यशोधन जोशी
सध्याच्या करोना संकटकाळात ‘डास’ हा जीव दुर्लक्षित होऊ शकतो. पण करोना विषाणूने सध्या जग जसे वेठीला धरले आहे, तसेच प्रसंग डासांनीही मानवी इतिहासात अनेकदा आणले. त्यांचा सामना माणसाने कसा केला, याची रोचक कहाणी सांगणाऱ्या पुस्तकाची ही ओळख..
एखाद्या संध्याकाळी घरात, बागेत किंवा एखाद्या डोंगरावर वा जंगलात आपण बसलेलो असताना कानापाशी अचानक ओळखीची मंद गुणगुण ऐकू येते. आपण दोन-तीनदा हात हलवून त्या जीवाला हाकलून देण्याचा प्रयत्न करतो किंवा कानाशी एखादी टाळी वाजवून त्याच्या जीवावरही उठण्याचा प्रयत्न करतो, यापेक्षा जास्त किंमत आपण त्या जीवाला देत नाही. त्याच्याबद्दल सविस्तर काही लिहिणे तर मग लांबच राहिले!
पण ही कसर भरून काढलेली आहे कॅनडाच्या लष्करात अधिकारी म्हणून चाकरी बजावलेल्या आणि नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएच.डी. केलेल्या डॉ. टिमोथी वाइनगार्ड यांनी. ‘द मॉस्क्युटो : ए ह्य़ुमन हिस्टरी ऑफ अवर डेडलीएस्ट प्रीडेटर’ या पुस्तकाद्वारे डासांबद्दल एक ऐतिहासिक दस्तावेजच त्यांनी सादर केला आहे. एकूण आपली धारणा बघता, पुस्तकासाठी तसा हा विषय क्षुल्लक वाटेल; पण या छोटय़ा जीवाने केलेले पराक्रम, घेतलेले बळी आणि त्याच्यावर आजवर खर्च झालेले पैसे लक्षात घेतले तर आपले डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.
अँटाक्र्टिका, आइसलँड, सेशेल्स आणि फ्रेंच पॉलीनेशिया हे भाग सोडले, तर उरलेल्या पृथ्वीवर सुमारे ११० लाख कोटी डास आहेत आणि नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाने मांडलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दोन लाख वर्षांत पृथ्वीवर १०८ अब्ज मनुष्यप्राणी होऊन गेले, त्यापैकी ५२ अब्ज डासांच्या चाव्यातून पसरलेल्या मलेरिया आणि इतर रोगांमुळे मृत्युमुखी पडले. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने त्यांच्या स्थापनेपासून- म्हणजे इ.स. २००० पासून आजवर ४० अब्ज डॉलर्स डासांवरच्या संशोधनासाठी खर्च केलेले आहेत. जगभरातील डास प्रतिकारक फवारे, मलम आणि इतर गोष्टींची उलाढाल सुमारे ११ अब्ज डॉलर्सची आहे, अशी आकडय़ांची जंत्रीच डॉ. वाइनगार्ड वाचकासमोर मांडतात.
डास मलाच का चावतात?
१९ कोटी वर्षांपासून डासांची ही गुणगुण पृथ्वीवर गुंजत आहे. डायनोसॉरपासून सर्व मोठय़ा प्राण्यांचे चावे त्यांनी मोठय़ा आवडीने घेतलेले आहेत. पण यांतही वैशिष्टय़ म्हणजे डासांच्या सगळ्या जातींतल्या फक्त माद्याच हा हुळहुळणारा डंख करतात, नर डास फक्त फुलातील रसावर जगतात. एखाद्या ठिकाणी अनेक लोक असतानाही डास केवळ एखाद्याच माणसाला जास्त का चावतात, याचीही कारणे डॉ. वाइनगार्ड देतात. ‘ओ’ रक्तगटाच्या लोकांना डास चावण्याचे प्रमाण ‘ए’, ‘बी’ आणि ‘एबी’ रक्तगटाच्या लोकांपेक्षा दुप्पट असते; ‘ओ’खालोखाल ते ‘बी’ रक्तगटाच्या रक्ताला पसंती देतात. मजेदार गोष्ट म्हणजे गडद कपडे घालणाऱ्या, उत्तम अत्तरे वापरणाऱ्या आणि बीअर पिणाऱ्या मनुष्यप्राण्यांची डासांना फारच आवड असते. नियमित व्यायाम करणाऱ्यांच्या शरीरातून कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन जास्त होते; शिवाय गरोदर स्त्रियांच्या श्वासातून २० टक्के जास्त कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. डासांना त्याचा गंध आकर्षित करतो आणि ते लगेच तिथे पोहोचतात. आपल्याला एखादा डास चावण्यामागे एवढी सगळी कारणमीमांसा असते आणि आपल्याला तो चावण्याआधी त्याच्या एवढय़ाशा मेंदूत एवढी मोठी नियमावली असलेले ‘सॉफ्टवेअर’ कार्यरत होते, याचा आपल्याला अंदाजही नसतो. बरे, यातल्या कोणत्याही नियमात न बसूनही ते तुम्हाला चावणार नाहीत याची खात्री नाहीच!
डास : काही अतिप्राचीन नोंदी
इ.स.पूर्व सुमारे १५५० ते १०७० या काळात इजिप्तमध्ये राणी नेफ्रितीती, रामसेस-२ आणि तुतनखामेन यांसारखे प्रभावी राज्यकर्ते होऊन गेले. तेव्हाही इजिप्तमध्ये डासांनी उच्छाद मांडलेला होता. ऐन तारुण्यात- म्हणजे १८ व्या वर्षीच मरण पावलेल्या तुतनखामेनच्या मृत्यूचे कारण मलेरियाही असण्याची शक्यता वर्तवली जाते. इ.स.पूर्व पाचव्या शतकात हीरोडोटसने लिहिलेल्या वृत्तान्ताचा संदर्भ इथे डॉ. वाइनगार्ड देतात. हीरोडोटस लिहितो की, ‘डासांमुळे इजिप्तमधील जनता अतिशय हैराण झालेली आहे. उच्च दर्जाच्या लोकांनी झोपण्यासाठी घरावर उंच मनोऱ्यासारखे मजले बांधलेले आहेत. वाऱ्याच्या झोतांमुळे डास तिथंवर पोहोचत नाहीत. सामान्य जनता मात्र मासे पकडायच्या बारीक जाळ्यांचा वापर करून डास आपल्यापासून दूर ठेवतात.’ मलेरियापासून (अर्थात हे नाव तेव्हा नव्हतेच) बचाव करण्यासाठी इजिप्शियनांचा तेव्हाचा उपाय म्हणजे मानवी मूत्राने स्नान करणे.
भारतीय ग्रंथांत आणि परंपरेत आलेल्या तापांच्या प्रकारांचीही डॉ. वाइनगार्ड यांनी नोंद घेतलेली आहे. इ.स.पूर्व १५ व्या शतकात ‘तक्मन्’ म्हणजेच ताप हा सर्व रोगांचा राजा मानला जाई. तक्मन् हा पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजेतून निर्माण होतो, अशी कल्पना होती. आपल्याला साठलेले पाणी आणि डास यांच्यात काही संबंध आहे याची कल्पना होती. डासांच्या चावण्याने ताप येतो हे आपणच सर्वप्रथम ओळखले होते. सुश्रुताने- डास हे पाच प्रकारचे असतात, हे नमूद करून त्यांच्या चावण्याने ताप, अंगदुखी, उलटय़ा, जुलाब, ग्लानी येणे, थंडी वाजणे आदी विकार होतात, हे नोंदवलेले आहे. प्लीहेची वृद्धी होणे किंवा ती कडक होणे हेसुद्धा डासांच्या चावण्याने संभवते, असे तो नोंदवतो.
‘३००’ नावाचा सिनेमा काही वर्षांपूर्वी आलेला होता. या सिनेमामुळे आपल्याला सुप्रसिद्ध थर्मोपिलीची लढाई, पर्शियन सम्राट झरसिस आणि ग्रीक राजा लिओनायडस माहीत झाले. इ.स.पूर्व ४८० मध्ये पर्शियन सम्राट झरसिस आपले वडील डॅरियस यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेव्हाच्या अथेन्स, स्पार्टासारख्या गणराज्यांनी बनलेल्या ग्रीसवर चालून आला आणि लवकरच त्याने अथेन्सवर कब्जा केला. सर्वच गणराज्ये या युद्धात उतरलेली होती. जमीन आणि समुद्र दोन्हीवर हे युद्ध सुरू होते. ग्रीसमधल्या प्रत्येक शहराला तटबंदी होती आणि तटबंदीबाहेर पाणथळ आणि दलदलीच्या जागा होत्या. आगेकूच करणाऱ्या पर्शियन सैनिकांना तिथल्या डासांनी आपला प्रसाद दिला. डासांचा हल्ला इतका जबरदस्त होता, की जवळपास ४० टक्के सैन्य मलेरिया आणि अतिसाराने मृत्युमुखी पडले. अशक्त झालेल्या या सैन्याला मग ग्रीकांनी प्लेटीआच्या युद्धात सहज हरवले. हा घटनाक्रम सांगताना लेखक- ग्रीक लोक डासांपासून आपला बचाव कसा करत, हे सांगायला विसरलेला आहे.
ग्रीक वैद्य हिपॉक्रेट्सने ताप आणि मलेरिया यांच्यातला फरक विशद केला. हिपॉक्रेट्सने ठामपणे मलेरिया हा देवाचा कोप नसून दूषित हवेमुळे होणारा आजार आहे, हे सांगितले. मलेरिया हे नावच ‘टं’’ म्हणजे दूषित आणि ‘अ१्रं’ म्हणजे हवा यांतून तयार झाले आहे. मलेरिया डासांमुळे होतो हे तोवर उघड व्हायचे होते, त्यामुळे ही समजूत १९ व्या शतकापर्यंत कायम होती.
इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने अलेक्झांडर ग्रीसमधून निघाला आणि युरोप, मध्यपूर्वेतले देश जिंकत भारताच्या सीमेवर म्हणजे सिंधूनदीच्या काठावर येऊन उभा राहिला. तिथेच पौरसाबरोबर त्याची लढाई झाली आणि त्याने त्यात विजय मिळवला. मग त्याच्या सैन्याची आणि डासांची गाठ पडली. त्याच्या सैन्यात रोगराई पसरली. जेवढे सैनिक त्याने लढाईत गमावले होते, त्याहून जास्त मलेरिया आणि विविध तापांना बळी पडले. जे वाचले त्यांचे निव्वळ सापळे उरले. त्यांच्यातला जोम आणि शौर्य जणू संपूनच गेले. याचे वर्णन लेखक ग्रीक इतिहासकार अॅरियनचा संदर्भ देऊन करतो. लढण्याची ताकद संपलेला अलेक्झांडर तिथून माघार घेऊन बॅबिलॉनमार्गे मायदेशी जायला निघाला. दमलेल्या अलेक्झांडरने बॅबिलॉनमध्ये मुक्काम ठोकला. त्याचवेळी त्याला ताप येऊ लागला, जो सुमारे १२ दिवस टिकला आणि त्यातच अलेक्झांडरचा मृत्यू झाला.
रोमन वैद्य गॅलेननेही मलेरियाचा अभ्यास केला आणि तापाचा एक नवीन प्रकार ‘एलीफंटीअॅसिस’ म्हणजे हत्तीपाय शोधला. गॅलेननेच सर्वप्रथम मलेरिया हा दूषित हवेमुळे न होता डासांमुळे होतो, हे सांगितले. रोमन्स मलेरियावर उपाय म्हणून पपायरसची पाने जवळ बाळगत आणि ‘अब्राकाडाब्रा’ हा मंत्र लिहिलेला ताईत गळ्यात बांधत. याशिवाय त्यांनी ‘फेब्रीस’ ही तापाची देवीही निर्माण केली आणि जागोजागी तिची मंदिरे बांधली. आपल्याकडच्या खोकलाई, मरीआई वगैरेची ही रोमन बहीण मानायला हरकत नसावी! यापुढे लेखक रोमन साम्राज्याची निर्मिती, त्याचा युरोपभर झालेला प्रसार आणि जोडीला मलेरियाही युरोपात कसा पसरला, याबद्दल विश्लेषण करतो.
ख्रिस्तानंतर दोन-तीन शतकांत रोमन साम्राज्यापासून सुरुवात होऊन ख्रिस्ती धर्म जगभर पसरला आणि रोममधील सामान्य जनता ख्रिश्चनांच्या सेवाभावी वृत्ती आणि रुग्णसेवेमुळे ख्रिस्ती झाली. व्हॅटिकन हे ख्रिश्चनांचे धर्मस्थळ, पण टायबर नदीकाठी वसलेले हे शहर सदैव डासांनी वेढलेले असायचे. तिथला धर्मार्थ दवाखाना मलेरियाच्या रुग्णांनी गजबजलेला असायचा. खुद्द पोपही व्हॅटिकनमध्ये न राहता रोमजवळ राहत असत. इ.स. १६२६ पर्यंत डासांमुळे जवळपास सात पोप आणि पाच रोमन राजांचा मृत्यू झालेला होता.
वसाहतकाळात..
इथून पुढे वसाहतींचा काळ सुरू होतो. तुर्कानी इस्तंबूल जिंकल्याने युरोपीयांना आशियात येण्यासाठी नवीन मार्ग शोधावा लागला. त्या प्रयत्नात अनेक दर्यावर्दी वेगवेगळ्या देशांत पोहोचले आणि याची सुरुवात कोलंबसपासून झाली. स्पेनच्या राजा आणि राणीच्या मदतीच्या जोरावर तो अमेरिका खंडात पोहोचला आणि तिथे युरोपीय सत्तेचा पाया घातला. युरोपीय लोक अमेरिकेत येऊन पोहोचल्यावर त्यांच्यासोबत गेलेल्या अॅनोफेलीस डासांनीही तिथे आपले बस्तान बसवले आणि या डासांची सवय नसणारे व त्यापासून उत्पन्न होणाऱ्या रोगांसाठी प्रतिकारकशक्तीच नसल्याने लाखो मूलनिवासी मलेरिया आणि फ्लूला बळी पडले. स्थानिक गुलामांची संख्या कमी झाल्याने तंबाखू, ऊस, कॉफी आणि कोकोची लागवड करण्यासाठी बाहेरून मजूर आणण्याची गरज भासू लागली. मग आफ्रिकी वसाहतींतून हे गुलाम अमेरिकेत आणले गेले. पण या गुलामांबरोबर अमेरिकेत शिरकाव झाला तो ‘एडिस’ जातीच्या डासांचा. १६४७ साली डचांनी अमेरिकेची ओळख पिवळ्या तापाशी करून दिली आणि मग पुढच्या दीड शतकात त्याने लाखो बळी घेतले.
एका संघराज्याची निर्मिती
इंग्लंडने आपला मोर्चा अमेरिकेकडे वळवलेला बघून स्कॉटलंडलाही वाटले की, आपण या शर्यतीत उतरावे. इंग्लडच्या कंपन्या स्कॉटिश लोकांना आपल्यात सामावून घ्यायला तयार होईनात. यावर भरपूर चर्चा होऊन धडाडीचा स्कॉटिश उद्योजक विल्यम पॅटर्सनने १६९८ साली एक कंपनी सुरू केली आणि चार लाख पाउंड भांडवल गोळा केले. या कंपनीचा उद्देश पनामात जाऊन वसाहत स्थापन करणे आणि व्यापारातून पैसा मिळवणे होता. पनामाचा डॅरिअन हा भाग पॅटर्सनने त्यासाठी निवडला. डॅरिअन हा भाग सुपीक असला तरी जंगलांनी वेढलेला होता. जुलै १६९८ मध्ये पॅटर्सन १२०० लोकांना बरोबर घेऊन निघाला आणि तीन महिन्यांनी डॅरिअनला जाऊन पोहोचला. परंतु काही दिवसांतच मलेरिया आणि पिवळ्या तापाची साथ सुरू होऊन त्यात ६०० लोक बळी पडले. शेवटी उरलेल्या लोकांनी कशीबशी आपली जहाजे हाकली आणि धडपडत मायदेशी आले. मूर्खपणाचा कळस म्हणजे पहिली फळी डॅरिअनला जाऊन स्थिरस्थावर व्हायच्या आतच उत्साही स्कॉटिश लोकांनी दुसरी सफर सुरू केलेली होती. ज्यात सुमारे हजारभर लोक होते आणि त्यापैकी ३०० स्त्रिया होत्या. यांनाही मलेरिया आणि पिवळ्या तापाचा भयंकर फटका बसला आणि जेमतेम शंभर लोकच स्कॉटलंडला परतू शकले.
इकडे भांडवलदारांचे पैसे बुडाल्याने अनेकांचे धंदे बुडाले, रोजगार संपला आणि दंगे उसळले. या परिस्थितीतून स्कॉटलंडला बाहेर काढण्यासाठी इंग्लंडने हे सगळे कर्ज निवारण्याची हमी दिली; पण अट ही घातली की, स्कॉटलंडने इंग्लडचे एक संघराज्य झाले पाहिजे आणि शेवटी या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्कॉटलंडला १७०७ च्या युनियन अॅक्टअन्वये इंग्लंडचे संघराज्य व्हावे लागले आणि ग्रेट ब्रिटन अस्तित्वात आले.
महायुद्ध आणि डास
१९४१ साली जपानच्या पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली. मलेरियाची कल्पना असल्याने अमेरिकेने ताबडतोब डास आणि मलेरिया प्रतिबंधक उपायांबद्दल संशोधन सुरू केले. क्विनाईनचा शोध लागलेला असला तरी त्याचा पुरवठा फारच मर्यादित होता. त्यामुळे पर्यायी व्यवस्था शोधणे भाग होते. यातूनच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डीडीटीचा शोध लागला. याशिवाय अॅटाब्राइन आणि क्लोरोक्विन ही रासायनिक औषधेही याच सुमारास तयार झाली. १९४२ पासून अमेरिकेने डीडीटीचा वापर सुरू केला, लवकरच दोस्त राष्ट्रांनीही डीडीटीचा वापर सुरू केला.
अमेरिकेची ‘मॉस्क्युटो ब्रिगेड’ ही सैनिकांबरोबर रणभूमीवर जाऊन डीडीटीची फवारणी करत असे. सैनिकांना अॅटाब्राइनच्या गोळ्यांचे नियमित वाटप होऊ लागले, पिवळ्या तापाच्या लसी दिल्या गेल्या. तरीही सुमारे सात लाख सैनिकांना मलेरिया आणि डेंग्यूची बाधा झाली.
जर्मनीने १९४४ साली इटलीतून माघार घेताना इटलीतील अँझिओमध्ये दोस्त राष्ट्रांच्या फौजांना रोखण्यासाठी आणि इटालियन जनतेला अद्दल घडवण्यासाठी डासांचा वापर करून घेतला. खुद्द हिटलरच्या आज्ञेनुसार हे सगळे घडवण्यात आले. सगळ्यात पहिल्यांदा स्थानिकांकडून क्विनाईन, मच्छरदाण्या, इतकेच काय खिडकीच्या जाळ्याही जप्त करण्यात आल्या. त्यानंतर मुद्दाम पाणथळ जागा तयार करून तिथे दूषित पाणी साठू दिले गेले. या सगळ्याचा परिणाम म्हणून अॅनोफेलीस डासांची भयंकर पैदास झाली. फवारणी करता येऊ नये म्हणून या पाण्याजवळ स्फोटके लावण्यात आली. जर्मनीच्या व्यूहरचनेप्रमाणे तिथे तळ ठोकलेल्या तुकडय़ातील ४५ हजार अमेरिकी सैनिकांना मलेरियाची लागण झाली.
इथे ऐतिहासिक भाग संपतो आणि महायुद्धानंतरच्या डास आणि डासांमुळे होणाऱ्या रोगांच्या निर्मूलनाचे जागतिक प्रयत्न आदींची माहिती दिलेली आहे. डीडीटी व त्याच स्वरूपाची दुसरी कीटकनाशके यांची निर्मिती, तापनिवारक औषधे वगैरेचे संशोधन. यासाठी रॉकफेलर आणि बिल गेट्ससारख्या विश्वस्त संस्थांनी दिलेल्या देणग्या, जागतिक आरोग्य संघटनेने अमेरिका आणि आफ्रिकेतील मलेरियाच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न आदींची माहिती देण्यासाठी दोन प्रकारणे खर्ची पडलेली आहेत.
या पुस्तकाची वैशिष्टय़े म्हणजे लेखक मूळ विषयाची माहिती देतानाच इतर अनेक विषयांना स्पर्श करून जातो. काही प्रकरणे वाचताना हौशी संशोधकांना अभ्यासासाठी अनेक विषय मिळून जातात. लेखकाकडे माहितीचा खजिनाच असल्याने त्याने वेगवेगळे संदर्भ वापरून भरभरून लिहून ठेवलेले आहे. शेवटी दिलेली संदर्भ ग्रंथांची यादी पाहिली तर त्यात अनेक ‘वाचलेच पाहिजे’ अशी पुस्तके आढळतात. आता न्यून सांगायचे झाले तर, अघळपघळ शैली टाळून पुस्तक आटोपशीर केले असते, तर ते अधिक प्रभावी झाले असते.
yashjoshi.in@gmail.com