क्रिकेट सामन्यातील धावफलकावरील आकडे त्या सामन्याचे किंवा खेळाडूंच्या खेळाचे अचूक वर्णन करतीलच असे नाही. तरीही खेळाचे व खेळाडूंचे मूल्यमापन करायचे तर आकडय़ांचाच आधार घ्यावा लागतो. हे पुस्तकही अशा मूल्यमापनासाठी आकडय़ांचा आधार घेते, परंतु तरीही त्यातून आलेले निष्कर्ष हे क्रिकेट चाहत्यांच्या आजवरच्या पूर्वग्रहांना धक्का देणारे ठरतात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखादा क्रिकेटचा सामना सुरू असेल तर आपले लक्ष आपसूकच धावफलकाकडे वळते. संघाची धावसंख्या काय, कुणी किती धावा केल्या, कुणी किती बळी घेतले, जिंकायला किती चेंडूंमध्ये किती धावा हव्यात, याचा विचार करत आपण समीकरणांचे इमले बांधत जातो. या सर्व गोष्टी जिंकणेआणि हरणे यामधले अंतर ठरवणाऱ्या असतात. पण क्रिकेट म्हटले  म्हणजे फक्त तीच आकडेवारी महत्त्वाची आहे का, याचा विचार आपण करत नाही. एखाद्या खेळीवरून खेळाडू कसा कसदार आहे याचे गोडवे गायले जातात, पण खरंच हे आकडे खेळाडूंची गुवणत्ता सिद्ध करतात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आशिया खंडात केलेले शतक आणि न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांतील शतकांची तुलना करता येऊ शकते का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करणारे व त्यावर साधार चर्चा करणारे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ‘नंबर्स डू लाय- हिडन क्रिकेट स्टोरीज’ हे ते पुस्तक. त्याचे लेखक आहेत- भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा व इम्पॅक्ट इंडेक्स ही खेळाडूंच्या खेळाचे आकडय़ांवर आधारित मूल्यमापन करण्याची अनोखी पद्धत शोधून काढणारे जयदीप वर्मा, सोहम सारखेल व निखिल नारायण.

तर हे पुस्तक खेळातील आकडे आणि आकडय़ांचा खेळ यांचा सुंदर मिलाफ साधणारे आहे. एखाद्या सामन्यातील धावफलकावरील आकडे त्या खेळाचे संपूर्ण चित्र दाखवत नाहीत, त्यातून अचूक खेळ  दिसत नाही; तो दिसण्यासाठी या आकडय़ांकडे व खेळाकडेही अपारंपरिक दृष्टीतून पाहावे लागते, हे या पुस्तकातील चर्चेचे मुख्य सूत्र आहे. पुस्तकातील साऱ्या चर्चेसाठी आकडय़ांचा आधार घेतला गेला आहे, आणि त्या आकडय़ांच्या साहाय्याने नवा अन्वयार्थही मांडला आहे.  ते करताना लेखकांनी पुस्तकात काही गृहितकेही वाचकासमोर ठेवली आहेत, पण ती सारीच आपल्याला पटतील असेही नाही. उदा. व्हीव्हीएस लक्ष्मण या फलंदाजाने आपल्या कारकीर्दीत काही महत्त्वाच्या खेळी केल्या असल्या तरी तो काही भारताचा प्रभावशाली फलंदाज ठरत नाही, किंवा भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी आपल्या फलंदाजीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला नवे वळण दिले, यांसारखी काही विधाने अनेकांना पचणे अवघड जाऊ शकते, मात्र त्यावर लेखकांनी केलेली साधार चर्चा ही नक्कीच विचार करायला लावणारी आहे. पुस्तकात ६१ प्रकरणांमध्ये विविध देशांतील क्रिकेट खेळाडूंविषयी अशी मूल्यमापनात्मक विधाने केली आहेत आणि त्यावर साधार चर्चाही.

राहुल द्रविड हा भारतातला सर्वात प्रभावी कसोटी फलंदाज आहे, असे सांगणारे एक प्रकरण आहे. यात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि द्रविड या तिघांचा तौलनिक अभ्यास केला आहे. यात दिलेल्या या तिघाही खेळाडूंच्या खेळांच्या आकडेवारीने द्रविडविषयी केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण मिळते. ते असे- १९८० च्या दशकात गावस्कर हे भारताचे सर्वात प्रभावी कसोटी फलंदाज होते. सचिनचा उदय झाला १९८९ साली. १९९६-९९ या काळात सचिनची गणना दादा फलंदाजांमध्ये व्हायला लागली असली तरी  या काळातही तो प्रभावी कसोटी फलंदाज ठरला नाही; पण त्याच्यानंतर आलेल्या द्रविडने मात्र सातत्यपूर्ण तंत्रशुद्ध फलंदाजी करत २००३-०४ साली गावस्कर यांना मागे सारत भारताचा सर्वात प्रभावी कसोटी फलंदाज होण्याचा मान पटकावला. २००८ आणि २०११ साली सचिन भन्नाट फॉर्मात होता, क्रिकेट जगतावर त्याची मोहिनी होती; त्या वेळी त्याने प्रभावी कसोटी फलंदाजांच्या शर्यतीत गावस्करांना मागे टाकले, पण त्याला द्रविडला मागे टाकता आले  नाही, अशी मांडणी यात करण्यात आली आहे.

सचिनच्या बाबतीतही असेच एक विधान एका स्वतंत्र प्रकरणात करण्यात आले आहे. ते म्हणजे- सचिनने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात चांगली साहाय्यक फलंदाजाची भूमिका बजावली आहे. त्यासाठी १९९०-२०१३ या काळातील उल्लेखनीय ३४ कसोटींचा या विधानाच्या स्पष्टीकरणासाठी विचार केला आहे. या कसोटींमध्ये सर्वाधिक अग्रेसर फलंदाज द्रविड ठरला आहे. त्याने नऊ वेळा मोठी धावसंख्या उभारून संघाला दिशा दाखवली, तर सात वेळा तो साहाय्यक फलंदाचाच्या भूमिकेत होता. त्याचवेळी या कसोटींत सचिनने मात्र फक्त तीनदा नायकाची भूमिका बजावली असून चौदा वेळा त्याने साहाय्यक फलंदाजाची भूमिका वठवली, असे यात आकडेवारीच्या मदतीने दाखवून दिले आहे.

वीरेंद्र सेहवागच्या बाबतीत एका उदाहरणावरून त्याबाबतचे व्यक्त केलेले मत आपल्याला पटते. इंग्लंडविरुद्ध २००८ मध्ये चेन्नई येथे झालेल्या कसोटी  सामन्यात भारताला जिंकण्यासाठी ३८७ धावांचे लक्ष्य दिले गेले. तीनशेपेक्षा जास्त धावसंख्येचे लक्ष्य म्हणजे पराभवाला आमंत्रण, असे समजले जायचे; पण सेहवागने दुसऱ्या डावात ६८ चेंडूंत ८३ धावांची खेळी साकारली. तो बाद झाला तेव्हा संघाची २३ षटकांत ११७ धावा अशी मजबूत स्थिती होती आणि सेहवागने रचलेल्या भक्कम पायाच्या जोरावर भारताने हा सामना सहा विकेट्स राखून जिंकला. सेहवागने या सामन्यात शतक झळकावले नव्हते, तरी त्याची ही खेळी सामना जिंकवून देणारी ठरली होती. यात आणखीही दोन कसोटी सामन्यांचे उदाहरण देऊन सेहवागच्या फलंदाजीविषयी चर्चा केली आहे. त्याला जेव्हा जेव्हा त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तेव्हा त्याने चांगली धावसंख्या उभारली, मात्र  त्याच्या तडाखेबाज शैलीच्या विरूद्ध जाऊन त्याला खेळ करावा लागला तेव्हा तो अपयशी ठरला, असे  मत लेखकांनी यात व्यक्त केले आहे.

आकाश चोप्रा हा सावधपणे फलंदाजी करणारा खेळाडू, पण लेखक म्हणून या पुस्तकात सुरुवातीपासून तो चौकार-षटकार लगावताना दिसतो. काही वेळा त्याचे फटके आपल्याला आवडत नाहीत, तर काही सुरेख दादही मिळवून जातात; पण भारताचा माजी सलामीवीर सदगोपन रमेशच्या प्रकरणामध्ये येऊन तो फसलेला दिसतो. १९९९-२००१ या कालावधीत भारताने बरेच सलामीवीर पाहिले. त्या साऱ्यांत रमेश फारच प्रभावी होता, असे आकाशचे म्हणणे आहे; पण या काळात वसिम जाफर आणि राहुल द्रविड यांनीही भारतासाठी सलामीची जबाबदारी पार पाडली. द्रविड हा तर महान खेळाडूच होता, पण खेळाच्या तंत्राचा विचार केला तर रमेशपेक्षा जाफरही नक्कीच उजवा होता.

पुस्तकात ज्या रितीने अनेक खेळाडूंच्या खेळाविषयी काही विधाने केली गेली आहेत, तसे विधान विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या कामगिरीविषयी करता येऊ शकते. आयपीएलपूर्वी हे दोन्ही खेळाडू स्वत:च्या देशासाठी बरेच सामने खेळले; पण यंदाचे आयपीएल पाहिले तर कोहलीने पूर्णपणे निराश केले. त्याच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु हा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. दुसरीकडे १४ डावांमध्ये वॉर्नरने सर्वाधिक ६४१ धावांचा रतीब घातला. त्याचबरोबर वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ या आयपीएलमध्ये चौथा ठरला. त्यामुळे कोहलीपेक्षा वॉर्नर सरस किंवा प्रभावी फलंदाज व कर्णधार आहे, असे आपण म्हणू शकतो; पण खरेच हे सगळ्यांना पटणारे आहे का? असेच काहीसे हे पुस्तक वाचताना होते.

हे पुस्तक क्रिकेटच्या सर्व प्रकारांवर आणि त्यामधील खेळाडूंवर भाष्य करते. ख्रिस गेल  हा आयपीएलमधील सर्वात प्रभावी खेळाडू नाही, असे पुस्तकात बिनधास्तपणे मांडले आहे. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, एबी डी’व्हिलियर्स यांच्याबाबतही पुस्तकात लिहिले गेले आहे. वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४०० धावांचा विश्वविक्रम रचला, पण तरीही त्याची ही खेळी सर्वात प्रभावी कशी ठरत नाही, हेदेखील येथे मांडले आहे. पण हे सारे सर्वानाच पटेल असे नाही. पुस्तकात आकडय़ांचा कीस पाडला गेला आहे. एवढी आकडेवारी वाचायला सामान्य क्रिकेट चाहत्यांना कदाचित आवडणार नाही. त्यामुळे हे पुस्तक सलग वाचून होण्यासारखेही नाही, कारण प्रत्येक प्रकरणानंतर वाचकाला विचार करावा लागतो. ते तपशील पुन्हा पाहावे लागतात, त्यावर पुन्हा मेंदू झिजवावा लागतो आणि सरतेशेवटी आपण ते प्रकरण पचवतो; पण एक प्रकरणपचवल्यावर पुन्हा एकदा दुसरे प्रकरण वाचण्याचा रस तुमच्यामध्ये फार कमी वेळा उरतो, त्यासाठी काही काळाची विश्रांती तुम्हाला नक्कीच लागेल.

या पुस्तकाची खास बाब म्हणजे स्पष्टवक्तेपणा; पण भारतामध्ये प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या डोक्यावर एक पगडा आहे किंवा त्यांच्यावर कुणाचे तरी गारूड आहे. त्यामुळे हे पुस्तक भारतातील क्रिकेट चाहत्यांच्या पचनी पडेल असे वाटत नाही. पण जर कुठल्याही खेळाडूविषयी पूर्वग्रह नसतील तर या पुस्तकाची गोडी तुम्हाला लागू शकेल. क्रिकेट बघताना आकडेवारीमध्ये न रमता, खेळात रस दाखवायला हवा, हे या पुस्तकाचे म्हणणे आहे. पुस्तकात खेळाडू व त्याच्या मूल्यमापनासाठी वापरलेली अनोखी पद्धत भारतीय क्रिकेट चाहत्यांना नवी दृष्टी देणारी ठरू शकते. एकंदरीत या पुस्तकासाठी फार मेहनत घेतली गेली असून आपले म्हणणे थेटपणे मांडले गेले आहे.

ज्या व्यक्तीला क्रिकेट हा खेळ म्हणून माहिती आहे, त्याने हे पुस्तक जरूर वाचण्यासारखं आहे किंवा ज्याला आपल्या ज्ञानात थोडी भर पाडायची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक वाचनीय ठरेल. क्रिकेट हा धर्म आणि खेळाडूंना देव मानण्याची भारतीय मानसिकता दूर सारत हे पुस्तक ठोस काही सांगू पाहते. त्यामुळेच असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या मनावर गारूड करणाऱ्या सचिन तेंडूलकरची लोकप्रियता दूर सारत त्याच्या खेळींचे, त्यांच्या परिणामांचे आजवर न झालेले विश्लेषण यात येऊ शकते. पण पुस्तकात काही गोष्टींची उत्तम मांडणी असली तरी काही गोष्टींवर त्यात भाष्यच केलेले नसल्याचेही स्पष्ट जाणवते. खेळाची परिस्थिती मांडत असताना खेळाडूच्या तंत्राबद्दल मात्र लेखकांनी गुपचिळीच धरलेली दिसते. पुस्तकातील प्रकरणे लहान ठेवल्याने ती काही वेळात वाचून होतात, पण काही गोष्टी अजून यामध्ये असल्या असत्या तर हे पुस्तक अधिक माहितीपूर्ण होऊ शकले असते, असे वाटत राहते. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामध्ये चारही लेखकांनी चर्चा केली आहे. ही चर्चा पुस्तकातील मांडणीत रंगत आणते. पुस्तकातून कुण्या एका खेळाडूचा चेहरा दिसत नाही, तर क्रिकेट या खेळाचे रूप दाखवले गेले आहे. ते करताना हे रूप एकदा पाहावे, काहीसे प्रेमात पडावे, पण त्यामध्ये अडकून जाऊ नये, असेही हे पुस्तक सूचित करते.

  • नंबर्स डू लाय- हिडन क्रिकेट स्टोरीज
  • लेखक : आकाश चोप्रा, जयदीप वर्मा, सोहम सारखेल, निखिल नारायण
  • प्रकाशक : हार्पर स्पोर्ट
  • पृष्ठे : ३३७, किंमत : ३५० रुपये

प्रसाद लाड

prasad.lad@expressindia.com