देश म्हणजे देशातील माणसेच; मग एखाद्या देशातील माणसांनी नेमलेल्या लोकनियुक्त सरकारच्या विरुद्ध बोलणे- सतत बोलत राहणे आणि इतरांनाही किमान तसा विचार करण्यासाठी चिथावणी देणे- हा केवळ सरकारद्रोह किंवा राजद्रोह नव्हे तर ‘देशद्रोह’च ठरायला हवा, हा युक्तिवाद अनेकांना पटेल. पण भारतासह अनेक देशांच्या कायद्यांना तो पटत नाही. भारतीय दंड संहितेतील कलम ‘१२४ ए’ म्हणजेच ‘१२४ क’ हे राजद्रोहाविषयीच आहे. आजदेखील, सरकारविरुद्ध निव्वळ बोलणे किंवा इतरांना सरकारच्या विरोधात केवळ ‘विचार-प्रवृत्त’ करणे याला ‘राजद्रोह’ तरी म्हणावे का यावर कायदेपंडितांमध्ये मतभेद आहेतच. अनेक विधिज्ञांनी असे मत वेळोवेळी मांडले आहे की, जोवर एखाद्या कृतीतून अथवा अभिव्यक्तीतून मिळणारी ‘चिथावणी’ ही सरकारविरोधात कृती – किंवा हिंसाच- करण्यासाठी आहे/ होती असे सिद्ध करता येत नाही, तोवर त्या कृती/अभिव्यक्तीला ‘राजद्रोह’ म्हणता येत नाही. न्यायालयांना हे मत कधी कधी अमान्य असते. अरुंधती रॉय यांना २००२ च्या मार्चमध्ये राजद्रोहाच्याच गुन्ह्य़ासाठी शिक्षा- म्हणजे एक दिवसाचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपयांचा दंड, पण हा दंड न भरल्यास तीन महिन्यांची कैद- साक्षात् सर्वोच्च न्यायालयाने फर्मावली होती. तेव्हापासून या लेखिकेवर ‘राजद्रोही’ असा शिक्का बसलेला आहे. याच लेखिकेने नंतरही अनेक निबंध असे लिहिले की, ज्यांमुळे तिच्यावर जवळपास दर वर्षी एक, याप्रमाणे राजद्रोहाचे खटले दाखल झाले! तरीही या निबंधांची वाचकप्रियता घटलेली नाही, हे ओळखून आता ‘पेंग्विन’ प्रकाशनाने गेल्या २० वर्षांतील सर्व निबंधांचे जाडजूड पुस्तक काढण्याचे ठरविले असून ते ६ जून रोजी प्रकाशित होणार आहे. पुस्तकाचे नावच ‘माय सेडिशियस हार्ट’ (माझे राजद्रोही हृदय) असे असून या हृदयाची धडधड वंचितांच्या बाजूने आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, कुडमुडी भांडवलशाही यांच्या विरोधातच आहे, हे रॉय यांनी आजवर अनेकदा सांगितले आहे. श्रीलंका, अमेरिका या अन्य देशांच्या धोरणांविरुद्ध त्यांची लेखणी चाललेली आहे.
बुकबातमी : ‘राजद्रोही हृदया’ची धडधड..
भारतीय दंड संहितेतील कलम ‘१२४ ए’ म्हणजेच ‘१२४ क’ हे राजद्रोहाविषयीच आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 25-05-2019 at 04:32 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My seditious heart novel by arundhati roy