मॅन बुकर पारितोषिकाच्या अंतिम निवडीसाठी सहा पुस्तकांची लघुयादी दरवर्षी काढली जाते. त्या यादीतील यंदाच्या कादंबऱ्यांपैकी निवडक पुस्तकांची ओळख करून देणारं हे अल्पजीवी लघुसदर! पहिला लेख, कथाकार म्हणून वाचकपसंती मिळवणारी लेखिका ओटेसा मॉशफेग हिच्या ‘आयलीन’ या कादंबरीबद्दल..
आत्मचरित्रांची एक गंमत असते. ती जास्त कादंबरीसारखी वाटतात. कारण शंभरातली नव्याण्णव आत्मचरित्रे आत्मस्तुतीग्रस्त असतात. त्यात नायक/नायिकेच्या कष्टप्रद जगण्यातून वर येतानाची धुतल्या तांदळासारखी स्थिती आरंभापासून अंतापर्यंत टिकवून ठेवण्यात आलेली असते. कादंबरीरूपी आत्मचरित्रांची निर्मिती ही अशाच आत्मचरित्रांची खिल्ली उडविण्यासाठी निघाली असावीत, कारण त्यात आत्मवंचना, आत्मटीका आणि आत्मपरीक्षणाच्या कित्येक शक्यता तयार होऊ शकतात . दुसऱ्या महायुद्धानंतर अशा कादंबरीरूपी आत्मचरित्रांची सुरुवात झाली. त्यातले सर्वात मोठे गाजलेले उदाहरण म्हणजे ‘कॅचर इन द राय’ हे जे. डी. सालिंजर यांचे पुस्तक . या पुस्तकाने म्हणे इंग्रजी कादंबरी लेखनाच्या धाटणीमध्ये बदल घडविले. हा मुद्दा वादाचा असला तरीही, खऱ्या अर्थाने सर्वत्र पोहोचलेले कादंबरीरूपी आत्मचरित्र आहे विन्स्टन ग्रूम यांचे ‘फॉरेस्ट गम्प’. १९८५ साली आलेल्या या कादंबरीत १९६० ते ८० काळातील अमेरिकेतील सर्वच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा साक्षीदार किंवा सहभागी ‘फॉरेस्ट गम्प’ हा वेडाविद्रा नायक दाखविला आहे. ओटेसा मॉशफेग यांची ‘आयलीन’ कादंबरी वाचताना सातत्याने फॉरेस्ट गम्पची आठवण होते. पण वेगळ्या अर्थाने. यात अमेरिकेतील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घटनांना तिलांजली देऊन फॉरेस्ट गम्पइतक्याच ताकदीचे आत्मव्यंगी निवेदन करणारी न-नायिका आयलीनच्या रूपाने भेटते म्हणून.
ओटेसा मॉशफेग हे नाव समांतर अमेरिकी कथा वाचणाऱ्या वाचकांसाठी गेल्या दोनेक वर्षांत महत्त्वाचे बनलेले आहे. तिचा कादंबरीचा पहिलाच प्रयत्न बुकर पारितोषिकाच्या यंदाच्या लघुयादीपर्यंत पोहोचला आहे. आणि चित्रपटासाठी कादंबरीचे हक्क बडय़ा कंपनीला मोठय़ा रक्कमेसह विकले गेले आहेत. या कादंबरीचे पहिले प्रकरण संपेस्तोवर यातील ननायिकेचे स्वतविषयीचे घृणाख्यान वाचताना कादंबरीतील व्यक्तिरेखा पुढे आणखी किती घसरण दाखविणार याविषयी चिंता निर्माण करते. पण तिच्या निवेदनाच्या वज्रमुठीतून सुटका होण्याची सुतराम शक्यता कादंबरी संपविल्याशिवाय राहत नाही.
या कादंबरीत आयलीन ही आता सत्तरेक वर्षांची असलेली निवेदिका आपल्या आठवणींतून १९६४ सालच्या नाताळातील आख्खा आठवडा समोर आणते. निवेदन सुरू होते ते २४ वर्षांच्या आयलीनच्या मुखातून. आत्तापर्यंत जगलेल्या मुर्दाड आयुष्याला लाथाडून गावातून परागंदा होणार असल्याचे ती सुरुवातीलाच स्पष्ट करते. यात ओळख होते ती बालसुधारगृहात काम करणाऱ्या तरुणीची. तिच्या भीषण कुरूपपणाची, शरीरही अनाकर्षक असल्याने पदोपदी दुर्लक्षिले जाण्याचे दु:ख वागवत सुकत जाणाऱ्या स्त्रीत्वाची, तिचा आहार आणि विहार अयोग्य असल्याची. शारीरिक संबंधांविषयी तिला प्रचंड गोंधळयुक्त घृणा असल्याची, आपल्यावर बलात्कार व्हावा, पण तो सुंदर माणसाकडूनच या विचित्र सुप्ताकांक्षेची. मद्यपी पित्याला मारून टाकावे ही उबळ रोखून त्याला दारू पाजून जगविण्याच्या तिच्या असहाय्य स्थितीची.
आईच्या आजारपणामुळे शिक्षण सोडून बालसुधारगृहात कनिष्ठ पदावर नोकरी करणारी आयलीन वयाच्या चोविसाव्या वर्षांपर्यंत कामाच्या आणि जगण्याच्या त्याच त्या चरक्यात अडकते. या दरम्यान, तिची बहीण परागंदा होते. आईचा मृत्यू होतो. पोलीसदलात शून्य कर्तबगारी दाखवून निवृत्त झालेले वडील चोवीस तास मद्याच्या अंमलातही पिस्तुल बाळगून ‘सुपरमॅनी’ कामगिरीच्या प्रतीक्षेत घरात पडून राहतात. मित्र, मैत्रीण, छंद या सर्वाचे दुर्भिक्ष्य असलेली आयलीन आत्मघृणेने काठोकाठ भरलेली असते.
घरातील साफसफाईकडे तिने कैक वर्षे दुर्लक्ष केलेले असते. वाचन हा तिच्यासाठी काही प्रमाणात दिलासादायक भाग असला, तरी कथा/कादंबऱ्यांच्या वाचनात तिला स्वारस्य नसते. ‘नॅशनल जिऑग्राफिक’ मासिकाची ती खंदी वाचक आणि वर्गणीदार असून सोबत खून, गुन्हेवार्ता आदींमध्ये तिला सर्वाधिक उत्सुकता असते. याशिवाय त्या काळाच्या पुढे बंडखोर म्हणावा असा स्वत:चा विरंगुळा तिने शोधून काढलेला असतो. सुधारगृहातील सुरक्षा रक्षकांमध्ये असलेल्या रॅण्डी नावाच्या एका सुंदर तरुणाची हेरगिरी ती करते. म्हणजे त्याला मिळविण्यासाठी काहीही करायच्या अशा प्रेमिकेच्या स्थितीत ती नाही. पण सवय लागल्यासारखे अन् दुसरे करायला हाती काही नसल्याने गाडी घेऊन त्याच्या घराभोवती गुपचूप लपून त्याच्या हालचालींवर, मित्रमैत्रिणींवर लक्ष्य ठेवण्याचे तिचे कार्य अव्याहत सुरू राहते. या कार्यातून घरी पोहोचायला उशीर झाल्यास प्रियकरासोबत सिनेमाला गेले होते, ही वडिलांना कधीच न पटणारी थाप ठोकायला ती मोकळी असते.
वडिलांसोबतचे तिचे नाते कोणत्याही पित्याचे आपल्या मुलीशी असणार नाही, इतके चमत्कारिक आणि गूढ आहे. दोघे एकत्र दारुही पितात आणि वडिलांना मारण्याच्या प्रयत्नांना मध्येच सोडून त्यांच्या तिच्याविषयीच्या तिटकाऱ्यात वाढ करण्यामध्ये आयलीनला काहीच वाटत नाही.
कादंबरीचा पन्नास ते साठ टक्के भाग हा आयलीनच्या नीरस आयुष्याच्या प्रत्येक घटनेला अत्यंत कोरडेपणाने मांडण्यात जातो. १९६०चे अमेरिकी दशक हे कैक अर्थाने जगावर परिणाम करणारे होते. संगीत, सिनेमा यांची ठोक निर्यात या काळात सुरू झाली. बंडखोरी, स्त्रीवाद, मानवी हक्क चळवळ, युद्धविरोधी चळवळ आदी साऱ्या याच काळात झाल्या. या कादंबरीचा विशेष हा की या कादंबरीत आयलीन सिनेमापासून गाण्यांपर्यंत सगळ्यांचा आटोकाट तिरस्कार करते. लोकप्रिय कलाकार आणि त्यांची गाणी तिला माहिती आहेत, पण त्या साऱ्यांचा तिला उबग येतो. चित्रपटातील गोंडस शरीरयष्टी आणि सुंदर चेहरा लाभलेल्या नायिकेचे भले होणारे शेवट तिला ओकारी आणणारे वाटतात. एकूणच समाजमान्य अशा सर्वच घटकांना ती नाकारत जाते. तिच्या घरी टीव्ही आहे, पण तोदेखील तुटल्यामुळे दुरुस्त करण्याची तिची इच्छा नाही. अधूनमधून दुकानांमधील किडुक-मिडुक गोष्टी लांबविण्याची विरंगुळासदृश गोष्ट ती करते. शरीराला आत्मसुख देण्याचे तिचे तपशिलातील अरंजक कथनही या न-नायिकेविषयी कीव करण्यापर्यंत पोहोचते. या सगळ्या अतिआत्मघृणेच्या टोकावरच सुधारगृहामध्ये मुलांना शिक्षण, साहित्याचे धडे देण्यासाठी रिबेका या तरुणीची नेमणूक होते. आयलीनहून पूर्णपणे भिन्न असलेली ही तरुणी पुढल्या काही दिवसांतच तिचे आयुष्य चौफेर बदलून टाकते. रिबेकासोबत आत्मसुखाचे क्षण मिळविण्यासोबत प्रचंड धाडसी कृत्य ती करू धजावते.
कादंबरीतले आयलीनचे जगणे अत्यंत भीषण असले, तरी निवेदनातील व्यंग्यात्मकता वाचकाला कादंबरी सोडू देत नाही.
ज्यांनी चेकॉव्हची ‘ए बोअरिंग स्टोरी’ ही प्रदीर्घ कथा वाचली असेल, त्यांना सुरुवात करताना शीर्षकाचा मथितार्थ जाणवूनही ती कथा पकडून कशी ठेवू शकते,याचा प्रत्यय आला असेल. तशाच प्रकारचे काहीसे या कादंबरीबाबत होते. १९६४ सालातील अमेरिकी मध्यमवर्गीय कुटुंब. धार्मिकतेचा बडेजाव माजवूनही पोर्नोग्राफिक मासिकांची हौस पुरवून घेणारी ढोंगी प्रवृत्ती, वाढत जाणारी विकृती, कुटुंबांची आणि जगण्याची विखंडित अवस्था कादंबरीमध्ये मांडण्यात आली आहे. ओटेसा मॉशफेग हिच्या बहुतांशी कथा नकारात्मक जगाचे चित्रण करणाऱ्या असतात. आयलीन कादंबरीही त्याला अपवाद नाही. ही कादंबरी बुकर पारितोषिक मिळविणारी ठरली, तर हे नकारात्मक जग लेखिकेसाठी सकारात्मक ठरू शकेल.
आयलीन
लेखिका: ओटेसा मॉशफेग
प्रकाशक : रँडम हाउस
पृष्ठे : २७२, किंमत : ५२४ रुपये (निवडक दुकानांत फक्त पुठ्ठाबांधणी उपलब्ध, पेपरबॅक अपेक्षित)
pankaj.bhosale@expressindia.com
( लेखिकेच्या कथा पॅरिस रिव्ह्य़ू, न्यूयॉर्कर, व्हॉइस, जॉयलॅण्ड मासिकांच्या संकेतस्थळांवर मोफत उपलब्ध आहेत.)