‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिटय़ूड’ ही नोबेल पारितोषिकाचे मानकरी (१९८२) ठरलेले दिवंगत कादंबरीकार गॅब्रिएल गार्सिआ मार्खेज यांच्या एकंदर लिखाणापैकी सर्वाधिक गाजलेली कादंबरी. मूळ स्पॅनिश भाषेत, १९६७ लिहिलेल्या या कादंबरीचं त्या भाषेतलं नाव ‘सेन्टोनोस द सोलेदाद’ असं होतं आणि १९७० साली ती इंग्रजीत आली. पुढे अगदी चिनी भाषेपर्यंत तिची भाषांतरं झाली. ही कादंबरी १०० वर्षांच्या कालखंडात घडते, सात पिढय़ांची कथा सांगते आणि कोलंबियातील मळ्यांवर मजूर म्हणून काम करणाऱ्या एका प्रातिनिधिक कुटुंबाची कहाणी सांगता सांगताच, प्रत्येक पिढीची स्वप्नं, मनोराज्यं आणि त्यावर पडलेल्या आर्थिक- सामाजिक वास्तवाच्या मर्यादा यांचा पट मांडते. हे असं लिखाण, कोलंबियातल्या लेखकांनी कधी केलंच नव्हतं. अख्ख्या दक्षिण अमेरिका खंडाबद्दल झालेल्या साहित्यामध्ये ही कादंबरी नवी दिशा देणारी ठरली. पुढेही अनेक कोलंबियन लेखक तयार झाले; ते या ना त्या प्रकारे मार्खेज यांचं ऋण मान्य करतात.
तर, इतक्या महत्त्वाच्या कादंबरीवर आजतागायत चित्रपट निघाला नव्हता. तो निघणं अशक्य आहे, असंच मानलं जात होतं. पण मार्खेज यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या दोन्ही मुलांनी ‘नेटफ्लिक्स’ या जगड्व्याळ दृश्यपटसेवेला या कादंबरीवर मालिका काढण्याची परवानगी दिली आहे! याविषयीचा करार किती डॉलर्सचा आहे- म्हणजे काही लाख की काही कोटी- याचा तपशील उघड झालेला नसला तरी, मार्खेज यांचे दोघेही पुत्र हेच या मालिकेचे कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहणार आहेत. ही मालिका फक्त स्पॅनिशमध्येच असेल; तिला इंग्रजी अनुवादओळी – सबटायटल्स – असतील. पुस्तकाऐवजी ‘नेटफ्लिक्स’कडे वळलेल्यांनीही ही मालिका पाहण्याआधी इंग्रजी कादंबरी वाचावी, यासाठी एवढं निमित्त पुरेसं आहे!