|| सतीश कामत
हमीर सिंग हे १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे बंदी झाले होते खरे, पण मानसिक पातळीवर हे युद्ध भारतानेच जिंकल्याची हमी त्यांच्या या बंदीकाळातल्या अनुभवांमधून जणू मिळत होती! राजकारण आणि लष्कर यांच्यातल्या फरकाचे, तसेच युद्धाच्या दुसऱ्या बाजूचे दर्शन त्या अनुभवांतून घडत होते..
युद्ध म्हणजे शौर्य. युद्ध म्हणजे साहस. युद्ध म्हणजे वीरता. पण युद्ध म्हणजे..पराभवसुद्धा! होय आणि तो पचवणं नेहमीच अतिशय अवघड असतं. १९७१ च्या डिसेंबरात पाकिस्तानशी झालेल्या युद्धातील विजयाचे पोवाडे आज ५० वर्षांनंतरही अभिमानाने गायले जातात आणि ते स्वाभाविकही आहे. पण याच युद्धात आपल्या सैन्याला काही ठिकाणी पराभवाचाही सामना करावा लागला.
देशाच्या पश्चिम सीमेवर राजौरीजवळ १४ ग्रेनेडिअर्स या बटालिअनचा तळ पडलेला होता. युद्धासाठी सदैव सज्ज असलेल्या या बटालिअनचे प्रमुख मेजर हमीर सिंग यांना ९ डिसेंबर रोजी वरिष्ठांकडून अनपेक्षितपणे आलेल्या आदेशानुसार आणखी चारच दिवसात त्यांच्या सैन्य तुकडीला ‘दारूछिहान’ ही पूंछ आणि मेंढार या टापूतली पाकिस्तानच्या कब्जात असलेली सुमारे एक हजार फूट उंचीची टेकडी पादाक्रांत करायची होती. अतिशय सदोष व्यूहरचनेमुळे या लढाईत भारतीय लष्कराची मोठय़ा प्रमाणत प्राणहानी झाली. गंभीर जखमी अवस्थेतील हमीर सिंग शत्रूच्या हाती सापडले आणि ‘युद्धकैदी’ बनले. ‘पीओडब्ल्यू १९७१ – अ सोल्जर्स अकाउंट ऑफ द हिरॉइक बॅटल ऑफ दारूछिहान’ या पुस्तकाचं मुख्य कथन इथून सुरू होतं.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये राजकीय पातळीवर शत्रुत्वाची भूमिका असली तरी सामान्य नागरिकांच्या पातळीवर अनेक वेळा परस्पर सौहार्दाची भावना अनुभवाला येते. हमीर युद्धकैदी बनले त्या काळात तर १९४७ पूर्वीच्या अखंड भारतातील सहजीवनाचा अनुभव असलेले हजारो लोक दोन्ही देशांमध्ये हयात होते. त्या स्मृती त्यांच्या मनात अजूनही ताज्या होत्या. युद्धकैदी म्हणून पाकिस्तानातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना तेथील डॉक्टर, परिचारिका, लष्करी अधिकारी, पहाऱ्यावरील सैनिक अशा निरनिराळय़ा लोकांशी त्यांचा संपर्क आला. त्याबाबत पुस्तकातील काही किश्श्यांमधूनही या मिश्र भावनांचा अनुभव येतो.
उदाहरणार्थ, हमीर यांच्यावर पहाऱ्यासाठी नेमलेल्या एका सुभेदार मेजर हुद्दय़ावरील वयस्क अधिकाऱ्याने त्यांच्याकडे भगवद्गीतेच्या इंग्लिश भाषांतराची मागणी केली. ती ऐकल्यानंतर हमीर यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्याचे भाव पाहून तो अधिकारी म्हणाला की, अहो, काही पिढय़ांपूर्वी आम्हीही हिंदूच होतो ना! त्यामुळे माझ्या मुलांना या ग्रंथाबद्दल कळायला हवं. त्यांना त्यातून काही शिकण्यासारखं आहे, असं मला वाटतं. हमीर यांच्या खोलीत ‘कल्याण’ हे धार्मिक-पौराणिक विषयांना वाहिलेलं त्या काळातील लोकप्रिय नियतकालिक एका सफाई कर्मचाऱ्याने पाहिलं. त्यावर वाल्मिकी ऋषींचं छायाचित्र छापलेलं होतं. त्या अंकाची मागणी त्या कर्मचाऱ्याने केली. भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी का भांडतात, काही कळत नाही, असं म्हणत एका न्हाव्याने तर गप्पांच्या ओघात, इंदिराजींनी आणखी काही काळ युद्ध चालू ठेवलं असतं तर आपण पुन्हा एकत्र आलो असतो, अशी धक्कादायक टिप्पणी केली. याच्यासारख्याच आणखीही काही स्थानिक लोकांच्या बोलण्यातून तत्कालीन पाक राजकारणी व लष्कराबद्दल राग, तिरस्कार आणि भ्रमनिरासाची भावना हमीरना जाणवली होती. अर्थात काही युद्धकैद्यांना दुसऱ्याही प्रकारचे अनुभव आले.
शत्रू पक्षाकडे सुमारे वर्षभर घडलेल्या या सक्तीच्या पाहुणचारात हमीर यांच्यातील नेतृत्वगुणांचीही झलक दिसून आली. त्यांच्याबरोबर हिंदू, शीख आणि मुस्लीम अशा तिन्ही धर्माचे युद्धकैदी होते. यापैकी शीख आणि मुस्लीम कैद्यांचा बुद्धिभेद, मानसिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न तेथील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला. पण ते देशप्रेमी जवान बधले नाहीत. मुस्लीम धर्मीयांसाठी प्रार्थनेचीही वेगळी व्यवस्था मुद्दाम केलेली होती. हमीदनी त्याला आक्षेप घेतला एवढंच नव्हे, तर त्यांच्या आग्रहामुळे त्या वर्षीचा ईदचा कार्यक्रम तिन्ही धर्मीय जवानांनी एकत्र येऊन गळाभेट घेत साजरा केला. भारतीय लष्कराची धर्मनिरपेक्षतावादी शिकवण आपल्या जवानांच्या मनात किती उत्तम प्रकारे रुजली आहे, हे यातून प्रतीत होतं. या भारतीय युद्धकैद्यांना खेळण्यासाठी फुटबॉल, व्हॉलीबॉलची मैदाने मिळावीत म्हणून सर्वाच्या वतीने पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडे हमीरनी केलेली शिष्टाईही यशस्वी झाली होती.
दारूछिहानच्या डोंगरउतारावर शत्रूशी दोन हात करत असताना १४ डिसेंबर १९७१ रोजी हमीरना पाकिस्तानी जवानांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर बरोबर साडेअकरा महिन्यांनी, ३० नोव्हेंबर १९७२ रोजी त्यांच्यासह सर्व कैद्यांची सुटका झाली. त्यांच्यातील सर्वांत ज्येष्ठ अधिकारी म्हणून इथेही हमीर यांच्याकडेच नेतृत्व होतं. १ डिसेंबर १९७२ रोजी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री झैलसिंग यांनी वाघा सीमेवर सर्वाचं स्वागत केलं. तिथे जमलेल्या गर्दीत भारत-चीन युद्धासह अनेक लढाया लढलेले आपले वडील मेजर जनरल कल्याणसिंह यांना पाहून हमीरना सुखद धक्का बसला. पण लढाईत त्यांच्यासह लढताना हौतात्म्य पत्करावं लागलेल्या लेफ्टनंट दलाल यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील चिंता, दु:ख, तरीही मुलगा जिवंत परत येण्याचा वेडा आशावाद पाहून ते अतिशय खिन्न झाले. हाच अनुभव लढाईत मारल्या गेलेल्या मेजर गोसीन या तरुण अधिकाऱ्याची पत्नी काही महिन्यांनी भेटली तेव्हाही आला.आपल्या पतीचा मृत्यू नेमका कसा झाला, इतकंच तिला जाणून घ्यायचं होतं. त्यापेक्षाही जास्त मोठा धक्का, युद्धानंतर ३०-३५ वर्षांनी या ज्येष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांना इथली प्रशासकीय सेवा किंवा तरुण पिढीकडून मिळणाऱ्या वागणुकीतून त्यांना बसला. त्या काळातील कमालीच्या मानसिक ताणाचे परिणाम हमीर यांच्या पत्नीवर आयुष्याच्या उत्तरार्धातही जाणवत असतात.
वयाची ऐशी वर्ष उलटलेल्या ब्रिगेडिअर हमीर सिंग यांच्या घराण्यातली पाचवी पिढी आता भारतीय लष्करात सेवा बजावत आहे. त्यापैकी त्यांचे चिरंजीव मेजर जनरल विजय सिंग यांनी पिताजींच्या लष्करी कारकीर्दीचा हा आलेख या पुस्तकाच्या माध्यमातून उभा केला आहे. हमीर यांनी लिहिलेले काही युद्धविषयक अहवाल, बालपणी त्यांच्या तोंडून ऐकलेल्या युद्धकथा, काही ध्वनिमुद्रित कथन आणि दुर्मीळ छायाचित्रांच्या आधारे तो साकारला आहे. एरवी गौरवल्या जाणाऱ्या किंवा उदात्तीकरण होणाऱ्या युद्धाची ‘दुसरी बाजू’ या संकलनात्मक कथनातून वाचकांपुढे परिणामकारकपणे सादर झाली आहे.
satish.kamat@expressindia.com