कॅप्टन मोहन नारायणराव सामंत यांचं निधन गेल्या महिन्यात, २० मार्च रोजी झालं. ते ८९ वर्षांचे होते. अंधेरीजवळ, जुहूला राहायचे. ‘कोण हे कॅप्टन सामंत?’ या प्रश्नाला अनेक उत्तरं आहेत. पण आपल्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं हे की, ‘ऑपरेशन एक्स’ हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक येत्या मे महिन्यात प्रकाशित होणार आहे. त्यापूर्वीच ते गेले, याची हळहळ आहेच. कॅप्टन सामंत यांचा परिवार (तीन मुली, जावई, नातवंडं..), नौदलातील त्यांचे सहकारी यांना जितकं दु:ख झालं, तितकंच ते या पुस्तकाचे सहलेखक संदीप उन्नीथन यांनाही झालं. गेली अडीच वर्ष पुस्तक आकाराला आणण्यासाठी उन्नीथन खपत होते. एवढं काय आहे या पुस्तकात?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याह्य़ाखान यांनी पाकिस्तानातून पूर्व पाकिस्तानच्या (आजचा बांगलादेश) बंगाली भाषकांची कत्तलच आरंभली होती, तेव्हा पाकिस्तानी युद्धनौकांना पाण्याखालून सुरुंग लावण्याचं काम त्यावेळी कमांडरच्या हुद्दय़ावर असणाऱ्या सामंत यांनी केलं होतं. पाकिस्तानी नौदलाला गलितगात्र करणाऱ्या या कारवाईत केवळ ‘लक्ष्यावर मारा करणे’ एवढंच अपेक्षित नव्हतं. लक्ष्य कुठे आहे, हे शोधण्याचंही काम होतं. पाकिस्तानविरोधात पेटून उठलेले काही बांगलादेशी तरुण, पाकिस्तानी नौदलातून ‘फुटलेले’ काही सैनिक व भारतीय नौदलातील काही सहकारी एवढय़ाच मनुष्यबळावर कॅ. सामंत यांनी ही कामगिरी फत्ते केली. त्याबद्दल त्यांना ‘महावीर चक्र’ हा महत्त्वाचा बहुमानही मिळाला.

कॅ. सामंत यांच्या आठवणी, डायऱ्या, काही नोंदी हा या पुस्तकाचा प्रमुख आधार असला, तरी तो तेवढाच नाही. तत्कालीन नौसैनिक आणि अधिकाऱ्यांच्या मुलाखती, सरकारी नोंदी यांवर सहलेखक उन्नीथन यांनी घेतलेल्या परिश्रमांतून हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे. त्यामुळेच ‘आजवर न सांगितला गेलेला, सागरी गनिमी-कावा मोहिमेचा इतिहास’ अशी या पुस्तकाची जाहिरात ‘हार्पर कॉलिन्स’ ही प्रकाशनसंस्था करते आहे. ‘घर मे घुस के मारा’ वगैरे प्रचार ज्या लोकसभा निवडणुकीसाठी केला जातो आहे, तिच्या निकालाहूनही अधिक.. म्हणजे २४ मे २०१९ रोजीपर्यंतची प्रतीक्षा ‘पानी मे घुस के मारा’ची थरारकथा सांगणाऱ्या या पुस्तकासाठी करावी लागणार आहे!

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Operation x book by authors captain mohan narayan rao samant