बुकर पुरस्कारासाठी अमेरिकी पुस्तकांच्या सहभागाला २०१४ पासून सुरुवात झाली, तर यंदा अमेरिकी कादंबरीलाच बुकर मिळाले. अमेरिकी कादंबरीची ही बुकरवारी ज्युलिअन बार्न्‍ससारख्या प्रसिद्ध ब्रिटिश लेखकांच्या मात्र पचनी पडलेली नाही. आधीच इतर युरोपीय साहित्य परंपरांच्या प्रसाराने दबून गेलेले ब्रिटिश साहित्य आणि त्यात यंदाचे अमेरिकेचे बुकरयश.. कारणे काहीही असोत, साहित्यबाह्य कंपूशाहीपासून इंग्रजी साहित्यजगतही फारसे दूर नाही हेच यातून समोर येते..

साहित्यिक वितुष्टाचे दर्शन सार्वकालिक आणि सार्वत्रिक सारखेच आहे. डबकेरूपी असो किंवा अथांग सागरासारखे. साहित्यिक बाधेची अवस्था चुकणे नाही. गंमत म्हणजे एकेकटा साहित्यिक कळप करतो. मग दुसऱ्या कळपाला शिव्या घालतो. दुसरा कळप पहिल्यासह तिसऱ्याला, ही रांग वाढत जाते आणि संमेलने, मेळावे, लिटफेस्ट मूळ उद्देशाला बगल देत साहित्यबाह्य़ उण्या-दुण्यांसाठीचे व्यासपीठ बनते. विश्वव्यापी म्हणवून घेणाऱ्या साहित्यिकांचा आक्रसलेला दृष्टिकोन त्यातून समोर यायला लागतो. गुणवत्तेऐवजी प्रांतवाद, देशवाद आणि सीमावादाची संकुचितता बाळगणाऱ्या लेखकांचे मोठेपण मग दुणावायला सुरुवात होते. या आठवडय़ात बुकर पारितोषिकाच्या निकषांवरून असाच प्रकार ब्रिटिश लेखक ज्युलिअन बार्न्‍स यांनी समोर आणला. गेल्या महिन्यामध्ये अमेरिकी लेखक पॉल बेट्टी यांना त्यांच्या ‘सेलआऊट’ या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक मिळाले. अगदी अलीकडेपर्यंत बुकर पारितोषिकासाठी राष्ट्रकुल देश आणि झिम्बाब्वे या राष्ट्रामधील लेखकांचा विचार केला जात होता. गेली सात दशके अमेरिकी लेखक जाणीवपूर्वक या पुरस्काराच्या परिघाबाहेर ठेवण्यात आले होते. २०१४ साली पहिल्यांदा अमेरिकी कादंबऱ्यांचा विचार या पुरस्कारासाठी झाला आणि त्यातूनच यंदाचे पारितोषिक अमेरिकी लेखकाच्या पुस्तकाला मिळाले. बार्न्‍स यांनी त्यावरची आपली प्रतिक्रिया तब्बल महिना उलटल्यानंतर मोकळी केली.

त्यांच्या मते, ‘अमेरिकी लेखकांसाठी अमेरिकेत प्रचंड संख्येने पुरस्कार आहेत. ते ब्रिटिश लेखकांना कधी पारितोषिक देत नाहीत. बुकर पारितोषिकासाठी त्यांचा विचार करणे इतर देशांतील लेखकांसाठी अन्यायकारक आहे.’ हे विधान करताना त्यांनी एक प्रकारे अमेरिकी लेखकांची साहित्यिक गुणवत्ताच मान्य केली. पुरस्कार जगासाठी खुला असेल, तर तो कोणत्याही देशाचा का असेना, त्या लेखकाला त्याच्या गुणवत्तेसाठी मिळणे कधीही इष्टच. पण अमेरिकी लेखकांना इतर पुरस्कार आहेत म्हणून त्यांचा या ब्रिटिश पुरस्कारासाठी विचार होऊ नये हे मानणे पूर्णपणे चूक आहे. बुकरसाठी अमेरिकेचा विचार करणे हा मूर्खोत्तम निर्णय असल्याचे बार्न्‍स यांचे म्हणणे आहे. बार्न्‍स यांना खुद्द २०११ साली ‘सेन्स ऑफ एण्डिंग’ या पुस्तकासाठी बुकर मिळाले आहे. ते टॉलस्टॉय विश्लेषक आहेत आणि लेक्सिकोग्राफर म्हणजेच डिक्शनरी निर्मितीत सहभागी शब्दतज्ज्ञही आहेत. आता इतके सारे असताना पुरस्कारच काय, तर एकूण सर्वच बाबतीत त्यांचा दृष्टिकोन अमर्याद असल्याचे आत्तापर्यंत सर्व जगाला भासत होते. तीन वर्षांपासून अमेरिकी कादंबरी बुकरसाठी नामांकित झाली. तेव्हा सुरुवातीलाच विरोधाची सुईही न उगारणाऱ्या बार्न्‍स यांनी यंदा पारितोषिक अमेरिकेकडे गेल्यानंतर तलवार घेतल्यासारखे प्रगट होणे हेच मुळात चुकीचे होते. आता त्यांना पाठराखण करण्यासाठी आणखी साहित्यमरतड उभे राहणे, ही आणखी गमतीशीर बाब आहे. मराठी साहित्यजगतात असले फुकाचे वाद नेहमीच होत असतात, पण बऱ्यापैकी जागतिक पोहोच असलेल्या ब्रिटिश साहित्यवर्तुळाला बार्न्‍स यांच्या संकुचित विचारांनी ग्रहण लावलेले दिसते. एकीकडे या पुरस्काराला आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि सर्वाधिक साहित्यिक घुसळण होत असलेल्या अमेरिकेला त्यापासून दूर लोटायची भाषा करायची हा उघड दुटप्पीपणा यातून समोर आला. अमेरिकेत पारितोषिकांची कमतरता नाही. नॅशनल बुक अ‍ॅवॉर्डपासून ते नेल्सन अल्ग्रन अ‍ॅवॉर्ड हा एका कथेसाठी प्रचंड रक्कम देणारा पुरस्कार यांच्या मध्ये शेकडो पुरस्कार आहेत. ‘न्यूयॉर्कर’, ‘हार्पर्स’, ‘अटलांटिक’, ‘प्लेबॉय’सारखी थेट आंतरराष्ट्रीय वाचक असलेली साप्ताहिके-मासिके समांतर कथालेखकांना घडवत आहेत. ‘झोइट्रोप-ऑलस्टोरी’, ‘प्लोशेअर’, ‘टीनहाऊस’, ‘नॅरॅटिव्ह’, ‘काव्‍‌र्ह मॅगझिन’, ‘बिलिव्हर’, ‘मॅकस्विनी’ या दुसऱ्या आघाडीवर असलेल्या मासिकांकडून उगवत्या लेखकांना आणण्यासाठी थेट स्पर्धा-मोहिमा राबवल्या जातात. (गेल्या वर्षीपर्यंत प्लेबॉय कॉलेज फिक्शन पारितोषिक राबवून विशी-पंचविशीतील तरुण लेखकांना समोर आणत होते.) पुशकार्ट-मिलिअन अ‍ॅवॉर्डमधून अगदीच स्थानिक मासिकांमधील दर्जेदार कथा दरवर्षी जगभरच्या वाचकांना ऑनलाइन उपलब्ध होतात. याशिवाय अमेरिकी पुस्तकांची बाजारपेठ, न्यूयॉर्क  टाइम्स बेस्टसेलर लिस्ट, न्यूयॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स, शिकागो रिव्ह्य़ू ऑफ बुक्स, एलए रिव्ह्य़ू ऑफ बुक्स यांच्याद्वारे जगात योग्य प्रमाणात पोहोचतात. दोन-अडीचशेवर असलेल्या मासिकांमुळे अमेरिकी विद्यापीठांमध्ये क्रिएटिव्ह रायटिंग अभ्यासाचा विषय आहे. या शिक्षणातून नोकरीची शाश्वती मुबलक आहे. त्यामुळे तेथे जगात कोणत्याही राष्ट्रापेक्षा अधिक साहित्य घुसळण आणि गुणवत्तावृद्धीची स्पर्धा मोठी आहे. त्यातून तयार होणारे साहित्य बुकरसारख्या इंग्रजी भाषेतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी गृहीत न धरणे म्हणजे चांगल्या साहित्यावर थेट अन्याय आहे. हा अन्याय तीन वर्षांपूर्वी धुऊन निघाला असला तरी ब्रिटिश मानसिकतेतला अमेरिकीविरोध अद्याप संपलेला नाही, हेच बार्न्‍स यांनी दाखवून दिले.

‘सेलआऊट’ ही अमेरिकी कादंबरी खुद्द अमेरिकी व्यवस्थेविरोधी आहे. तिचे लेखक कृष्णवंशीय असले, तरी गंमत ही की त्यात कृष्णवंशीयविरोधही ठासून भरलेला आहे. यंदा ती पुरस्कारासाठी अंतिम पाचात असताना डेबोरा लेव्ही या ब्रिटिश लेखिकेची ‘हॉट मिल्क’ पुरस्कार मिळवेल यावर मोठा सट्टा रंगला होता. ओटेशा मॉशफेग या तरुण अमेरिकी लेखिकेची कादंबरी आयलिनदेखील तिच्याभोवतीच्या अभूतपूर्व वलयामुळे पुरस्कार मिळवेल अशी शक्यता होती. यंदाही सट्टेबाजांना सेलआऊटला पारितोषिक मिळाल्याने मोठा फटका बसला. डेबोरा लेव्ही यांची कादंबरी कितीही श्रेष्ठ असली तरी ब्रिटनकडे पुरस्कार राहिला नाही. पण गेल्या पाच दशकांमध्ये ब्रिटिश लेखकांनी या पुरस्कारावर वर्चस्व मिळविले, ते अमेरिकी लेखक त्यात नसल्यामुळे. हे पूर्णसत्य आहे.

एकीकडे रॉडी डॉयलपासून ते ज्युलिअन बार्न्‍सपर्यंत सगळ्याच ब्रिटिश लेखकांना आपल्या कथा ब्रिटिश जगप्रिय मासिक ग्रॅण्टाऐवजी न्यूयॉर्कर या अमेरिकी साप्ताहिकातच यायला हव्या असतात. निक हॉर्नबीसारख्या लेखकाला आपल्या पुस्तकावरील सदर अमेरिकी मासिकातच असावे वाटते. तिथे त्यांचा दुजाभाव प्रकर्षांने गडद होतो. गेल्या काही दशकांत ब्रिटिश लेखकांचा मोठ्ठा जथा अमेरिकेत स्थलांतरित झाला आहे. आयरिश, स्कॉटिश, फ्रेंच साहित्यिक ब्रिटिशांच्या टिवल्याबावल्या करीत युरोपात वर्चस्व राखून आहेत. त्यावर कढी म्हणून उत्तर युरोपातील स्कॅनेडेव्हियन साहित्य (डेन्मार्क, फिनलंड, आईसलॅण्ड) अनुवादातून लोकप्रिय होत आहे. तेव्हा आपल्यातील कमतरतेकडे दुर्लक्ष करीत दुसऱ्याच्या उण्या-दुण्यांचा समाचार घेण्याचा प्रकार ब्रिटनमध्ये वाढला आहे. ज्युलिअन बार्न्‍स यांचे वक्तव्य, त्यांना समर्थन देणाऱ्या दिग्गज पण आता साहित्यविश्वासाठी कालबाह्य़ झालेल्या नावांची गर्दी ही त्या कुरबुरप्रधानतेचे प्रतिनिधित्व करणारी आहे. याच वर्षांत आलेल्या आपल्या कादंबरीची पुरेशी चर्चा न झाल्यामुळे, ती कुठल्याही बडय़ा पुरस्कारासाठी नामांकनात न गेल्यामुळे बार्न्‍स यांनी प्रसिद्धीसाठी ही कुरबुरीची शक्कल काढली असेल का, अशी चर्चा आता होत आहे. काहीही असले तरी, मुलाखतींपासून ते प्रसिद्धीच्या तंत्रासाठी अमेरिकी विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या ज्युलिअन बार्न्‍स यांना बुकर पारितोषिकाची यंदाची अमेरिकावारी सलणे, हे साहित्यिकांतील लघुतमाचे महत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

पंकज भोसले

pankaj.bhosale@expressindia.com       

Story img Loader