पुढे विट्गेन्स्टाइनवर बरीच पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यातील रे मंक याने लिहिलेली ‘लुडविग विट्गेन्स्टाइन : द डय़ूटी ऑफ जीनियस’ आणि ‘हाऊ टू रीड विट्गेन्स्टाइन’ ही पुस्तके लोकप्रिय आहेत.
shashibooks@gmail.com