अभिजीत ताम्हणे
दलित आत्मचरित्रांचे दालन मराठीत समृद्ध आहे. मात्र इंग्रजीत भारतीय पुस्तकांची एकंदर संख्या प्रचंड असूनही आजवर, मुळात इंग्रजीतच लिहिले गेलेले दलित साहित्य फार कमी होते. मराठी, बंगाली, हिंदीसारख्या भाषांत झालेली पुस्तके इंग्रजीत भाषांतरित स्वरूपात येत; पण सूरज येंगडे, याशिका दत्त यांच्यासारख्या तरुणांनी इंग्रजीची ही कमतरता भरून काढली. त्या दिशेचे पुढले पाऊल म्हणजे ‘समाजशास्त्रज्ञाने, समाजशास्त्रज्ञाच्या भूमिकेतून लिहिलेले (दलित) आत्मचरित्र’ असे वर्णन झालेले, ‘माय लाइफ’ हे गोवर्धन वानखेडे लिखित पुस्तक.
या पुस्तकातून भेटणारे वानखेडे जगाकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहणारे, तपशील टिपणारे व त्याचा अर्थ अंतर्मुखपणे समजून घेऊ पाहणारे आहेत. १९५०च्या दशकात अमरावती जिल्ह्य़ाच्या अतिपश्चिम सीमेवरील गावात बालपण गेले, तिथून शिक्षणासाठी (नामांतर न झालेल्या) मराठवाडा विद्यापीठात आले आणि जालना जिल्ह्य़ात शिक्षकाची नोकरी करता करता एमए झाले. पुढे एमफिलसाठी दिल्लीच्या जेएनयूत गेले आणि तिथून दलित कामगारांची ‘मोबिलिटी’ (गमनशीलता किंवा समाजासंदर्भात गतिशीलता) या विषयावर संशोधन करून पीएच.डी.ही झाले. पुस्तकात या गमनशीलतेचा उल्लेख स्वत:संदर्भात येतो! ‘शिक्षणामुळे विद्याक्षेत्रीय-आर्थिक आणि मग सामाजिक पत वाढली,’ असे ते स्वत:बद्दल सांगतात; पण या प्रवासात कसकशी माणसे पाहिली, याचे वर्णनही करतात. बालपणाबद्दल सांगताना, डॉ. आंबेडकरांनी स्थापलेल्या ‘समता सैनिक दला’चा प्रभाव वस्तीत कसा होता आणि ‘गायबैलांचे मांस खाणे सोडा’ असाही प्रचार ते करीत, याची वर्णने येतात आणि समाजाकडे पाहणारी नजर वाचकालाही भिडू लागते. ‘वडील कोतवाल झाले, सात रुपये पगार होता. लोक म्हणायले ही नोकरी कशाला करतो. वडिलांनी ऐकलं नाही. मग कधी कधी आम्हाला समाजबांधवांकडूनच बहिष्कृत व्हावं लागलं’ यासारखा अनुभव येथे तटस्थपणाने येतो. घराची रचना, शाळेची रचना याचे वर्णन चित्रदर्शी आहे आणि महाराष्ट्रीय वाचकाला ते लांबलेले वाटले तरीही, जगभरातील अन्य वाचकांसाठी ते उपयुक्त ठरेल. जेएनयूतील शिक्षण, संशोधन आणि पुढे मुंबईत ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’त अधिव्याख्याता, प्रपाठक, प्राध्यापक व अधिष्ठाता अशा पदांवर काम, तसेच १९९० मध्ये जर्मनीची अभ्यासवृत्ती या टप्प्यांवरले अनुभव हे व्यक्ति-भान आलेल्या लेखकाचे आहेत. ते सांगताना लेखकाचा खरा कस लागतो. काही वेळा ‘सत्काराला उत्तर’ दिल्यासारखा, कृतज्ञतेचा सूरही या अनुभवांच्या कथनावेळी लागलेला आहे, त्यामागील हळवेपणा, संवेदनशीलता समजून घेण्याची जबाबदारी लेखकाने वाचकावर टाकली आहे. ‘‘बलुतं’चे लेखक दया पवार यांना (टाटा समाजविज्ञान) संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत एकदा वक्ते म्हणून पाचारण करण्यात आले. पवार वेळेआधी आले, पण मंचावर जाईपर्यंत त्यांची सरबराई सोडाच, पण साधी विचारपूस करायलाही कुणी आले नाही’ हा अनुभवही त्याच संवेदनशीलतेतून नोंदविला जातो.
रोजनिशीतील नोंदीइतके तपशील काही प्रसंगांच्या वर्णनात आहेत. कनॉट प्लेसहून जेएनयूपर्यंत एकच बस जाते, तीही हॉटेल जनपथच्या समोरून, ६१५ क्रमांकाची- यासारखा तपशील एरवी अनाठायीच वाटेल, पण पुस्तकाला जी प्रांजळ कथनाची लय आहे, त्यात तो चालून जातो. याच प्रांजळपणातून, लेखकाने आधी भरतनाटय़म् व नंतर कथ्थक शिकण्याचा प्रयत्न तरुणपणी गांभीर्याने केला होता, हेही वाचकाला समजते.
दलित-वंचितांची सामाजिक गमनशीलता, विशिष्ट जातींचे वंचितीकरण (तांत्रिक शब्द : सीमान्तीकरण), सरकारी धोरणे व दलितांची सद्य:स्थिती, हे समाजशास्त्रज्ञ म्हणून लेखकाचे अभ्यासविषय आहेत. त्याविषयी ३० प्रत्यक्ष संशोधन अहवाल आणि अनेक अभ्यासलेख त्यांनी लिहिले आहेत. याचे प्रतिबिंब पुस्तकात कमीत कमी असले, तरी अखेर-अखेरच्या प्रकरणांतून ते स्पष्ट होत जाते. वरवर पाहता हे ‘यशस्वी’ प्राध्यापकाचे, ‘मी असा घडलो’प्रकारचे आत्मकथन असले तरी, सामाजिक बंधने ते व्यक्ति-भान हा यातील प्रवास कळण्यासाठी ते संवेदनशीलतेने वाचले पाहिजे.
abhijit.tamhane@expressindia.com