व्हॅटिकन किंवा ‘होली सी’ हे सर्वोच्च कॅथोलिक ख्रिस्ती धर्मपीठ.. त्याला एका राष्ट्राचा दर्जा आहे आणि त्यामुळेच त्या धर्मपीठात जर काही भ्रष्टाचार होत असेल तर तो उखडून काढणे ही त्या राष्ट्राच्या प्रमुखाची जबाबदारी आहे.. पण सहसा हा भ्रष्टाचार चालू दिला जातो आणि मग त्याची चर्चा दबक्या आवाजातच होत राहते, असे यापूर्वीचे चित्र होते. दक्षिण अमेरिकेत गरिबांसाठी लढणारी व्यक्ती ‘पोप फ्रान्सिस’ म्हणून या धर्मपीठाच्या प्रमुखपदी आल्यावर जे बदल झाले, त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापण्याची कार्यवाही फेब्रुवारी २०१३ मध्ये झाली! त्या चौकशीतून गेल्या दोन वर्षांत जे काही धक्कादायक निष्कर्ष आणि पर्वताएवढी अपहार/ भ्रष्टाचार/ गैरव्यवहार प्रकरणे बाहेर आली, त्यापैकी काहींची तपशीलवार आणि मुख्य म्हणजे साधार माहिती बाहेर काढण्यात दोघा इटालियन पत्रकारांना यश मिळाले. दोघांनीही या माहितीवर आधारलेली पुस्तकेच लिहिली, ती तत्परतेने बाजारात आली आणि यापैकी जिआंलुइजी नुझी यांनी लिहिलेले पुस्तक तर, फक्त इटालियन भाषेत न राहाता जर्मन, फ्रेंच आणि इंग्रजीतही भाषांतरित झाले. या इंग्रजी पुस्तकाचे नावच ‘र्मचट्स इन द टेम्पल’! दुसरे ‘अव्हारिझिया’ हे इटालियन पुस्तक ‘अॅव्हारिस’ या नावाने इंग्रजीत येत असून त्याचे लेखक आहेत एमिलियानो फिटिपाल्डी.
या दोन पुस्तकांतून बाहेर आलेले निष्कर्ष धाबे दणाणवणारे आहेत. आयोगाने करविलेल्या हिशेबतपासणीत अवघ्या चार तपासण्यांतून १० कोटी डॉलरचा अपहार/ गैरव्यवहार/ बेहिशेब उघड होतो, व्हॅटिकन बँकेत १,२०,००० डॉलर ज्यांच्यानावे १९७८ पासून पडून आहेत त्या दिवंगत पोप जॉन पॉल पहिले यांचे खाते तर ‘मृत’ दाखवण्यात येते, मग अशा कैक खात्यांतला पैसा किती असावा, कार्डिनल टार्सिचिओ बटरेन (हे पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या काळात फार महत्त्वाचे मानले जात) यांनी अपंग मुलांसाठीच्या दोन लाख डॉलरची अफरातफर केली, तर कार्डिनल जॉन पेल यांनी पाच लाख डॉलरचा अपहार केला, असे हे आरोप आहेत.
या साऱ्या आरोपांसाठीचे पुरावे चौकशी आयोगाच्या दोघा सदस्यांनी पुरवले, म्हणून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात त्या दोघांवर गोपनीयताभंगाची कारवाई सुरू झाली होती. त्याहीपुढे जाऊन गेल्याच आठवडय़ात, नुझी आणि फिटिपाल्डी यांना चौकशीच्या नोटिसा व्हॅटिकनने धाडल्या आहेत! हे दोघे इटालियन आणि व्हॅटिकन तर निराळे ‘राष्ट्र’, या तांत्रिक मुद्दय़ावर चौकशी टाळता येईलही; पण यामागचा खरा मुद्दा चर्चच्या नैतिकतेचा आहे आणि त्याच्याशी आता नुझी आणि फिटिपाल्डी यांना लढावे लागत आहे.