इंदिरा गांधी यांचे सचिव असलेले माखनलाल फोतेदार यांनी लिहिलेल्या राजकीय आठवणींमध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वशैलीचे पैलू तपशिलाने उलगडतात; पण त्याहीपेक्षा राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंह राव आदी नंतरच्या राजकारणातील मोहऱ्यांबद्दल फोतेदार यांनी अधिक मोकळेपणे लिहिले आहे.. हे लिखाण आत्मकेंद्री असले, तरी नेतृत्वाच्या छत्रछायेत असतानाचे अनेक तपशील त्यात आहेत..
राजकीय नेत्याचा सचिव किंवा जवळच्या वर्तुळातील व्यक्ती म्हटले की त्याला भलताच भाव असतो, हे चित्र आजचे नाही; पण नेतृत्वाच्या छत्रछायेतील या सूत्रधारांनी लिहिलेली आठवणीवजा पुस्तके आपल्याकडे गेल्या दशकभरात अधिक आली. स्वीय सचिव या पदाभोवती असलेले वजन पाहता अंतस्थ वर्तुळातील त्याचे अनुभवही तितकेच रंजक आणि भविष्यातील रणनीती तसेच अभ्यासासाठी मोलाचे ठरतात. नेहरू-गांधी परिवाराचे निष्ठावान अशी ओळख असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते माखनलाल फोतेदार यांचे ‘दि चिनार लीव्हज’ हे राजकीय आत्मकथन काँग्रेसअंतर्गत राजकारण व त्या अनुषंगाने देशातील सहा दशकांच्या राजकारणाचा एक प्रकारे लेखाजोखाच आहे. यात प्रामुख्याने इंदिरा गांधी यांची कार्यपद्धती, दूरदृष्टी व निर्णय घेण्याची क्षमता यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. त्याखेरीज काँग्रेसमधील सत्तास्पर्धा, पक्षनेतृत्वाकडे एकमेकांच्या विरोधातील तक्रारी त्यावर पक्षनेतृत्वाचा प्रतिसाद असे अनेक प्रसंग पक्षाध्यक्षांचा विश्वासू सहकारी या नात्याने उघड केले आहेत.
पुस्तकाचा पूर्वार्ध मात्र थोडा कंटाळवाणा आहे. काश्मिरी पंडित असलेल्या फोतेदार यांच्या राजकारणाची सुरुवात नॅशनल कॉन्फरन्सचा एका कार्यकर्ता म्हणून झाली. हे टप्पे सांगण्याच्या ओघात काश्मीरमधील स्थानिक राजकारणाचे बारीकसारीक तपशील वाचताना थोडा गोंधळ उडतो. दिल्लीत इंदिरा गांधी यांनी बोलावल्यानंतर राजकारणात हळूहळू महत्त्व येते. त्यातून मग अनुभवाची शिदोरी मिळते. प्रसारमाध्यमांवरून अनेक वेळा एखाद्या व्यक्तीबाबत आपले बरे-वाईट मत बनते. त्यात पक्षश्रेष्ठींच्या जवळचा माणूस म्हटले, की काम न होणारे त्यांच्या विरोधी सूर लावणार हे ओघानेच आले. माखनलाल फोतेदार हेही त्याला अपवाद नाहीत. इंदिराजींनी फोतेदार यांना दिल्लीला बोलावले म्हणजे त्यांच्यातील काही तरी गुण हेरले असणारच. राजकीय सल्लागाराच्या भूमिकेत वावरलेल्या फोतेदार यांनी आपले निर्णय योग्य कसे ठरले याचे कथन पुस्तकात केले आहे, मात्र एखादा निर्णय कसा चुकला हे मात्र सांगण्याचा प्रांजळपणा दाखवलेला नाही.
इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आर. के. धवन व फोतेदार यांना महत्त्व होते. नंतर राजीव गांधी किंवा सोनियांनी वेळप्रसंगी त्यांचा सल्ला घेतला तरी महत्त्व कमी केल्याची खंत लेखकाने वारंवार व्यक्त केली आहे. इंदिराजींनी इच्छापत्र करतेवेळी झालेल्या चर्चेत नात प्रियंकाला महत्त्वाचे स्थान देण्यास सांगितल्याची मोलाची माहिती फोतेदार देतात! ते त्या प्रसंगाचे साक्षीदार होते, असा दावा त्यांनी या पुस्तकात नोंदविला आहे. राजीव गांधी यांना प्रियंकांबाबत इंदिराजींच्या मताची आठवण करून देताच ते उत्साही झाले होते. कालांतराने मात्र सोनियांकडे इंदिराजींच्या इच्छापत्रावेळच्या चर्चेचा दाखला देत, प्रियंका यांच्याबद्दल आठवण करून देताच त्या काहीशा अस्वस्थ झाल्याचा दावाही फोतेदार यांनी केला आहे. तसेच राज्यसभेची खासदारकीची मुदत संपल्यावर व पुन्हा मिळण्याची शक्यता नसल्याने राजधानीत बेघर व्हायची वेळ आल्यावर प्रियंकांनी धीराचे शब्द सांगत परिपक्वता दाखवून दिली. त्यामुळे एकूणच लेखकाने प्रियंकांकडे आजीप्रमाणे नेतृत्वगुण असल्याचे सूचित केले आहे.
देशातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा लेखक जवळून साक्षीदार असल्याने त्या त्या प्रसंगात नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती कसा विचार करत होत्या यावरही यानिमित्ताने प्रकाश पडतो. इंदिरा गांधी यांनी राजीव गांधी यांना राजकारणात पथ्ये पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यात या दोन गोष्टी न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांना राजकारणात प्रवेश न देणे तसेच माधवराव शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असे सांगितल्याचे फोतेदार यांनी लिहिले आहे. मात्र बच्चन यांना उमेदवारी मिळाली तसेच शिंदे यांना मंत्रिपदही दिले गेले. पुढे खासदारकीच्या काळात अमिताभ यांनी उत्तर प्रदेशच्या बाहेरही राजकारणात बरेच दिवे लावले. त्याचे दाखले देत राजीव गांधी यांनी बच्चन यांचा राजीनामा घेतला तेव्हा त्या चर्चेतले साक्षीदार असल्याचा दावाही केला आहे. काँग्रेस पक्षाला ‘हात’ हे निवडणूक चिन्ह कसे मिळाले याचा रंजक किस्साही या पुस्तकात आहे. इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वगुणांची उदाहरणे अनेक ठिकाणी वाचलेली असतात. मात्र निकटवर्तीय म्हणून काम करत असल्याने इंदिरा गांधी यांचा स्वभाव व निर्णय घेण्याची पद्धत फोतेदार यांनी अनुभवकथनामध्ये सांगितली आहे. इंदिरा गांधी यांची शिस्त, पक्षासाठी देणग्या स्वीकारताना प्रतिमेला धक्का बसणार नाही याची घेतलेली खबरदारी, एखाद्या अनामिकाने निवडणुकीसाठी देणगी दिलीच तर त्याचा हेतू तपासण्याची ताकीद अशा बारीकसारीक बाबी यामध्ये आहेत. ‘गरिबांसाठीचा पक्ष’ अशीच प्रतिमा काँग्रेसची राहावी म्हणून इंदिरा गांधींचा प्रयत्न होता. अशा वेळी राजीव गांधी यांनी एका उद्योगपतीला राजस्थानमधून राज्यसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिल्यावर इंदिराजी अस्वस्थ होत्या. ती उमेदवारी देऊ नये, असे त्यांनी बजावले. अखेर काँग्रेसचे म्हणू्न नव्हे तर अपक्ष म्हणून ती व्यक्ती निवडून आली. अशा वेळी सल्लागार म्हणून काम करताना नेमके कुणाचे ऐकायचे अशी भंबेरी उडायची याचेही किस्से आहेत. देशात एखादी आपत्ती आल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी स्थानिकांना दिलासा देण्यावर इंदिरा गांधी यांचा कटाक्ष. पक्षातील ज्येष्ठांशी झालेला त्यांचा संघर्ष, मुख्यमंत्री बदलाची पद्धत, राज्यात नेता निवडीवेळी पक्षनिरीक्षकांकडेच पक्षाध्यक्षांच्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव सांगणे, या बाबींवरून काँग्रेस पक्षांतर्गत राजकारणाची – किंवा राजकारणातील ‘काँग्रेसी व्यवस्थे’ची- झलक पुस्तकातून मिळते.
इंदिरा गांधी यांच्या पश्चात राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेसची सूत्रे आल्यानंतर धोरणांमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. इंदिरा गांधी यांच्या काळात प्रमुख निर्णयांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या फोतेदार यांनी नंतर त्यांचे महत्त्व कमी झाल्याची खंत व्यक्त केली आहे. राजीव गांधी यांनी पंतप्रधान या नात्याने मंत्रिमंडळ ठरवताना सल्ला घेतला नाही. मात्र नंतर राज्यसभेवर निवडून आणले हा भाग निराळा. राजीव गांधी व अरुण नेहरू यांचे ताणलेले संबंध; व्ही. पी. सिंह, अर्जुन सिंह, नरसिंह राव यांसारख्या तत्कालीन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा, राज्याराज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलासाठी अंतर्गत गटांमधील शह-काटशह या बाबी जवळून पाहिल्या असल्याने खुर्चीसाठी सत्ताकारणात कसे डावपेच आखले जातात याची कल्पना हे पुस्तक देते. राजीव गांधी यांच्याविरोधात विश्वनाथ प्रताप सिंह यांनी आघाडी उघडली होती. त्याचे पर्यवसान काँग्रेसची सत्ता जाण्यात झाले. याच कालखंडातील विविध नेत्यांशी झालेल्या चर्चेच्या तपशिलातून सामान्यांना माहीत नसलेल्या अनेक बाबी उघड होतात. या संघर्षांत माझे सल्ले कसे योग्य ठरले हेही वारंवार आत्मकथनातून येते. राजीव गांधी यांनी फोतेदार यांना मंत्री केले. काश्मीरमध्ये यापूर्वी मंत्रिपदाचा असलेला अनुभव त्यांना कामी आला. ‘१९८७ च्या आसपास राजीव गांधी यांच्या स्वच्छ प्रतिमेला गेलेला तडा, राम मंदिर आंदोलन, शहाबानो खटला या काळात राजीव गांधी यांनी घेतलेली भूमिका नेहरू-गांधी कुटुंबाच्या आतापर्यंतच्या धोरणाच्या विरुद्ध होती’ अशी टिप्पणी फोतेदार करतात. राजीव गांधी यांना भारतीय राजकारणातील गुंतागुंत अनेक वेळा नेमकी समजली नाही. इंदिराजींकडून त्यांना तो शिकण्याचा अवधी मिळाला नाही. याच काळात बिगरकाँग्रेसवाद आणीबाणीत जसा उफाळला होता, तशीच त्याने पुन्हा उचल खाल्ली. त्याचे जनक होते व्ही. पी. सिंह, त्याला बोफोर्स प्रकरणाचाही दारूगोळा होता. याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झाला. हरयाणातील प्रभावी नेते देवीलाल यांच्याशी राजीव गांधी यांना संपर्क वाढवण्याचा सल्ला फोतेदार यांनी दिला, तो राजीव यांनी मानला. त्यातून पुढे चंद्रशेखर यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न साकार झाल्याचे श्रेय लेखक स्वत:कडे घेतात.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव यांच्याकडे पक्षाची धुरा आल्यावर फोतेदार यांचे राजकीय स्थान तितकेसे पक्के राहिले नाही. फोतेदार यांच्या लिखाणातून तो कडवटपणा वारंवार जाणवतो. विशेषत: ‘आज उत्तर प्रदेश व बिहार या दोन मोठय़ा राज्यांमध्ये काँग्रेससाठी फारशी अनुकूल स्थिती नाही. बिहारमध्ये आता सत्तेत सहभाग असला तरी तो दुय्यम आहे. या साऱ्याला नरसिंह राव यांची धोरणे जबाबदार’ असल्याचा ठपका फोतेदार यांनी ठेवला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी नरसिंह राव यांच्या समर्थकांनी प्रयत्न सुरू केले असतानाच सोनियांचे नाव सुचवण्याबाबत शरद पवार यांनी दिलेला शब्द पाळल्याची ‘आठवण’ फोतेदारांनी सांगितली आहे. मात्र सोनिया गांधीच यांनी त्या वेळी सक्रिय राजकारणात येण्याचे नाकारले. पुढे नरसिंह राव यांनी अध्यक्षपदासाठी फोतेदार यांची मदत घेतली. त्याच वेळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवार हेही होते. मात्र राजीव यांच्या हत्येनंतर पक्षातील ऐक्य टिकावे यासाठी पवारांनी राव यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला, असे फोतेदार यांचे म्हणणे आहे. नंतर मात्र नरसिंह राव अंतर राखून वागल्याचा संताप फोतेदार व्यक्त करतात. बाबरी मशीद पडण्यास राव यांचीच धोरणे कारणीभूत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यावर फोतेदार यांनी, सोनियांनी पक्षाची धुरा सांभाळावी यासाठी कसे प्रयत्न केले याचा तपशीलवार उल्लेख आहे. आपली बाजू मांडताना नरसिंह राव यांच्या माथी साऱ्या चुकांचे खापर लेखकाने फोडले आहे. राव यांच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले. त्याबाबतचे विशेष विवेचन नाही. उलट बाबरी मशीद पडल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत त्या वेळी अर्थमंत्री असलेल्या मनमोहन सिंग यांनी राव यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्यावर, ‘तुम्ही गप्प बसा’ असे सिंग यांना म्हणाल्याची बढाई फोतेदार यांनी मारली आहे. तसेच राव यांना पदावरून हटवण्यासाठी इरेला पेटल्याचेही मान्य केले आहे.
सोनियांनी पंतप्रधानपद अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांच्याकडे सोपवताना मंत्रिमंडळाची यादी आपण तयार केली, मात्र शपथविधीचे निमंत्रणही नव्हते याचीही खंत होती. त्यातूनच पुढे सोनियांचे राजकीय सल्लागार असलेल्या अहमद पटेल यांचे महत्त्व वाढल्याचे काही प्रसंगांतून सांगितले आहे. एखाद्याचे राजकीय महत्त्व कमी करण्यासाठी राज्यपालपद सोपवले जाते, हे सांगतानाच अहमद पटेल यांनी राज्यपालपदाचा दिलेला प्रस्ताव धुडकावला. मीच अनेकांना राज्यपालपदी बसवले, तुम्ही काय प्रस्ताव देता? असे सुनावले. काँग्रेसला देशभरात ११६ जागा मिळालेल्या असताना सोनियांनी काँग्रेसचे पुनरुज्जीवन केले. आता पुन्हा तीच स्थिती आहे. आता कोण तारणहार ठरणार? राहुल गांधी यांचे नेतृत्व देशवासी स्वीकारतील काय, याबाबत फोतेदार यांना शंका आहे. आता दिशादर्शन करण्यासही कोणी नाही. चुकांपासून शिकण्यास काँग्रेसचे नेते तयार नाहीत, असा त्यांचा एकूणच पुस्तकाच्या समारोपाचा सूर आहे.
प्रदीर्घ काळ पक्षनेत्यांच्या बरोबर वावरताना आलेले अनुभव, निर्णयप्रक्रियेतील सहभाग यातून हे पुस्तक साकारले आहे. एखादा विशिष्ट निर्णय घेताना काय निकष लावला जातो? राजकारणात महत्त्वाचे निर्णय घेताना पक्षाचे नेतृत्व कसे विचार करते? पक्षांतर्गत गटांच्या कुरघोडय़ा, त्याचबरोबर देशातील परिस्थिती याचे विवेचन वाचण्याजोगे आहे. जवळपास सहा दशकांचा हा लेखाजोखा राजकीय अभ्यासकांच्या दृष्टीनेच नव्हे राजकीय नेते व कार्यकर्ते यांनाही उपयुक्त आहे.
द चिनार लीव्हज
एम. एल. फोतेदार
हार्पर कॉलिन्स इंडिया
पृष्ठे : ३५४, किंमत : ५९९ रु.