‘नाविकांच्या बंडा’चा इतिहास सर्वानाच माहीत असेल. १८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबईत ब्रिटिश नौदलाच्या ‘तलवार’ या भूतळावर सुरू झालेला खलाशांचा संप हां हां म्हणता देशभर पोहोचला (म्हणजे, ७८ पैकी किमान ७४ ब्रिटिश युद्धनौकांवर आणि २० भूतळांवर युनियन जॅकऐवजी तिरंगे फडकले! लष्कराच्याही काही तुकडय़ांनी लाक्षणिक संप केले..) आणि ब्रिटिशांनी अवघ्या चार दिवसांत हे बंड मोडून काढलं असलं तरी त्यांना चांगलाच दणका मिळून, त्यानंतर अवघ्या १८ महिन्यांत भारत राजकीयदृष्टय़ा स्वतंत्र झाला. या बंडाची आठवण देणारं एका खलाशाचं स्मारक आज कुलाब्यात (वूडहाउस जिमखान्याजवळ, इलेक्ट्रिक हाउसच्या मागे- पूर्वीच्या ‘वूडहाउस रोड’ व आताच्या नाथालाल पारीख मार्गावर) आहे, हेही काही जणांना माहीत असेल. पण बलाइचंद्र (बी.सी.) दत्त हे त्या बंडाचे एक महत्त्वाचे करविते होते, हे फार कमी जणांना माहीत असेल! या बी.सी. दत्त यांनी लिहिलेलं ‘नौबिद्रोहो’ (१९६८) हे बंगाली आणि ‘म्यूटिनी ऑफ द इनोसंट्स’ (१९७१) हे इंग्रजी पुस्तक बंडाचा प्रथमपुरुषी एकवचनी इतिहास सांगणारं आहे.
पुस्तक कसं आहे, त्यात काय काय सांगितलं आहे, हे नंतर पाहूच. पण ४५ वर्षांपूर्वीच्या या पुस्तकाची आठवण आज, येत्या १८ फेब्रुवारीस नाविकांच्या त्या बंडाला ७० र्वष पूर्ण होत असताना येण्याचं कारण सांगितलं पाहिजे. ते असं की, बराच काळ ‘आउट ऑफ प्रिंट’ असलेलं, त्यामुळे दुर्मीळ झालेलं हे पुस्तक आता दुसऱ्या आवृत्तीच्या नव्या रूपात आजच्या वाचकांपुढे येतं आहे! साहजिकच, १८ रोजी त्याचं प्रकाशन समारंभपूर्वक केलं जाणार आहे. पण आजच्या काळात ही दुसरी आवृत्ती वाचतानाचा अनुभव केवळ त्या बंडाच्या इतिहासाची आठवण जागी होऊन ऊर अभिमानानं भरून यावा, इतकाच असेल का? शक्यच नाही- एकतर, आम्ही किंवा आमचं हे बंड किती महान होतं, अशा आत्मप्रौढीच्या थाटात हे पुस्तक अजिबात लिहिलं गेलेलं नाही. या पुस्तकात अभिमानाऐवजी आत्मपरीक्षणाची आणि इतिहासाची ‘कहाणी’ सांगण्याऐवजी इतिहासाचा शोध घेण्याचा प्रयत्नच लेखक बी.सी. दत्त यांनी केला होता आणि तो यशस्वीही झाला होता. हा आत्मपरीक्षणाचा सूर ‘म्यूटिनी ऑफ द इनोसंट्स’ या शीर्षकापासूनच दिसतो. यातल्या ‘इनोसंट्स’चा अर्थ ‘निष्पाप- निरपराध’ अशा अंगाचा असेलही, पण त्यापेक्षाही या इंग्रजी शब्दाच्या अर्थातली ‘अनभिज्ञ’ ही छटा लेखकाला अभिप्रेत असावी, याचा खुलासा २३४ व्या पानावर होतो. ‘आम्ही सारे जण ‘पोलिटिकल इनोसंट्स’ तर होतोच, त्यामुळेच तर आम्ही (बंड हे काही राष्ट्रीय प्रतिकार-चळवळीचे अंग ठरणार नाही, हा) तत्कालीन राजकीय नेत्यांचा सल्ला धुडकावला’ असं वाक्य आहे, त्यातला ‘पोलिटिकल इनोसंट’ म्हणजे ‘राजकारणाबाबत अनभिज्ञ’. ही अनभिज्ञता अनेकांच्या अंगी आजही असते.. अशा अनभिज्ञांनी आपापल्या परीनं आणि सुचेल त्या मार्गानं देशप्रेम दाखवायला सुरुवात केली की त्यांना- किंवा त्यांच्या मार्गाना- असंमजस म्हणणारे लोक जणू ‘देशद्रोही’ ठरवले जातात. हे असं काहीसं त्याही वेळी, राष्ट्रीय चळवळ आणि बंडखोर नाविक यांच्यात होऊ पाहात होतं. मुख्य प्रवाहातली राजकीय चळवळ आपल्याला पाठिंबाच कशी काय देत नाही, उलट लांबच का जाताहेत ते आपल्यापासून? आपण तर देशासाठी लढतोय, क्रांतीच करतोय, असं नाविकांना वाटत होतं.. ते तेव्हा त्वेषानंच वाटलं असणार, याची सूचक जाणीव या पुस्तकातून लेखकानंही करून दिली आहे. पुस्तकातला हा भाग, चांगलं ललित साहित्य तुम्हाला जसं एक हुरहुर आणि अस्वस्थता देतं आणि त्या अस्वस्थेतून तुमचं जगण्याबद्दलचं भान वाढवतं, तसं रसायन आजच्या वाचकाला देणारा आहे. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातला त्वेष हळूहळू इतिहास-शोधाकडे जातो. नौदलापेक्षा नागरी क्षेत्रातच (फ्री प्रेस जर्नलमध्ये काही काळ पत्रकार, पुढे ‘लिंटास’ या जाहिरातसंस्थेत बरीच र्वष अधिकारी आणि मग अगदी २००४-०५ पर्यंत पनवेलजवळच्या तारा गावातल्या ‘युसुफ मेहेरअली सेंटर’चे संचालक म्हणून) दीर्घ कारकीर्द केलेला लेखक आपल्यापुढे येतो. ‘फ्री प्रेस’ ते ‘लिंटास’ हे बी.सी. दत्त यांच्या आयुष्यातलं दुसरं मोठं वळण येऊन गेल्यानंतर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे लेखकाचं त्या वेळचं वय (चाळिशीतलं) तसं तरुणच होतं, हेही जाणवतं आणि आयुष्याच्या अखेरच्या वर्षांत त्या- ऐन विशीतल्या- बंडखोरीबद्दल दत्त यांना काय वाटत होतं, हे मात्र अनुत्तरित राहतं. उत्तरायुष्यात दत्त यांची मतं काय होती, हे सांगणारा उपसंहार दुसऱ्या आवृत्तीला अनाठायी ठरला नसता, पण तो इथं नाही.
त्यामुळे मग, १९७१ साली जसं होतं तसंच पुस्तक- केवळ (अॅडमिरल) विष्णू भागवत यांच्या छोटेखानी प्रस्तावनेसह- वाचकांहाती येतं. भागवतांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद फौजे’इतकंच महत्त्व या बंडाला मिळावं अशी शुभकामना व्यक्त केली आहे, त्याबद्दल तज्ज्ञांचे वादही असू शकतील; परंतु ‘हे पुस्तक म्हणजे नाविकांच्या बंडाचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि विश्वासार्ह असं इतिहाससाधन आहे’ हा भागवतांचा दावा मात्र खरा असल्याची साक्ष पुस्तकातून मिळत राहते. लेखक बी.सी. दत्त यांना सरकारकडील या बंडाचे चौकशी-अहवालही अभ्यासायचे होते, पण कधी म्हणजे कधीच जाहीर झाले नसल्यानं नौदलाचीच त्या वेळची प्रसिद्धीपत्रकं, भारतातले तत्कालीन ब्रिटिश युद्धमंत्री फिलिप मेसन यांनी दिल्लीच्या केंद्रीय असेम्ब्लीत या बंडाबद्दल केलेलं निवेदन आणि पुढे त्याबद्दल झालेली चर्चा अशी काहीच दस्तावेजी साधनं दत्त यांना मिळू शकली. पण बंडाच्या केंद्रस्थानी असलेल्या २० जणांच्या समितीची सुरुवातच त्यांच्यापासून झालेली असल्यानं, तसंच बंडात सहभागी असलेल्या अनेकांशी त्यांचा उत्तम संपर्क असल्यानं केवळ त्यांच्या (अभिनिवेश अजिबात नसलेल्या!) आठवणी, हेच मोठं इतिहाससाधन आहे. दत्त यांना ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये नोकरी देणारे आणि मुख्य म्हणजे, नाविकांच्या बंडाचं व्यापक आणि उत्तम वृत्तसंकलन ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं ते माजी संपादक एस. नटराजन यांची दीर्घ प्रस्तावना पहिल्या आवृत्तीपासूनची आहे. तीत काहीसा आत्ममग्न सूर असला, तरीही इतिहास कळण्यासाठी त्याही लिखाणाची मदत होतेच.
दत्त यांनी स्वतच्या लहानपणापासून लिखाण केलंय, पण त्यामागचा हेतू ‘देशप्रेमाची भावना कशी रुजली’ हेच सांगण्याचा असल्यामुळे ते उगाच स्मरणरंजन होत नाही. जिथं कधीकाळी एखादीच राजकीय सभा व्हायची अशा वर्धमान (बरद्वान) जिल्ह्यातल्या खेडय़ातून पाटण्याला लांबच्या चुलत भावाकडे, तिथं हरकाम्येगिरी करण्याचा उबग येऊन भणंगावस्था, मग देशभक्त नरेन्द्र सिन्हा यांनी दिलेला आधार आणि त्यातून पुन्हा सुरू झालेलं वाचन.. शिवाजी महाराजांबद्दल आकर्षण.. असे तपशील इथं येतात. पण ‘बॅकग्राउंड’, ‘इव्हेंट’ आणि ‘कंटिन्युएशन’ या तीन प्रकरणांत बंडाचा इतिहास उलगडतो आणि ‘आफ्टरवर्ड’मध्ये हेच बंड दिल्लीत केंद्रीय असेम्ब्लीमध्ये कसं चर्चिलं जात होतं याची समीक्षा होते.
पुस्तकात काही साधेसुधे- पण रोमांचक म्हणावे असे क्षण आहेत.. हे क्षण अविस्मरणीयच- केवळ दत्त यांच्यासाठीच नव्हे- आजही, देशासाठीसुद्धा! उदाहरणार्थ, ‘काय केलं म्हणजे आपल्याला राष्ट्रीय चळवळीचाही पाठिंबा मिळेल?’ असा विचार करून त्या बंडाच्या दुसऱ्या दिवशी आधी उपोषणाला बसणारे आणि नंतर ‘ब्रिटिश अधिकारीच अंगावर आले तर दोन हात करण्यासाठी अंगात जोर हवा’ म्हणून दुपारचं जेवण खाणारे अवघ्या १९ ते २५ र्वष वयोगटातले नाविक (यांना इंग्रजी नौदलीय परिभाषेत ‘रेटिंग्ज’ म्हणतात- म्हणजे, अद्याप ‘कमिशन्ड’ नसलेला शिकाऊ खलाशी).. किंवा, ‘रेटिंग्जचं खाणंपिणं बंदच करून टाकू’ असं ब्रिटिशांनी ठरवल्याचं बाहेर- नागरी वस्त्यांत- समजल्यावर गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात स्वेच्छेनं स्वतच्या घरून नाविकांसाठी डबे घेऊन आलेले मुंबैकर.. नौदलातल्या भारतीय कमिशन्ड बंदूकधाऱ्यांना ‘भाई, आपण सारे मिळून ब्रिटिशांशी लढतोय.. आमच्यावर गोळी चालवून काय मिळणार तुम्हाला?’ असं भावनिक आव्हान नाविकांनी केल्यावर खांद्याच्या खाली आलेल्या बंदुका!
ते सारे क्षण, स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सुगम भारतीय-इंग्रजीत आपल्यापर्यंत पोहोचवणारं हे पुस्तक आहे. बंडाच्या तिन्ही दिवसांत प्रचाराचं युद्धसुद्धा ब्रिटिशांनी कसं चालू ठेवलं होतं आणि तरीही नागरी जनतेनं त्यावर कसा विश्वास ठेवला नव्हता, याचे अनेक तपशीलही दत्त यांनी दिले आहेत. नौदलाच्या त्या वेळच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये कसे अंतर्विरोध होते, याची चिरफाडच केली आहे. एक हरती लढाई आपण लढतो आहोत हे लक्षात आल्यावर नाविकांनी शरणागतीची सशर्त तयारी दाखवली होती, त्याचा युद्धमंत्री फिलिप मेसन यांनी दिलेला तपशीलही आहे. मात्र, ‘नाविकांना कोणी फूस लावली’ हे शोधण्यावर ब्रिटिशांचा भर होता आणि ते काही त्यांना शेवटपर्यंत जमलं नाही- कारण अशी बाहेरून कोणाची फूस नव्हतीच- हा या पुस्तकातून आबालवृद्धांना काही ना काही शिकवून जाईल असा भाग आहे. जेवणखाण्यापासून झोपण्या-आंघोळीच्या जागेपर्यंत भारतीय आणि ब्रिटिश असा भेदभाव नौदलात होत होता, ब्रिटिश अधिकारी (१९४२ ची ‘चलेजाव’ चळवळ आणि सतत लढावंच लागलेल्या दुसऱ्या महायुद्धातून झालेलं नुकसान अशा दुहेरी कात्रीत सापडल्यानंतर असेल, पण-) नाविकांशी अविश्वासानं वागू लागले होते किंवा उगाचच डाफरू लागले होते. याच्या परिणामी बंडाच्या कल्पनेला पाठिंबा मिळत गेला आणि त्याआधीच्या- देशप्रेम कसं व्यक्त करावं याच्या- चर्चा ‘तलवार’ भूतळावर दोन महिने सुरू होत्या. प्रत्यक्ष बंडाची कल्पना १६ फेब्रुवारीपासूनच साकारू लागली आणि १८ रोजी ‘चले जाव’ ही घोषणा सकाळच्या न्याहारीवेळीच झाल्यावर भडका उडाला!
..हे सारं मुळातून वाचण्यासारखं आहेच. पण केवळ इतिहास म्हणून नव्हे.. आपले आजचे डोळे, आजचे कान, ‘पोस्टनॅशनलिस्ट’ म्हणवल्या जाणाऱ्या आजच्या काळातली आपली बुद्धी जर शाबूत ठेवली, तर हे पुस्तक म्हणजे एक ‘मानवी दस्तावेज’- ह्य़ूमन डॉक्युमेंट- वाटू लागेल! निष्पाप आणि बेभान प्रेमाचा अनुभव कुसुमाग्रजांच्या एका कवितेत (काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात..) ‘होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले। होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले।’ अशा ओळींनी संपतो.. तशी जाणीव या बंडाबद्दल देऊन, ‘होते म्हणू बंड एक.. दिवस चार तोललेले’ अशी वाचकाची अवस्था करून मगच हे पुस्तक मिटतं.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2016 रोजी प्रकाशित
होते म्हणू बंड एक..
पुस्तक कसं आहे, त्यात काय काय सांगितलं आहे, हे नंतर पाहूच.
Written by अभिजीत ताम्हणे

First published on: 13-02-2016 at 03:53 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta book review mutiny of the innocents