नायिकेच्या आयुष्यात अनेक टप्प्यांवर पुरुष येतात, पण ही प्रकरणं दीर्घकाळ टिकत नाहीत.. एवढय़ावरून योनिशुचितेच्या संकल्पनांना हादरा देण्याशी स्त्रीवादाचा संबंध जोडायचा, तर तोही या कादंबरीत धडपणे मांडलेला नाही.. तरीही चेतन भगत यांच्या या कादंबरीनं ‘स्त्रीवाद’ वगैरे जाहिरात का करावी?
‘फेमिनिझम’ अर्थात ‘स्त्रीवाद’ या शब्दाला अलीकडच्या काळात महत्त्व आले आहे. विशेषत: भारतासारख्या देशात जेथे रूढी व परंपरांच्या बेडय़ांमध्ये अडकवून स्त्रियांना अनेक गोष्टींपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या घटना आजही उजेडात येत असतात, अशा ठिकाणी महिलांच्या हक्कांसाठी, त्यांना न्याय देण्यासाठी एखादी चळवळ उभी राहते तेव्हा समाजजीवनाचा प्रवाह खळखळतो. ‘राइट टू पी’सारखी एखादी मोहीम असो वा मुस्लीम समाजातील तलाकचा मुद्दा असो, महिलांशी संबंधित विषय येताच त्यावरून सकारात्मक/ नकारात्मक प्रतिक्रिया, पडसाद उमटत राहतात. ही झाली चळवळींची गोष्ट. स्त्रीला समाजात बरोबरीचे स्थान देण्यासाठी झगडणाऱ्या, त्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करणाऱ्यांची गोष्ट. येथे स्त्रीवाद समाजपरिवर्तन घडवणारा, नवीन विचार जन्माला घालणारा असतो. पण मार्केटयुगात ‘फेमिनिझम’च्या नावाखाली बाजार भरवण्याचे प्रकारही सुरू झालेच. यात कधी कुठली कंपनी आपले ‘ब्यूटी क्रीम’ कसे समाजातील महिलांचा ‘आत्मविश्वास वाढवणारे’ आहे, अशा जाहिराती करून उत्पादने खपवते; तर कधी आपल्या वाहिनीवरील कार्यक्रम कसे महिलांना प्रेरित करणारे आहेत, असा गवगवा केला जातो. अशा प्रकारांत ‘स्त्रीवाद’ ही संकल्पना अर्थकारणाच्या केंद्राशी घुटमळत असते. असा हेतू मूळ संकल्पनेलाच धक्का देणारा, नुकसान करणारा असतो. लोकप्रिय साहित्यातही असाच काहीसा प्रकार झाल्याचे ‘रूपा पब्लिकेशन्स’ने अलीकडेच प्रकाशित केलेली ‘वन इंडियन गर्ल’ ही कादंबरी वाचताना लक्षात येतो. ‘..आधुनिक भारतातील एका तरुणीच्या दृष्टिकोनातून प्रेम, स्वप्न, करिअर आणि ‘फेमिनिझम’ यांची कथा’ अशी (फेमिनिझम या शब्दासह) ‘टॅगलाइन’ असलेल्या या कादंबरीत लेखकाला स्त्रीवाद म्हणून नेमके काय दाखवायचे होते, हे पुस्तकाच्या मलपृष्ठापर्यंत पोहोचल्यावरही कळत नाही आणि मग आपली फसगत झाल्याची भावना नैराश्य आणते. स्त्रीवादाचा मुलामा देऊन उभ्या करण्यात आलेल्या या कादंबरीत तोच नेमका कुठे दिसत नाही, एवढय़ाच वाक्यात ‘वन इंडियन गर्ल’चे अप्रूप संपवता येते.
आता या पुस्तकाचा लेखक कोण, हे सांगितले तर आणखी सांगण्याची गरज उरणार नाही. चेतन भगत.. बस नामही काफी है.. गॅजेट आणि गप्पा यांच्यात रममाण असलेल्या भारतीय तरुणवर्गाला इंग्रजी साहित्याबाबत आकर्षण निर्माण करणाऱ्या एक-दोन नव्हे, तर चार ‘बेस्टसेलर’ पुस्तकांचा लेखक चेतन भगत हाच ‘वन इंडियन गर्ल’चा लेखक आहे. (खरं तर ‘फाइव्ह पॉइंट समवन’, ‘वन नाइट अॅट द कॉल सेंटर’, ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’, ‘टू स्टेट्स’, ‘रिव्होल्यूशन २०२०’ अशी संख्यादर्शक शीर्षके असलेली पुस्तके लिहिणाऱ्या चेतन भगतनेच ‘वन इंडियन गर्ल’ लिहिलंय, हे एखाद्याला अंदाज लावूनही सहज ओळखता येईल.) तर ‘द’ चेतन भगत याच्या ‘सिद्धहस्त’ लेखणीतून अथवा ‘कीबोर्ड’मधून ‘वन इंडियन गर्ल’ ही कहाणी साकार झाली आहे. यातला कथाभाग थोडक्यात सांगायचा तर, प्रेम, करिअर, स्वप्न यांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या राधिका नावाच्या तरुणीची ही कथा आहे. राधिका स्वत:च आपली ही कथा वाचकांसमोर मांडते. वयाने वर्षभर मोठी असलेल्या सख्ख्या बहिणीच्या सौंदर्यामुळे लहानपणापासूनच दिसण्याबाबतच्या न्यूनगंडाला सामोरी जाणारी राधिका आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उच्च शिक्षण पूर्ण करते, पुढे याच हुशारीच्या बळावर ‘गोल्डमन सॅक’ या जगविख्यात कंपनीची उपाध्यक्ष बनते. पण हा सगळा प्रवास करत असताना राधिकाला मनासारख्या जोडीदाराचे प्रेम मिळत नाही. तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पुरुष येत राहतात. पण ही प्रेमप्रकरणं दीर्घकाळ टिकत नाहीत. या सगळ्यांमुळे कंटाळलेली राधिका आई-वडिलांच्या आग्रहाखातर मग विवाहाचा निर्णय घेते. आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी तिचे लग्न ठरते. गोवा हे ‘डेस्टिनेशन वेडिंग’चे ठिकाण ठरते. लग्नाच्या तीन दिवस आधी वधू-वर दोन्हीकडची मंडळी गोव्यातील आलिशान पंचतारांकित हॉटेलात जमतात. लग्नसोहळ्यापूर्वीची कवतिके सुरू होतात. पण याचदरम्यान राधिकाचे मन उचल खाते आणि ती लग्न न करण्याचा निर्णय घेते. करोडो रुपये खर्चून बुक केलेले हॉटेल, इव्हेंट कंपनी, लग्नासाठी जमलेली मंडळी सगळे राधिकाच्या निर्णयाने अवाक होतात. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न होतो. पण राधिका ऐकत नाही. ती जगाच्या सफरीवर रवाना होते, तीन महिन्यांनी पुन्हा तिच्या वाग्दत्त वरालाच कॉफी पिण्यासाठी बोलावते आणि हे प्रकरण कॉफीपाशी संपत नाही.
राधिकाच्या गोष्टीची सुरुवात वर्तमानात, गोव्यातील ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठीच्या हॉटेलातून होते. तेथून ही गोष्ट अधूनमधून भूतकाळात डोकावत पुढे सरकते. हे कथासूत्र एखाद्या हिंदी चित्रपटाशी साधम्र्य असलेले आहे. तुम्हाला असे साधम्र्य दिसले नसेल तर काळजी नको, चेतन भगतच्या अन्य पुस्तकांप्रमाणे या पुस्तकातही एखाद्या हिंदी चित्रपटासाठी आवश्यक असलेला झगमगाट, ऐश्वर्यदर्शन, प्रेम, सेक्स, विदेशी ठिकाणे असा सर्व ऐवज भरलेला आहे. मात्र, या सर्वात कादंबरीच्या ‘टॅगलाइन’मधील ‘फेमिनिझम’ दिसून न येण्याइतपत पातळ होतो. भारतीय समाजात आजही मुलीचे सौंदर्य हे महत्त्वाचे मानले जाते. मुलीने उच्च शिक्षण, करिअरच्या भानगडीत न पडता संसाराला लागले पाहिजे. जास्त शिकलेली किंवा वारेमाप पगार असलेल्या मुलीला तोडीचा वर कसा मिळणार, अशी चिंता तिच्या पालकांना सतावत असते, असे मुद्दे कथेतून डोकावतात खरं, पण त्यांचं डोकावणं केवळ डोकावणंच असतं. त्या मुद्दय़ांवर चर्चा वा त्यांचं निरसन होत नाही. अखेर ही कथाप्रधान कादंबरी असल्याने तसं झालंच पाहिजे, असा अट्टहास धरणं योग्य नाही. मात्र, मग लेखकानं आपण अमुक दाखवण्याचा प्रयत्न केलाय, असं बोलत सुटणंही योग्य नाही. म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ‘वन इंडियन गर्ल’ला केवळ ‘स्त्रीवादा’चा मुलामा लावण्यात आला आहे तो कशासाठी, असा प्रश्न पडणारच. त्यातील मूळ माल चेतन भगतच्या अन्य कथानकांप्रमाणेच मसाल्याने भरला आहे.
चेतन भगतच्या पुस्तकांनी भारतीय तरुणाईला त्याच्या प्रेमात पाडलं. तरुणवर्गाच्या रोजच्या जगण्यात असलेल्या प्रेम, शिक्षण, करिअर, भावना यांची गुंतागुंत मांडणाऱ्या त्याच्या आधीच्या चार कादंबऱ्या हातोहात खपल्या. त्यानंतर चेतन भगत तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. मग या ‘यूथ आयकॉन’ने तरुणाईला मार्गदर्शन करणारे ‘रिव्होल्यूशन २०२०’ हे वैचारिक (?) पुस्तक लिहिले. ते अजिबात चालले नाही. म्हणून आता चेतनने हेच विचार कादंबरीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा विचार केला असेल तर त्याचा हेतू चांगला आहे. मात्र, प्रत्यक्ष ‘साहित्य’कृती अजिबात तशी नाही. स्त्रीवाद वगैरे तर, चेतन भगत किंवा वितरण-चमू यांनी मारलेल्या बाताच ठरतात.
- वन इंडियन गर्ल
- लेखक : चेतन भगत
- प्रकाशक : रूपा पब्लिकेशन्स
- पृष्ठे: २८०, किंमत : १७६ रु.
आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com