देशात ‘उजवे’ राजकारण म्हटल्यावर उगाच एक चित्र उभे राहाते. मुळात राजकारणातील डावी-उजवी विभागणी युरोपीय; पण विद्यमान पक्षांपर्यंत ती कायम आहे.
मग हेच आजचे पक्ष, कालच्या नेत्यांना ‘उजवे’ ठरविण्यात धन्यता मानतात. प्रत्यक्षात हे गतकाळातील नेते तसे होते का? याचे उत्तर इतिहासाची छाननी करून शोधणाऱ्या संशोधनपर पुस्तकाबद्दल..
पाश्चात्त्य राजकीय विश्लेषकांनी राजकीय विचारसरणींची विभागणी सर्वसाधारणपणे डावी आणि उजवी अशा दोन ढोबळ प्रकारांत केली आहे. विशेषत: युरोपीय राजकारणात या दोन विचारसरणी नेहमीच परस्परविरोधी असल्याचे आढळले आहे. युरोपीय राजकारणातील ही विभागणी भारतीय राजकारणातही तशीच्या तशी लावण्याचा प्रयत्न पूर्वी केला गेला आहे आणि आजही केला जातो. आणि त्यामुळेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या एकाच राजकीय पक्षात असलेल्या दोन विचारसरणी बाळगणाऱ्या नेत्यांना डावे आणि उजवे असे संबोधून त्यांची विभागणी केली जाते. अशी विभागणी कितपत बरोबर आहे, त्यांच्या मतभेदांचे विषय नेमके कोणते होते, तसेच मतभेदांची कारणे काय होती आणि त्यांची मतभिन्नता असतानाही ते एकाच पक्षात का काम करीत होते, या प्रश्नांची उत्तरे ‘पटेल, प्रसाद अॅण्ड राजाजी : मिथ ऑफ इंडियन राइट’ या सेज प्रकाशनगृहाने प्रकाशित केलेल्या नीरजा सिंग यांच्या पुस्तकातून मिळतात.
या पुस्तकात सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि राजगोपालाचारी या उजव्या विचारांच्या समजल्या जाणाऱ्या भारतीय लोकनेत्यांच्या, विविध विचारांच्या आणि विविध प्रश्नांवरच्या त्यांच्या भूमिकांचा विचार लेखिकेने केला आहे.
‘‘अन्य देशांतील प्रतिमानांना उचलून जसेच्या तसे आपल्या देशाला लावणे, हे नेहमीच बरोबर असते, असे मला वाटत नाही. कारण परिस्थिती वेगळी असते. ’’ या राजाजींच्या उद्धरणाने, ‘क्रायसिस ऑफ पॅराडिजम : हिस्टॉरिसिटी ऑफ द कन्सेप्ट ऑफ राइट’ या प्रकरणाचा प्रारंभ होतो. या प्रकरणात लेखिकेने डावे आणि उजवे या संकल्पनांची उत्पत्ती, विविध व्याख्याकारांनी केलेल्या व्याख्या यांचा सविस्तर ऊहापोह करून पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांच्या मधल्या काळात या दोन विचारसरणींचे एकमेकांशी काय संबंध होते, याची सविस्तर चर्चा केली आहे. ‘फ्रान्स आणि ब्रिटनने १९३० च्या दशकात हिटलरकडे दुर्लक्ष केले. कारण या नॉन-फॅसिस्ट उजव्यांना, कम्युनिस्टांना नष्ट करायचे घाणेरडे कार्य फॅसिझम करेल असे वाटत होते,’ हे निरीक्षण लेखिकेने नोंदविले आहे.
पटेल, प्रसाद आणि राजाजी हे साम्राज्यवादाविरुद्धच्या महात्मा गांधींच्या संघर्षांत त्यांचे निकटचे सहकारी होते आणि त्यांनी लोकशाही, नागरी स्वातंत्र्य, स्वदेशी, सामाजिक सुधारणा, गरिबांची उन्नती करणारा विकास, विकेंद्रीकरण, वसाहतवादविरोध, सेक्युलॅरिझम आणि वांशिक सहअस्तित्व ही काँग्रेस विचारसरणीची मूलभूत मूल्ये स्वीकारून स्वातंत्र्यासाठीचा लढा दिला, हे नमूद करून लेखिकेने १९४९ मध्ये सरदार पटेल यांच्या भाषणातील ‘‘स्वतंत्र भारतात जात, धर्म, पंथ वा वर्ग यांच्यात ते दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवतील असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कदाचित त्यात गरीब आणि श्रीमंत, सुखी आणि दुखी असे लोक असू शकतील. पण एका नागरिकाहून दुसऱ्या नागरिकाच्या दर्जात कोणताही फरक नसेल,’’ हे वचन उद्धृत केले आहे.
राष्ट्रवादाची व्याख्या करताना ‘उजवे’ म्हटले जाणाऱ्या या त्रयीच्या राष्ट्रवादाचा उगम िहदू वेद-शास्त्रे वा पुराण-विद्या नव्हती, तर गांधींनी प्रतिपादलेला बहुलवादी (प्लुरॅलिस्टिक) राष्ट्रवाद होता, हे या पुस्तकात अनेक उदाहरणांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसमधील डावे आणि उजवे यांच्यात मतभेद असूनही स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत ते एकत्र राहिले याला लेखिका, ‘समाजवादी नेते पटेल, राजाजी आणि प्रसादांप्रमाणे ग्रामीण जनतेची मने जिंकण्यात अपयशी ठरले हे एक आणि दुसरे म्हणजे त्यांना साम्राज्यवादी ब्रिटिशांविरुद्ध लढायचे होते व त्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या ऐक्याबरोबरच श्रीमंत, जमीनदार, सावकार, राजे, महाराजे, नवाब, व्यापारी, उद्योजक या साऱ्याच वर्गाचा पाठिंबा हवा होता,’ ही दोन कारणे देतात.
‘सोशल व्हिजन ऑफ द काँग्रेस राइट’ या प्रकरणात उपरोक्त त्रयीच्या जातिव्यवस्था, अस्पृश्यता, मंदिरप्रवेश, महिलांची प्रतिष्ठा, बालविवाह, विधवांची परिस्थिती, पडदापद्धती, घटस्फोट, स्वदेशी या विषयांवरच्या मतांचा सविस्तर आढावा घेतला आहे. तो वाचल्यावर काँग्रेसमधील डावे आणि उजवे यांच्या या विषयांवरील मतांमध्ये सारखेपणा स्पष्ट होतो. बऱ्याचदा डावे जास्त उजवे वाटतात तर उजवे जास्त डावे वाटतात.
जातीय प्रश्न आणि फाळणी या विषयांवरची सविस्तर चर्चा तिसऱ्या प्रकरणात केली आहे. हे तीनही नेते जातीय प्रश्नांची निर्मिती ब्रिटिशांची आहे आणि ब्रिटिश निघून गेल्याशिवाय त्यात तोडगा निघणार नाही, या मताचेच होते. परंतु पुढे जेव्हा फाळणी अटळ आहे, ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा या नेत्यांतच काही बाबतीत मतभेद स्पष्ट होतात. फाळणीच्या अपरिहार्यतेची जाणीव राजाजींना सर्वप्रथम झालेली दिसते. १९४३ मध्ये ते म्हणतात-
‘‘एकत्र राहणे कदाचित विश्वासघात असेल, विभक्ततेचा अर्थ शांती होऊ शकेल.. अर्थातच तुम्ही मांजर आणि कुत्र्याला एकत्र बांधू शकता, रस्त्याने खेचत नेऊन किती उत्तम ऐक्य आहे असे म्हणू शकता. तथापि, ऐक्याचा खरा मार्ग, ‘जायचे असेल तर जा, परतायचे असेल तर परता, राहायचे असेल तर राहा,’ असे सांगणे हा आहे.’’
याच काळात सरदार पटेलांनीही मुसलमानांबाबत रोखठोक बोलायला सुरुवात केल्याचे दिसते. मुस्लिम लीगला आपण झुकते माप देता, असे त्यांनी व्हाइसरॉयला ठणकावले आणि मुस्लिमांना, ‘दोन घोडय़ांवर स्वार न होता तुम्हाला जो चांगला वाटतो, तो एक घोडा स्वीकारा’ असे पटेल सांगत होते असे लेखिकेने नमूद केले आहे. अशाच वक्तव्यांच्या आधारे जातीयवादी प्रवृत्ती सरदारांना िहदुत्ववादी गटात ओढतात. पण असे म्हणणाऱ्या सरदारांच्या, १९५० साली हैदराबादला केलेल्या भाषणातील पुढील ओळी लेखिकेने उद्धृत केल्या आहेत-
‘‘आमचे राज्य सेक्युलर राज्य आहे. आम्ही आमची धोरणे वा आमची वर्तणूक पाकिस्तानप्रमाणे ठरवू शकत नाही. आमचे सेक्युलर आदर्श प्रत्यक्षात आणावेच लागतील.. येथे प्रत्येक मुसलमानाला तो भारताचा नागरिक आहे असेच वाटले पाहिजे. आपण जर त्याला असे वाटू देऊ शकलो नाही, तर आपण आपल्या वारशाला आणि देशाला पात्र असणार नाही.’’
काँग्रेसमधील उजव्यांच्या आíथक आणि राजकीय विचारसरणीची सविस्तर चर्चा पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणात केली आहे. उजवे म्हणजे जमीनदारधार्जणिे, पुराणमतवादी, गरिबांच्या शोषकांचे कैवारी इत्यादी चित्रे एरवी आपल्या डोळय़ांपुढे असू शकतात, परंतु हे प्रकरण वाचल्यावर निदान काँग्रेसमधील उजव्यांबाबत हे चित्र खोटे ठरते. जमीनदारी संपवताना, जमीनदारांना नुकसानभरपाई देण्यास विरोध करताना राजाजींनी ‘‘दुसऱ्या गोलार्धामध्ये एके काळी मौल्यवान मालमत्ता होती. त्यांच्याकडे गुलाम होते. गुलामी नष्ट करताना त्यांना नुकसानभरपाई दिली होती काय,’’ असा प्रश्न विचारला आणि जमीनदारी अधर्म असल्याचे म्हटले. तथापि, त्यांनी वर्गयुद्धाला वाव नसलेली, सामाजिक समरसता आणि सहकार्यावर आधारित अर्थव्यवस्था प्रतिपादित केली. भांडवल आणि श्रम यांतील संघर्ष या नेत्यांना नको होता आणि तो देशाला परवडणाराही नव्हता. गांधीजींच्या या शिष्यांनी गरिबीचा गौरव करणाऱ्या ‘दरिद्रीनारायण’ या संकल्पनेचा स्वीकार गरिबी गौरवण्यासाठी नव्हे तर, आपली आíथक, सांस्कृतिक धारणे दारिद्रय़ाभोवती केंद्रित करून ती नाहीशी करण्यासाठी केला.
ठिकठिकाणच्या संस्थांनी प्रजांनी त्यांच्या शासनकर्त्यांविरुद्ध उभारलेल्या लढय़ात हस्तक्षेप न करण्याच्या काँग्रेसच्या धोरणाची जबाबदारी या त्रयीवर टाकून त्यांना संस्थानिकधार्जणिे म्हटले जायचे. परंतु ते धोरण योग्यच होते. कारण स्वतंत्र भारतात ही संस्थानेही यायची होती आणि स्वातंत्र्यासाठी संस्थानिकांचा पाठिंबा नको, पण निदान विरोध तरी असणार नाही एवढी काळजी घ्यायला हवी, याचे भान या नेत्यांना होते, हे लेखिकेने समर्पकपणे मांडले आहे. त्याचप्रमाणे, सुभाषचंद्र बोस यांना केवळ गांधींचा आणि उजव्यांचाच विरोध नव्हता, तर समाजवादी नेते नरेंद्र देव यांचाही विरोध होता, ही बाबही पुस्तकातून स्पष्ट होते.
रूढार्थाने या त्रयीला उजवे समजले जाते. आजकाल तर गांधींसहित सारे उजवे- विशेषत: सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद कसे िहदुत्ववादीच – होते, हे दाखविण्याचा आटापिटा चालला आहे. सोमनाथ जीर्णोद्धाराला राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची उपस्थिती, हे याचे प्रमाण म्हणून देण्यात येते. या नेत्यांना त्यांचा धर्म प्रिय होताच, पण त्यासाठी त्यांना अन्य धर्माचा द्वेष करावा लागत नव्हता आणि ते जातीयवादी तर अजिबात नव्हते. दिल्लीत केल्या गेलेल्या लुटीला, लावलेल्या आगींना आणि मुसलमानांच्या कत्तलींसाठी, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे आरएसएसला (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला) जबाबदार धरत होते आणि १४ मे १९४९ रोजी सरदारांना त्यांनी लिहिलेल्या पत्रात, आरएसएस नव्याने तयारी करून िहदू आणि मुसलमान विभागांमध्ये दंगली करणार असल्याचे सूचित केले होते. िहदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आरएसएस हे करीत असल्याचे लिहून त्यांनी, सरदारांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी विनंतीही या पत्रात केली आहे, असे लेखिका लिहिते. प्रसाद यांनी संघाबाबत, ‘ब्रिटिश निघून गेल्यावर पुन्हा पेशवाई आणण्यासाठीची महाराष्ट्रीय ब्राह्मणांची चळवळ’ असे म्हटले होते, हेदेखील सप्रमाण सांगून लेखिका या त्रयीची सेक्युलॅरिझमवरची निष्ठा सिद्ध करते.
विद्यापीठीय शिस्तीने हा अभ्यास झालेला आहे. म्हणून ते केवळ विद्यापीठांत किंवा इतिहासाच्या अभ्यासकांनीच वाचावे, असे काही नाही. भारतीय सेक्युलॅरिझम हा जगभरात अनोखा का समजला जातो, भारताचे विभाजन होऊनही, अमानुष दंगली आणि रक्तपात घडूनही भारत एक सेक्युलर देश का बनतो आणि नष्ट करायचा प्रयत्न करूनही या देशाचा गांधींचा वारसा का संपत नाही, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
पटेल, प्रसाद, राजाजी ‘उजवे’ होते का?
देशात ‘उजवे’ राजकारण म्हटल्यावर उगाच एक चित्र उभे राहाते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-03-2016 at 03:53 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patel prasad and rajaji myth of indian right