सचिन कुंडलकर या अवलिया चित्रपट दिग्दर्शकाची त्याच्या चित्रपटांआधी मोठी ओळख होती ती ‘कोबाल्ट ब्लू’ नामक कादंबरीसाठी. अवघ्या बाविसाव्या वर्षी लिहिलेल्या या मराठी कादंबरीचा एक तपानंतर २०१६ च्या दरम्यान जागतिक उदोउदो झाला तो त्याच्या इंग्रजीतील अनुवादामुळे. मराठीत जागतिक तोडीचे साहित्य नाही वगैरे म्हटले जाते, यात अर्धतथ्य असले तरी मराठी साहित्याचा उत्तमरीत्या इंग्रजीत अनुवाद ही सदोदित ‘समस्या’ राहिली आहे. अन् तो पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे दर दशकातील साहित्यलेण्यांना स्थानिकतेची मर्यादा लाभली आहे. अन् तिकडे जपान, इस्राएल, दक्षिण कोरियातील साहित्यात प्रथितयश साहित्यिकांपासून उदयोन्मुख लेखकांना आंतरराष्ट्रीय शिक्का बसण्यासाठी तातडीने अनुवाद करणारी यंत्रणा उपलब्ध आहे. हारुकी मुराकामीच्या आरंभिक कादंबऱ्या इंग्रजी जगतात त्याचे वलय नसतानाही अनुवादित झाल्या होत्या. पुढे ‘नॉर्वेजियन वुड’च्या अनुवादानंतर मुराकामीची ख्याती इतकी झाली, की चाहत्यांच्या गराडय़ापासून लांब राहण्यासाठी देशाबाहेरच निवासाची व्यवस्था त्याला करावी लागली. हयातभर जपानी भाषेत लिहून आज नोबेल पारितोषिकासाठी दरवर्षी चर्चेत राहणाऱ्या या लेखकाची सारी किमया उत्तम अनुवादकांच्या बळावर जगाला कळाली.

मराठीमध्ये प्रकाशकांच्या, लेखकांच्या अनास्थेसोबत यथोचित अनुवादक सापडणे ही साठोत्तरीतील प्रत्येक लेखकाची समस्या होती. म्हणजे जगभरातील सर्वोत्तम लेखन कोळून प्यायलेले नि पान खाऊन पिंक टाकण्याइतके कामू, सात्र्, काफ्काचे (इंग्रजीतून वाचलेले) दाखले देत समीक्षेच्या प्रांगणात टायसनी वाघासारखे वावरणारे सारे लोक मराठी साहित्यावर सदोदित तुच्छता प्रगटत राहिले. परिणामी जीएंच्या थोडक्या कथा, व्यंकटेश माडगूळकरांचे काहीसे लेखन यानंतर भरीव असे काही मराठीतून इंग्रजीत गेले नाही. अलीकडच्या दशकात मात्र शांता गोखले, जेरी पिंटो यांच्या पुढाकारातून मराठीतील उत्तम साहित्यकृतींना इंग्रजी अनुवादाद्वारे जागतिक व्यासपीठ लाभले. त्यातून हळूहळू अनुवादाची द्वारे मराठीसाठी उघडू लागली आहेत. मकरंद साठे यांच्या दोन कादंबऱ्या, मलिका अमरशेख यांचे आत्मकथन, गणेश मतकरी यांचा कथासंग्रह, मिलिंद बोकिल यांची गाजलेली ‘शाळा’ या अलीकडे मराठीतून इंग्रजीत गेलेल्या उत्तम साहित्याच्या पंगतीत अवधूत डोंगरे या युवा लेखकाच्या दोन लघुकादंबऱ्याही थाटात जाऊन बसल्या आहेत.

‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ आणि ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’ या अवधूत डोंगरे यांच्या कादंबऱ्यांनी नव्या पिढीतून सकस लेखन हरवत चालले असल्याच्या टीकेला जोरदार तडाखा दिला होता. राजकीय वास्तवाचा वेध घेणाऱ्या या लघुकादंबऱ्यांतून आजचे जगणे जसे दिसते, तसेच ‘कादंबरीकारा’चे अस्तित्वही ठळकपणे जाणवत राहते. आपल्या जगण्याच्या मिती तपासत हा कादंबरीकार कथन रचत जातो. हे डोंगरे यांच्या ‘पान, पाणी नि प्रवाह’ आणि अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘भिंतीवरचा चष्मा’ या कादंबऱ्यांतही दिसले आहे.

पैकी- ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ आणि ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’ या दोन लघुकादंबऱ्यांचा ‘द स्टोरी ऑफ बिइंग यूसलेस’ आणि ‘थ्री कॉन्टेक्स्ट्स ऑफ ए रायटर’ या नावाने नदीम खान यांनी केलेला देखणा अनुवाद रत्ना बुक्स प्रकाशनातर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामुळे अवधूत डोंगरे या मराठीतील अँग्री यंग लेखकाच्या कलाकृतींना जागतिक पटलावर वाचक लाभणार आहे.

भाऊ पाध्ये यांच्या साहित्याला इंग्रजीमध्ये नेणाऱ्या नदीम खान यांनी या दोन्ही लघुकादंबऱ्या/ कादंबरिकांना अनुवादातून न्याय दिला आहे. अवधूत डोंगरे यांच्या भाषेची तिरकस लय तंतोतंत पकडून वाचनप्रक्रिया अवघड होणार नाही, याची काळजी घेतली आहे. सुंदर मुखपृष्ठ, दोन वेगळ्या कादंबऱ्या दर्शविण्यासाठी वापरलेला भिन्न कागद यांमुळे या पुस्तकाचे रूपडे साजेसे झाले आहे.

रत्ना बुक्सतर्फे गंगाधर गाडगीळ, विजया राजाध्यक्ष, प्रकाश बाळ जोशी यांच्या कथाही इंग्रजीत अनुवादित झाल्या आहेत. पण डोंगरे यांच्या कादंबऱ्या तातडीने इंग्रजीत अनुवादित होण्याची गरज होती, ती पूर्ण होणे मराठीत या प्रक्रियेसाठी चांगली वातावरणनिर्मिती होत असल्याचेच निदर्शक आहे.

Story img Loader